बलुचिस्तान- पाकिस्तानची दुखरी नस!
         Date: 02-Dec-2018
बलुचिस्तान- पाकिस्तानची दुखरी नस!
 

 
 
Contemporary era मध्ये एखाद्या देशाच्या मिलिटरी आणि government कडून संपूर्ण समाजावर केल्या जाणाऱ्या अत्याचारांचे, exploitation चे एक prominent example. भारतात minorities म्हणजेच अल्पसंख्याकांना कशी ट्रीटमेंट दिली जाते तर पाकिस्तानात बलोच अल्पसंख्यांकांना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे, हे खरंच विचार करण्यासारखे विषय आहेत. या सगळ्या परिस्थितीचा मागोवा घेताना काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला याच्या कारणांपर्यंत घेऊन जायला मदत करतात.
कोण आहेत हे बलोच लोक? पाकिस्तानचे सरकार स्वतःच्याच नागरिकांवर इतके अनन्वित अत्याचार का करत आहे? या समाजाप्रती बलुचीतर पाकिस्तानी नागरिकांच्या काय भावना आहेत बरे? अश्या प्रश्नांची उत्तरे मिळवायला 'बलुचिस्तानचा इतिहास' समजून घ्यायला हवा.

बलुचिस्तान नावाने ओळखला जाणारा हा प्रांत आजमितीला तीन देशांत तोडला गेला आहे. इराणचा पूर्व भाग, पाकिस्तानचा पश्चिम भाग आणि दक्षिण अफगाणिस्तान हे एकत्रितपणे Balochistan province म्हणून शतकानुशतके ओळखले जात आहेत. बलोच इतिहास 'राजा दाहीर सेनची गोष्ट' सांगितल्याशिवाय पुराच होऊ शकत नाही. हा सिंध म्हणजेच आत्ताचे बलुचिस्तान प्रांताचा शेवटचा हिंदू राजा होता. अतिशय शूर, दिलदार, प्रजाहितदक्ष राजा अशी त्याची ख्याती होती. असे म्हटले जाते कि हाच तो उदार, जिंदादिल राजा ज्याने प्रॉफेट मोहम्मद यांच्या कुटुंबाला आश्रय दिला होता. परंतु त्यांच्या मागोमाग आला, त्यांच्या जीवावर उठलेला मोहम्मद बिन कासीम. याच्याशी राजा दाहीरचे 'अरोर म्हणजे सिंधची राजधानी', येथे तुंबळ युद्ध झाले. सिंधू नदी ओलांडून हे युद्ध जिंकल्यावर त्याने ब्राह्मणबाद आणि मुलतान हे प्रांतही जिंकले. भारत खंडावर झालेला हा पहिला मुस्लिम किंवा अरबी हल्ला समाजाला जातो.
आता सांगण्यासारखी आणि ऐकण्यासारखी गोष्ट अशी कि बलोच लोक आजही या राजा दाहीरलाच आपला राजा मानतात. हे सगळे धर्मन्तरित झालेले मुसलमान लोक आहेत. परंतु स्वतःच्या इतिहासाशी खेळ करणे त्यांनी पूर्णपणे अमान्य केले आहे. अजून एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे, आपल्याला हे माहिती असतं कि देवी शक्तीची भरतखंडात ५१ शक्तिपीठे आहेत. पण ती कुठे आहेत, याचा शोध फारसा घेतला जात नाही. बलोचिस्तानात माता सतीचे शीर पडले होते आणि ते ‘माँ हिंगलाज मंदिर’ नावाने ओळखले जाते. याची मोठ्या श्रद्धेने आजही हिंदू पद्धतीने पूजा केली जाते. ५१ शक्तिपीठांपैकी हे अतिमहत्त्वाचे स्थान आहे असे समजले जाते.

 
असे हे बलुचिस्तान १४ ऑगस्ट ४७ या दिवशी पाकिस्तानचा भूभाग नव्हते. तर चीनने जसा तिबेटवर जबरदस्तीने कब्जा केला आहे त्याचप्रमाणे पाकिस्ताननेही बलुचिस्तान या स्वतंत्र प्रदेशावर मार्च १९४८ साली कब्जा केला.
आता पाकिस्तान सरकारची गोची कुठे झाली आहे पहा. पाकिस्तानची एकूण लोकसंख्या साधारण २० कोटी. त्यातले ६५ लाख म्हणजे केवळ (३.५%) साडेतीन टक्के लोक बलुची राज्यांमध्ये राहणारे बलुची आहेत. आणि या राज्यांचे एकूण क्षेत्रफळ पाकिस्तानच्या एकूण क्षेत्रफळापैकी ४७% आहे. त्यात हे लोक स्वतःला पाकिस्तानी समजायला तयार नाहीत. आणि यात अजून एक मेख निसर्गानेच मारून ठेवली आहे. ती म्हणजे बलुचिस्तानात असणारी १ ट्रिलियन US डॉलर्सच्या किमतीची खनिज संपत्ती.! असा म्हटलं जातं कि पाकिस्तानची अर्थव्यवस्था मुख्यत्वे या खनिजसंपत्तीवरच अवलंबून आहे. इथली हि खनिजसंपत्ती वारेमापपणे पाक सरकार ओरबाडून काढत असते. परंतु त्याचा योग्य मोबदला मात्र इथल्या मूळनिवासींपर्यंत पोहोचू दिला जात नाही.
त्यात तेल आणि नैसर्गिक वायू देणाऱ्या इराणबरोबर बलुचिस्तान सीमा शेअर करतो. म्हणजेच बलुचिस्तान ताब्यात नसेल तर पाकिस्तानला इंधनाच्या वाहतुकीसाठी अफगाणिस्तानवर अवलंबून राहावे लागेल. आणि अफगाण पाकिस्तान सीमावाद जगजाहीर आहेच.
आता या मुद्द्यावरून पुढचा मुद्दा येतो बंदरांचा.
पाकिस्तानच्या समुद्रकिनाऱ्यावर दोन प्रमुख बंदरे आहेत. एक कराची आणि दुसरे सिपेकच्या अंतर्गत तयार झालेले बलुचिस्तानातील ग्वादर बंदर. ग्वादर बंदराचे अनेक स्थानविशेष आहेत. ते स्ट्रेट ऑफ होर्मूझ पासून अगदीच जवळ आहे. त्यामुळे त्याची उपयोगिता संरक्षण, आर्थिक, राजकीय, भूराजकीय अश्या अनेक अंगानी प्रचंड वाढते. पाकिस्तानसाठी याचे अनन्यसाधारण असे महत्व आहे.
'चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर' हाही बलुची लोकांच्या रोषाचे एक महत्वाचे कारण आहे. बलोची साधनसंपत्ती, तिथली जनता यांची भयंकर स्वरूपाची पिळवणूक हे यामागचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे बलुची नेते आणि फुटीरतावादी गट सिपेकच्या कामात वारंवार अडथळे आणत असतात. या सगळ्या कारणांमुळे बळाचा वापर करून इथला विरोध मोडून काढायचा प्रयत्न पाक सरकार करते आहे. आणि म्हणूनच सर्वधर्मसमभाव, नागरिकांचे सामान्य अधिकार, सरकारची कर्तव्ये आदी गोष्टींचा गंधही नसणाऱ्या पाकिस्तान मिलिटरीला या सगळ्या प्रदेशात धुमाकूळ घालायची बेछूट परवानगी पाक सरकारने दिलेली आहे. खरे तर गेली काही दशके पाकिस्तान सरकार हे नामधारी सरकार असून सर्व कारभार पाक मिलिटरीच्याच हातात आहे.
त्यासाठी बलुची नागरिकांची केली जाणारी पिळवणूक. कलात, नसीराबाद, केच, इ. जिल्हे, माकुरानं, सुरान, नगाई इत्यादी शहरे आजपर्यंत पाक सेनेच्या अत्याचारांनी त्रस्त झाली आहेत. या जनतेवर केले जाणारे अत्याचारही भयानक स्वरूपाचे आहेत. ठिकठिकाणी वेगवेगळे आकडे वाचायला मिळतात. पण छोट्यातछोटा आकडा म्हणजे जवळजवळ १८००० लोक आतापर्यंत गायब केले गेले आहेत. यापैकी अनेक जेलमध्ये सडत राहतात. अनेकांना वाळवंटात नेवून ठार केलं जातं. केलेल्या तक्रारींची कसल्याही प्रकारची उत्तरे दिली जात नाहित. सरकारी लोक कोणत्याही प्रकाराची जवाबदेही स्वीकारायला तयार नाहीत. प्रचंड अनागोंदीचा कारभार आहे. तीव्र गरिबी, भूकमरी, रोगराईचे साम्राज्य आहे. शिक्षण, आरोग्य वाहतूक सेवा आणि बाकी वीज पाणी अन्य गरजांची सोयी अतिशय त्रोटक स्वरूपाची आहे. या सगळ्याचा परिणाम होऊन हजारो बलुची लोक शेजारच्या अफगाणिस्तान मार्गे पळून जात आहेत, कॅनडा, युरोपिअन देशांमध्ये आसरा शोधात आहेत. इतक्या भयानक प्रकारे मानवाधिकारांचे हनन होत असताना जगभरातील मानवाधिकार संस्था मूग गिळून गप्प आहेत. परंतु जगात ठिकठिकाणी, विविध पद्धतींनी आपल्यावर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवण्याचे काम बलोची activists करत आहेत. लिहिण्यासारखे अजून बरेच आहे. पण थोडक्यावर थांबलेले बरे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑगस्ट १६ साली लाल किल्ल्यावरून बलुचिस्तानचे नाव घेतले होते. जगभरातील बलुची भाषा बोलू शकणाऱ्या लोकांसाठी एअर इंडियाने स्वतंत्र चॅनेल सुरु केला आहे. तसेच दर शुक्रवारी सकाळी ९.०० वाजता पाकिस्तान-नामा या नावाने पाकिस्तानातील सर्व बातम्या देणारा कार्यक्रम DD National वर लागतो. त्यातही तिथल्या घडामोडी दाखवल्या जातात. हे सोडता, बलुचिस्तान संदर्भात बाकी काही दृश्य हरकती भारत सरकारने केल्याचे अजूनतरी ऐकिवात नाही.
 
--- अमिता आपटे