दलाई लामांचा उत्तराधिकारी ठरविण्याचा अधिकार चीनला नसून तिबेटी बौद्ध आणि संयुक्त राष्ट्रसंघाला आहे. - अमेरिका
         Date: 25-Nov-2019
दलाई लामांचा उत्तराधिकारी ठरविण्याचा अधिकार चीनला नसून  तिबेटी बौद्ध आणि संयुक्त राष्ट्रसंघाला आहे. - अमेरिका

 

दलाई लामांचा उत्तराधिकारी ठरविण्याच्या चीनच्या दाव्याला या गुरुवारी अमेरिकेने फेटाळून लावले. संयुक्त राष्ट्र संघासह इतर आंतरराष्ट्रीय संघटना या मुद्द्यावर आपले मत मांडतील असेही अमेरिकेने खडसावून सांगितले.

 

दलाई लामांचा उत्तराधिकारी ठरविण्यासाठी आपली सहमती असणे आवश्यक असल्याचे चीन ठासून सांगत आहे.

 

" चीनमध्ये न रहाणारे अनेक लोक दलाई लामांचे अनुसरण करतात. संपूर्ण जगात त्यांचे खूप अनुयायी आहेत. त्यांची लामांवर श्रद्धा आहे. त्यामुळे त्यांच्या श्रद्धेला धक्का लागणार नाही अश्या प्रकारे उत्तराधिकारी निवडण्याची प्रक्रिया व्हावी.. "  अमेरिकेचे राजदूत सॅम्युअल ब्राउनबॅक यांनी इंटरनॅशनल रीलीजियस फ्रीडम पत्रकार परिषदेत पत्रकारांना सांगितले.

 

ब्राउनबॅक यांनी नुकतीच धरमशालाला भेट दिली. तेथील तिबेटियन समुदायाशी बोलताना ते म्हणाले की अमेरिका याचा पाठपुरावा करत राहणार आहे. 

 

चीनने दलाई लामांवर तिबेटी स्वातंत्र्यासाठी काम करणारे " फुटीरतावादी " असा आरोप केला आहे. आताचे दलाई लामा हे चौदावे दलाई लामा आहेत. ६० वर्षांपूर्वी म्हणजे सन १९५९ मध्ये चीनच्या भीतीने  ते तिबेट मधून भारतात पळून आले आणि त्यांनी भारताचा आश्रय घेतला. धरमशाला येथे निर्वासित म्हणून ते राहू लागले.

 

" अनेक ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. खूप प्रवास केला आहे. त्यांची भाषणे फार चांगली असतात. ते अमेरिकेत येत असत तेव्हा मी अनेकवेळा त्यांना भेटलो आहे. ते उत्साही आणि स्पष्टवक्ते आहेत. त्यांना भेटणे म्हणजे एका चालत्या बोलत्या चैतन्याला भेटण्यासारखे आहे. ज्या उद्देशाने त्यांनी एकट्याने इतकी वर्ष अनेक देशांना भेटी दिल्या तो हेतू सफल करण्यासाठी आता ते प्रवास करू शकत नाहीत. त्यामुळे आता जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय संघटनांनी पुढे येऊन त्यांचा प्रश्न सोडविण्यास त्यांना मदत करणे गरजेचे आहे. संयुक्त राष्ट्र संघाने हा प्रश्न धसास लावण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. उत्तराधिकारी ठरविण्यासाठी सर्व युरोपियन देशानी एकत्र यायला हवे."  ब्राउनबॅक म्हणाले.

 

विशेषतः तिबेटचे धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवी हक्क यासंबंधी त्यांच्या बाजूने सगळ्यांनी उभे राहायला हवे. खरंतर हाच मुद्दा युरोपियन सरकारने अत्ता उचलून धरायला हवा असे ब्राउनबॅक म्हणाले.

 

" चीनने पंचन लामा यांच्याबाबत जे केलंय ते सर्वश्रुत आहे. चीनची मनीषा लपून राहिलेली नाही. त्यामुळे चीनने या संबंधी काही वाकडे पाऊल उचलले तर आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. ते असे काही करण्याआधी आम्ही हालचाल करणे गरजेचे आहे. चीनवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याची गरज आहे. दलाई लामांचा वारस ठरविण्याचा अधिकार फक्त तिबेटी बौद्धांना आहे. तो चीन कम्युनिस्ट पार्टी किंवा इतर कुणालाही नाही." ब्राउनबॅक यांनी ठणकावून सांगितले.

 

यासाठी चीन काहीही करू शकतो. पंचन लामा यांचे चीनने काय केले ते अजून कुणाला माहीतही नाही. ते जिवंत आहेत की त्यांचं काही बरं वाईट झालंय याची कुणालाही कल्पना नाही. 

 

-प्राची चितळे जोशी.

 

( ICRR Media Monitoring Desk)

 

Source : hindustantimes

 

Tibetan Buddhists, UN to decide Dalai Lama’s successor, not China: US