बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा मोठा विजय, विरोधी पक्षाने मतदानाविषयी घेतली शंका.
         Date: 01-Jan-2019

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा मोठा विजय, विरोधी पक्षाने मतदानाविषयी घेतली शंका.

 

मतदानामध्ये फेरफार झाल्याचा विरोधी पक्षाचा आरोप फेटाळून लावत निवडणूक आयोगाने शेख हसीना यांना पंतप्रधान घोषित केले आहे. पंतप्रधान शेख हसीना यांच्या सत्तारूढ पक्षाने बांगलादेशच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बहुमत मिळवून शेख हसीना यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पद मिळवून दिले आहे.

 

२९८ जागांपैकी २८७ जागा पटकावून शेख हसीना यांच्या आवामी लीगने आपली ताकद दाखवून दिली आहे. तर २०१४ मध्ये निवडणुकीवर बहिष्कार घातलेला प्रमुख विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी (बीएनपी) ला या निवडणुकीत सहाच जागांवर समाधान मानावे लागले आहे.

 

 

 

हसीना यांचा विजय हा त्यांच्या दहा वर्षातील उत्तम कारकिर्दीचे फळ आहे. सत्तेवर असताना बांगला देशाची अर्थव्यवस्था सुधारणे आणि विकासाला प्रोत्साहन देणे या गोष्टींमुळे बरीचशी मते त्यांनी पदरात पाडून घेतली आहेत. मानवाधिकारांवर अत्याचार, प्रसारमाध्यमांवर कारवाई आणि विरोधकांशी असलेले तीव्र मतभेद आणि त्यांची केलेली मुस्कटदाबी या सारखे आरोप त्यांच्यावर होत असले तरी हे सर्व आरोप त्यांनी नाकारले आहेत.
 

चीन नंतर वस्त्रोद्योगामध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचे राष्ट्र असलेल्या बांगला देशातील प्रचंड अश्या मोठ्या वस्त्रोद्योगात काम करीत असलेल्या कामगारांचे वेतन वाढविणे हे पुन्हा पंतप्रधानपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतरचे त्यांचे महत्त्वाचे काम असेल असे पक्षाच्या प्रवक्त्याने सांगितले. सोमवार नंतर हसीना पत्रकारांना आणि निवडणूक निरीक्षकांना भेटतील.

 

विरोधी पक्षनेते कमल हुसेन यांनी बीएनपीच्या नेतृत्वाखाली केलेल्या राष्ट्रीय एकता मोर्चामध्ये रविवारी झालेले मतदान सदोष असल्याचा आरोप करून निवडणूक आयोगाने तात्काळ दुसरी निवडणूक घ्यावी आणि तीही "तटस्थ" अश्या मंडळाच्या अखत्यारीत घ्यावी अशी मागणी केली. संपूर्ण निवडणुकीत अफरातफर झाली असल्याने ती रद्द करण्याची मागणी ८२ वर्षाच्या हुसेन यांनी केली. मतदारांवर लक्ष ठेवण्यासाठी निवडले गेलेले उमेदवार हसिनाच्या पक्षाचे होते आणि मतदानाच्या नोंदी करायलाही सत्ताधारी पक्षाचे लोक होते. ज्यांनी मतदान केंद्रावर बळाचा वापर केला असेही हुसेन यांचे म्हणणे आहे. "आम्ही या पूर्वीही अनेकवेळा चुकीच्या किंवा खराब निवडणुका पहिल्या आहेत. पण ही निवडणूक मात्र त्या निवडणुकांपेक्षाही वाईट झाली. मतदानामध्ये कुठेही प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता नव्हती," असे हुसेन यांनी वार्ताहरांना सांगितले.

 

मतदान झाल्यानंतर झालेल्या दंगलीत कमीतकमी १७ लोक मारले गेले. हसिनाच्या सरकारने मतदानाचा डाव कायमच आपल्या हातात ठेवला असा आरोप विरोधी पक्षाने केला.

 

साजिब वझेद या शेख हसीना यांच्या मुलाने विरोधी पक्षाच्या या आरोपांना उद्देशून "चोराच्या उलट्या बोंबा" असे विधान केले.

 

या आरोपाचा तपास चालू असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. परंतु या तपासाचा निकालावर काही परिणाम होईल की नाही हे सांगण्याचे मात्र संस्थेच्या प्रवक्त्याने टाळले.

 

आवामी लीगचे संयुक्त सचिव जहांगीर कबीर नानक म्हणाले की, विरोधी पक्षाला मतदारांनी नाकारले आहे आणि हा नकार पचविणे विरोधी पक्षाला खूप जड जात असल्याने ते असा कांगावा करीत आहेत. आणि ही त्यांची खूप जुनी सवय आहे.

 

विरोधी पक्षाला कमजोर करण्यासाठी निवडणूक सुरु व्हायच्या काही महिने आधी विरोधी पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांवर खोटेनाटे आरोप लावून सत्ताधारी पक्षाने त्यांना अटक केले आहे. तसेच विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला देखील केला आहे. या आरोपाचे खंडन करताना हसीना सरकारने सांगितले की त्या हल्ल्यामध्ये आमच्या पक्षाचे कार्यकर्तेही जखमी झाले आहेत. आमच्या पक्षाचे सात आणि बीएनपीचे पाच कार्यकर्ते ठार मारले गेले आहेत आणि २० जखमी झाले आहेत.

 

राऊटर्स ने मतदान केंद्रावर केलेल्या पाहणीत त्यांना मतदान केंद्रावर मोजकीच माणसे दिसली. सत्तारुढ पक्ष कार्यकर्त्यांनी तुमचे मत आधीच देऊन झाले आहे असे सांगून आम्हाला मतदान केंद्रावर जाण्यापासून रोखले असा आरोप काही मतदारांनी राऊटर्सकडे केला.

 

फेब्रुवारी पासून भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केल्यामुळे निवडणुकीत बीएनपीची लीडर खालिदा झिया ही तिच्या पक्षाच्या प्रचाराला अनुपस्थित होती. हसीना आणि खालिदा या एकमिकांच्या कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. या दोहींनी गेली तीन दशके आलटून पालटून सत्ता उपभोगली आहे.

 

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk)

Source: INDIA TODAY

Bangladesh PM Sheikh Hasina scores big election win, opposition claims vote rigged.