अफगाणिस्तानात बॉम्बस्फोट - ८४ मुली मृत्युमुखी, अनेक जखमी.
         Date: 11-May-2021

अफगाणिस्तानात बॉम्बस्फोट - ८४ मुली मृत्युमुखी, अनेक जखमी.

 

- प्राची चितळे जोशी.

 

( ICRR Content Generation )

 

संपूर्ण जग मातृदिन साजरा करत असताना अफगाणिस्तानात मात्र त्या दिवशी अनेक भविष्यकालीन मातांना मृत्यूच्या दाढेत लोटलं गेलं.

 

एका कारमध्ये बॉम्ब ठेऊन ती कार दष्ट- ए - बर्ची येथे शाळेच्या बाहेर ठेवण्यात आली. पहिला बॉम्बस्फोट होताक्षणी घाबरलेल्या मुली शाळेच्या बाहेर पळत असतानाच त्यांच्यावर पुन्हा दोन बॉम्ब शाळेच्या आवारात फुटले. या स्फोटात ८५ मुलींची शवं सापडली असून अनेक जणी बेपत्ता आहेत. १५० हून अधिक मुली जखमी झाल्या आहेत.

 

स्फोटातून वाचलेल्या एका मुलीने सांगितले की पहिला स्फोट एवढा जबरदस्त होता की अनेक मुलींची शवे ओळखूही येणार नाहीत. घाबरून मुली बाहेर येत असतानाच एकामागोमाग २ स्फोट झाले. त्यामुळे अजूनच मनुष्यहानी झाली. सगळीकडे पुस्तके आणि रक्त यांचा सडा पडला होता.

 

प्रत्येक दिवस हा मृत्यूच्या छायेत काढण्याचा आम्हाला कंटाळा आला आहे. असं तीळ तीळ मारण्यापेक्षा आम्हाला एकदाच का मारून टाकत नाही असे उद्गार एका मृताच्या नातेवाईकाने काढले. 

 

२००१ मध्ये बाहेरील देशांचे (अमेरिकेचे ) समर्थन मिळवून सत्तेवर आलेल्या सरकारला उखडून फेकण्यासाठी तालिबानी बंडखोरांनी युद्ध सुरु केले. गेली २० वर्षे अफगाण अत्यंत अस्थिर जीवन जगतोय. अफगाणिस्तानात भयंकर अशांतता नांदतेय. तालिबान्यांचा प्रखर विरोध आणि त्यांनी गेल्या २० वर्षात केलेला हिंसाचार अतोनात आहे. गेल्या वर्षी अमेरिका आणि तालिबान यांच्यात झालेल्या चर्चेत अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपले सैन्य मागे घेण्यास १ मे ही अंतिम मुदत देण्यात आली होती. अमेरिकेने हळूहळू आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली होती. ११ सप्टेंबर पर्यंत सगळे सैन्य मागे घेऊ असे अध्यक्ष जो बायडन यांनी सांगितले होते. 

 kabul attack_1  

 

परंतु आता अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान यांच्यात या निर्णयामुळे सतत संघर्ष होताना दिसतोय. जर तालिबान वरचढ ठरला तर नागरिक पुन्हा एकदा क्रूर आणि हिंसक तालिबान्यांच्या हातात जातील अशी भीती नागरिकांच्या मनात आहे. अमेरिकन सैन्याने अफगाण सोडला तर परिस्थिती अधिक बिघडेल. आमच्या मुलांना शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे हे आम्हाला माणूसपणाचे लक्षण वाटत नाही असे एका नागरिकाने आपल्या मुलाखतीत म्हटले आहे.

 

हे तालिबानी जास्त करून शाळांना किंवा मशिदींसारख्या सार्वजनिक जागांना आपले लक्ष्य बनवतात. त्यामुळे प्रत्येक सार्वजनिक ठिकाणांना सुरक्षा पुरवणे अफगाण सरकारच्या हाताबाहेर आहे.

 

संपूर्ण जगाने या घटनेचा निषेध केला आहे. अमेरिकेने " रानटी हल्ला " म्हणून या हल्ल्याचा निषेध नोंदवला तर चीनने अमेरिकेने आपली जबाबदारी निभवावी आणि येथील जनतेला भयमुक्त करावे असे म्हटले आहे. हा बॉम्बहल्ला अफगाणिस्तानच्या भवितव्यावर झालेला हल्ला असल्याचे भारताने म्हटले आहे.

 

पश्चिम काबूलमध्ये ज्या ठिकाणी हे स्फोट घडले त्या भागात हंजारा समाजाचे लोक राहतात जे मूळचे मंगोलियन आणि मध्य आशियातून आलेले शिया मुस्लिम पंथाचे आहेत. अफगाण सरकारने या स्फोटासाठी तालिबान्यांना जबाबदार धरले आहे. परंतु तालिबान्यांनी या स्फोटाची जबाबदारी नाकारली आहे. अजूनपर्यंत या स्फोटाची जबाबदारी घेण्यास कोणताही दहशतवादी गट पुढे आला नाही. पवित्र रमजान महिन्याचे शेवटचे तीन दिवस युद्धविराम पाळण्याची तालिबान्यांनी घोषणा केली आहे.

 

अफगाणिस्तानमध्ये शिया आणि सुन्नी पंथामध्ये खूप तेढ आहे. इस्लामिक स्टेट ग्रुप (आयएस ) शिया पंथाला आपला दुश्मन मानतो. अफगाणिस्तानात तालिबान्यांच्या बरोबरच आयएसचे सुद्धा वर्चस्व आहे. हे लोक अनेकवेळा शिया मुस्लिमांवर हल्ले करत असतात. काबूल, जलालाबाद परिसरात त्यांनी अनेक वेळा बॉम्बस्फोट केले आहेत.

 

तालिबानने पाकिस्तानात मुलींनी शिक्षण घेऊ नये म्हणून मलाला युसूफझाईच्या खैबर पख्तुनख्वा येथील शाळेवर केलेला हल्ला अजून जग विसरलेले नाही. या हल्ल्याची जबाबदारी कुणीही घेवोत. पण अश्याप्रकारे शाळेत जाणाऱ्या मुलींना लक्ष्य करून त्यांच्यावर आणि त्यांच्या पालकांवर जरब बसवणे केवळ अमानवीय आहे.

 

Source : cnn, bbc, google