कुर्द, बलुच बंडखोरांचा वापर का इराणच्या खार्ग बेटावर "बुट्स ऑन ग्राऊंड" अर्थात अमेरिकन सैन्य?
१. कुर्दांचा वापर करण्याचा पर्याय!
२०१३ पासून अमेरिकन लोकांनी इराक, सिरिया मधील कुर्द लोकांना स्वतंत्र देश देण्याचं गाजर दाखवून इस्लामिक स्टेट विरुद्ध लढवलं आहे. कुर्द ४ ते ५ कोटी लोकसंख्या असलेला जगातील सर्वात मोठा स्वतःचा देश नसलेला भाषिक, जातीय समुदाय आहे. इराणचा ऐतिहासिक धर्म असलेल्या जोराष्ट्रियन धर्माचा संस्थापक झरतुष्ट्र हा जातीने कुर्द होता. त्यामुळे इस्लामी स्टेटच्या कुर्द आणि याझिदी लोकांविरोधातल्या हिंसक हल्ल्यानंतर उत्तर इराकच्या कुर्दिस्तान स्वायत्त भागात सुन्नी मुस्लिम कुर्द परत झोराष्ट्रियन बनण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शिवाय सुन्नी अरब लोकांसारखे कुर्द संकुचित नाहीत, अर्ध्या अधिक राजकीय, सरकारी पदांवर तिथे महिला काम करतात. कुर्द महिला, मुलींची "पेशमर्गा इन्फंट्री बटालियन" ही अत्यंत तिखट आणि चिवट लढाऊ बाण्यासाठी प्रसिद्ध युनिट्स आहेत आणि इस्लामिक स्टेटच्या पाडावात या मुलींच्या लढाऊ युनिट्सचा मोठा वाटा होता.
तुर्कस्तानमध्ये २ कोटी कुर्द राहतात, इराणमध्ये १.५ कोटी, इराकमध्ये सुमारे १ कोटी आणि सीरियात ५० लाख. तुर्कस्तान मधील कुर्द टर्किश सरकारविरोधात गेली कित्येक दशके कुर्दिस्तान वर्कर्स पार्टीच्या झेंड्याखाली सशस्त्र संघर्ष करत आहेत. काही वर्षांपूर्वी कुर्दांनी तुर्कीच्या विमान उत्पादन कंपनीच्या कारखान्यावर मोठा हल्ला केला होता. १९८४ पासून आजपर्यंत तुर्कस्तान मध्ये कुर्द आणि तुर्क संघर्षात ४०,००० लोक मारले गेले आहेत. अशा तिखट कुर्दांचा वापर करून इराणी राजवट पाडायची अमेरिकेची योजना होती. कुर्द योद्धे आणि अमेरिकन, इस्रायली सैन्याची हायब्रीड युनिट्स तयार करून इराण इराक सीमेवरून आत येत एकेक भागातून इराणी राजवट उलथवत तेहरान पर्यंत यायचा हा होरा होता.
इराणमध्ये इराण इराक सीमेवर कुर्द लोकसंख्या आहे. इथेही शिया इराणी शासन आणि सुन्नी कुर्द यांच्यात संघर्ष होतो. याचा फायदा घ्यायची ही योजना होती.
पण सध्याचं युद्ध सुरू झाल्या झाल्या इराकी आणि सीरियन कुर्दांनी ट्रम्पचा हा प्रस्ताव फेटाळला. कारण मागच्या वर्षी ट्रम्प सरकारने सीरियन अध्यक्ष बशर अल असदला हरवून इस्लामिक स्टेटचा प्रमुख अहमद अल शारा ऊर्फ अबू मोहम्मद अल जोलानी याला सिरियाचा अध्यक्ष केला. ज्या हिंसक इस्लामिक स्टेट विरुद्ध अमेरिकन सैन्याने आम्हाला वापरून घेतलं त्याच लोकांच्या हातात अमेरिकेने सिरिया सोपवला यामुळे कुर्द अतिशय संतप्त झाले. शिवाय तीन महिन्यांपूर्वी जोलानी सरकारने सीरियाच्या अनेक भागातून कुर्दिश योद्ध्यांना पिटाळून लावण्यासाठी तुर्कस्तानच्या सैन्याच्या मदतीने मोठी सैन्य कारवाई केली आणि यावेळी अमेरिकेने कुर्दांना कसलीही मदत केली नाही!
या सगळ्याचा परिणाम म्हणून ही योजना सुरुवात व्हायच्या आतच संपली! तरीही इराक इराण सीमेवर नजफ मध्ये युद्धाच्या चौथ्या, पाचव्या दिवशी अमेरिकन आणि इस्रायली एअरबॉर्न डिव्हिजनच्या पॅराट्रूपर्सना उतरवण्याचा प्रयत्न अमेरिकन सेंट्रल कमांडने केला. परंतु त्या भागात असलेल्या इराण समर्थित शिया मिलिशियाच्या लढाऊ युनिट्सनी त्यांच्या हेलिकॉप्टर्सवर हल्ले केले आणि आधीच उतरलेल्या कमांडोजना अटक केली, अशी घोषणा इराणी सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष अली लार्जियाने याने केली होती.
२. इराण पाकिस्तान सीमावर्ती भागातल्या बलुचांचा वापर!
इराणमध्ये सुमारे ५० लाख बलुच राहतात. पाकिस्तानी बलुचिस्तानला लागून असलेल्या इराणच्या सिस्तान बलुचिस्तान मध्ये ही बलुच लोकसंख्य केंद्रीत झालेली आहे. भारताने इराणसोबत विकसित केलेल्या छाबहर बंदरात बलुच बहुसंख्य आहेत. बलुच सुद्धा सुन्नी आहेत आणि अत्यंत तिखट आणि चिवट लढाऊ म्हणून ओळखले जातात. यांच्यात सक्रिय जैश अल अदल ही सुन्नी आतंकी संघटना आहे (पूर्वीचं नाव जुन्दुल्लाह) त्यांच्यात आणि इराणी रिवोल्युशनरी गार्ड्स यांच्यात संघर्ष होत राहतो. २०१९ मध्ये गार्ड्सच्या परेडवर झालेल्या बलुच हल्ल्यात २७ गार्ड्स मारले गेले होते. ट्रम्पची योजना या बलुच लोकांना पाकिस्तानच्या मदतीने या युद्धात ओढण्याची होती पण खुद्द पाकिस्तानमध्ये बलुच क्रांतिकारकांनी गेली काही वर्षे जो अभूतपूर्व उत्पात मांडला आहे त्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याच हाताने आपलेच शत्रू अमेरिकेसाठी अजून मजबूत करणे पाकिस्तानच्या फायद्याचं नव्हतं म्हणून ही योजनाही बारगळली!
जानेवारीत झालेल्या मोसाद पुरस्कृत उठावात स्टारलिंक इंटरनेट डिव्हाइसेस बलुचिस्तान मधल्या डिझेल स्मगलिंग रॅकेटच्या माध्यमातून इराणमध्ये पाठवली गेली होती, कारण या भागातून पाकिस्तानच्या एकूण गरजेच्या ३०% डिझेल इराणमधून पाकीस्तानात स्मगलिंग करून आणलं जातं! त्यामुळे शेवटचा पर्याय उरतो इराणमध्ये अमेरिकन सैन्याची तैनाती! ती कशी?
३. इराणच्या खार्ग बेटावर अमेरिकन सैन्याची तैनाती!
इराणी राजवट उलथवून टाकण्यासाठी इराणी क्रूड निर्यात बंद करण्यावाचून पर्याय नाही. पण समजा नंतर अमेरिका समर्थित राजवट आलीच तर तेल उत्पादन आणि निर्यात यंत्रणा उध्वस्त करूनही उपयोग नाही त्यामुळे अमेरिकन सैन्य आता इराणच्या खार्ग बेटावर सैन्य उतरवण्याच्या विचारात आहे.
खार्ग बेट इराणच्या क्रूड निर्यातीच्या ९०% क्रूडची शिपिंग करतं. उत्तर पर्शियन गल्फमध्ये इराणच्या किनाऱ्यापासून २५ किमी अंतरावर असलेलं हे बेट फक्त २३ चौरस किमी आकाराचं आहे आणि लोकसंख्या फक्त ८ हजार. पण या बेटाला इराणी अर्थव्यवस्थेत अनन्यसाधारण महत्व आहे. गेले १२ दिवस युद्ध सुरू असूनही या बेटावरून चीनला होणारी क्रूड निर्यात एक क्षणही थांबलेली नाही. बाकी अरबांसाठी इराणी सैन्याने हॉर्मुझ स्ट्रेट बंद केली असली तरी खार्ग वरून चीनसाठी रवाना झालेलं क्रूड आरामात बाहेर जात आहे.
याचा बंदोबस्त करण्यासाठी या बेटावर अमेरिकन सैन्याची ८२ वी एअरबॉर्न डिव्हिजन उतरवून पहिला इराणी तेलाचा चीनला होणारा पुरवठा थांबवायचा आणि मग तिथून मोठ्या संख्येने इराणी मुख्य भूमीवर सैन्य न्यायची योजना असल्याची बातमी आहे.
कालच्या इराणवरील पेंटागॉन ब्रिफिंग मधून बाहेर पडलेले अमेरिकन सिनेटर्स रिचर्ड ब्लूमेंथाल आणि क्रिस मर्फी यांच्या म्हणण्याप्रमाणे अमेरिकन अध्यक्ष, चिफ ऑफ स्टाफ, युद्धमंत्री आणि विदेशमंत्री या प्रत्येकाने युद्धाची वेगवेगळी उद्दिष्टे सिनेटरना सांगितली, पण त्यापैकी अमेरिकन सैन्य इराणी भूमीवर उतरवून इराणी राजवट उलथवून टाकण्याबाबत ट्रम्प प्रशासनात एकवाक्यता आहे.
इराणी भूमीवर सैन्य उतरवायची योजना ऐकून आम्ही अतिशय अस्वस्थ झालो असं हे सिनेटर म्हणाले. कारण मुळात इराणमध्ये लहान मोठ्या ४३००० पर्वतरांगा आहेत. इराणी रिव्होल्युनरी गार्ड्सच्या ३१ रिजनल कमांड आहेत आणि सर्वोच्च नेता मारला गेल्यास त्यांनी आपापल्या युद्ध योजना ठरवाव्यात असे त्यांना आदेश आहेत. शिवाय इराणी सैन्य म्हणजे अर्तेश आणि बासिज मिलिशिया आणि गार्ड्सच्या हातात असलेले कुदस स्पेशल फोर्सेस असे मिळून ५ ते ७ लाख सैनिक होतात. या डोंगररांगांमध्ये ३१ स्वायत्त सैन्य कमांडच्या हातात अमेरिकन सैनिक सापडले तर दोन्ही बाजूंनी होणारी कत्तल कल्पनेच्या पलिकडे असेल.
याशिवाय पर्शियन गल्फच्या मधोमध असलेल्या खार्ग बेटावर अरबी देशांच्या मदतीशिवाय सैन्य आणता येणार नाही, त्यांनी मदत केल्यास इराणी सैन्य आपली उरली सुरली इराणी मिसाईल आणि ड्रोन अत्यंत समृद्ध, विकसित अशा अरब देशांच्या नागरी भागांच्या सर्वंकष विनाशासाठी खर्च करेल.यात अरब देशात अब्जावधी डॉलर्सचे नुकसान आणि अगणित मनुष्यहानी होईल. तेल उद्योग जाळले जातील ते वेगळे.
अमेरिकन सैन्याला येमेनी शियांचा धोका!
आज येमेनी शिया हौती बंडखोरांच्या अन्सरुल्लाह गटाच्या कमांडरने इराणसाठी मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. ते आज ना उद्या यात येणारच आहेत पण अमेरिकन सैन्य इराणमध्ये आल्यास येमेनी बंडखोर सुवेझ कालव्यातून येणारी रेड सी शिपिंग लेन्स बंद करतील. आत्ता जागतिक तेल व्यापाराचा फक्त २०% भाग हॉर्मुझ स्ट्रेट बंद असल्याने ठप्प झाला आहे, येमेनी बंडखोरांच्या माऱ्याने बाब अल मांदेबच्या मार्गाने येणारा तेल पुरवठा बंद झाल्यास जागतिक तेल व्यापाराचा ३७% व्यापार ठप्प होईल. म्हणजे अख्ख्या जगाच्या औद्योगिक, आर्थिक विश्वाची थेट नासाडी!
मध्य आणि पश्चिम आशियातील शिया प्राबल्याचा धोका!
अख्ख्या जगात सुन्नी लोकसंख्या १५ ते २०% आहे पण उत्तर अरबी समुद्राच्या येमेन, ओमान ते लेबनॉन या भागात शिया ४० ते ४५% आहेत आणि जगातील एकमेव भव्य, ऐतिहासिक आणि प्रबळ इराणी शिया राजवट सत्तेवरून खाली खेचण्यासाठी ख्रिचन अमेरिकन सैन्य अरबी सुन्नी मुस्लिमांच्या सक्रीय पाठिंब्यासह यहूदी इस्रायलच्या योजनेनुसार इराणमध्ये आल्यास या प्रचंड शिया मुस्लिम समाजाची प्रतिक्रिया काय असेल याची कल्पनाच केलेली बरी!
समजा ट्रम्प प्रशासनातील काही हॉकिश लोकांच्या भव्य स्वप्नांना धरून थेट तेहरान मध्ये १ लाख पॅराट्रूपर्सना उतरवून इराणी राजवट पाडायची योजना ठरली तर येमेन, बहारीन, इराण, सिरिया, इराक, लेबनॉन, ओमान, सौदी, अमिराती मधील सगळी शिया पॉकेट्स मैदानात उतरतील.
सौदीच्या तेलसमृद्ध अल कातिफ आणि अल अहसा या पूर्वेकडील प्रांतात सौदीची १५% शिया लोकसंख्या एकवटलेली आहे. अमेरिकन नौसेनेच्या ५ व्या फ्लीटचं मुख्यालय असलेल्या बहरीन मध्ये बहुसंख्य शियांवर सुन्नी राजा राज्य करतो तिथे सध्या प्रचंड अस्वस्थता आहे, राजा पळून गेल्याच्या वावड्याही उठत आहेत.
अशा परिस्थितीत अमेरिकन सैन्याने इराणी भूमीवर पाय ठेवण्याची योजना आखणं आत्महत्येपेक्षा कमी नाही. यामुळे अरब देशातील तेल उद्योग आणि नागरी इन्फ्रास्ट्रक्चर कमीत कमी ५० वर्षे मागे जाईल. त्याशिवाय हॉर्मुझ स्ट्रेट आणि बाब अल मांदेब अनिश्चित काळासाठी बंद राहिल्याने अमेरिकेसह जागतिक अर्थव्यवस्था देशोधडीला लागतील.
तात्पर्य काय की खार्ग बेट असो, कुर्द किंवा बलुच बंडखोरांना हाताशी धरून असो, इराणी राजवट पाडायची सध्या उपलब्ध एकही योजना व्यवहार्य दिसत नाही.
पुढच्या भागात आपण इराण युद्धाचे सैनिकी पैलू, त्याचे जागतिक डिजिटल व्यवस्था आणि तेल उद्योगावर होणारे परिणाम बघू!