पालघर घटना आणि रावण-महिषासूर पूजा.
         Date: 25-Apr-2020

पालघर घटना आणि रावण-महिषासूर पूजा.

 (ICRR- Maoism/LWE) 
 

10-12 दिवसांपूर्वी पालघरला घडलेल्या साधूंच्या हत्येने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर अख्खा देश हादरून गेला. तीन असहाय्य जीव घेण्याची ही निर्घृण वृत्ती पाहून प्रत्येक संवेदनशील मन सुन्न झालं. एका अत्यंत वयोवृद्ध माणसावर हात उचलण्याची क्रूर आणि पाशवी वृती आणि बुद्धी या जमावामध्ये आली कुठून असा प्रश्न जवळजवळ प्रत्येकालाच पडला असणार आहे. आपल्या कृतीवर बहुतांश वेळा आपल्या विचारांचा प्रभाव असतो, आणि आपले विचार आपण समोर ठेवलेल्या आदर्शांप्रमाणे पक्के होत असतात. या जमावासमोर नेमका कोणता आदर्श असेल म्हणून त्यांना हे कृत्य करण्याची प्रेरणा मिळाली?

रावण व महिषासूर पूजा_1&nbघटना घडायच्या आधी गेली काही वर्षे वनवासी समाजात बदलत चाललेल्या मानसिकतेची कुणकुण अनेकांना लागली होती. दुर्दैवाने भगव्याच्या विद्वेषाची विषवेल वनवासी समाजात एवढ्या वेगाने पसरत जाते आहे याचा अंदाज नागरी हिंदू समाजाला लागला नाही. संपूर्ण देशात दसऱ्याला रावण दहन होत असतं. पण पालघरच्या वनवासी पट्ट्यात काही वर्षांपासून रावण पूजा- महिषासुर पूजा आदी प्रकार मुद्दाम रुजवले गेलेत. यातून भगव्याचा द्वेषही अत्यंत आक्रमकपणे पसरवला गेला आहे. गेल्या 5 ते 6 वर्षांपासून ठाणे जिल्ह्यातील कित्येक वनवासी (आदिवासी) पाड्यांवर ‘आदिवासी राजा रावण’ आणि ‘महिषासूर’ या दोघांची देव म्हणून पूजा केली जाते.(सोबतचा फोटो पहा) ही प्रथा कुठून आली? 

 
 
 

मुळातच रावण लंकाधिपती आणि म्हणून क्षत्रियकर्मी असला, तरी तो दशग्रंथी ब्राह्मण, निस्सीम शिवभक्त आणि संस्कृत भाषेचा प्रकांड पंडित होता. संस्कृत भाषेमध्ये त्याने रचलेल्या शिवस्तुती आजही उपलब्ध आहेत. राक्षसराज म्हणून त्याने लंकेवर राज्य करायला सुरुवात केली, आणि त्याच दरम्यान लंकेमधून भारताच्या दक्षिण भागामधील जंगलातल्या कित्येक ऋषीं आणि त्यांच्या धार्मिक कृत्यांमध्ये सतत विघ्ने आणून, त्यांच्या आश्रमांची नासधूस करून आपली दहशत तेथे निर्माण केली. रावणाची माणसे व सैन्य यांच्या सततच्या उपद्रवापासून सुटका व्हावी म्हणून विश्वामित्रांनी श्रीरामचंद्राला तेथे नेले, तिथली परिस्थिती त्याला अवगत करून दिली. आपल्या वनवास काळात या जंगलांमधून वास्तव्य करत रामाने तेथील मूलनिवासीना अभय दिले. त्यावेळी रामपत्नी सीतेचे अपहरण रावणाने केले आणि म्हणून रामाने त्याच्याशी युद्ध्य करून त्याचा विनाश केला. तीच कथा महिषासुराची. ब्रह्मदेवाच्या वराने उन्मत्त झालेल्या राक्षस महिषासुराच्या अन्याय्य वर्तनाने क्रोधीत होऊन देवीने त्याचा नाश केला.

 
 
 
 

या सगळ्यामध्ये रावण आणि महिषासूर यांची वनवासींनी पूजा करण्याचे कारण काय? रावण आणि महिषासूर आदिवासी होते असा म्हणणारे अप्रत्यक्षपणे वनवासींना राक्षस म्हणू पहात आहेत का? की केवळ बहुतांश हिंदू समाजाची निढळ श्रद्धास्थाने असणाऱ्या श्रीराम आणि देवीला विरोध म्हणून या भोळ्या-भाबड्या वनवासींच्या भावना आणि श्रद्धा भरकटवून, अशा कित्येकांच्या क्रूर हत्येने आपले हात ‘लाल’ करून घेणाऱ्या स्टालिन आणि माओच्या विचारधारा इथे रुजवू पहात आहेत? पालघर घटनेमागची प्रेरणा आणि ‘त्या’ जमावाच्या क्रूर मानसिकतेचे मूळ इथे दडलेले आहे! त्या हत्येमध्ये जरी स्थानिक वनवासी सामील होते, तरी त्याच्या मागचा मेंदू हा खुनशी ‘नागरी कम्युनिस्ट’ होता हे आतातरी ओळखलं पाहिजे.

 
 
 

राम, रावण किंवा महिषासूर खरोखर घडून गेले की त्या केवळ दंतकथा हा मुद्दा जरी बाजूला ठेवला, तरी अत्यंत संयमी, न्यायी आणि नैतिक बुद्धीचा श्रीराम आणि वात्सल्यमूर्ती श्रीआदिशक्ती ही बहुतांश हिंदूंची आदर्शस्थाने आणि स्फूर्तीस्थाने आहेत. त्यांना धक्का लावून अनैतिक, क्रूर आणि उपद्रवी अशा असुरशक्तीचा आदर्श जर कुणी आपल्या फायद्यासाठी रुजवू पहात असेल, तर भविष्यात अशा घटनांसाठी आपण आपली मानसिक तयारी करून ठेवलेलीच बरी! स्वदेश,स्वधर्म,स्वभाषा अशा मूळ श्रद्धांवरच घाला घालत एखाद्या समाजाचा पाया आणि वैचारिक बैठकच कोलमडवून आपल्याला हवी ती विचारसरणी तिथे पेरायची, आणि या मार्गात आड येणाऱ्या प्रत्येकाला अतिशय क्रूरपणे संपवायचं जेणेकरून बाकीच्यांना त्याची दहशत बसेल. कम्युनिस्टांची ही पद्धत फार जुनी आहे. या क्रूरपणाला तितक्याच पराक्रमाने उत्तर देत टिकून रहायचं असेल तर श्रीरामाच्या कोदंडाचा टणत्कार होणं आता अत्यावश्यक आहे!!!

 
                                     -मैत्रेयी गणपुले-