पाकिस्तानातील दहशतवादामुळे चीन इतका असुरक्षित का आहे?
         Date: 12-Jan-2019

पाकिस्तानातील दहशतवादामुळे चीन इतका असुरक्षित का आहे?

 

चीन पाकिस्तानात चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीपीईसी) हा ६२ बिलियन डॉलर्सचा मोठा प्रकल्प उभारत आहे. या प्रकल्पाअंतर्गत चीनच्या झीनजियांग पासून पाकिस्तानातील बलुचिस्तानला जोडणारे रेल्वेमार्ग, पाईपलाइन्स आणि महामार्ग यांचे मोठे जाळे चीन विकसित करीत आहे. सध्या पाकिस्तानात २०,००० पेक्षा जास्त चिनी नागरिक कायमस्वरूपी काम करीत आहेत तर दरवर्षी ७०,००० व्हिसा अल्पकालीन व्हिसा तत्वावर जारी केले जात आहेत.

 

 

 

चीन आणि पाकिस्तानचे एकमेकांशी असलेले दृढ संबंध आणि चिनी लोकांची पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर असणारी उपस्थिती यामुळे २०१९ मध्ये चीनच्या या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात दहशतवादी हल्ल्यांना सामोरे जावे लागणार आहे. चीनचा "वसाहतवाद" आणि झिंजियांग मधील उयघूर मुस्लिमांना देण्यात येणारी वागणूक या दोन कारणामुळे चीनच्या असुरक्षिततेत वाढ झाली आहे. दहशतवादी हल्ल्याची भीती फक्त बलोच स्वातंत्र्यतावादींकडूनच नाही तर तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) आणि इस्लामिक स्टेटस (आयएसआयएस) यासारख्या इस्लामिक दहशतवादी गटांकडूनही आहे.
 

बलोच स्वतंत्रतावादी गट -

 

अनेक दशकापासून बलुचिस्तान प्रांतामध्ये पाकिस्तानविषयी विद्रोहाचीच भावना होती त्यात या प्रकल्पाची भर पडल्याने बलोच विद्रोही गटांनी चीनच्या पाकिस्तानातील उपस्थितीबाबत उघड उघड शत्रुत्व स्वीकारले. बलुचिस्तानातील स्थानिक संसाधनांचे चीनकडून शोषण होत आहे अशी या स्वतंत्रतावादी गटांनी समजूत करून घेतली आणि चीन "वसाहतवाद" निर्माण करीत असल्याचे आकलन त्यांना झाले. आर्थिक विकासाचा वरकरणी देखावा करून त्याच्या आड बलोच लोकांना बाजूला सारणे हाच एकमेव उद्देश चीन-पाकिस्तान द्विपक्षीय संबंधांचा आहे असा आरोप कायमच हे गट करीत आले आहेत. बलोच लोकांच्या तक्रारी समजून घेण्यास पाकिस्तान सरकार असमर्थ असल्याने या गटांमध्ये सरकारविषयी चीड विकोपास गेली आहे. सहा बलोच स्वतंत्रतावादी गटांनी या प्रांतातील चीनच्या उपस्थितीबद्दल नाराजी दर्शविली आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये बलोच लिबरेशन फ्रंट (बीएलएफ) च्या कमांडर अल्ला नाझार बलुच यांनी पाकिस्तानच्या चिनी राजदूतांना पत्र लिहून सांगितले की, मच्छीमार, मजूर आणि पर्यटक असलेले चिनी नागरिक यांना लक्ष्य केले जाईल.

 

बीएलएफच्या या इशाऱ्याशिवाय चीनला बलोच लिबरेशन आर्मी (बीएलए) चा सुद्धा मोठा धोका आहे. कारण त्यांचे संख्याबळ खूप मोठे आहे (२,००० ते ३,००० विद्रोही) आणि त्यांना असलेली अनुकूल भौगोलिक परिस्थिती.( इराण मधील डोंगराळ प्रदेशात असलेले वास्तव्य आणि अफगाणिस्तानातून केल्या जाण्याऱ्या कारवाया) यामुळे बीएलए ची भीती चीनला सतत जाणवत आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये बीएलएने चिनी इंजिनिर्स वाहून नेणाऱ्या एका बस वर केलेल्या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात लोकांना किरकोळ जखमांव्यतिरिक्त मोठी हानी झाली नाही. नुकतेच नोव्हेंबरमध्ये कराचीमधील चायनीज वकिलातीवर बीएलएच्या ३ बंदूकधारी लोकांनी गोळीबार करून ४ लोकांना ठार मारले. या गोळीबारात चिनी राजदूत किंवा अधिकाऱ्यांपैकी कोणालाही इजा झाली नाही. आतापर्यंत चिनी लोकांना २ वेळा आत्मघातकी हल्ल्याना सामोरे जावे लागले आहे. दूतावासात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बंदूकधाऱ्यांनी आत्मघातकी बॉम्ब परिधान केले होते. परंतु आयत्या वेळी त्यांचा स्फोट करणे त्यांना शक्य झाले नाही.

 

इस्लामिक दहशतवादी गट -

 

सप्टेंबर २०१८ मध्ये तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) ने उर्दूमध्ये आचारसंहिता जारी केली. ज्यात त्यांनी असे म्हटले आहे की,"पाकिस्तानशी संबंध असलेले आणि इस्लामिक नसलेले जे देश आहेत ते आमचे संभाव्य लक्ष्य असतील." आचारसंहितेमध्ये उघडपणे चीनचे नाव घेतली गेले नसले तरी दोन महत्त्वाच्या कारणांमुळे चीनला टीटीपीपासून धोका संभवतो. प्रथम, टीटीपीने अमेरिकेला आपला शत्रू म्हणून घोषित केले. याचे कारण म्हणजे त्यावेळी पाकिस्तान आणि अमेरिका दहशतवाद विरोधी जागतिक युद्धामध्ये एकमेकांचे सहयोगी होते आणि त्यांनी टीटीपीच्या लोकांवर आदिवासी भागात जाऊन ड्रोनद्वारे हल्ले केले होते. टीटीपीचे असे म्हणणे आहे की अमेरिका पाश्चात्य मुल्यांचे प्रतिनिधित्व करतो, धर्मनिरपिक्षतेला महत्त्व देतो. याचाच अर्थ तो काफिर आहे. तसेच २०१७ पासून पाकिस्तान आणि अमेरिकेचे संबंध थोडे बिघडले आहेत कारण अमेरिकेने पाकिस्तान अफगाणिस्तानातील आणि त्यांच्या देशातील दहशतवाद मिटविण्यास असमर्थ असल्याचे कारण देऊन पाकिस्तानला देण्यात येणारी ३०० मिलियन डॉलर्सची लष्करी मदत स्थगित केली. अमेरिकेच्या पावलावर पाऊल ठेवत आता चीन सुद्धा पाकिस्तानचा महत्त्वाचा सहयोगी बनला आहे. आणि मोठ्या प्रमाणात चीनच्या कामगारांनी पाकिस्तान व्यापले आहे. अमेरिकेसारखाच चीनही काफिर आहे आणि हे एक महत्त्वाचे कारण त्याला लक्ष्य करण्यास पुरेसे आहे.

 

दुसरे म्हणजे, झिनजियांग प्रांतातील उयघूर अल्पसंख्यांक मुस्लिमांना चीन जी वागणूक देत आहे त्याचा टीटीपीने विरोध केला आहे. झिनजियांग प्रांतातील आमच्या मुस्लिम बांधवांना ठार मारल्याच्या निषेधार्थ चीन सरकारचा "बदला" घेण्यासाठी २०१२ मध्ये एका चिनी नागरिकाला ठार मारल्याची कबुली टीटीपीने दिली आहे. सद्य परिस्थितीत झिंजियांगच्या पुनर्वसन शिबिराच्या बातम्या पाहून टीटीपी उयघूर मुस्लिमांच्या रक्षणाकरिता तेथे आणखी हल्ले करण्याची शक्यता आहे.

 

अफगाणिस्तान-पाकिस्तान विभागातील इस्लामिक स्टेटची स्थानिक शाखा असलेल्या इस्लामिक स्टेट खोरासान प्रांत (आयएसकेपी) ने देखील पाकिस्तानातील चीनच्या उपस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. इस्लामिक स्टेटने चीनला ," इस्राएल, भारत आणि अमेरिकेसारखा मुस्लिमांवर जुलूम करणारा देश" असे म्हटले आहे. जून २०१७ मध्ये अमाक मीडिया एजन्सीने दावा केला की या गटाने बलुचिस्तान मधून अपहरण केलेल्या दोन चिनी नागरिकांना मारले होते. आयएसकेपीला पाकिस्तानमध्ये हल्ले करण्यासाठी जमात-उल-अहरार आणि लष्कर-ए-झांगवी अल-अलामी हे दोन स्थानिक गट मदत करीत असतात. जगभरात कुठे मुस्लिम विरोधी घटना घडत असतील तर इस्लामिक स्टेट त्या विरोधात आवाज उठवते. जम्मू-काश्मीर मध्ये तर इस्लामिक स्टेट आणि आयएसकेपीने आपले जाळे पसरविले आहे.

 

दहशतवाद विरोधातील सहकार्य -

 

चीनच्या दृष्टीने पाकिस्तानाचे भूगर्भीय स्थान महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्याच्या सीईपीसी प्रकल्पाला दहशतवादी अथवा स्वतंत्रतावादी गटांकडून लक्ष्य केले जाणार नाही आणि आपला प्रकल्प अयशस्वी होणार नाही याची काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. २०१५ पासूनच चीनने पाकिस्तानला दहशतवाद विरोधी सहकार्य केले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे २०१८ मध्ये पंजाब प्रांतात संयुक्त प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. नोव्हेंबर २०१८ मध्ये चीन दूतावासावर हल्ला झाल्यानंतर या शिबिराच्या प्रशिक्षणाचा शेवटचा टप्पा म्हणून दोन्हीकडील लष्कराला विशेष प्रशिक्षण देण्यात आले. चीन आणि पाकिस्तानला जोडणारा काराकोरम येथील महामार्ग बंद करण्याची भीती जेव्हापासून टीटीपीने घातली आहे तेव्हापासून चीनने टीटीपीला पाकिस्तानातील शांतता आणि स्थैर्य नष्ट करणारा गट म्हणून घोषित केले आहे.

 

भारत आणि पाकिस्तान मधील प्रॉक्सी वॉर चा बलुचिस्तान प्रांतातील दहशतवादाशी जवळचा संबंध आहे. बलुचिस्तानमध्ये अंदाधुंदी माजविण्यासाठी भारतीय गुप्तचर संघटना जबाबदार असून यासाठी भारत निधी पुरवीत असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. आणि या दाव्याला पुष्टी देण्यासाठी मार्च २०१६ मध्ये बलुचिस्तान मधून भारताच्या कुलभूषण जाधव ला गुप्तहेर म्हणून अटक करण्यात आली. भारताने तो गुप्तचर असल्याचे फेटाळून लावले आहे. बलुचिस्तानमध्ये काही घडल्यास त्याचा परिणाम भारत आणि पाकिस्तानातील संबंधावर होत असल्याने आम्ही कोणताही गुप्तचर पाठविलेला नसल्याचे भारताचे म्हणणे आहे.

 

एकूणच, चीनला असलेला दहशतवादाचा धोका वाढतच चालला आहे. त्यामुळे पाकिस्तानला लवकरच दहशतवाद संपविण्याच्या दृष्टीने आणि चीन सोबतचे संबंध चांगले ठेवण्याच्या दृष्टीने विचार करणे भाग आहे. २०१९ मध्ये आपले आर्थिक हितसंबंध कसे जपले जातील आणि ६२ बिलियनची गुंतवणूक कशी सांभाळता येईल हे पाहणे गरजेचे आहे.

 

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk)

Source: THE DIPLOMAT

Why Is China Vulnerable to Terrorism in Pakistan?