जिनपिंग ०३ अर्थात शिटलर- चीनच्या विभाजनाची नांदी?
         Date: 11-Mar-2023
जिनपिंग ०३ अर्थात शिटलर- चीनच्या विभाजनाची नांदी?
 
शी जिनपिंगला त्याचे विरोधक नवा हिटलर म्हणजेच "शिटलर" शी अधिक हिटलर म्हणतात त्याची तिसरी कारकीर्द कशी असेल याचा आढावा घेण्याचा प्रयत्न!
 
(ICRR Profiles)
 

Xitler i.e. Xi Jinping Plus Hitler 
 
 
काल शी जिनपिंग ने ऐतिहासिक तिसऱ्या कार्यकाळाची सुरुवात केली. या तिसऱ्या कार्यकाळाची सुरुवात आणि त्याचे भारतासह जगावर होणारे संभाव्य गंभीर परिणाम याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे.
चिनी कम्युनिस्टांची १९४८ ला चीनमध्ये राजवट सुरु झाल्यापासून प्रत्येक राष्ट्रपती ५ वर्षाच्या जास्तीत जास्त २ कार्यकाळांसाठी चिनी अध्यक्ष राहत असे. चिनी राष्ट्रपती हाच चिनी कम्युनिस्ट पक्षाचा महासचिव असतो आणि तोच सेंट्रल मिलिटरी कमिशन या चिनी सैन्याचं संचालन करणाऱ्या सर्वोच्च विभागाचा अध्यक्ष असतो. २०१६ पासून जिनपिंग यांनी स्वतःला चिनी सैन्याचा कमांडर इन चीफ घोषित करून संपूर्ण चीनवर आपली वज्रमूठ आवळली आहे. आणि चिनी राष्ट्रपती पदासाठी पाच वर्षांच्या २ कार्यकाळाचं असलेलं घटनात्मक नियंत्रण काढून स्वतःला तहहयात चिनी अध्यक्षपद मिळेल याचीही व्यवस्था करून घेतली आहे.
 
 
चिनी सेना- चीन देशाची नसून चिनी कम्युनिस्ट पक्षाची सेना आहे. जसं पाकिस्तानच्या बाबतीत म्हटलं जातं कि, "Every country has its army but Pakistani Army has it own country called Pakistan" तसा एका राजकीय पक्षाची स्वतःची सेना असण्याचं जगातलं एक मोठं उदाहरण म्हणजे चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या मालकीची चिनी सेना!
 
 

Xitler i.e. Xi Jinping Plus Hitler 
 
 
जीनपिंगचा हुकूमशाही कारभार!
 
 
आधीच जगभरातले कम्युनिस्ट नेते टोकाचे हेकेखोर आणि हुकूमशाही वृत्तीचे असतात आणि तरीही लोकशाही देशात सक्रिय कम्युनिस्ट पक्ष निर्लज्जपणे त्यांचे गोडवे गाताना दिसतात! चिनी कम्युनिस्ट काहीना काही प्रमाणात एका नेत्याची हुकूमशाही नं पोसता पार्टीची सामूहिक हुकूमशाही पाळत आणि वाढवत होते. पण शी जिनपिंग ने देशाचा कारभार आपल्या हातात घेतल्या दिवसापासून चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या "सामूहिक हुकूमशाही" (Collective Party Dictatorship) ला बासनात गुंडाळून स्वतःची म्हणजे एका व्यक्तीची हुकूमशाही चीनमध्ये सुरु केली. चिनी कम्युनिस्टांना हि गोष्ट नवीन होती आणि तिला कसा प्रतिसाद द्यावा किंवा काय प्रतिक्रिया द्यावी याचा विचार करण्यापूर्वीच जिनपिंग ने विक्रमी वेळात अख्खी पार्टी आणि देश गुंडाळून आपल्या खिशात टाकला. याचे देशावर, भारतावर आणि जगावर दूरगामी परिणाम होणार आहेत आणि होताना दिसत आहेत.
 
 
जीनपिंगची तथाकथित भ्रष्टाचार विरोधी मोहीम...
 
 
सत्तेत आल्या आल्या जिनपिंगने देशभरात कम्युनिस्ट पार्टी आणि चिनी सेना- पीपल्स लिबरेशन आर्मीच्या मोठमोठ्या नेते आणि सैन्य अधिकारी यांच्या विरोधात आक्रमक कारवाया सुरु केल्या ५०० च्या वर कम्युनिस्ट नेते आणि सैन्य अधिकारी पकडून त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं.
 
 
चिनी सेना अधिकृतपणे १०,००० च्या वर उद्योग चालवत होती आणि त्यात वारेमाप भ्रष्टाचार होत होता, जिनपिंगने हे सर्व उद्योग सैन्याच्या हातून काढून घेऊन त्याचं सरकारीकरण केलं. पाकिस्तान आर्मी सुद्धा वेफर्स, स्नॅक्स, कपडे, सिमेंट, पोलाद, रियल इस्टेट उद्योगातून अफाट पैसे कमावते आणि पाकिस्तानी जनरल्स तो सगळा पैसा आपल्या घशात घालतात, चीनमधेही हाच प्रकार चिनी जनरल्स करत होते. जिनपिंगने हे उद्योग त्यांच्या हातून काढून घेऊन वर कित्येक जनरल्स तुरुंगात टाकले. त्यामुळे काही महिन्यात चिनी सैन्य अधिकारी शक्तिहीन झाले.
 
 
चिनी सैन्याची कमांड हॉस्पिटल्स कित्येक वर्षे अटकेतल्या राजकीय कैदी, तिबेटी नागरिक आणि "फालुन गॉन्ग" सारख्या प्रतिबंधित धार्मिक गटांच्या अटकेतल्या राजकीय कैद्यांचे अवयव काढून ते अनधिकृतपणे विकत होती. याची अब्जावधी डॉलर्सची उलाढाल होती. जीनपिंगच्या पहिल्या कार्यकाळात याच्यावर कठोर नियंत्रण आणि प्रतिबंध आणून चिनी सैन्याचा आणखी एक आर्थिक स्रोत बंद केला गेला.
 
 
जिनपिंगचा मुखवटा...
 
भ्रष्टाचार विरोधी मोहीम आणि सैन्याच्या आर्थिक घोटाळ्यांवर नियंत्रण हा शी जिनपिंगचा मुखवटा होता, खरा उद्देश कम्युनिस्ट पार्टी आणि चिनी सेना यांच्यातल्या आपल्या विरोधकांचा समूळ नाश करून आपली सत्ता कमीत कमी वेळात निरंकुश करणे हे खरं उद्दिष्ट होतं.
 
 
चीनबाहेर जिनपिंगची दादागिरी- डोकलाम ते पांगोंग त्सो...
 
 
देशांतर्गत प्रतिस्पर्धी लोकांचा काटा काढतानाच जिनपिंगने जगभरात आपल्या महत्वाकांक्षेचा ढोल वाजवायची सुरुवात केली. प्रथम भारत- भूतान सीमेवर डोकलाम येथे २०१७ मध्ये चिनी सैन्याने भूतानी भागात अतिक्रमण केल्यावर भूतानच्या सैनिकी रक्षणाची जबाबदारी भारताची असल्याने भारतीय सैन्याने आपली तैनाती वाढवून त्याला प्रत्युत्तर दिलं, अनेक महिन्यांच्या संघर्षानंतर हा वाद निवळतो तोच अरुणाचल सीमा, बांग्लादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान येथे आपल्या लढाऊ जहाजांना आणि पाणबुड्यांना पाठवून चीनने भारताला घेरण्याची रणनीती आखली. जगभर चिनी सैन्य आपली तैनाती वाढवत आहे. आणि अमेरिका- युरोपच्या अधिकारक्षेत्रात सतत घुसखोरी करत आहे.
 
 
साऊथ चायना सी, दिबौती ते अटलांटिक- पॅसिफिक प्रदेशात मिळेल त्या देशात आणि समुद्रात हाताला लागेल त्या देशाला अमाप कर्जपुरवठा करून तो देश आपला गुलाम करायचा अशी चीनची प्रमुख नीती आहे.
 
 
शी जिनपिंग चीनला विभाजनाच्या दिशेने नेईल का?
 
२ अध्यक्षीय कारकिर्दीवरील मर्यादा काढून टाकल्याने आणि चिनी सैन्य अधिकाऱ्यांच्या विरोधात उघड कारवाया केल्याने चिनी कम्युनिस्ट पक्षातील नेते आणि सैन्य अधिकारी जिनपिंगच्या राजवटीवर कमालीचे नाखूष आहेत. जिनपिंग जिवंत असेपर्यंत आता अन्य कोणीही नेता चीनचा अध्यक्ष होण्याची शक्यता उरलेली नाही, त्यांच्या महत्वाकांक्षा कधी आणि कशा उफाळून येतील हा महत्वाचा मुद्दा आहे.
 
 
जिनपिंग ने चिनी उद्योग- व्यापार विश्वाच्या विरोधात उघड युद्ध पुकारल्यासारखी परिस्थिती असल्याने अलीबाबा समूहाच्या जॅक मा सारखे कित्येक उद्योगपती एकतर चीन सोडून पळाले आहेत, किंवा आपला पैसा चीनच्या बाहेर नेऊन कायमच्या स्थलांतराच्या मानसिकतेत आहेत. जो जो चिनी नागरिक राजकीय, सैनिकी, आर्थिक शक्ती बाळगतो तो तो आपला प्रतिस्पर्धी आहे आणि त्याला वठणीवर आणला पाहिजे अशी जीनपिंगची मानसिकता आहे एकाअर्थी जिनपिंग पॅरनॉइड् (Paranoidˈ) म्हणजे भयगंडाने पछाडलेला आहे अशी वस्तुस्थिती आहे. यात चिनी कम्युनिस्ट नेते आणि सैन्य अधिकारी एकमुखाने जिनपिंग विरोधात उभे राहिले तर १९९१ ला रशियाची जी अवस्था झाली ती चीनची येणाऱ्या काळात होईल- फक्त ती काल सुरु झालेल्या तिसऱ्या कार्यकाळात होईल का पुढच्या चौथ्या कार्यकाळात होईल एवढाच मुद्दा आहे!
 
 
जिनपिंग म्हणजे शिटलरच्या भयगंडाचे भारतावर आणि जगावर काय परिणाम होतील?
 
देशांतर्गत सुप्त शत्रूंपासून स्वतःची खुर्ची सुरक्षित ठेवण्याचा एकमवे मार्ग म्हणजे जनतेला सतत बाह्य शत्रूंचा बागुलबुवा दाखवणं हा एक हुकमी एक्का शी जिनपिंगच्या हातात आहे. याचा वापर तो सत्तेत बसलेल्या दिवसापासून करत आहे.
 
साऊथ चायना सी मध्ये कृत्रिम बेटे तयार करून त्यावर प्रचंड नौसैनिक तैनाती करणं, आसपासच्या दुर्बल दक्षिण आशियाई देशांच्या सागरी हद्दीत रोज नवे मालकी दावे ठोकून वाद निर्माण करणं, जपानच्या तेल समृद्ध सेनकाकू बेटांवर दावा सांगणं, भारताच्या लडाख, अरुणाचल वर दावा सांगून कुरापती काढणं, अमेरिकेच्या हवाई हद्दीत हेरगिरी करणारे बलून पाठवणं, श्रीलंकेत हेरगिरी जहाजे पाठवणं, तैवान वर सतत सैनिकी दबाव आणणं आणि जगभराच्या दैनंदिन कारभाराची नाडी असलेल्या समुद्र तळात विसावलेल्या अजस्र इंटरनेट डेटा केबल्सच्या जाळ्याला तोडून जगात हाहाकार माजवण्यासाठी विशेष नौसैनिक जहाजांची निर्मित करून त्याचे प्रयोग करत राहणं हि फक्त काही उदाहरणे झाली. अशा शेकडो कुरापती चीन जगभरात रोज काढत आहे. आणि याचा एकमेव उद्देश चिनी जनतेच्या मनात टोकाची "चिनी" भावना निर्माण करून जनतेला आपल्यावरच्या कठोर निर्बंधांचा विसर पडायला लावून त्याना सतत युद्धमान मानसिकतेत ठेवणं आणि देशांतर्गत कम्युनिस्ट विरोधक आणि सैनिकी प्रतिस्पर्धी नेत्यांना दाबात ठेवणं हाच आहे.
 
जिनपिंगच्या या आक्रस्ताळ्या स्वभावापासून भारत त्याच्या अधिक आक्रमक तिसऱ्या कार्यकाळात स्वतःला कसा
सुरक्षित ठेवतो हा कळीचा मुद्दा आहे. भारत जिनपिंगच्या आक्रमक विस्तारवादाला कसं उत्तर देतो यावर बव्हंशी जग कसं उत्तर देईल हे ठरेल!
 
 
थोडक्यात काय तर मोदी- शाह- जयशंकर हे भारतीयांना या धोक्याच्या बाबतीत देशात कसे तयार करतात आणि देशाबाहेर कशी मोर्चेबांधणी करतात यावर जगाचं भवितव्य ठरेल!
 
---- विनय जोशी