ब्रिटीश तेल टॅंकर ताब्यात घेण्याची इराणच्या अधिकाऱ्याची धमकी.
         Date: 07-Jul-2019

ब्रिटीश तेल टॅंकर ताब्यात घेण्याची इराणच्या अधिकाऱ्याची धमकी.

 

जर इराणचे जप्त केलेले जहाज सोडण्यात आले नाही तर ब्रिटिश तेल टँकर ताब्यात घेण्यात येईल असे एका इराणी अधिकाऱ्याने म्हटले आहे.

 

युरोपियन युनियनच्या मंजुरीचा भंग केल्याच्या संशयावरून गुरुवारी ब्रिटिश रॉयल मरीनने जिब्राल्टरच्या अधिकाऱ्यांना इराणच्या सुपर-टॅंकर ग्रेस १ या टँकरला सीरियाकडे तेल नेत असल्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यास मदत केली. जिब्राल्टरच्या न्यायालयाने हे जहाज पुढील १४ दिवसापर्यंत आपल्या ताब्यात ठेवण्याचे ठरविले आहे. ४२ कमांडोजना घेऊन ३० मरिनचा एक ताफा युकेमधून जिब्राल्टरकडे ग्रेस १ ला आणि त्याच्या कार्गोला ताब्यात ठेवण्यासाठी निघाला आहे.

 

इराणने या घटनेनंतर तेहरानमधील ब्रिटिश दूताला बोलावून "हा चोरीचा प्रकार आहे" असे खडसावले. मोहसिन रेझाई म्हणाले की इराण याचे प्रत्युत्तर देण्यास अजिबात कचरणार नाही. ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाने चोरीच्या आरोपाला "मूर्खपणा" म्हणून संबोधून फेटाळून लावले.


 

मोहसिन रेझाई हे अयातुल्ला खोमेनी याना सल्ला देणाऱ्या मंडळाचे एक सदस्य आहेत. त्यांनी त्यांच्या ट्विट मध्ये म्हटले," जर ब्रिटनने इराणचा तेल टँकर सोडला नाही तर त्यांचा टँकर ताब्यात घेतला जाईल."

 

सीरियातील तार्तास या बंदरावरील बनियस रिफायनरीमध्ये हे जहाज इराणचे क्रूड ऑइल वाहून नेत असल्याच्या आमच्या संशयाला वाव आहे.

 

खरेतर जिब्राल्टरने सुरुवातीला ७२ तासांसाठी जहाज ताब्यात घेतले होते पण नंतर न्यायालयाने १४ दिवसांची मुदत वाढवून दिली. त्यामुळेच इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही जप्ती बेकायदीशीर असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या हुकूमावरूनच युके असले धाडस करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.  

 

स्पेनचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री जोसेफ बोरेल यांनी गुरुवारी सांगितले की, ते या परिस्थितीचा अभ्यास करीत असताना त्यांच्या लक्षात आले की ही सगळी अमेरिकेची इच्छा असून ते ती ब्रिटनकडून पूर्ण करून घेत आहेत. परंतु बीबीसीचे संरक्षण प्रतिनिधी जोनाथन बीले म्हणाले, अमेरिकेच्या गुप्तहेर खात्याकडून आलेल्या माहितीच्या आधारे जिब्राल्टर सरकारने ही कारवाई केली आहे.

 

बीबीसीचे खास प्रतिनिधी कासरा माजी यांनी या प्रकाराची केलेली मिमांसा पाहू.

 

टँकरच्या बदली टँकर ही इराणची भूमिका हेच दर्शविते की युकेच्या या अश्या वागण्यामुळे तेहरान खूप संतापला आहे.

 

सीरिया युद्धाच्या आगीत होरपळत असतानाही इराण त्यांना सतत आठ वर्ष न चुकता तेल पुरवठा करीत होता. त्यात पहिल्यांदाच असा व्यत्यय आला आहे.

 

इराण आणि युके यांचे संबंध खराब होण्याची अनेक कारणे आहेत त्यापैकी एक कारण म्हणजे ब्रिटिश आणि इराणी असे दुहेरी नागरिकत्व असलेल्या नाझनीन झघरी-रॅटक्लिफ हिला इराणने केलेली अटक आणि तिला फर्मावलेला कारावास. ब्रिटन इराणवर तिला सोडण्याकरिता दबाव आणत आहे. तिला हेरगिरीच्या आरोपाखाली इराणने २०१६ साली अटक केली होती. आणि तिने हे आरोप नाकारले होते.

 

जप्त केलेल्या टँकर आणि त्याच्या वरील मालाची किंमत २००मिलियन डॉलर पेक्षा जास्त आहे. या बेकायदेशीर आणि चोरीच्या मामल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इराण उत्सुक आहे. गल्फ मधील ब्रिटिश जहाज ताब्यात घेण्याची त्यांची क्षमता आहे आणि ते तसे करतीलही.

 

 

या घटनेचे वेगवेगळे पडसाद बघायला मिळत आहेत. युकेला आता आत्मसन्मान राहिला नाहीय. ते आता फक्त अमेरिकेच्या हुकमाचे पालन करते असे एका वरिष्ठ इराणी वकिलाने म्हटले आहे. तर इराण-युकेचे संबंध मित्रत्वाचे असण्यासाठी स्थापन केलेल्या गटाचे प्रमुख मुस्तफा यांनी म्हटलेय की युकेने उगाचच इराणशी शत्रुत्व ओढवून घेतलेय. त्याचवेळी व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी "उत्कृष्ट कामगिरी" असे कौतुक करून या अवैध व्यापाराला खीळ घातल्याबद्दल अभिनंदन देखील केले.

 

बनियास रिफायनरी २०१४ पासून युरोपियन युनियनच्या मंजुरीच्या अधीन आहे. ट्रम्प प्रशासन तेहरानच्या आंतरराष्ट्रीय आण्विक करारापासून बाहेर पडले आहे. तेव्हापासून त्यांनी इराणवर मंजुरी लादली आहे. 

 

-प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk)

 

Source: BBC

 

Iranian official threatens to seize British oil tanker.