काश्मिरी जिहाद पंजाबी पाकिस्तानच्या कुवतीच्या पलीकडे!
         Date: 08-Aug-2019
​​
काश्मिरी जिहाद पंजाबी पाकिस्तानच्या कुवतीच्या पलीकडे!
 
(ICRR Af-Pak )
 

 
 
 
सध्या पाकिस्तानात दोन शक्तिशाली पण परस्परविरोधी गट सक्रिय आहेत. या-पंजाबी अशा बलुच, पश्तुन, सिंधी लोकांमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात टोकाच्या रागाची भवना आहे कोणत्याही स्थितीत पाकिस्तानच्या "काश्मीर जिहाद" ला समर्थन देण्याच्या मानसिकतेत नाहीत. दुसरा गट पंजाबी लोकांचा आहे, जो टोकाचा राष्ट्रवादी आहे आणि काश्मीर कलम ३७० च्या मुद्दयावर भारताविरोधात तात्काळ सैनिकी कारवाई करण्यासाठी सैन्यावर दबाव टाकत आहे.
 
 
 
ही १९७१ नंतरची पाकिस्तानी सैन्याची सर्वात मोठी आणि कठीण परीक्षा आहे. ट्रंम्पच्या काश्मीर मुद्दयावर मध्यस्थी करण्याच्या प्रस्तावानंतर पाकिस्तानात काश्मीरवरून निर्माण झालेल्या आशेचा भल्यामोठा फुग्या भारताच्या "३७०" च्या टाचणीने अचानकपणे फुटला आहे. पाकिस्तानी सैन्यासाठी हा अनपेक्षित आणि जीवघेणा धक्का आहे. यामुळे "काश्मीर बनेगा पाकिस्तान" ही घोषणा ज्या सैन्याने जनतेच्या मनात ठसवली आहे, तीच जनता आता सैन्यावर मोठ्या आणि भयंकर कारवाईसाठी दबाव टाकत आहे. पाकिस्तानी सोशल मिडीयावर वणवा भडकला आहे. कॉर्प्स कमांडर्स कॉन्फरन्स नंतर जनरल बाजवा यांनी ३७० च्या मुद्द्यावर कोणत्याही थराला जायला पाकिस्तान तयार आहे अशी उघड धमकी दिली आहे.
 
 
पण महत्वाचा मुद्दा आहे, पाकिस्तान भारताविरुद्ध थेट युद्ध करेल? युद्ध झालंच तर पंजाबी जनरल्स आपले उद्योगधंदे सोडुन लढतील? जरा आपण या मुद्द्यांचा विचार करू.
 
 
 
सामान्य भारतीय व्यक्ती पाकिस्तानकडे २० कोटी कट्टर सुन्नी लोकांचं एकजिनसी राष्ट्र म्हणुन बघते. हे सर्व लोक काश्मीरसाठी आणि भारतविरोधासाठी आपलं सर्वस्व अर्पण करायला तयार असतील असा भारतीयांचा समज आहे. पण हा समज चुकीचा आहे. प्रत्यक्षात पाकिस्तान हा अनेक भाषा आणि वंशांच्या टोकाच्या भेदभावांनी भरलेला एक देश आहे. सत्ता आणि संपत्तीचे एकत्रीकरण पंजाबी लोकांच्या झालेले आहे. बलुचिस्तानात बलुच संपुर्ण पाकिस्तानला कच्च तेल, गॅस, सोनं आणि खनिजसंपत्ती पुरवुनही पराकोटीचे दरिद्री राहिलेले आहेत कारण पंजाब्यांनी त्यांना आजपर्यंत फक्त लुटलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे. पश्तुन बहुल वझिरीस्तान आणि फाटा आजपर्यंत पाकिस्तानने अफगाणिस्तानात जिहादसाठी कट्टर सुन्नी मुस्लिम अतिरेकी तयार करून घुसवण्याची जागा म्हणुन वापरला आहे.
 
 
 
पंजाबी पाकिस्तानचे निःसंशय नैसर्गिक मालक असल्याच्या मस्तीत वावरत आलेले आहेत. जेव्हा बंगाली पक्षाने अखंड पाकिस्तानी संसदेत पुर्ण बहुमत मिळवले तेव्हा मस्तवाल पंजाब्यांनी हा निवडणुक निकाल अमान्य करुन पूर्व पाकिस्तानवर एक क्रूर युद्ध लादलं आणि या युद्धात ते निर्णायकरित्या हरून एक नवा देश- बांगलादेश निर्माण झाला.
 
 
 
इतकंच नव्हे, जेव्हा सिंधी नेता झुल्फीकार अली भुट्टो राजकीय लोकप्रियतेच्या शिखरावर पोचले तेव्हा पंजाबी जनरल झिया ने त्यांना पद्धतशीर खटला चालवुन फासावर चढवलं! भुट्टोची मुलगी बेनझीर अनेक वेळा पंतप्रधान झाली पण प्रत्येक वेळी सरकार बरखास्त करण्यात आलं आणि शेवटी तिला पाकिस्तानी सैन्याने आपले आतंकी प्रॉक्सिज वापरून बॉम्बस्फोटात ठार मारलं!
 
 
 
पाकिस्तानी सैन्याने १९४८ च्या पहिल्या काश्मीर युद्धात अफघाण-पाकिस्तान सीमेवरील पश्तुन ट्राइब्सना कट्टर सुन्नी इस्लामचा गांजा पाजुन भारताविरुद्ध लढवलं. परत रशियाला अफगाणिस्तानमधुन हाकलण्यासाठी त्याच पश्तुन लोकांना कट्टर सुन्नी भावनांचा वापर करुन रशियाला पिटाळलं आणि उलट त्यांच्यावरच आतंकवादाविरुद्धच्या लढाईच्या नावाखाली अमेरिकन डॉलर्सच्या बदल्यात २००१ आणि २०१४ मध्ये अमानुष बॉम्बिंग केलं.
 
 
 
१९७१ ला प्रथमच पंजाबी सेनाधिकारी प्रत्यक्ष युद्धात उतरले. पण बंगाली महिलांवर बलात्काराच्या धुंदीत लढाई विसरले. लाखो बंगाली महिला यांच्या वासनेच्या शिकार झाल्या. अखेर बंगाली राष्ट्रवादाच्या वणव्यात पाकिस्तानची फाळणी झाली आणि बांगलादेश नावाच्या नव्या देशाचा जन्म झाला! या पंजाबी जनरल्सनी सैनिकी इतिहासात शरणागतीचा विश्वविक्रम केला आणि ९३,००० पाकिस्तानी सैनिकांनी आपली शस्त्रे भारतीय सैन्याच्या समोर खाली ठेवली.
 
 
 
पंजाबी जनरल्सची दुविधा- व्यापार का लढाई?
 
 
पाकिस्तानी सैन्याच्या पंजाबी जनरल्सची व्यापारी प्रतिभा थक्क करणारी आहे. त्यांनी आपली सेना एका व्यापारी साम्राज्यात बदलुन टाकली आहे. आशिया टाईम्सच्या विस्तृत रिपोर्टनुसार पाकिस्तानी सैन्याच्या मालकीच्या उद्योगांची सध्याची वार्षिक उलाढाल १०० अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या पुढे गेली आहे. शाहीन फाऊंडेशन, फौजी फाऊंडेशन, बहारिया फाउंडेशन आणि डिफेन्स हाऊसिंग ऑथॉरिटी अशा वेगवेगळ्या औद्योगिक युनिट्सच्या माध्यमातुन पाकिस्तानी सेना इन्शुरन्स- बँकिंग, अन्नप्रक्रिया, सुपरमार्केट चेन्स, सिमेंट, रियल इस्टेट, बांधकाम, खाजगी सुरक्षा सेवा या आणि अशा अनेक उद्योगात सक्रीय आहे.
 
 
 
अशा बहुविध उद्योगात पैसे मिळवत असल्याने पंजाबी जनरल्स आपला लढाईचा मुख्य "धंदा" पुर्ण विसरुन गेले आहेत आणि याकामी ते पाकिस्तानच्या ग्रामीण भागातुन तयार झालेले दरिद्री आणि अशिक्षित कट्टर सुन्नी जिहादी भारत आणि अफगाणिस्तानच्या विरोधात वापरत आले आहेत. याशिवाय जन्मजात लढाऊ आणि कट्टर मुस्लिम पश्तुन म्हणजे पठाणांना त्यांनी नेहमी अफगाणिस्तान आणि भारताविरुद्ध वापरलं आहे. पण हे तंत्र आता पूर्वीएवढं प्रभावी राहिलेलं नाही, का?
 
 
 
पश्तुनांचं पाकिस्तानच्या काश्मीर वेडाविषयी काय म्हणणं आहे?
 

 
 
 
एका पश्तुन तरुणाने पाकिस्तानातील पश्तुन समाजाच्या स्थितीचं वर्णन करणारी एक अतिशय भावुक कविता ट्विटरवर लिहिली होती. तिचा सारांश असा....
 
 
---मी भारताविरुद्ध जिहाद लढायला आता काश्मीरला नक्कीच गेलो असतो पण मी पश्तुन असल्याने पाकिस्तानी सैन्याने माझं ओळखपत्र जब्त केलंय ....
.... तरीही...
..... मी माझ्या भावाला काश्मीर जिहादसाठी नक्की पाठवलं असतं, पण तो पश्तुन असल्याने त्याला पाकिस्तानी सैन्याने गायब केलंय आणि तो कुठे ते मला माहित नाही....
.....तरीही...
... मी माझ्या तरुण मुलग्याला जिहादसाठी पाठवलं असतं.... पण पाकिस्तानी सैन्याने वझिरीस्तानच्या पश्तुन जमिनीवर पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात तो जखमी झालाय आणि सध्या हॉस्पिटलमध्ये जीवन-मरणाची लढाई लढत आहे....
...... तरीही....
.... मला या देशाच्या लढाईसाठी मदत म्हणुन माझी जमीन विकायची इच्छा होती.... पण माझ्या जमिनीवरून मला बेदखल केल्याने मी सध्या बाका खेल विस्थापित शिबिरात रहात आहे....
 
 
 
ही करुण कथा लाखो बलुच आणि पश्तुन लोकांची १९४७ पासुन आहे.
 
 

 
 
पाकिस्तानातील अत्यंत कडवा मुस्लिम आणि भारत-हिंदु विरोधात सतत आग ओकणाऱ्या झैद हमीद या माजी जिहाद्याने ट्विटरवर एक पोस्ट टाकली. त्यात त्याने म्हटलं होतं, "अब एक बार फिर हमारे घयूर (शूर) पश्तुन काश्मीर मे जिहाद के लिए दाखिल हो जाएंगे....."
 
 यावर पश्तुन समाजाकडुन तिखट प्रतिक्रिया आल्या. लोकांनी त्याला विचारलं," काश्मीर जिहादसाठी पश्तुन? कशाबद्दल? पंजाबमध्ये एकही लढाऊ माणुस शिल्लक नाही? आम्ही काय पंजाब्यांचे बळीचे बकरे आहोत?"
ही सध्या पाकिस्तानातील क्रमांक दोनच्या वांशिक गटाची मानसिकता आहे. बलुच, पश्तुन, सिंधी सुन्नी मुस्लिम पाकिस्तानच्या धार्मिक भावनिक संकल्पनेपासुन कोसो दूर गेलेत. पाकिस्तानी सेना आणि सरकार याच्या विरोधात गाई पंजाबी समाजात टोकाची द्वेष भावना निर्माण झालेली आहे. त्यात पश्तुन तरुण त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत कितीतरी जास्त प्रमाणात सैन्यात आहेत. त्यामुळे ही अस्वस्थतता पाक सैन्याला भारी पडु शकते.
 
 
 
तुटती भावनिक संकल्पना आणि संपत चाललेला पाकिस्तानी राष्ट्रवाद...
 
 
जिन्नाच्या सैन्याने २७ मार्च १९४८ ला बलुचिस्तानचा बळजबरीने कब्जा घेतला आणि "कलात" चा राजा खान याला हाकलुन दिले. याशिवाय हजारो बलुच आणि पश्तुन सैन्याने वेगवेगळ्या कारणाने अपहरण करून मारले आहेत. आजपर्यंत एकही बलुच, पश्तुन सर्वोच्च राजकीय स्थानावर पंजाबी लोकांनी पोचु दिला नाही. बेनझीर आणि तिचा पिता तिथे पोचले तेव्हा त्यांना ठार मारण्यात आलं. एकही गाई पंजाबी राजनेता मोठा झालेला पंजाबी लॉबी सहन करत नाही.
 
 
 
पश्तुन आणि बलुच समाजाला बाहेरुन चिकटवलेली पाकिस्तानी राष्ट्रवादाची संकल्पना गळुन पडत आहे. १९७५ ला याचं वर्णन सरहद्द गांधींचा मुलगा खान अब्दुल वली खान यांनी केलं होतं. एका पाकिस्तानी पत्रकाराने वली खान यांना विचारलं तुम्ही पश्तुन आहात का पाकिस्तानी, त्यावर त्यांचं उत्तर होतं, "मी मागील ३००० वर्षांपासुन पश्तुन, मागील १३०० वर्षांपासुन मुस्लिम आणि फक्त २५ वर्षांपासुन पाकिस्तानी आहे!"
 
 
 
अशा स्थितीत पाकिस्तानी सैन्यावर अल्लाह पेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या सामान्य पंजाबी पाकिस्तानी माणसासाठी सद्यस्थिती अतिशय वेदनादायी आहे. काश्मीर साठी पंजाबी जनरल्स आपलं व्यावसायिक नुकसान करुन घेऊ इच्छित नाहीत. काश्मीरचा भावनिक मुद्दा गाई पंजाबी पाकिस्तान्यांना आता आपला वाटत नाही. रिकाम्या तिजोरीमुळे पाकिस्तानी सेना भारतासोबत काश्मीरसाठी युद्ध लढु शकत नाही. आणि तरीही साहसवादाच्या वेडात सैन्याने युद्धाचा जुगार खेळलाच तर पाकिस्तानची १९७१ पेक्षा वाईट अवस्था होऊन ३-४ तुकडे होतील.
 
 
 
 
अशा वेळी पाकिस्तानी आवाम त्यांच्या सैन्याला किती पुढे रेटत राहील? पाकिस्तानी सैन्य जनतेच्या या वेडेपणाला बळी पडेल? याची उत्तरे फक्त देवालाच माहीत आहेत!!!
 
 
 
 
---- विनय जोशी