मुस्लिम आक्रमकता आणि मोदी- शहा
         Date: 11-Jul-2019
मुस्लिम आक्रमकता आणि मोदी- शहा
 
हिंदु मंदिरावरील हल्ले, तथाकथित मॉब लिंचिंगच्या घटना आणि मुस्लिम नेतृत्वाचा सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न

लोकसभा २०१९ चा निकाल हिंदुत्ववादी जनता आणि संघटनांसाठी एक सुखद धक्का होता; तसाच तो विरोधी पक्ष, मुस्लिम- ख्रिश्चन संघटना आणि त्यांचे नेतृत्व यांच्यासाठी भीषण मानसिक आघात! या जीवघेण्या पराभवानंतर लगेचच एन.डी.ए. च्या पहिल्या बैठकीत मोदी यांनी मुस्लिम समाज आणि त्यांचा स्वातंत्र्यापासुन आजपर्यंत झालेला "वोट बँक" म्हणुन वापर यावर विस्तृत टिप्पणी केली. यानंतर पहिली मोठी घोषणा मुस्लिम स्कॉलरशिपची झाली. या घोषणेचे संमिश्र पडसाद उमटले. अनेक मुस्लिमांनी याचं स्वागत केलं, उर्दू मीडियाने याला भाजप सेक्युलर होत असल्याची पहिली खूण म्हटलं आणि काही हिंदूंनी याकडे मोदी-शहा यांची अतर्क्य खेळी म्हणुन बघितलं.
 
पण आधी मोदींचं भाषण आणि मग स्कॉलरशिपची घोषणा यामुळे कट्टर मुस्लिम नेतृत्व आणि मुस्लिम मतांवर प्रामुख्याने राजकीय भवितव्य अवलंबुन असलेल्या राजकीय पक्षांना एक मोठा मानसिक धक्का बसला यात शंका नाही. जर खरंच ही योजना यशस्वीपणे राबवली गेली तर भाजपा २०२४ च्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतांवर डल्ला मारेल या भीतीने कट्टर मुस्लिम नेतृत्व- काँग्रेस आणि डाव्या मीडियामध्ये मोठी घबराट पसरली आहे. एका बाजुला मोदी सरकारच्या मुस्लिम हिताच्या मोठ्या योजना आणि दुसऱ्या बाजुला निवडणुक निकालाचा धक्का अशा दुहेरी दणक्याने कट्टर मुस्लिम नेतृत्व, डावा मिडीया आणि काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष एका कात्रीत सापडले आहेत.
 
यावर उपाय करण्यासाठी काँग्रेस सध्या तरी सक्षम नाही आणि संपुर्ण मुस्लिम समाजाचं नेतृत्व कोणा एका नेत्याकडे आहे अशीही स्थिती नाही. एकेकाळी मिडीया आणि बुद्धिवंत वर्तुळाचे अनभिषिक्त राजे असलेले कम्युनिस्ट भारतीय इतिहासात पहिल्यान्दाच फक्त ४ खासदारांसह अतिशय केविलवाण्या स्थितीत आहेत. ज्या बंगाल आणि केरळच्या जीवावर कम्युनिस्ट आणि त्यांना मानणारा मिडीया भारतीय समाजमनावर त्यांच्या आकाराच्या तुलनेत कित्येक जास्त पटींनी प्रभाव गाजवत होते त्या दोन राज्यातुन यावेळी लोकसभेत फक्त १ खासदार आला! त्यामुळे काँग्रेस-कम्युनिस्ट-मुस्लिम-मिडीया या चौकडीने अतिशय धूर्तपणे संघ- भाजपाला एका सापळ्यात जखडण्यासाठी "मॉब लिंचिंग" नावाचा सापळा लावला.
 
"मॉब लिंचिंग" नावाचा सापळा...
 
सुरुवातीला झारखंडमधील तबरेज नावाच्या अट्टल चोराला लोकांनी चोरी करताना पकडून यथेच्छ चोप दिल्याचा व्हिडियो वेगाने सर्वत्र पसरला. मग पोलिसांनी त्याला लोकांच्या तावडीतुन सोडवुन तुरुंगात डांबला. तोपर्यंत तो अत्यंत ठणठणीत होता, पण जेलमध्ये असतानाच तबरेजचा अचानक मृत्यु झाला. यानंतर काँग्रेस-कम्युनिस्ट-मुस्लिम-मिडीया चौकडीने देशभर तबरेजला हुतात्मा घोषित करून "मॉब लिंचिंग" चं रडगाणं गायची सुरुवात केली. पुढे देशभरातुन खऱ्या खोट्या "मॉब लिंचिंग"च्या बातम्यांनी मिडीया भरून गेला.
 
हा हिंदुस्थान नसुन "लिंचिस्तान" आहे वगैरे वगैरे आरडाओरडा सुरु झाला. मोदींना लोकसभेत तबरेजच्या मृत्यूचा उल्लेख करावा लागला एवढं वातावरण या चौकडीने पेटवून दिलं.
 
जय श्रीराम आणि "मॉब लिंचिंग"
 
पुढे, जमावाने मुस्लिम माणसाला पकडुन त्याला "जय श्रीराम" म्हणण्याची सक्ती केली आणि ते नं म्हटल्यामुळे त्याला मारण्यात आलं अशा बातम्या पद्धतशीरपणे पेरण्यात आल्या. यापैकी बंगालमधील कुचबिहारची जय श्रीरामवरून मुस्लिमाला मारण्याची बातमी खोटी असल्याचं टाईम्स ऑफ इंडियाने छापलं. या घटनेत व्हिडियो तयार करण्यासाठीच एका मुस्लिमाने दुसऱ्या मुस्लिमाला "जय श्रीराम" म्हणण्याची सक्ती केल्याचं समोर आलं. नंतर गुरुग्राम आणि कानपुरच्या "जय श्रीराम" आणि मारहाण संबंधीच्या बातम्याही अशाच खोट्या निघाल्या. विशेष म्हणजे न्यूज-१८ आणि अन्य मिडीयाने या खोट्या असल्याची कबुली दिली. तरीही तोपर्यंत "जय श्रीराम" संबंधात मारहाण केल्याच्या बातम्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरून भारत सरकारचा निषेध करण्याचे प्रकार सुरु झाले.
 
मुस्लिम नेतृत्व आणि उर्दू मिडीयाचा आततायीपणा कि आत्महत्या?
 
अभूतपूर्व अशा ३०३ लोकसभा जागांसह दुसऱ्यांदा सत्तेत बसलेल्या मोदींनी आणि पहिल्यांदाच सत्तेत सामील झालेल्या अमित शहांनी पहिल्या दिवसापासुन मुस्लिम समुदायाला आपलंसं करण्याची भूमिका जाहीर केलेली असताना आणि त्या दिशेने चांगल्या घोषणा/ पावले उचललेली असताना "मॉब लिंचिंग" चं धादांत खोटं भूत उभं करून भारतीय मुस्लिम नेतृत्वाने आणि उर्दू मिडीयाने आपली दळिद्री मानसिकता जगासमोर आणली. उर्दू मिडीयाच्या "हुजूमी तशद्दुद मे भारी ईजाफा", "मोदी-२ मे मुसलमान मेहफूझ नही" वगैरे आगलाव्या प्रचारामुळे देशभरात जागोजागी तथाकथित "हुजूमी तशद्दुद" (मॉब लिंचिंग) च्या विरोधात मोर्चे निघाले. अनेक उत्तर प्रदेश, झारखंड आणि गुजरातमध्ये असे मोर्चे हिंसक झाले.
 
जागोजाग मुस्लिम नेतृत्व या संदर्भात आक्रमक प्रचार करत आहे. असा प्रचार त्यांच्या अपरिपक्वतेचा उत्तम नमुना आहे. एकेकाळी भारतीय मुस्लिम सौदीच्या अरबी पेट्रो डॉलरच्या आणि पाकिस्तानच्या भावनिक उबेवर भारतात जगत होते. पॅलेस्टाईनमध्ये इस्रायली सैनिकांनी काही अरब गोळीबारात मारले कि भारतात मुस्लिम मोर्चे काढत होते. सौदीचा ग्रँड मुफ्ती इस्राएलविरोधात ७ दशके फतवे काढत होता. आज तोच सौदी आणि त्यांचा ग्रँड मुफ्ती इराणविरोधात इस्राएलच्या गळ्यात गळे घालत आहे. पाकिस्तान ऐतिहासिक आर्थिक संकटात डुबत आहे.
 
भारतात मुस्लिमांच्या बाजुने बोलणारे काँग्रेस आणि कम्युनिस्ट निवडणुकीत पार कंगाल झाले आहेत. अशा स्थिती भारतीय मुस्लिम नेतृत्वाने प्रचंड जनादेश मिळवुन सत्तेत आलेल्या भाजपसोबत जुळवून घेण्यात मुस्लिम समाजाचं हित होतं परंतु जन्मभर कुणाच्या ना कुणाच्या आदेशाने आपल्या पोटाची खळगी भरण्यात धन्यता मानणारे मुस्लिम नेते यावेळीही समाजाचं हित नं जपता "आत्महत्या" करण्याच्या दिशेने अग्रेसर आहेत.
 
हिंदुत्ववादी राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना यांच्याशी जुळवुन घ्यायची शेवटची संधी मुस्लिम नेतृत्व फुकट घालवत आहे. हा भारतातील मुस्लिम नेतृत्वाचा अंत आहे. यानंतर सामान्य मुस्लिम सरकारशी थेट जोडले जाण्याची शक्यता अधिक आहे, अशा स्थितीत पश्चात्ताप करण्यावाचून मुस्लिम नेतृत्वाच्या हाती काहीही उरणार नाही.
 
चांदनी चौक मंदिरावरील हल्ला आणि मोदी-शहांना समजण्यात मुस्लिम नेतृत्वाची घोडचूक!
 
मोदी-शहा यांचं मन वाचणं आजपर्यंत कुणालाही जमलेलं नाही. एका बाजुला मॉब लिंचिंगच्या नावाने गळे काढुन दुसऱ्या बाजुला दिल्ली आणि उत्तर प्रदेशात मंदिरावर हल्ले करायचे आणि कट्टर हिंदुना मोदी-शहांच्या विरोधात भडकवायचं जेणेकरून गृहमंत्रालय आक्रमक होईल, मग पोलीस कारवाईत अजुन काही मुस्लिम मारले जातील आणि त्या घटनांना "मोदी सरकारकडून मुस्लिमांची कत्तल" या नावाने जगभर विकता येईल या भ्रमात मुस्लिम नेतृत्व होतं, पण मोदी-शहा यांना वाचण्यात, समजण्यात त्यांची चूक झाली आहे. शिवाय सध्या तात्काळ हिंदु मतदारांना आपल्या बाजुला ठेवण्यासाठी या जोडीला काहीही करण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे दिल्लीच्या मंदिर हल्ल्यानंतर काँग्रेस-कम्युनिस्ट-मुस्लिम-मिडीया चौकडीला जशी अपेक्षित होती तशी आक्रमक कारवाई शहा यांनी केली नाही. यादरम्यान मोदी-शहा यांनी कट्टर हिंदूंच्या चिक्कार शिव्या खाल्ल्या पण याने मुस्लिमांचा कोणता फायदा झाला?
 
मुस्लिम आक्रमकतेला मोदी-शहांनी काय उत्तर दिलं?
 
चांदनी चौक मंदिर हल्ल्यानंतर काही दिवसांनी शहा यांनी दिल्ली पोलीस कमिशनरचे कान पिळले, मग दिल्ली पोलिसांनी १४ दंगेखोर पकडले. त्यांच्यावर कोणती कलमे लावली याचा तपशील अजुन उपलब्ध नाही. पण कारवाईला उशीर केल्यामुळे एक मोठा फायदा नक्कीच झाला. वातावरण गरम असताना पोलीस मोठ्या फौजफाट्यासह जुन्या दिल्लीच्या गर्दीत घुसले असते तर मोठा सामुहिक संघर्ष उसळुन कित्येक पोलीस जखमी झाले असते आणि स्वतःला वाचवण्यासाठी गोळीबार केला असता तर अनेक मुस्लिम मारले गेले असते. याचं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय भांडवल करता आलं असतं. आणि वर अशी स्थिती उद्भवली असती तर मंदिरही हिंदूंचं तोडलं गेलं आणि वर मुस्लिम मेल्याने दोषही मोदी-शहा यांचाच. नेमकी हीच योजना डोक्यात ठेऊन मंदिरावर हल्ला करण्यात आला पण त्याचा फायदा मात्र मुस्लिमांना झाला नाही.
 
दुसरीकडे मॉब लिंचिंगच्या विरोधात उत्तर प्रदेशात मेरठमध्ये बदर अली नावाच्या गुंडाच्या नेतृत्वाखाली एक आक्रमक मोर्चा काढण्यात आला. त्यात भयंकर हिंसा आणि जाळपोळ झाली. यांनतर गुंड बदर अलीला अटक करण्यात आली शिवाय त्याने बांधलेलं आणि पुढच्या काही दिवसात उदघाटन होऊ घातलेलं पण अवैध असलेलं खाजगी हॉस्पिटल स्थानिक प्रशासनाने बुलडोझर लाऊन जमीनदोस्त केलं. शिवाय ८५० लोकांवर केस दाखल झाल्या आहेत. यामुळे अक्ख्या उत्तर प्रदेशात जायचा तो संदेश गेला.

शहांची कोंडी करून मुस्लिम नेतृत्व काय साध्य करत आहे?
 
सततच्या हिंदुविरोधी कारवाया आणि सरकारविरोधी विषारी प्रचार करून प्रस्थापित मुस्लिम नेतृत्व गृहमंत्री अमित शहा यांची कोंडी करत आहे. एक वेळ अशी येईल कि कट्टर हिंदू जनमताचा रेटा, मोदी- शहा यांची राजकीय गरज आणि तत्कालीन राजकीय स्थिती या बाबी ज्या दिवशी एकत्र येतील तेव्हा शहा एकच पण खूप मोठी कारवाई निवडक लोकांवर करतील. त्यातून त्यांना जो संदेश सामान्य माणसापर्यंत पोचवायचा आहे तो ते पोचवतील. आणि त्यातुन सामान्य मुस्लिम व्यक्तीलाही ते मुस्लिम नेतृत्वापासुन अलग करतील.
 
 
मोदी- शहा मुस्लिम तुष्टीकरण करत आहेत का?

जन्मजात राजकारणी असलेली ही जोडगोळी हिंदू हिताच्या मुद्दयावर भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेली आहे. पराकोटीची राजकीय समज आणि प्रभावी पण अदृश्य राजकीय संदेश भारतीयांपर्यंत पोचवण्यात यांचा हातखंडा आहे. राजकीय नेते राजकीय स्वार्थापायी आपल्या भूमिका रातोरात बदलतात हे सत्य आहे. पण मोदी-शहा यांची हिंदुहितासंबंधीची भुमिका बदलते आहे असं मानायला आजतरी कोणताही पुरावा नाही. या दोघांची कट्टर धार्मिक दबावगटांसंबंधीची भुमिका बघायची असेल तर काश्मीरमधील कारवाई बघावी. काश्मीरमधील कट्टर जिहादी महिला आसिया आदरानबी हिची श्रीनगर येथील मालमत्ता काल जब्त करण्यात आली, यासीन मलिक सह सर्व फुटीरतावादी सध्या जेलमध्ये आहेत. हे सर्व नग गेली ३० वर्षे फुकटच्या सरकारी सुविधा आणि सरकारी सुरक्षा मिळवत वर्षानुवर्षे पाकिस्तानची तळी उचलत होते. मोदी-१ मध्ये सुरु झालेली कारवाई मोदी-२ मध्ये अजुन तेज झाली आहे. याशिवाय केंद्रीय तपास संस्था देशभर इस्लामिक स्टेटविरोधात धडक कारवाया करत आहेत.
 
हिंदु हित टाळुन, हिंदु मत आपल्यापासुन दुर जाईल असं करण्याएवढे ते बावळट आहेत असं मानणं ही मोठी चुक ठरेल. तरीही भाजपाला योग्य मार्गावर ठेवण्यासाठी सजग, सतर्क हिंदु समाज अत्यावश्यक आहे. सामान्य हिंदूंचा दबाव फक्त सत्ताधाऱ्यांनाच नव्हे तर नोकरशाहीला योग्य निर्णय घेण्यासाठी बाध्य करायलाही अत्यंत अत्यावश्यक आहे यात शंका नाही.
 
पण.....
 
इंटरनेटवर हिंदु हितासाठी आक्रमकपणे लिहिणं एवढीच गोष्ट पुरेशी नाही. जमेल तेव्हा, जमेल तिथे आणि जमेल तितके हिंदू हिताचे मुद्दे संबंधित मंत्री, विभाग,सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत लिखित स्वरूपात निवेदन/ तक्रार म्हणुन पोचवणं ही सर्वात उपयोगी आणि अत्यावश्यक बाब आहे. ५ वर्षातून एकदा मोदी-शहांना मतदान करून ते हिंदु हिताच्या सर्व बाबींवर आपल्याला योग्य वाटतात अश्या कारवाया करतील ही अपेक्षा सर्वस्वी चुकीची आहे. निरंतर जागृती आणि कृती यासाठी अतिशय अत्यावश्यक आहे.
 
 
---- विनय जोशी