लष्करासाठी काश्मिरमधील वर्षांतील सर्वात जास्त व्यस्त महिना.
         Date: 30-Nov-2018

लष्करासाठी काश्मिरमधील वर्षांतील सर्वात जास्त व्यस्त महिना.

 

आज संपणाऱ्या महिन्यात आपल्या जवानांनी काश्मीर खोऱ्यात आतापर्यंत एकूण ३९ दहशतवाद्यांना यमसदनी धाडले आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिना वर्षातील इतर महिन्यांच्या तुलनेत संरक्षण दलांसाठी सर्वात व्यस्त गेला असेच म्हणावयास लागेल. लष्कर ए तोयबाचा कमांडर नावीद जट हे मारल्या गेलेल्या अतिरेक्यांपैकी मुख्य नाव आहे. याला आपल्या लष्कराने याच आठवड्यातील बुधवारीच टिपले. लष्कराने अश्या काही प्रमुख दहशतवाद्यांची यादीच तयार केलेली असून एकामागोमाग एक प्रत्येकाला टिपण्याचा कार्यक्रमच हाती घेण्यात आलेला असल्याचे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.

 

 

संरक्षण दलांनी यावर्षी जूनपर्यंत २३३ दहशतवाद्यांना ठार केले आहे. मागील संपूर्ण वर्षात २१३ दहशतवादी ठार करण्यात आले होते त्याच्या तुलनेत हा आकडा बराच मोठा आहे. पण हे इथेच थांबत नाहीये. लष्कराकडे माहिती आहे की दक्षिण आणि मध्य काश्मीरच्या काही विशिष्ट भागात दहशतवादी गोळा होत आहेत. यांमध्ये लष्कराने बनविलेल्या यादीतील टॉप ३ दहशतवादी असण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे वर्षाच्या शेवटी मोठी धुमश्चक्री पहावयास मिळण्याची अपेक्षा आहे.

 

बुधवारी दिल्ल्लीमध्ये एका कार्यक्रमाच्या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी सांगितले,"जम्मू-काश्मीर प्रदेशातील एकेकाळी पहिल्या १२ क्रमांकाच्या दहशतवाद्यांना एकापाठोपाठ एक टिपून काढण्याचे काम आपली संरक्षण दले येथे करीत आहेत. या सगळ्यांचा निःपात करून त्यांचे नेतृत्व खणून काढणे हाच आमचा उद्देश आहे. नावीद जट ला ठार केल्यानंतर आता आम्ही हिजबुल मुजाहिद्दीनचा काश्मिरमधील ग्रुप चीफ ऑपरेशनल कमांडर झीनत उल इस्लाम, रियाझ अहमद नैकू, झाकीर मुसा, अन्सार गझावत उल हिंद या सर्वांचा शोध घेत आहोत. या सर्वांना संरक्षण दलांनी कुख्याततेच्या पातळीवर ए++ दर्जा दिलेला आहे."

 

दहशतवाद्यांना अश्या पातळीवर आणून ठेवायचे आहे की तिथून पुन्हा उभे राहणे त्यांना शक्य होता कामा नये. काश्मीर मधील अतिरेक्यांपैकी बहुतांश अतिरेकी हे शॉपीअन, अनंतनाग, बुडगाम, कुलगाम आणि श्रीनगर या ५ प्रदेशांशीच निगडित असल्याच्या पक्क्या खबरा आम्हाला आहेत असे एका सरकारी अधिकाऱ्याने बोलताना सांगितले.

 

सध्या स्थानिकांकडूनही मोठ्या प्रमाणात माहिती मिळत असल्याचे रावत यांनी सांगितले. स्थानिकांकडून मिळत असलेल्या माहितीच्या आधारावरच हल्लीच्या काळात बऱ्याच मोहिमा यशस्वी झाल्या असल्याचेही लष्कर प्रमुखांनी आवर्जून सांगितले. "मागील ४ दिवसात आम्ही १८ दहशतवाद्यांना ठार केले आहे. यामध्ये दक्षिण काश्मिरमधील काही प्रमुख दहशतवादी नेत्यांचा समावेश होता.

 

ऑगस्ट महिन्यात लष्कराने काश्मीरमध्ये २८ दहशतवाद्यांना ठार केले होते, सप्टेंबर मध्ये २९, ऑक्टोबर मध्ये पुन्हा २८ आणि आता नोव्हेंबर मध्ये ३९ (ही बातमी लिहीपर्यंत). लक्ष देता एक महत्त्वाचा आलेख आपल्याला दिसून येतो. दहशतवाद्यांच्या बाबतीत कोणतेही मवाळ धोरण अवलंबिणे लष्कराने साफ सोडून दिलेले आहे. याचाच परिणाम म्हणून या महिन्यात स्थानिकांपैकी एकही जण या दहशतवादी गटांमध्ये दाखल झालेला नाही. ऑक्टोबर महिन्यातील स्थानिक भरतीचा आकडा ३३ असताना पुढच्याच महिन्यात तो सरळ शून्यावर आलेला आहे. अश्याप्रकारे दहशतवादी संघटनेच्या स्थानिक पातळीवरील भरतीच्या घसरलेल्या आकड्यामुळे अर्थातच या दहशतवादी संघटना आणि संरक्षण दले यांच्यातील चकमकींचे प्रमाणही कमी झाले आहे.

 

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk)

Source: ET

Deadliest month for the security forces in Jammu & Kashmir.