भारताशी मित्रत्वाचे नाते- चीनची बदललेली रणनीती की नाटक?
          Date: 09-Apr-2020


भारताशी मित्रत्वाचे नाते- चीनची बदललेली रणनीती की नाटक?

 

गेल्या आठवड्यात चीनने भारत-चीन (इंडो-चायना ) संबंधांची सत्तर वर्षे मोठ्या उत्साहात साजरी केली. चिनी राजदूताने भारताला उद्देशून लिहिलेलं संपादकीय अनेक चिनी वृत्तपत्रांनी ठळक बातमी म्हणून छापलं. परंतु भारताच्या राजदूतांनी चीनसाठी असे काही लिहिल्याचे ऐकीवात नाही. चिनी राजदूत आणि चिनी सरकारने भारत-चीन यांच्यातील वाढत्या संबंधाबाबत ट्विट केले. दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या टेलिफोन वरील संभाषणाचा देखील त्यांनी ट्विट मध्ये उल्लेख केला.

 

संपादकांनी दोन्ही देशांच्या निकटच्या संबंधाबाबत कौतुक केले आणि कोविद-१९ वर दोन्ही राष्ट्रे एकत्रितरित्या कसा लढा देत आहेत यावर स्वतंत्रपणे एक परिच्छेदही लिहिला होता. सोशल डिस्टंसिन्ग मुळे याविषयी कोणताही औपचारिक कार्यक्रम आखला गेला नाही. चिनी राजदूतांनी शनिवार आणि रविवारी असलेल्या मेणबत्ती लावण्याच्या कार्यक्रमात सुद्धा भाग घेतला आणि ट्विट केले," आम्ही एकमेकांच्या सुख दुःखात एकमेकांच्या बाजूने उभे आहोत."

 
Modi and xi_1  

 

गेल्या महिन्यात पाकिस्तानने चीनला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत काश्मीर प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी पाकिस्तानच्या वतीने या महिन्याचं प्रमुखपद भूषवावे अशी गळ घातली होती. चीनकडून पहिल्याच फटक्यात ती दुर्लक्षित केली गेली. काश्मीर प्रश्नी चीनने मौन बाळगले. गेल्या काही महिन्यांपासून भारत-पाक सीमा शांत आहेत. तिथे कसलीही गडबड झाली नाही. असे फार क्वचित घडले असेल. कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी आम्ही संपूर्णपणे तुम्हांस सहकार्य करू असे चीनने म्हटले आहे. तात्पुरते रुग्णालय बांधायलाही मदत देण्याचीही चीनने तयारी दाखविली.

 

अलिबाबा फाउंडेशनने मास्क, व्हेंटिलेटर आणि इतर सुरक्षा विषयक वस्तू भारताला भेट म्हणून दिल्या आहेत. टेस्ट किटची तिसरी बॅच भेट म्हणून पाठविण्यात आल्याचे ट्विट चिनी राजदूताने केले. चीन आणि भारत एकजुटीने कोविद-१९ च्या महामारीवर मात करू असेही ते म्हणाले. टिक-टॉक ने १०० कोटींची वैद्यकीय उपकरणे दान केली.

 

या दोन्ही कंपन्या बीजिंगच्या निर्देशानुसार काम करत आहेत. चिन्यांचं भारताबद्दलचं प्रेम अचानक का उफाळून आलंय? याचं उत्तर अगदी सोपं आहे. डब्ल्यूएचओच्या कोविद-१९ च्या सर्व नियमांचं पालन भारताने केलं आहे. या व्हायरसचा प्रसार रोखण्यास चीन अपयशी ठरला अथवा चीनने यासंबंधी माहिती देण्यास दिरंगाई केली अश्या प्रकारचे कोणतेही आरोप भारताने चीनवर केले नाहीयेत. सद्यपरिस्थितीत, चीनविरुद्ध जागतिक असंतोष पसरत चाललेला असताना चीनला त्याच्या मित्र देशांची गरज भासणार आहे.

 

आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक देशातला चिनी राजदूत चीनच्या बाजूने ट्विट करत आहे. चीन आता कोरोना व्हायरसविरुद्धचे युद्ध जवळ जवळ जिंकल्यात जमा आहे. तो स्वतः या महामारीला सामोरे जात असताना इतर पिडीत देशांनाही वैद्यकीय मदत पुरवून या कोरोना विरुद्धच्या लढ्यात मदत करीत आहे अश्या आशयाची ती सगळी ट्विट्स आहेत. चीनने पुरवलेली ही मदत अनेक वेळा देणगी नसते. तर ती त्या त्या देशांनी विकत घेतलेली असते. तसेच या वैद्यकीय वस्तू बर्‍याचदा निकृष्ट दर्जाच्या आणि महागड्या असतात याचा उल्लेख त्या ट्विट मध्ये नाहीये. म्हणजे करायचं एवढंसं आणि दाखवायचं भरपूर असा चीनचा कारभार आहे. या वस्तूंच्या निकृष्ट दर्जाबद्दल छेडले असता चिनी प्रवक्त्याने सांगितले की जेव्हा जगभरातून चीनला अश्या प्रकारची वैद्यकीय मदत मिळालीय तेव्हा अनेक वेळा त्यात चिनी निकषांची पूर्तता केलेली नसूनही आम्ही ती स्वीकारलीय.

 

द वेस्टर्न प्रेस चिनी सरकारच्या जाहिरातींनी भरलेला आहे किंवा आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या देशांना चीन जबरदस्तीने चीनचा मोठेपणा दाखवणाऱ्या बातम्या छापायला भाग पाडतंय. चीनशी लागेबांधे असलेले काही पत्रकार पाश्चिमात्य माध्यमात चीनचे कौतुक छापतायत. ते राष्ट्रांना चीनची  लॉकडाऊनची कठोर रणनीती अवलंबण्याचा सल्ला देतायत. त्यावेळी चीनने जगापासून अनेक गोष्टी लपविल्या आहेत हे मात्र ते सोयीस्करपणे विसरलेत.

 

चीनशी नातं सांगणारा कोणताही दुवा नसलेले नाव या व्हायरसला देण्याविषयी चीनने डब्ल्यूएचओला भरीस पाडले. या व्हायरसच्या प्रादुर्भावाविषयी चीनने माहिती लपवून ठेवली ही गोष्ट ढळढळीतपणे समोर असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून डब्ल्यूएचओ 'चीनने या संकटातून स्वतःला कसे सावरले' याविषयी कौतुक करण्यात रमलंय. तैवानने दिलेल्या माहितीवर चर्चा करण्यास नकार देणाऱ्या डब्ल्यूएचओच्या अधिकाऱ्यांमुळे एक पूर्वग्रहदूषित संघटना म्हणून ती अपयशी ठरते. जपानने तर डब्ल्यूएचओला (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ) सीएचओ (चाइना हेल्थ ऑर्गनायझेशन) असे उघड उघड संबोधले आहे.

 

चीन मधील पेशंट झिरोला मुक्तपणे सगळीकडे फिरण्याची मुभा होती. त्याने सत्तर हजाराच्यावर लोकांना हा विषाणू वाटला. जगभरातील आरोग्यसेवा यंत्रणा निकामी ठरली. उध्वस्त झाली. आणि विकसित आणि विकसनशील सर्वच देशांना मंदीच्या भोवऱ्यात ढकलले. आशा आहे की इतर राष्ट्रांना आता तरी समजले असेल की डब्ल्यूएचओची पुनर्रचना करणे आणि आहे ती कमिटी बरखास्त करणे किती गरजेचे आहे.

 

चीनबद्दलचा द्वेष लोकांच्या मनात दिवसागणिक वाढतच आहे. अशातच चीन मधून पळून जाऊन दुसरीकडे राहणाऱ्या लोकांचे प्रमाणही वाढले होते. या पलायन करून आलेल्या लोकांमुळे संसर्ग झालेल्या लोकांचे चीड व्यक्त करणारे व्हिडीओ सगळीकडे फिरत आहेत. अनेक राष्ट्रे आपली वैद्यकीय उपकरणे स्वतःच्या देशाकरिता राखून ठेवत आहेत. अंतर्गत कमतरता वाढू नये यासाठी चीन झटत आहे. हा व्हायरस आटोक्यात आला की लोकांचा रोष बळावणार आहे. परंतु सगळे पुरावे नष्ट करण्यात चीन माहीर आहेच. तो सगळं सुरळीत झालं की पहिलं काम तेच करेल. ज्याप्रमाणे या विषाणूविषयी माहिती देणाऱ्या शास्त्रज्ञांच्या बाबतीत केलं. वुहानमधील अपार्टमेंटच्या अपार्टमेंट सील करणं असो किंवा तेथील जनतेला मरण्यासाठी असंच सोडून देणं असो. सगळ्या गोष्टींचे पुरावे चीन सरकार काही काळातच नष्ट करेल. आणि शोकांतिका विजयात बदलेल. मग चीन 'आमच्या पक्षाच्या नेतृत्त्वामुळे सगळं काही व्यवस्थित होतंय' अशी स्वतःच्या पक्षाची टिमकी वाजवून राजकीय फायदा करवून घेईल. अमेरिकेने सरकारला कोंडीत पकडण्यासाठी हा विषाणू मुद्दाम पसरवला होता असे सध्या चीन सगळीकडे सांगत सुटलाय. स्वतःच्या अपयशासाठी जगाला दोष देणारा चीन आंतरराष्ट्रीय समुदायाकडून कधीही स्वीकारला जाणार नाही.

 

कितीही आणि कश्याही प्रकारे चीनने प्रयत्न केले तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनची प्रतिमा सुधारणे आता शक्य होईल असे वाटत नाही. जगातील लोक सध्या चीन वर भयंकर तापले आहेत. परंतु प्रत्येक राष्ट्र आपल्यापुढे असलेल्या समस्येवर तोडगा काढण्याच्या प्रयत्नात आहे. जेव्हा हा तोडगा निघेल तेव्हा चीन एकटा पडेल. त्यावेळी त्याला भारताच्या मैत्रीची आवश्यकता भासेल. आणि भविष्याकडे डोळा ठेवूनच चीन सध्या " चिनी- हिंदी भाई भाई" चा राग आळवतोय.

 

-प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk)

 

Source: the statesman

 

Why China has changed tune on ties with India