क्वेटा हल्ला: चिनी प्रकल्पांची चिंता आणि पाकिस्तानला अस्थिर करणारी धोक्याची घंटा
         Date: 25-Apr-2021

Akshata_1  H x
 
 
 
 
बलुचिस्तानची राजधानी क्वेटा शहरात सेरेना या तारांकित आणि लक्झरी हॉटेलच्या कार पार्कमध्ये स्फोट झाला. क्वेटा मधील हे सेरेना हॉटेल इराणी दूतावास आणि बलुचिस्तानच्या प्रांतीय विधानसभेच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे सुरवातीला हा स्फोट इराणी दूतावासासमोर झाल्याची बातमी पसरली पण लगेचच बलुचिस्तानचे मंत्री डॉ. मीर जियाउल्लाह लांगोव यांनी ही घटना इफ्तार नंतर झाली असून कार सेरेना हॉटेलच्या पार्किंगमध्ये उभी होती, स्फोटात चार लोक ठार आणि ११ जखमी झाले असून ११ जखमींमध्ये एक पोलिस हवालदार असल्याची माहिती दिली. पाकिस्तानमधील चिनी राजदूत नॉंग रोंग हे इतर चार चिनी प्रतिनिधींबरोबर हॉटेलमध्ये थांबले होते पण स्फोट होताना ते मीटिंगसाठी बाहेर गेले असल्यामुळे सुरक्षित राहिले.
 
 
सुरवातीला हा हल्ला स्थानिक बलुच लोकांनीच केला असावा अशी शंका येणे स्वाभाविक होते कारण त्यांचा पाकिस्तानपासून स्वातंत्र्यासाठी चाललेला सहा दशकांतील संघर्ष सी-पेक ( CPEC ) नंतर आधीकच तीव्र झाला. बलुचिस्तानमध्ये चिनी वसाहती वाढत आहेत.कोट्यवधी डॉलर्सची उलाढाल या प्रदेशांमध्ये होत आहे, हजारो बाहेरील लोकांना नोकर्‍या मिळत आहेत, परंतु बलुच मात्र दुर्लक्षीत राहिले आहेत आणि जगण्यासाठी धडपडत आहेत. त्यामुळे त्यांचा सी-पेकला आणि पर्यायाने चीनला होणारा विरोध रास्त आहे. अलिकडच्या वर्षांत त्यांनी चिनी गुंतवणूकीवर अनेक हल्ले केले आहेत. २०१८ मध्ये क्वेटामध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात तीन चिनी नागरिक जखमी झाले होते. २०१९ मध्ये चीन विकसित करत असलेल्या ग्वादार बंदरातील हॉटेलवर बंदूकधारकांनी हल्ला केला आणि त्यात पाच लोक ठार झाले. २०२० मध्ये बलुच बंडखोरांनी कराची स्टॉक एक्सचेंजवर हल्ला केला, ज्यामध्ये नऊ लोक ठार झाले.
 
 
पण अनपेक्षितपणे या हल्ल्याची जबाबदारी तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) स्वीकारली आहे जे खूपच आश्चर्यकारक आहे. टीटीपीच्या प्रवक्त्याने हल्ल्याचा दावा करताना सांगितले की, “आमच्या आत्मघाती बॉम्बरने हॉटेलमध्ये स्फोटक भरलेली कार वापरली.” टीटीपीच्या क्वेटामध्ये झालेल्या हल्ल्याचा अर्थ असा आहे की हा गट पाकिस्तानच्या इतर शहरांमध्ये आपले हात पाय पसरू पाहात आहे. पूर्वी हा गट खैबर पख्तूनख्वा ( KPK ) आणि अफगाणिस्तान शेजारील आदिवासी भागात हल्ले करीत होता. हा हल्ला टीटीपीची वाढलेली ताकद आणि त्यांच्या वाढलेला ऑपरेशनल एरिया अधोरेखित करतो. टीटीपी आत्मघाती हल्लेखोरांना भरती करण्यास व त्यांना प्रशिक्षित करण्यास सक्षम आहे ही बाब चिंताजनक आहे.
 
 
हा हल्ला झाला तेव्हा हॉटेलमध्ये थांबलेले चिनी राजदूत लक्ष्य असल्याचे जे सांगण्यात आले आहे ते सत्य असेल किंवा नसेलही तरी पाकिस्तान सरकार, लष्कर आणि चिन्यांसाठी ही नक्कीच धोक्याची सूचना आहे. कारण टीटीपीने आजपर्यंत बलुचिस्तानमधील चिनी हितसंबंधांवर कधीच भाष्य केलं नाही ना त्यांच ते कधी लक्ष्य होतं. बलुच फुटीरतावादी गटांकडूनच असे हल्ले केले गेले.
 
 
हल्ल्याबाबत आतापर्यंत टीटीपीने तीन वेगवेगळी विधाने जाहीर केली आहेत. पहिल्या निवेदनात स्थानिक आणि हॉटेलमध्ये थांबलेल्या परदेशी लोकांना लक्ष्य करण्याचे नमूद केले आहे. दुसर्‍या विधानात पोलिस अधिकारी हेच लक्ष्य असल्याचे सांगून परकीयांचा उल्लेख मागे घेण्यात आला. दुसर्‍या निवेदनात, या समुहाने पाकिस्तानच्या मीडियावर हल्ल्याचा गैरप्रचार आणि वापर केल्याचा आरोपही केला आहे.
 
 
हा हल्ला टीटीपीने स्वतंत्रपणे किंवा काही इतर स्थानिक गटांसह संयुक्तपणे केला आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही.
 
 
काहीही झाले तरी, बलुचिस्तानमध्ये टीटीपीच्या हल्ल्या हा पाकिस्तानी सुरक्षा एजन्सीना संदेश आहे की हा गट केवळ परत आला नाही तर त्यांच्या नेहमीच्या कार्यक्षेत्राचा भाग नसलेल्या भागांनाही तो लक्ष्य करत आहे.
 
 
गेल्या आठवड्यात या गटाने तहरीक-ए-लबबाइक पाकिस्तान (टीएलपी) आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या प्राणघातक निषेधांच्या संदर्भात टीएलपीच्या समर्थनार्थ एक पत्र प्रसिद्ध केले होते. "आम्ही त्यांना आश्वासन देतो की या शहीदांच्या रक्ताच्या थेंबाच्या प्रत्येक थेंबाचा आपण हिशेब घेऊ" असे टीटीपीने या खुल्या पत्रात म्हटले आहे.
 
 
पाकिस्तानने स्वीकारलेल्या दहशतवादविरोधी धोरणानंतरही (?) हा गट पुन्हा एकदा कार्यक्षेत्राचा भाग नसलेल्या मातीत आपली पाळेमुळे रोवू पाहात आहे हा पाकिस्तानसाठी नक्कीच चिंतेचा विषय आहे.