दुसऱ्या बीआरआय समिट मध्ये जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश हा भारताचाच भाग असल्याचे चीनने नकाशामध्ये दाखविले.
         Date: 30-Apr-2019

दुसऱ्या बीआरआय समिट मध्ये जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश हा भारताचाच भाग असल्याचे चीनने नकाशामध्ये दाखविले.

 

गुरुवारी बीजिंगमध्ये बेल्ट आणि रोड इनिशिएटिव्ह समिटच्या दुसऱ्या टप्प्यात बीआरआयच्या मार्गांचा जो नकाशा सादर करण्यात आला त्यात चीनने संपूर्ण जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश भारताचा भाग असल्याचे दाखविले  आहे.

 

भारताने दुसऱ्यांदा या समिटवर बहिष्कार घालूनसुद्धा या नकाशात भारताला चीनच्या बीआरआय प्रकल्पाचा एक भाग म्हणून चित्रित केले आहे. तीन दिवसीय बीआरआय समिट प्रसंगी चीनच्या मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सने हा नकाशा सादर केला.

 


अरुणाचल प्रदेश हा भारताचा भाग असल्याचे हजारो नकाशे अलीकडेच चीनने नष्ट केल्यामुळे या समिट प्रसंगी सादर केलेल्या नकाशात जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश भारताचा भाग असल्याचे दाखविणे हे नुसतेच अचंबित करणारे नाही तर त्यांच्याच वागण्यातील विसंगती दर्शविणारे आहे. चीन सरकार अरुणाचल प्रदेशला "दक्षिण तिबेट" असे संबोधतो.  भारतीय पुढाऱ्यांच्या अरुणाचल भेटीला चीन आतापर्यंत तीव्र आक्षेप घेत आला आहे.

 

चीनने यापूर्वी जारी केलेल्या नकाशामध्ये जम्मू काश्मीरचा पाकव्याप्त भाग हा पाकिस्तानचा असल्याचे दाखविले होते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार असला गलथानपणा चीनच्या प्रकाशनाकडून आणि वेबसाईट कडून घडणे फारच दुर्मिळ गोष्ट आहे. तथापि, भारताला चुचकारण्यासाठी चीनने जाणूनबुजून उचललेले हे धोरणात्मक पाऊल आहे की यामागे अजून काही आहे याचा तपास करण्याचा प्रयत्न चीनच्या घडामोडींकडे बारकाईने लक्ष्य ठेवणारे तज्ज्ञ करीत आहेत. गेल्या नोव्हेंबर मध्ये चिनी दूतावासावर कराचीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे प्रक्षेपण करीत असताना चीनकडून चालविल्या जाणाऱ्या मीडियाने (सीजीटीएन टेलिव्हिजन) पाकिस्तानच्या नकाशातून पाकव्याप्त काश्मीर वगळले होते.

 

पाकिस्तानी नकाशातून पाकव्याप्त काश्मीर वगळणे हे चीन-पाकिस्तान-इकॉनॉमिक-कॉरिडोर (सीपीईसी) च्या भविष्याच्या दृष्टीने आडवळणाने पाकिस्तानला दिलेले संकेत असू शकतात. पाकव्याप्त काश्मीर मधून हा सीपीईसी प्रकल्प जात असल्याने भारताच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन होत असल्याच्या कारणावरून भारताचा या प्रकल्पाला जोरदार आक्षेप आहे. सीपीईसी हा चीनच्या बेल्ट आणि रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) प्रकल्पातील महत्त्वाचा दुवा आहे. 

 

भारताच्या विरोधाला न जुमानता बीआरआय सुरू होण्याआधीपासूनच चीनने पाकव्याप्त काश्मीरमध्ये पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. पाकव्याप्त काश्मीर मधील चीनच्या हस्तक्षेपाबद्दल भारताने आतापर्यंत बीजिंग आणि इस्लामाबादला अनेक निषेध पत्रं पाठविली होती. तसेच चीनने पाकव्याप्त काश्मीर मध्ये त्यांच्या सैनिकांची नेमणूक सुद्धा केली होती. यावर भारताने तीव्र आक्षेप नोंदवला होता.

 

हुर्रियत लीडर्सना उत्तेजन दिल्यामुळे आणि काश्मिरी रहिवाश्याना स्टेपल व्हिसा देऊ केल्यामुळे काही वर्षांपूर्वी चीन-भारत संबंधांवर प्रतिकूल परिणाम झाला होता. भारत आणि पाकिस्तानने सामंजस्याने काश्मीर प्रश्न सोडवावा असा पवित्रा आता उशिरा का होईना बीजिंगने घेतला आहे.

 

-प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk)

 

source: defencenews

 

2nd BRI Summit underway - China shows maps of J-K and Arunachal Pradesh as part of India