आयएसआयएसचे जोरदार पुनरागमन.
         Date: 03-Jul-2019

आयएसआयएसचे जोरदार पुनरागमन.

 

एका अहवालानुसार आयएसआयएसने पुनरागमनाची जोरदार तयारी केली आहे. एवढेच नाही तर या वेळी ती संपूर्ण ताकदीने आणि जोमाने धडक मारणार असे दिसतेय.

 

यावर्षी सीरिया आणि इराकमधील कडवे धार्मिक खलिफा मारले गेले असले तरी त्यांचे कट्टर अनुयायी पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत हे मात्र नक्की.

 

वॉशिंग्टन बेस्ड इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ वॉर यांनी त्यांच्या अहवालात चेतावणी दिली आहे की क्रूर दहशतवादी गट पुन्हा एकदा सक्रिय होणार आहेत आणि यावेळी ते ताज्या दमाने आणि अधिक धोकादायक बनले आहेत. आयएसआयएसने इराकवर नियंत्रण मिळवलेच आहे. आयएसआयएस च्या विरोधातील सर्व नेत्यांना आणि नागरिकांना आयएसआयएसने पद्धतशीरपणे बाजूला केले आहे. इराकमधील अनेक छोटीछोटी गावे आपल्या ताब्यात घेऊन तेथील नागरिकांना एकतर विस्थापित तरी केले आहे अथवा त्यांच्यावर अनेक कर लादले आहेत.

 

रशिया आणि अमेरिकेचे सैन्य सतत तैनात असल्याने आयएसआयएसला सीरियामध्ये पुन्हा मूळ धरणे तसे जिकिरीचे जाणार आहे. परंतु या अहवालात असे म्हट्ले आहे की लष्करामुळे विस्कळीत झालेले हे दहशतवादी पुन्हा एकत्र येत आहेत आणि आपली संघटना बनवत आहेत. आता असं म्हटलं जातंय की आयएसआयएसने मुद्दामून पराभव मान्य केला आणि आपल्या कुटुंबाला आणि सैनिकांना वेगवेगळ्या ठिकाणी जायला सांगितले. त्यामुळे आता यांचे सैनिक दोन्ही देशात व्यवस्थित वाटले गेले आहेत आणि अधिक सक्षम झाले आहेत.

 

आयएसआयएसचे जगभर जाळे पसरले आहे. ज्यायोगे त्यांना निधी मिळतो. दहशतवादी कारवायांसाठी लागणारी शस्त्रे, लपून राहण्यासाठी आवश्यक ती योजना आणि या सर्वाला लागणारे पैसे तसेच दहशतवादी कारवायांसाठी लागणारी सर्वतोपरी मदत याना जगभर निर्माण केलेल्या नेटवर्कच्या यंत्रणेतून मिळते.

 

या अहवालानुसार आयएसआयएसचा नेता अबू बकर अल-बगदादी मध्य पूर्वेमध्ये हिंसाचार घडवून आणण्यासाठी योजनापूर्वक गटाची उभारणी करीत आहे. ओबामा सरकारने आणि आता पुढे ट्रम्प सरकारनेही आयएसआयएसवर कारवाई करण्यात खूप दिरंगाई केल्यामुळे आयएसआयएसला सदस्यांना संघटित करण्यासाठी पुष्कळ वेळ मिळाला असे अहवालात म्हटले आहे. 


 

या संघटनेचं इराक आणि सीरियामध्ये यशस्वीपणे पुनरागमन ही संपूर्ण युरोपसाठी धोक्याची घंटा आहे. एवढेच नाही तर या घातपाती कारवायांमध्ये आयएसआयएस यशस्वी झाली तर ती त्यांच्या विजयाची नांदीच ठरेल.

 

जर असे झाले तर आयएसआयएस ला आम्ही हरवले आहे असे डोनाल्ड ट्रम्प यांचे म्हणणे खोटे ठरेल. इराक आणि सीरियामध्ये डोके वर काढणाऱ्या या संघटनेला चिरडून टाकण्यासाठी अमेरिकेने त्वरित पावले उचलणे गरजेचे आहे.

 

-प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk)

 

Source: thesun

 

ISIS poised for ‘devastating’ comeback thanks to secret billions and sleeper cells, new report warns.