बलुचिस्तानात १९७१ मधील बांगलादेश चळवळीची पुनरावृत्ती?
         Date: 29-Dec-2020

बलुचिस्तानात १९७१ मधील बांगलादेश निर्मितीची पुनरावृत्ती?

 

- प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk)

 

बलुचिस्तान स्वातंत्र्य चळवळीतील ३५ वर्षीय लोकप्रिय नेता करीमा बलोच हिचं कॅनडातून अचानक बेपत्ता होणं आणि त्यापाठोपाठ लगेचच ती मृतावस्थेत आढळणं ही आश्चर्याची नसली तरी धक्कादायक बाब नक्कीच आहे. पाकिस्तान लष्कराच्या विरोधात बोलल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ती आयएसआयच्या हिट लिस्टवर होतीच. आपल्याला आज ना उद्या लक्ष्य केले जाईल अशी तिला भीती वाटत होती.

 

इस्लामाबाद विरोधात बोलणाऱ्या बलोच नेत्यांच्या बाबतीत हे असे पहिल्यांदाच घडतेय असे नाही. या वर्षाच्या मार्च महिन्यात, बलोच पत्रकार साजिद हुसेन स्विडनमधील उप्प्सलाजवळील फायरीस नदीत मृतावस्थेत सापडले होते. ते बलुचिस्तान टाईम्सचे संपादक होते. पाकिस्तानमध्ये होणारे मानवी हक्कांचे उल्लंघन, बलोच नेत्यांचे आकस्मिक गायब होणे आणि पाकिस्तानमध्ये चालणारी अंमली पदार्थांची तस्करी हे त्यांच्या वेबसाईटचे मुख्य विषय होते. स्विडिश पोलिसांनी हे प्रकरण " संभाव्य आत्महत्या किंवा अपघाती मृत्यू" म्हणून बंद केले असले तरी पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय यांनी त्यांची हत्या केल्याचा आरोप पॅरिस मधील पत्रकारांनी केला आहे.

 

स्विडन पोलिसांप्रमाणेच टोरोंटो पोलिसांनी देखील करीमा बलोचचा मृत्यू हा घातपात नसल्याचे म्हटले आहे. यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. सतत मिळणाऱ्या धमक्यांमुळे पाकिस्तानातून पळून जाऊन कॅनडामध्ये आश्रय मिळवणाऱ्या करीमाने अचानक मृत्यूला कवटाळण्याचा निर्णय खरंच घेतला असेल? तिच्या कुटुंबीयांनी आणि अनेक बलोच नेत्यांनी संपूर्ण चौकशीची मागणी केली आहे.

 

यापूर्वी परवेझ मुशर्रफ यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी सैन्याने बलोच स्वातंत्र्यलढ्याला वाहून घेतलेले बलोच आदिवासी नेता नवाब अकबर बुगती यांची २००६ मध्ये निर्घृणपणे हत्या केली होती. २०१४ मध्ये बलूचिस्तान स्टुडंट्स ऑर्गनायझेशन (बीएसओ) चे माजी प्रमुख झहीद बलोच यांचे क्वेट्टा मधून अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर आजतागायत त्यांचा काही ठावठिकाणा लागलेला नाही. त्यांच्या अपहरणानंतरच करीमाने बीएसओच्या प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली होती.

 

दोन वर्षांपूर्वी कराचीच्या क्लिफ्टनमधील चिनी वकिलातीवर युद्धसदृश हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) मधील अतिशय आक्रमक अश्या सैनिकांनी केला होता. बलोच लोकांना स्वातंत्र्य मिळवून देणे हेच या आर्मीचे लक्ष्य आहे. या हल्ल्यात कोणताही चिनी नागरिक मारला गेला नसला तरी बीजिंगने संपूर्ण चौकशीचे आदेश दिले. आपल्या नागरिकांचे आणि पाकिस्तानात असलेल्या चिनी मालमत्तेचे संरंक्षण झाले पाहिजे असा इशारा चीनने दिला. जोपर्यंत परिस्थिती निवळत नाही तोपर्यंत चीनचे प्रकल्प स्थगित केले जातील असेही चीनने बजावले. परंतु पाकिस्तानला खात्री होती की चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर संबंधित प्रकल्पांच्या बाबतीत चीन असे काही करणार नाही.

 

 karima baloch _1 &nb

 

सिपेक हा चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह मधील सर्वात महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा बलुचिस्तानमधील ग्वादार बंदरातून चीनच्या झिंजियांगला हिंद महासागराशी जोडतो. हिंद महासागरावर वर्चस्व मिळवण्यासाठी चीनला बलुचिस्तानमध्ये आपले पाय रोवणे आवश्यक आहे. बलोच आर्मीपासून संरक्षण मिळावे म्हणून पाकिस्तान आता ग्वादार बंदरावर काटेरी तारांनी कुंपण घालत आहे.

 

अमेरिकेशी मैत्री ते शीतयुद्ध अशी मजल गाठणारे पाकिस्तान आता चीनचे आश्रित झाले आहे. अमेरिकेप्रमाणे चीनला पाकिस्तानमधील भ्रष्टाचार, अल्पसंख्यांकांशी चाललेली अमानुष वागणूक किंवा मानवी हक्कांची तेथे होत असलेली पायमल्ली याविषयी काहीही देणेघेणे नाही. याउलट पाकिस्तानातील  उपेक्षित लोकशाही आणि निर्णय प्रक्रियेवर असलेले लष्कराचे वर्चस्व आणि नियंत्रण या बीजिंगच्या दृष्टीने जमेच्या बाजू आहेत. भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकिस्तानला चीनच्या रूपाने एक उत्तम कायमस्वरूपी आणि विश्वासू मित्र मिळाला आहे.

 

चिनी सैन्याने बलुचिस्तानचा पूर्णपणे ताबा घेण्याअगोदर नवीदिल्लीला काहीतरी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. लवकरात लवकर बलुचिस्तानमधील परिस्थितीचा भारताला गांभीर्याने विचार करावा लागेल आणि त्यावरील उपाययोजना अमलात आणाव्या लागतील.

 

खनिज समृद्ध प्रदेशांमध्ये पंजाबी पाकिस्तानी सैन्य बिगर बलुची लोकांची वस्ती वाढवत असल्याने बलूच लोकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. हा फार मोठा लोकसंख्याशास्त्रीय बदल असेल. ग्वादार बंदर आणि किनारपट्टीवरील भागाचे या प्रकल्पाच्या आडून पंजाबी बहुल भागात वेगाने रूपांतर करण्यात येत आहे. यामुळे दोन गोष्टी होतील. एक- स्थानिक लोकसंख्या कमी होऊन ते अल्पसंख्यांक होतील आणि आपोआपच त्यांचा स्वातंत्र्यलढ्याचा जोर नाहीसा होईल. दोन - नवीन वसाहतीना स्थानिकांना मदत करण्यात कोणतेही स्वारस्य नसेल आणि ते सैन्याच्याच बाजूचे असतील. कालांतराने ६.५ दशलक्ष बलोच लोकसंख्या आपल्याच जमिनीवर अल्पसंख्यांक म्हणून ओळखले जातील आणि आपल्या मातृभूमीवरील हक्क गमावातील.

 

या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करताना पाकिस्तानी सैन्य १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तान ( आताचा बांगलादेश) मध्ये केलेल्या चुकांची पुनरावृत्ती करत आहे. तिथे पंजाबी बहुल सैन्याने बंगाली भाषा, साहित्य, समाजातील बुद्धिजीवी आणि त्यांच्या अस्मितेला दडपलं. लष्कराने तेथील सांस्कृतिक विशिष्टता दडपली. लोकशाहीचा अनादर, भयंकर अत्याचार, जनतेचा अनादर यातच आनंद मानला आणि याचा परिणाम पाकिस्तानचे तुकडे झाले. " आपला शत्रू चुका करत असताना त्याला कधी अडवू नये." हा नेपोलियन बोनापार्टचा सल्ला नवी दिल्लीने लक्षात ठेवायला हवा. इंदिरा गांधींनी हे कायम ध्यानात ठेवलं आणि अमलात आणलं.

 

करीमा बलोचची हत्या, आणि हजारो बलुची लोकांचे अपहरण आणि हत्या बलुचिस्तानी सहजासहजी विसरणार नाहीत.पण १९७१ ची पुनरावृत्ती जवळ आलीय का? वेळच ठरवेल काय ते.   

 
Source: youtube, google, Herald, Deccan Herald, wikipedia

फोटो स्रोत - गुगल