लंडन दूतावासावर हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या शक्तीहीन अवस्थेची पोचपावती
             Date: 04-Sep-2019

    लंडन दूतावासावर हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या शक्तीहीन अवस्थेची पोचपावती
    (ICRR Af-Pak)


    आधी १५ ऑगस्ट आणि परत ३ सप्टेंबरला लंडनच्या भारतीय दूतावासावर पाकिस्तानी ब्रिटिश नागरिकांनी मोठे हल्ले केले. सध्या ब्रिटनचा गृहमंत्री आणि लंडनचा महापौर दोघेही पाकिस्तानी मूळ असलेले ब्रिटिश नागरिक आहेत. महापौर सादिक खान पक्का जिहादी मानसिकतेचा पाकिस्तानी आहे. १५ ऑगस्टला झालेल्या दूतावास हल्ल्यासाठी सादिक खानने बसेस भरभरून पाकिस्तानी नागरिक जमावल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

    हल्ले ब्रिटनमध्ये का होत आहेत?


    जगभरातील पाकिस्तानी ३७० रद्द केेल्याने प्रचंड संतापले आहेत. प्रत्येक पाकिस्तानी 'कश्मीर बनेगा पाकिस्तान' ही घोषणा देेेत देत मोठा झालेला आहे. त्यामुळे ३७० चा झटका जगभरातील पाकिस्तान्यांच्या जिव्हारी लागला आहे. भारताचा हा निर्णय बदलण्यासाठी कोणताही हुकमी आणि खात्रीपूर्वक उपाय सध्या उपलब्ध नाही. जगभर भारतीय राजनैतिक अभियान अतिशय यशस्वी ठरल्याने काश्मीरवरील पाकिस्तानी दृष्टिकोनाला चिनशिवाय कुणीही गिऱ्हाईक नाही. पाकिस्तानची सर्व दारोमदार मुस्लिम अरब देशांवर होती त्यांनीही पाकिस्तानला वाऱ्यावर सोडलं आहे.

    यामुळेच जगभरातील पाकिस्तानी मिळेल त्या मार्गाने काश्मीर विषय लाऊन धरत आहेत.

    पाकिस्तानी सैन्यावरील जनतेची नाराजी!

    आजपर्यंत ज्या सैन्याला पाक प्रजेने "खुदा" चा दर्जा दिला त्या सैन्याची ३७० वरील भूमिका अत्यंत "नपुंसक", "बुझदिल" असल्याची पाक प्रजेची भावना आहे.

    पाकिस्तानी सेना 'फज्र की नमाज' (पहाटे) अदा करून निघाली की 'मघरीब की नमाज' (संध्याकाळची) अदा करायला दिल्लीच्या जामा मशिदीत पोचेल असल्या अव्यवहार्य आणि भंपक कल्पना १९४७ पासून पाकिस्तानात रुजवल्या गेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ३७० नंतरची पाक सैन्याची भूमिका प्रजेची अत्यंत निराशाजनक आणि संतापजनक आहे. आता हा राग सोशल मीडियावर प्रकटही होत आहे. आणि या निराशेचा परिणाम म्हणून लंडन हल्ल्यांसारखे प्रकार होत आहेत.


    लंडनसारखे हल्ले भारताच्या फायद्याचे?

    एका बाजुला भारतीय लोक जगभरात समरसून राहतात आणि दुसऱ्या बाजुला काश्मीरवरून सुरू झालेलं भारतीय राजनैतिक अभियान अतिशय शांत, प्रभावी, अदृश्य पण अत्यंत परिणामकारकरीत्या चालु आहे. याउलट पाकिस्तानी लोक काश्मीरवरून जगभर धुडगुस घालत आहेत आणि पाकिस्तानी सरकार, नेते, डिप्लोमाट्स मिळेल तिथे धमक्या आणि आक्रमक भाषा वापरत आहेत. याचा भारताला मोठा फायदा होताना दिसत आहे.


    एकुणच उरी सर्जिकल स्ट्राईक पासुन पाकिस्तानी सैन्याची होत असलेली बेअब्रू आणि घटत चाललेला दरारा आशियातील शांततेसाठी एक शुभसुचक लक्षण आहे.

    ---- विनय जोशी