भूतानमध्ये सॅटेलाईट ट्रॅकर बसविण्याची भारताची तयारी सुरु
         Date: 31-Dec-2018

भूतानमध्ये सॅटेलाईट ट्रॅकर बसविण्याची भारताची तयारी सुरु.

 

भूतानमध्ये सॅटेलाईट ट्रॅकर आणि माहिती संकलन केंद्र उभारण्याची तयारी भारताने सुरु केली आहे. इस्रो तर्फे हे काम होणार असून भारत आणि चीन यांच्या मध्ये या केंद्राचे भौगोलिक स्थान असल्यामुळे भारताचे डावपेचात्मक स्थान अधिक बळकट नक्कीच होणार आहे.

 

तिबेट ऑटोनॉमस रिजन मधील नागरी येथे चीनने यापूर्वीच एक अत्यंत आधुनिक असे सॅटेलाईट ट्रॅकिंग सेंटर आणि खगोलशास्त्रीय वेधशाळा उभारलेली आहे जी एलओसी पासून १२५ किलोमीटर दूर आहे.

 

 

 

नवी दिल्लीतील हैद्राबाद हाऊस येथे भूतानचे पंतप्रधान लोटे त्शेरींग यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही माहिती दिली. ते म्हणाले,"अवकाश विज्ञान हे भारत आणि भूतानच्या परस्पर संबंधातील एक नवीन मिती आहे. मला आनंद आहे की इस्रोतर्फे भूतानमध्ये एका ग्राउंड स्टेशनच्या उभारणीचे कार्य लवकरच पूर्ण होईल. या सॅटेलाईट ट्रॅकरमुळे दक्षिण आशिया उपग्रहातर्फे मिळणाऱ्या माहितीचा लाभ घेणे शक्य होणार आहे. या कार्याच्या पूर्ततेपश्चात भूतानला हवामान संदर्भातील माहिती, टेली-मेडिसिन आणि आपत्तीग्रस्त भागातील बचावकार्यात मदत मिळणार आहे.
 

५ मे २०१७ रोजी इस्रोने दक्षिण आशिया उपग्रह आकाशात सोडला. या उपग्रहाच्या उभारणीपासून प्रक्षेपणापर्यंत सर्व खर्च हा भारतातर्फे करण्यात आला. २०१४ मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच सार्कच्या सर्व सभासद देशांसाठी मिळून एक असा उपग्रह आकाशात सोडण्याची कल्पना मांडली होती जेणेकरून अवकाश तंत्रज्ञानातील भारताच्या प्रगतीचा फायदा दक्षिण आशियातील त्याच्या सर्व शेजारी राष्ट्रांना होऊ शकेल. सार्कच्या सर्व सभासद देशांनी या कल्पनेचे स्वागत करून यात आपला सहभाग दर्शविला परंतु पाकिस्तानने मात्र यापासून दूर राहणेच पसंत केले.

 

इस्रोतर्फे भूतानमध्ये उभारणी करण्यात येणाऱ्या या माहिती संकलन केंद्राचा उद्देश हा भूतानला दक्षिण आशिया उपग्रहातर्फे मिळणाऱ्या माहितीचा फायदा करून देणे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले असले तरीही 'ही खरेतर चीनच्या तिबेट येथे असलेल्या सॅटेलाईट ट्रॅकरवर वचक बसविण्यासाठी भारताने खेळलेली खेळीच' असल्याचे सूत्रांनी खाजगीत बोलताना स्पष्ट केले.

 

तिबेट येथे चीनतर्फे उभारण्यात आलेले केंद्र इतके अत्याधुनिक आहे की भारतीय उपग्रहांचा माग काढणे तसेच त्यांना मिळणारी माहिती थांबविणे या दोन्ही गोष्टी चीनला शक्य असल्याचेही दिल्ली येथील सूत्रांनी सांगितले.

 

या प्रसंगी भूतानच्या १२व्या पंचवार्षिक योजनेस मदत म्हणून भारतातर्फे ४५०० कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे मोदी यांनी जाहीर केले. "भूतानच्या १२व्या पंचवार्षिक योजनेस मदत म्हणून भारतातर्फे ४५०० कोटी रुपये देण्यात येतील. भूतानच्या गरज आणि प्राथमिकतेस लक्षात घेऊन ही मदत करण्यात येईल. मी भूतानचे पंतप्रधान लोटे त्शेरींग यांना आश्वासन दिले आहे की भारत कायमच एका विश्वासार्ह्य मित्राप्रमाणे भूतानच्या प्रगतीत त्यांच्या मागे उभा राहील" मोदी म्हणाले.

 

२०१७ च्या जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात भारतीय लष्कर आणि चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी यांच्यात डोकलाम येथे निर्माण झालेल्या आणि ७२ दिवस चाललेल्या वादात भूतान भक्कमपणे भारताच्या बाजूने उभा होता.

 

त्शेरींग हे त्यांनी भूतानच्या पंतप्रधान पदाची धुरा हाती घेतल्यानंतरच्या आपल्या पहिल्याच भारत भेटीवर आले आहेत आणि त्यांनी भारताचे पंप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील भूतान भेटीवर येण्याचे आमंत्रण दिले आहे.

 

काल शुक्रवारी पार पडलेल्या दोन देशांच्या या बैठकीत भूतानमधील नव्यानेच उभारणी करण्यात आलेल्या ७२० मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युतनिर्मिती प्रकल्पातील विजेच्या दरपत्रकाविषयी करार झाला.

 

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk)

Source: DECCAN HERALD

India’s sat tracker in Bhutan to match China’s in Tibet.