भारत आणि यूएईमध्ये चलनाच्या अदलाबदलीचा (करन्सी स्वॅप) करार संमत, नवीन व्यापाराकडे वाटचाल.
         Date: 06-Dec-2018

भारत आणि यूएईमध्ये चलनाच्या अदलाबदलीचा (करन्सी स्वॅप) करार संमत, नवीन व्यापाराकडे वाटचाल.

 

भारत आणि यूएई ने चलन अदलाबदली (करन्सी स्वॅप) सह दोन करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आपले काउंटरपार्ट अब्दुल्ला बिन झाएद यांच्याशी सुरक्षा, संरक्षण, दहशतवाद, व्यापार आणि उर्जा यासारख्या विषयांवर परस्पर सहकार्याने कसा तोडगा काढता येईल यावर चर्चा केली. असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी ट्विट केले आहे.


 

स्वराज सोमवारी संयुक्त अरब अमीरात-भारत जॉईंट कमिशन मिटिंगसाठी अबुधाबी मध्ये दाखल झाल्या. अब्दुल्ला यांनी त्यांचे स्वागत केले. स्वराज यांचा दौरा दोन दिवसांचा होता. आर्थिक तसेच औद्योगिक सहकार्यासाठी भारत आणि संयुक्त अरब अमीरात (युएई) यांच्यामध्ये झालेली ही १२ वी बैठक होती.

 

चलन अदलाबदल करार (करन्सी स्वॅप) आणि आफ्रिकेमध्ये विकास करण्यासाठी एमओयू करार असे दोन करार स्वराज यांच्या दोन दिवसाच्या दौऱ्यामध्ये करण्यात आले.

 

करन्सी स्वॅप चा करार २ बिलियन दिरहम्स किंवा ३५ बिलियन भारतीय रुपयांचा करण्यात आला.

 

चलन अदलाबदल करार (करन्सी स्वॅप) हा दोन देशांमधील असा एक करार आहे ज्या योगे दोन्ही देश आपापल्या चलनात पूर्व-निर्धारित विनिमय दराने डॉलर्ससारख्या तिसऱ्याच चलनाला मध्ये न घेता आयात आणि निर्यात करू शकतात. डॉलर्स वर असलेले अवलंबित्व यामुळे कमी झाले आहे. तसेच स्थानिक चलनामध्ये व्यवहार केल्यामुळे एक्सचेंज रेट मुळे उध्दभवणारा ट्रान्समिशन कॉस्ट चा धोकाही खूप कमी झाला आहे.

 

दोन्ही देशांनी आतापर्यंत जवळपास ५० बिलियन डॉलर्सचा व्यापार केला असून उभयपक्षी खूप मोठी गुंतवणूकही केली आहे. युएई हा भारताची तेलाची गरज भागविणाऱ्या देशांपैकी एक देश आहे. करन्सी स्वॅप हा या व्यापारातील मैलाचा दगड आहे. व्यापार, सुरक्षा आणि संरक्षण यामध्ये दोन्ही देशांनी एकमेकांना सहकार्य करण्याविषयी सहमती दर्शविली आहे. दहशतवाद विरोधात लढण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याचा संकल्पही या बैठकीमध्ये करण्यात आला.

 

चलन अदलाबदल (करन्सी स्वॅप) करारासोबतच आफ्रिकेमध्ये दोन्ही देशांनी विकास प्रकल्प सुरु करण्याविषयीचा करारही करण्यात आला. या करारामुळे दोन्ही देशातील मैत्रीचे संबंध अधिक वृद्धिंगत होण्यास मदत होईल अशी आशा असल्याचे ट्विट कुमार यांनी केले.

 

महात्मा गांधी यांचे जीवन, कार्य आणि तत्वज्ञान यावर प्रकाश टाकणाऱ्या तसेच मॉडर्न यूएईचे संस्थापक असलेल्या शेख झाएद यांच्यावरील डिजिटल म्युझियम चे उदघाटनही स्वराज आणि अब्दुल्ला यांनी यावेळी केले. महात्मा गांधींच्या 150 व्या जयंती आणि शेख झाएदच्या जन्म शताब्दी उत्सवाचे औचित्य साधून शांती, सहिष्णुता आणि स्थिरता यांचे प्रतीक असलेले गांधी- झाएद डिजिटल म्युझियम उभारण्यात आले आहे.

 

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk)

Source: hindustantimes, khaleejtimes, reuters

India, UAE sign currency swap deal