अर्थतज्ज्ञ शिवछत्रपती
         Date: 19-Feb-2023
अर्थतज्ज्ञ शिवछत्रपती आणि स्वराज्याचे आर्थिक पैलू
 
 
(ICRR- Profile)
 

Shivaji's Maratha Navy  
 
 
अजून सात वर्षांनी शिवाजी राजे यांच्या जन्माला ४०० वर्षं पूर्ण होतील. महाराष्ट्रात जे नाव दैवतासमान पुजलं जातं ते म्हणजे श्री शिवछत्रपती! एका राजाची ४ शतकांनंतरही जनतेच्या हृदयात अशी प्रतिमा कोरली जाणं यात त्यांचं मोठेपण आहे. जन्मजात योद्धा, साहसी सेनापती, प्रखर बुद्धिमान आणि वेगवान नियोजनकर्ता हि त्यांच्यातील सेना नायकाची वैशिष्टये होती. पण याशिवाय शिवछत्रपती कोण होते? त्यांच्या अद्वितीय रणधुरंधर व्यक्तिमत्वामागे झाकोळला गेलेला बुद्धिमान अर्थतज्ज्ञ कसा होता याचा हा धावता आढावा...
रणधुरंधर सेनानी...
युद्धस्य वार्ता रम्याः हा मनुष्यस्वभाव आहे, त्यामुळेच शिव छत्रपतींचा एक अद्वितीय योद्धा म्हणून त्यांचे युद्धप्रसंग, त्यांचे विजय, लढाया, सैनिकी अभियाने आणि शत्रूला नागवणारी त्यांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं युद्धकौशल्य या गोष्टी महाराष्ट्राच्या घराघरात आख्यायिका बनून राहिल्या आहेत. देशभर पसरलेल्या तत्कालीन मुस्लिम शासकांनी समस्त हिंदू प्रजेला नागवून, अन्याय, धमर्च्छल, बलात्कार, लुटालूट आणि धर्मांतर यांचा वणवा लावून दिलेला असताना राजांचा जन्म झाला. त्यांच्यातील धर्माभिमानी, भावनिक माणूस या अत्याचारांमुळे पेटून उठला आणि एका अद्वितीय सेनानीचा उदय आणि क्रमिक विकास होत गेला. कालांतराने पश्चिम भारतातून एका एका भागातून अत्याचारी यावनी सत्तेचं सैनिकी मार्गाने उच्चाटन होत होत अख्खा भारत मराठ्यांनी आपल्या टाचेखाली आणला, या अफाट खटाटोपाची आर्थिक बाजू कशी असेल?
 
 
अर्थतज्ज्ञ शिवाजी राजे!
 
 
राजांच्या कर्तृत्वाच्या अफाट राशींमधून एकेक गुण बाहेर काढून तो विस्ताराने मांडणं हि अतिशय कठीण गोष्ट आहे. शिवाय वर उल्लेख केल्याप्रमाणे राजांच्या व्यक्तिमत्वातील लखलखता अद्वितीय सेनानी, अजेय योध्दयानें त्यांच्यातील अन्य पैलूंना इतकं झाकोळून टाकलेलं आहे कि ते शोधणं हि अतिशय किचकट गोष्ट झालेली आहे. याशिवाय स्वराज्याच्या आर्थिक- व्यापारी इतिहासाबद्दलची मूळ कागदपत्रे म्हणावी तशी पुढे आलेली नाहीत त्यामुळे राजांच्या आयुष्याच्या शेवटच्या दहा वर्षात त्यांनी उभं केलेलं लाखाच्या जवपळपासचं खडं सैन्य, शेकडो किल्ले, समुद्रावर सतत कार्यरत शंभर पेक्षा जास्त लढाऊ जहाजांचा ताफा याला पोसणारी राजांची अर्थव्यवस्था नेमकी कशी होती याचे फुटकळ, विखुरलेले उल्लेख आपल्याला मिळतात त्यावरून आपण काही ठोस अंदाज बांधू शकतो.
 
 
लुटीची आर्थिक गणिते...
 
 
युरोपियन लिखाणांमध्ये राजांचा उल्लेख "चोर, लुटारू, दरोडेखोर" असा येतो कारण सुरुवातीच्या काळात जहागिरी- वतनदारी व्यवस्था त्यांनी संपवून मुलकी, सैनिकी अधिकारी आणि नोकर- सैनिकांना रोख पगार द्यायची व्यवस्था सुरु केल्यानंतर नवीन उभ्या होत असलेल्या व्यवस्थेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राजांनी सुरत, बिदर सारखी लहान मोठी शेकडो व्यापारी ठिकाणे लुटून आपला कारभार चालवला. यातून उभ्या राहिलेल्या निधीतून नवे किल्ले, आरमार यांची बांधणी केली. या छापेमारीतून राजनैतिक लाभही होताच तो म्हणजे मुघलांसारखा बलाढ्य शासक त्याच्याच प्रदेशात व्यापार करणाऱ्या लोकांच्या संपत्तीचे शिवाजी पासून रक्षण करू शकत नाही हा संदेश देणं! या दहशतीच्या जोरावर राजांनी उद्दाम फिरंगी व्यापाऱ्यांना सुद्धा वठणीवर आणलं.
 
 
राजापूरचा सुभेदार अण्णाजी पंडित आणि स्वराज्याचा समुद्री व्यापार...
 
 
पन्हाळ्याच्या वेढ्यात राजापूरच्या इंग्रजांनी सिद्दी जौहरला लांब पल्ल्याच्या तोफा चालवणारे फिरंगी गोलंदाज ब्रिटिश निशाणासह दिल्याचा वचपा काढण्यासाठी राजांनी तात्काळ राजापूरची ब्रिटिश वखार लुटून हेन्री रेविंग्टन सह ७ ब्रिटिश अटक करून सोबत नेले. नंतर राजापूरला अण्णाजी पंडित नावाचा सुभेदार नेमून त्याच्या मार्फत सुरुवातीला मिठाचा व्यापार आणि नंतर अरबी देशासोबत मोठा व्यापार सुरु केला.
 
 
शिवाजीची मिठाची गलबते आम्हाला दिसली किंवा अण्णाजी पंडिताने मिठाच्या वाहतुकीसाठी गलबते भाड्याने मागितली परंतु एकदा मिठाच्या वाहतुकीला गलबत दिले कि त्याला ओल येत राहते आणि त्या गलबताचा अन्य काही उपयोग उरत नाही असे उल्लेख इंग्लिश फॅक्टरी रेकॉर्ड्स मध्ये वरचेवर येतात.
 
 
याच राजापूरच्या सुभेदाराने- अण्णाजी पंडिताने मक्का, बसरा( इराक) आणि काँगो येथे पाठवलेल्या व्यापारी जहाजातून त्याला इतका प्रचंड नफा झाला कि त्याने या नफ्यातून अजून कितीतरी नवीन व्यापारी गलबते बांधायची सुरुवात केली आहे. असे उल्लेखही येतात.
 
 
अरबी देशात जाणाऱ्या शिवाजीच्या प्रत्येक गलबतावर तैनात करण्यासाठी २-३ युरोपियन खलाशी आम्हाला द्या अशी मागणी शिवाजीने केली आहे असेही उल्लेख आहेत. असे फिरंगी खलाशी आपल्या व्यापारी जहाजावर तैनात असतील तर त्याकाळी अरबी समुद्रावर एकछत्री नियंत्रण असणाऱ्या युरोपियन व्यापारी जहाजांचा (हे नियंत्रण नंतरच्या काळात कान्होजी आंग्रेंनी मोडून काढले) आपल्या व्यापारी जहाजांना त्रास होणार नाही असा धूर्त विचार यामागे होता.
 
 
राजापूरची नुकसान भरपाई...
 
 
राजापूरची ब्रिटिश वखार लुटल्याने इंग्रजांचे १ लाख होनांचे नुकसान झाले. याची नुकसान भरपाई मिळावी यासाठी पुढे कित्येक वर्षे मुंबईचे ब्रिटिश चिकाटीने पाठपुरावा करत राहिले आणि शेवटी राज्याभिषेकाच्या आधी यात काही रक्कम रोख आणि बाकीची जकात माफीतून वळती करून देण्याचा करार राजे आणि ब्रिटिशात झाला. पण या मधल्या काळात सुरत आणि मुंबईच्या इंग्रजांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्रात अनेक वेळा उल्लेख आलेला आहे कि "शिवाजी अत्यंत लबाड, धूर्त आणि चाणाक्ष आहे, राजापूरची नुकसान भरपाई द्यायची त्याची तयारी नाही म्हणून आता अण्णाजीची मक्केहून परत येणारी गलबते पकडून मुंबई बंदरात ओढून ठेवा, नाक दाबल्याशिवाय तो भरपाई देणार नाही." याचा अर्थ असा कि अण्णाजी पंडितांमार्फत राजांचा अरबी देशांसोबत नियमित व्यापार सुरु झाला होता आणि त्याचा आकार आणि मिळणारा नफा अफाट होता ज्याच्या आधारावर स्वराज्याची सैनिकी आणि मुलकी व्यवस्था आर्थिकदृष्टया पोसली जात होती.
 
 
पोर्तुगिजांचा "कार्ताज" परवाना आणि राजांचा उपाय...
 
 
अरबी समुद्रात सर्वात जुनी नौसैनिक ताकद म्हणजे पोर्तुगीज त्यामुळे ते म्हणतील तो कायदा आणि नियम. समुद्रात व्यापारी जहाजे जाण्यासाठी जवळच्या पोर्तुगीज अधिकाऱ्याला शुल्क भरून "कार्ताज" म्हणजे परवाना घेणं सर्वांना सक्तीचं होतं आणि असा परवाना नसलेली जहाजे पोर्तुगीज जब्त करायचे. पुढे डच, इंग्रज, फ्रेंच आणि नंतर स्वराज्याची आरमारी ताकद वाढायला लागल्यावर पोर्तुगीज दुर्बल झाले आणि हे परवाने बंद झाले. राजांची गोव्याच्या व्हॉईसरॉयला उघड दमही दिलेला सापडतो कि आमच्या जहाजांकडे परवाने मागाल तर याद राखा.
 
 
राजांच्या आरमाराच्या सुरुवातीच्या काळात एका छापेमारीच्या दरम्यान राजांच्या आरमाराने मालवण जवळ गोव्याच्या पोर्तुगीजांनी चौल (रेवदंडा) च्या पोर्तुगीजांकडे जाणारी सात गलबते धरून ती विजयदुर्गाच्या किल्याकडे नेली आणि साती गलबते "हस्तिदंत" घेऊन जात होती असा उल्लेख आहे! कल्पना करा भारतात एकछत्री एक स्वदेशी राजवट नव्हती पण संपन्नता किती असेल आणि तिची मिळेल तो विदेशी मिळेल त्या मार्गाने लूट करत होता!
 
 
पन्हाळा जिंकण्याची तातडी आणि डचांचा तांदुळाचा व्यापार...
 
 
अफझलखानाच्या वधानंतर फक्त अठरा दिवसात राजांनी पन्हाळा जिंकला. अफझलखान वधाच्या धामधुमीत आपली पट्टराणी प्रतापगडापासून लांबवर मरण पावलेली असताना शोकात बुडायला किंवा अफझल वधाचा आनंद साजरा करण्यात वेळ नं खर्च करता दुसऱ्याच दिवशी राजे पन्हाळा जिंकण्यासाठी रवाना झाले. राजापूर, मालवण, गोवा या बंदरातून येणारा व्यापारी माल पन्हाळा मार्गे घाटावर जात होता त्यामुळे ते एक अत्यंत महत्वाचं जकात ठाणं होतं, आदिलशाहीच्या पराक्रमी, कर्तबगार सेनानींचा सफाया केल्यानंतर आपली आर्थिक बाजू मजबूत करण्याच्या दृष्टीने आणि कर्नाटकचा माल कोकणी बंदरातून पन्हाळा मार्गे खाली उतरत असल्यामुळे त्यांनी पन्हाळा ताब्यात घेण्याची तातडी दाखवली असावी अशी रास्त शक्यता वाटते.
 
 
राजांनी डचांना आणि फ्रेंचांना कायम आपल्या मर्जीत ठेवल्याने आरमार उभारणीच्या वेळी फ्रेंचांनी पितळेच्या ८३ तोफा आणि ४०० मण दारुगोळा राजापूर बंदरात पोचवला असा ब्रिटिश रिपोर्ट आहे. याच दरम्यान कर्नाटकातून मालवण मार्गे गोव्याला जाणारा तांदूळ हा डच व्यापारी नियंत्रित करायचे. (हा तांदूळही जर कोकणी बंदरातून गोव्याकडे जात असेल तर त्याचाही मार्ग पन्हाळाच असला पाहिजे) हा तांदुळाचा व्यापार अचानक राजांनी आपल्या हातात घेतल्याने गोव्याच्या बाजारात तांदुळाचे भाव एका रात्रीत ४ पट वाढले. त्याकाळात रस्ता मार्गाने माल पोचवण्यासारखी परिस्थिती नव्हती त्यामुळे कर्नाटक गोवा जवळजवळ असूनही मालवण, राजापूर बंदरातूनच गोव्याला माल जात होता. याचा सरळ अर्थ असा निघतो कि राजांचा आपल्या आसपासच्या व्यापारी- आर्थिक उलाढालींचा सूक्ष्म अभ्यास होता आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी ते आपली तलवार आणि लढाऊ गलबते यांचा खुबीने उपयोग करत होते.
 
 
स्वराज्याच्या आरमाराचे २ उद्देश!
 
 
आपण स्वराज्याचे आरमाराचे महत्व आणि छत्रपतींनी बांधलेल्या जलदुर्गांवर सामरिक दृष्टीने खूप लिहिलं गेलं आहे. पण त्या आरमाराचा मूळ उद्देश स्वराज्याचे आर्थिक हितसंबंध मजबूत करणे आणि समुद्री व्यापाराला सुरक्षा कवच देऊन फिरंगी आरमाराचे वर्चस्व मोडून काढणे हा होता. जमिनीवर ज्याचे किल्ले त्याचे राज्य हा नियम समुद्रात "ज्याचे गलबत त्याचा व्यापार" असा होतो. हे दोन्ही उद्देश राजांच्या आरमाराने अल्पावधीत साधले. एकतर इंग्लिश आणि पोर्तुगीजांची समुद्रावरील दादागिरी कमी झाली आणि युरोपियन लोकांची समुद्रावरील एकाधिकारशाही राजांनी संपवली.
 
 
स्वाभाविकपणे स्वराज्याच्या विदेश व्यापाराला याचा थेट फायदा झाला असावा. कारण सुरतेच्या पहिल्या लुटीनंतर सुरतेची रया गेली. सुरतेची दुसरी लूट औरंगझेबाला अवमानित करण्यासाठी होती कारण पहिल्या लुटीनंतर शिवाजी कधीही येऊ शकतो या भीतीमुळे आणि दरवर्षी सुमारे महिन्यातून एकदा शिवाजी आला अशा अफवा उडत असल्याने सुरतेची बरीच धनिक मंडळी भडूच, अमदाबादच्या दिशेला आपली संपत्ती घेऊन गेले होते. स्वराज्याच्या सीमा वाढलेल्या असल्याने लुटीसाठी संपन्न प्रदेश शिल्लक नव्हते तरीही हजारो सैनिक, किल्ले, आरमार, मुलकी सेवा आणि सैनिकी मोहिमा यांचा खर्च प्रजेवर बसवलेला वाजवी कर आणि महसूल याशिवाय मोठ्या व्यापारातून आलेला पैसा हाच स्वराज्याच्या आर्थिक स्वावलंबनाचा आधार असला पाहिजे, या सिद्धांताला बळकटी मिळते. याचा अभ्यास होऊन हा व्यापार नेमका कसा, किती आणि कुठे होत होता यावर संशोधन आवश्यक आहे.
 
 
राजांचा दंडा राजपुरीचा हट्ट...
 
 
जंजिऱ्याचे सिद्दी दंडा राजपुरीच्या किल्ल्यावर मांड ठोकून होते. हा किल्ला चौल या पोर्तुगीज ठाण्याच्या जवळ असल्याने आणि इंग्रजांच्या ताब्यातल्या मुंबई बेटाला जवळ असल्याने राजांनी दंडा राजपुरीचा किल्ला ताब्यात घेण्यासाठी आयुष्यभर जंग जंग पछाडले. एकदा किल्ला जिंकल्यात जमा होता पण शिड्या लावूनही समुद्रातून रसद आली नाही. मोरोपंत पिंगळे स्वतः किल्ला जिंकण्याची प्रतिज्ञा घेऊन आले होते आणि एकदा राजे स्वतः ब्रिटिश वकिलाजवळ बोलताना म्हणाले होते कि दंडा राजपुरी जिंकण्यासाठी मी १५,००० सैनिक खर्ची घालायला तयार आहे. कारण सुरत ते गोवा या सातशे किमी लांबीच्या किनारपट्टीवर इंग्रजांची मुंबई, चौलचे पोर्तुगीज आणि दंडा राजपुरीचे सिद्दी वगळता सर्वत्र राजांचं निर्वेध राज्य होतं त्यातही मुंबई आणि चौल ला समुद्री किल्ला नव्हता तो फक्त दंडा राजपुरीला होता त्यामुळे हा किल्ला घेऊन इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्या समुद्री व्यापाराला कायमची पाचर मारून सगळा व्यापार एकतर आपल्या हातात किंवा आपल्या नियंत्रणात घ्यायचा त्यांचा संकल्प होता.
 
 
जर राजांच्या योजनेप्रमाणे दंडा राजपुरी त्यांच्या हातात आला असता तर कदाचित मुंबईच्या ब्रिटिशांना त्यांनी पुढच्या काही वर्षात खालसा करून मुंबई आपल्या ताब्यात घेतली असती आणि भारतावर कधीही ब्रिटिश राज्यच आलं नसतं, पण नियतेच्या ते मनात नसावं!
 
 
राजांचं आर्थिक अस्त्र!
 
 
मुंबईचे ब्रिटिश लांब पल्ल्याच्या पितळी तोफा आणि दारुगोळा उधार देत नाहीत म्हणून राजांनी मुंबईची आर्थिक नाकेबंदी करून मुंबई बंदराला होणारा सरपण आणि तांदुळाचा पुरवठा पूर्ण बंद केला होता, मुंबईत रोजच्या वापराचा तांदूळ गोव्यातून समुद्री मार्गाने आणावा लागला त्यामुळे शिवाजी मागेल त्या वस्तू त्याला थोडीशी घासाघीस करून देऊन टाका अशी ब्रिटिश पत्रे आहेत, कारण त्याच्या मागण्या अवाजवी असतात पण त्या मानल्या नाहीत तर तो मुंबईची आर्थिक नाकेबंदी करतो! ब्रिटिशांना शिवाजी हे कोडं जन्मभर सुटलं नाही आणि त्याचं कारण राजे आर्थिक- व्यापारी विचारांच्या बाबतीत इंग्रजांच्या कायम चार पावले पुढे होते.
 
 
साल्हेरचा ताबा घेण्यामागचा आर्थिक विचार..
 
 
नाशिकजवळ साल्हेर आणि मुल्हेर हे किल्ले मुघल सरदार बहलोल खान, इखलास खान आणि दिलेखानाला पराभूत करून ताब्यात घेतले. जे व्यापारी- आर्थिक महत्व दक्षिणेत पन्हाळ्याचं आहे ते उत्तरेत साल्हेरचं आहे. सुरतेच्या बंदरातून आलेला माल पूर्व भारतात जाताना आणि येताना साल्हेर मार्गे जाणार त्यामुळे या मालाच्या नियंत्रण आणि जकात वसुलीसाठी साल्हेर- मुल्हेर ताब्यात ठेवणं आवश्यक होतं याचा विचार करून हि धाडसी मोहीम झाली असावी. या मोहिमेला महाराजांनी किती महत्व दिलं होतं ते बघायचं असेल तर त्यात कोण सामील होतं हे बघून कळेल. स्वतः महाराज घोडदळाच्या एका तुकडीचं नेतृत्व करत लढाईच्या मैदानात होते. पेशवा मोरोपंत पिंगळे कोकणातून त्यांच्या मोठ्या तुकडीसह बोलावले गेले होते, सरसेनापती प्रतापराव गुजर मैदानात होते. नंतर सेनापती झालेले आनंदराव मकाजी युद्धात सामील होते आणि कद्दावर सेनानी सूर्याजी काकडे या लढाईत धारातीर्थी पडले. राजांचा निग्रही स्वभाव, अचूक नियोजन आणि टोकाचा लढाऊ बाणा यामुळे त्यांनी या लढाईत इतके मोठे सरदार आणि स्वतः यांना झोकून देऊन आपल्या सैन्याच्या तिप्पट आकाराचं सैन्य अंगावर घेऊन पराभूत केलं (हि लढाई राजांच्या आयुष्यातील पहिली खुल्या मैदानातील लढाई होती!) आणि यामुळे पूर्व पश्चिम व्यापाराचा महत्वाचा मार्ग आपल्या नियंत्रणात आणला.
 
 
खांदेरी- उंदेरीचा संघर्ष आणि सध्या भारताने चीनला मारलेली साबांग बंदराची पाचर!
 
 
दंडा राजपुरीचा किल्ला हर तऱ्हेने प्रयत्न करून ताब्यात येत नाही हे बघून राजांनी मुंबईच्या इंग्रजांना शह देण्यासाठी थेट मुंबईच्या तोंडावर निमनुष्य खांदेरी बेटावर अचानक ५०० कामगार आणि सैनिक उतरवून तिथे किल्ला बांधायची सुरुवात केली. ब्रिटिशांना यामुळे मोठा मानसिक धक्का बसला. एकदा का खांदेरी वर शिवाजीचा किल्ला पूर्ण झाला आणि सैनिक तैनात झाले कि मुंबईचं व्यापारी- आर्थिक महत्व संपणार आणि शिवाजी म्हणेल ती पूर्व दिशा ठरणार. या भीतीने इंग्रजांनी खांदेरीला नौसैनिक वेढा दिला. पण राजांचा खांदेरीचा सुभेदार मायनाक भंडारी आणि नौसैनिक सरदार दौलत खान यांनी चिकाटीने खांदेरीला किल्ला बांधण्यासाठी रसद सुरु ठेवली. अनेक महिने हा संघर्ष सुरु राहिला. एका फसलेल्या छाप्यात मायनाक भंडाऱ्याने काही ब्रिटिश नौसैनिक युद्धकैदी बनवून लांबवर नेऊन अटकेत टाकले. अखेर ब्रिटिश आणि राजे यांच्यात तह झाला आणि त्यात राजांनी खांदेरीचा किल्ला आणि बेट ताब्यातून सोडण्याची ब्रिटिशांची मागणी साफ साफ फेटाळून लावली. दुर्दैवाने राजे हा तह झाला त्याच वर्षी १६८० ला स्वर्गवासी झाले अन्यथा ब्रिटिश त्यांच्या हयातीतच गाशा गुंडाळून गेलेले दिसले असते.
 
 
राजांच्या खांदेरी मोहिमेची पुनरावृत्ती सध्या इंडोनेशियाच्या साबांग बेटावर दिसत आहे. मलाक्काच्या अत्यंत चिंचोळ्या सामुद्रधुनीतून चीनला अत्यावश्यक असलेला पेट्रोलियमचा पुरवठा होतो. चिनी नौसेना त्याच चिंचोळ्या पट्टीतून भारताच्या दिशेला येण्यासाठी बाहेर पडते. या समुद्री मार्गावर मालकाच्या तोंडावर भारताने साबांग नावाचे बंदर दोन वर्षांपूर्वी भाड्याने घेऊन तिथे नौसैनिक ठाणे उभारले आहे. इतिहास अशा प्रकारे पुनरावृत्ती करत असतो ती अशी!
 
 
शिवछत्रपती आणि व्यापारी यांचे परस्पर संबंध!
 
 
साल्हेरची लढाई असो किंवा खेम सावंत राजांशी द्रोह करून गोव्याच्या पोर्तुगीजांच्या आश्रयाला गेला म्हणून राजांनी बार्देश वर केलेली मोहीम असो या आणि अन्य अनेक लढायांमध्ये एक साम्य दिसतं. साल्हेर- बार्देश दोन्ही लढायांनंतर राजांनी प्रत्येकी १४०० ते १६०० व्यापारी पकडून आपल्या सोबत नेले होते. पकडून नेलेले व्यापारी फक्त खंडणी वसूल करण्यासाठी नेले असतील अशी शक्यता कमी दिसते. ज्याला सध्याच्या इंटेलिजन्स एजन्सी डीब्रीफिंग (म्हणजे उलट तपासणी) म्हणतात तशाच प्रकारचं "डीब्रीफिंग" राजांचे लोक पकडून नेलेल्या व्यापाऱ्यांचं करत असावेत. अन्यथा लढाईच्या उपयोगाचा नाही असा एक दोन नव्हे शेकडो जिवंत माणसे सोबत नेऊन त्याचा काय उपयोग? या पकडून नेलेल्या व्यापाऱ्यांच्या उलट तपासणीतून (डीब्रीफिंग) त्यांची व्यापारी तंत्रे, कोणत्या वस्तूंचा व्यापार कोण, कुठे आणि किती करतो, मालाच्या किमती काय, कशा आणि कुठे ठरतात, सोडून दिल्यानंतर ते व्यापारी राजांसाठी काय प्रकारची व्यापारी आणि आर्थिक मदत करणार वगैरे वगैरे माहितीचा प्रचंड खजिना आणि त्याशिवाय जिवंत परत जाण्याच्या बदल्यात प्रचंड खंडणी असा दुहेरी फायदा राजे करून घेत असावेत.
 
 
या संदर्भात ओझरते, पुसट, उडते, दिसायला दुय्यम दिसणारे असे शेकडो उल्लेख शिवशाहीच्या उपलब्ध कागदपत्रात आणि युरोपियन कागदात उपलब्ध असणार फक्त ते छत्रपतींची आर्थिक बाजू काय असेल हा प्रश्न डोक्यात ठेऊन वाचले गेले पाहिजेत. शिव चरित्राचा आणि शिवशाहीचा हा एक अत्यंत महत्वाचा पैलू आहे ज्यावर म्हणावं तसं काम झालेलं दिसत नाही.
 
 
शिवछत्रपतींच्या ४०० व्या जयंतीनिमित्त २०३० च्या आधी म्हणजे अजून सात वर्षात याबाबतीत मोठा अभ्यास अनेकांनी एकत्र येऊन केल्यास अभ्यासकांसाठी एक नवीन दालन उघडं होईल आणि शिवचरित्राची एक दुर्लक्षित बाजू जगासमोर येईल. पुढील लेखात राजांच्या कूटनैतिक प्रतिभेवर विचार करू.
 
 
राजांची आर्थिक प्रतिभा, सैनिकी प्रतिभेच्याच तोडीची उत्तुंग होती, आज शिवजयंतीनिमित्त राजांना अभिवादन करताना येणाऱ्या काळात त्यावर लख्ख प्रकाश पडो हि सदिच्छा!
 
 
---- विनय जोशी