इराण ऐवजी इराकमध्ये "रिजिम चेंज" ची शक्यता:- होर्मुझ, खार्ग बेट ते बगदाद ते लेबनॉन- एक युद्ध, सात आघाड्या!

इराण ऐवजी इराकमध्ये "रिजिम चेंज" ची शक्यता:- होर्मुझ, खार्ग बेट ते बगदाद ते लेबनॉन- एक युद्ध, सात आघाड्या!

          Date: 21-Mar-2026   
Total Views |
इराण युद्ध सुरू होऊन आता तीन आठवडे उलटून गेले आहेत. पहिल्याच दिवशी इराणी धार्मिक नेता खामेनी याच्या हत्येनंतर इराण चौवीस तासात शरण येईल आणि आपल्या पसंतीचा नेता सत्तेत बसवुन इराणी तेल आपण चोरू ही ट्रम्पची आशा धुळीस मिळालेली आहे. इराणी शिया राजवटीच्या बहुस्तरीय रचनेमुळे इराणी राजवट तग धरून आहे.
एक युद्ध, सात आघाड्या!

1 
 
बाहेरून दिसताना हे युद्ध एकाच ठिकाणी सुरू आहे असा भास होतो पण प्रत्यक्षात हे युद्ध एकाच वेळी पाच आघाड्यांवर सुरू आहे, त्या आघाड्या अशा,
१) इराण:- इराणवर रोज होणारी इस्रायली आणि अमेरिकन बॉम्बफेक,
२) इराणकडून अमेरिकेचे अरब देशातील सैन्य तळ आणि खुद्द इस्रायलवर होणारे मिसाईल, ड्रोन हल्ले,
३) इराणने होर्मुझ स्ट्रेट बंद केल्याने सुरू असलेले मूक आर्थिक युद्ध, ज्यात कमीत कमी दारूगोळा खर्च होतो आहे, कमीत कमी मनुष्यहानी होत आहे पण अतोनात जागतिक आर्थिक नुकसान होत आहे. ही बंदी मोडून काढण्यासाठी अमेरिका विविध सैनिकी पर्यायांवर विचार करत आहे,
 
४) इस्रायल विरुद्ध लेबनॉन मधील शिया हिजबुल्ला गट यांच्यातील मिसाईल, ड्रोन आणि आमनेसामने होत असलेलं युद्ध,
५) इराक, सिरिया मधील पॉप्युलर मोबलाझेशन फोर्सेस अर्थात शिया ॲक्सिस ऑफ रेझिस्टन्सने अमेरिकन, नाटो बेस, अमेरिकन दूतावास यांच्याविरुद्ध सुरू केलेलं निर्णायक युद्ध,
 
६) इराण समर्थित येमेनी शिया हौती बंडखोरांनी अद्याप सुरू न केलेलं पण लवकरच आपण बाब अल मांदेबची चिंचोळी सामुद्रधुनी आम्ही बंद करू म्हणून केलेली घोषणा. या युद्धातील ही अजूनपर्यंत शांत असलेली सहावी युद्ध आघाडी आहे.
 
७) खार्ग बेटावर हल्ल्याची अमेरिकन योजना:- ही अजून एक शांत आघाडी आहे, पण होर्मुझ स्ट्रेट इराणने बंद केल्याने अमेरिकन सैन्य आता इराणच्या तेल व्यापाराची आर्थिक नाडी असलेल्या खार्ग बेटावर "मरीन एक्स्पिडिशनरी फोर्स" आणण्याच्या तयारीत आहे. तसं झाल्यास इराणी जमिनीवर अमेरिकन सैन्य प्रत्यक्ष उतरण्याची या युद्धातील ही पहिलीच वेळ असेल.
बगदाद मधील फौदा, इराकमधील "रिजिम चेंज" च्या हालचाली आणि इराकमधून नाटो फौजांची माघार!
 

2 
इराणवर इस्रायली आणि अमेरिकन हल्ले सुरू झाल्यापासून इराकमधील अमेरिकन आणि नाटो फौजांना पॉप्युलर मोबिलाझेशन फोर्सेस कडून होणाऱ्या तिखट हल्ल्यांचा सामना करावा लागत आहे. इराक मध्ये शिया लोकसंख्या ६९% च्या आसपास आहे त्यामुळे शिया क्रेसेंट किंवा शिया ॲक्सिस मधल्या विविध शिया सशस्त्र गटांनी यावेळी इराणवरील हल्ल्यांचा बदला म्हणून मोठा सैनिकी संघर्ष सुरू केलेला आहे. कतईब हिजबुल्ला, असाईब अहल अल हक आणि बद्र ग्रुप हे तीन प्रमुख इराण समर्थक शिया सशस्त्र गट आहेत. पैकी कतईब हिजबुल्लाने यावेळी बगदाद मधील अमेरिकन दूतावासावर, रडार स्टेशनवर आणि कुर्दिश, फ्रेंच संयुक्त बेसेसवर मोठे हल्ले केले आहेत. इराणकडून मिळणारी भरघोस सैनिकी मदत आणि प्रशिक्षण यामुळे हे हल्ले अतिशय प्रभावी ठरत आहेत.
 
या हल्ल्यात फ्रेंच सैनिक मारले गेल्यानंतर आणि अन्य कित्येक तळांवर मिसाईल, ड्रोन हल्ले अहोरात्र होत राहिल्याने नाटो फौजांनी बहुसंख्य तळ रिकामे करून माघार घेतली आहे. इराकच्या आकाशात या गटांनी केलेल्या हल्ल्यात अमेरिकन सैन्याचा एक एरियल रिफ्युएलिंग टँकर पडल्याने मोठा गदारोळ उडाला होता.
 
बगदाद मधील अमेरिकन दूतावासावर झालेल्या हल्ल्याने दूतावास बंद करावा लागला, याशिवाय उत्तर इराकमधील कित्येक अमेरिकन तळांवर सततच्या हल्ल्यांनी ते तळ सोडून अमेरिकन सैनिक ज्या ज्या इराकी हॉटेलमध्ये राहत आहेत त्यांच्यावर शिया गटांचे हल्ले सुरू आहेत.
 
स्थानिक गट अधिक इराणी सैन्याने वेचून वेचून अमेरिकन रडार स्टेशन उद्ध्वस्त करण्याचा सपाटा लावल्याने आता कोणतीही पूर्वसूचना न मिळता इराणी मिसाईल थेट लक्षावर येऊन आदळत आहेत. यामुळे अमेरिकन सेना मोठ्या अडचणीत आहे.
 
इराकच्या नजफ मधून उत्तर इराणमध्ये स्पेशल फोर्सेस आणण्याची मूळ अमेरिकन योजना यात पार फसलेली आहे आणि त्यावर अमेरिकन सैन्याला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कष्ट घ्यावे लागत आहेत. त्यामुळे अमेरिका समर्थित इराक सरकारवर आता दबाव वाढत आहे.
 
इराकी सरकारसमोर पेच!
 

3
 
नाटो आणि अमेरिकन सैन्य माघारी गेल्यास वर्तमान प्रधानमंत्री मोहम्मद शिया अल सुदानी यांना सत्ता सोडावी लागू शकते. इराणचा प्रयत्न असा असणार आहे की हे सरकार पाडुन त्याच्या जागी इराणला सोयीचा एखादा नेता बद्र किंवा कतईब हिजबुल्ला मधून निवडून त्याला सत्तेत बसायला मदत करावी. हे शक्य झाल्यास इराणची उत्तर सीमा एकदम सुरक्षित होईल. हे विफल झाल्यास अमेरिकन सैन्यासमोर अल सुदानीची राजवट सुरक्षित ठेवण्यासाठी दबाव राहील आणि तिथून इराणमध्ये घुसखोरीसाठी वेळ मिळणार नाही. त्यामुळे काहीही झालं तरी सध्या इराणला सोयीची स्थिती आहे. पॉप्युलर मोबिलाझेशन फोर्सेस सध्या अमेरिकन सैन्याचा प्रचंड वेळ खर्ची पाडत आहे, शिवाय इराणवर हल्ला केल्यास आपल्याला इराकमधून सहजपणे कुर्दिश योद्ध्यांना स्पेशल फोर्सेस सोबत आत घुसवता येईल ही अमेरिकन अपेक्षा पॉप्युलर मोबिलाझेशन फोर्सेस मुळे विफल झाली आहे. असाच अजून एक अनपेक्षित नसला तरी कल्पनेच्या पलीकडचा तिखट संघर्ष उत्तर इस्रायलमध्ये हिजबुल्ला सोबत सुरू आहे.
 
इराणच्या साऊथ पार्स गॅस फिल्डवर हल्ले!
 
इराणच्या घरगुती मागणीच्या बहुसंख्य गॅस ज्या फील्ड मधून त्या साऊथ पार्स गॅस फिल्डवर इस्रायली सैन्याने हवाई हल्ला केला. यामुळे इराकमध्ये आणि तुर्की मध्ये जाणारा इराणी गॅस पुरवठा सुद्धा खंडित झाला. यानंतर इराणने अवघ्या काही तासात सौदी अरेबिया, युनायटेड अरब अमिरात, कुवैत, कतर आणि बहरीन मधील गॅस आणि तेल ठिकाणांवर मोठे हल्ले केले इथे दोन आघाड्या एकाचवेळी जळताना दिसल्या. यामुळे जागतिक गॅस पुरवठ्यात मोठी उलथापालथ झाली आणि अनेकांनी यानंतर इराणी तेल आणि गॅस ठिकाणांवर हल्ले करू नयेत अशी विनवणी सुरू केली. इथे लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट म्हणजे इराणी गॅस फिल्डवर हल्ले झाल्या झाल्या इराणने अरब देशातील कारखान्यांची यादी घोषित करून त्यावर हल्ले केले. अमेरिका आणि इस्राएल सतत इराणी मिसाईल लाँच पॅड उध्वस्त झाली हे घोषित करत असताना इराणने इतक्या कमी वेळात प्रत्युत्तर देणं सगळ्या अरब देशांसाठी मानसिक धक्का देणारं ठरलं आहे.
 
हिजबुल्ला आणि इस्राएल संघर्ष!
 
गेली दोन वर्षे लेबनॉन मधील शिया मिलिशिया हिजबुल्ला आणि इस्राएल यांच्यात युद्धबंदी होती. हिजबुल्लाचा प्रमुख नसरल्लाह याला मारल्याने आणि अनेक प्रमुख कमांडर्स मारल्याने हिजबुल्ला अत्यंत कमजोर अवस्थेत आहे या गृहितकावर इस्रायल विसंबून होतं. पण इराणवर संयुक्त हल्ले सुरू झाल्यापासून हिजबुल्लाने ज्या नव्या टॅक्टिकल योजनेने आणि तयारीने उत्तर इस्रायलवर हल्ले सुरू केले आहेत ते बघता खुद्द इस्रायली सैन्य नेतृत्व बुचकळ्यात पडलं आहे.
 
 
इराण युद्ध सुरू झाल्यापासून हिजबुल्लाने इस्रायलवर आत्तापर्यंत ४३२ रॉकेट, मिसाईल हल्ले, १६२ ड्रोन हल्ले, २५ अँटी टँक हल्ले असे जवळपास ६५० हल्ले केले आहेत. यावेळी हिजबुल्लाच्या सततच्या मिसाईल हल्ल्यात मोठी अचूकता दिसत आहे. शिवाय इराणी सैन्य आणि हिजबुल्ला यांच्या हल्ल्यात कमालीचं नियोजन दिसत आहे आणि बहुसंख्य हल्ले एकाचवेळी इस्रायलवर येत आहेत. यामुळे इस्रायली एअर डिफेन्स यंत्रणांवर कमालीचा ताण येऊन मिसाईल आणि ड्रोन थेट जमिनीवरील लक्षावर जाऊन फुटण्याच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे इस्रायलमध्ये अभूतपूर्व नुकसान झालं आहे.
 
सुमारे ५ लाख सैनिकांसह दक्षिण लेबनॉन मध्ये इस्रायली सैन्य कारवाई सुरू होणार आहे त्यापैकी सध्या ५ डिव्हिजन म्हणजे ५० हजार सैनिक लिटानी नदीच्या दक्षिणेला बफर झोन तयार करण्याच्या लढाईत गुंतले आहेत. पण या भागात त्यांना होणारा प्रतिकार अंदाजापेक्षा खूप जास्त आहे.
 
रादवान फोर्सेस!
 
हिजबुल्लाचे रादवान फोर्सेस! सध्या इस्रायली सैन्यासाठी मोठी डोकेदुखी बनताना दिसत आहेत. हिजबुल्लाच्या इमाद मुघलीय याच्या नावाने तयार झालेले हे कडवे जिहादी इस्रायली आर्मर्ड डिव्हिजन समोर अँटी टँक मिसाईल्स घेऊन उभे आहेत आणि आत्तापर्यंत दोन डझन इस्रायली टँकवर त्यांनी भीषण हल्ले केल्याच्या बातम्या आहेत. शिवाय उत्तर इस्रायलवर यांनी केलेल्या हल्ल्यांनी मोठं नुकसान झालेलं आहे.
 
या युद्धाच्या पहिल्या तीन आठवड्यात इस्रायलमध्ये झालेल्या नुकसानाची आकडेवारी मोठी आहे. तेल अवीव, अश्कलोन मध्ये प्रत्येकी ५००० इन्शुरन्स भरपाईचे दावे दाखल झाले आहेत आणि जेरुसलेम मध्ये ३००. एकूण इस्रायल मध्ये १२,००० इन्शुरन्स डॅमेज क्लेम्स दाखल झाले आहेत यात ८,००० इमारती, २,००० गाड्या आणि अन्य क्लेम्स सुमारे २,००० आहेत. या सगळ्याची एकूण किंमत कित्येक बिलियन डॉलर्स मध्ये पोचत आहे.
 
शिवाय हैफा रिफायनरी, बेन गुरियन विमानतळ आणि अन्य कित्येक औद्योगिक आणि सैनिकी भागात झालेलं नुकसान याची यात नोंद नाही.
दोन शांत आघाड्या आणि एक अस्वस्थ आघाडी!
 
एकूण सात आघाड्यांपैकी होर्मुझची आघाडी अस्वस्थ पण शांत आहे. इथे इराणने सध्या आपल्या किनाऱ्याच्या जवळून केशम आणि लरक बेटांच्या मधून पैसे घेऊन काही जहाजांना बाहेर जायची परवानगी दिली आहे. चीन आणि रशियाच्या सर्व जहाजांना पूर्ण आणि मोफत परवानगी आहे. बाकीच्यांना प्रत्येकी २० लाख डॉलर्स घेऊन इराण बाहेर जाऊ देत आहे. हे पैसे त्यांना चिनी चलन रेनमीनबी मध्ये देणे बंधनकारक आहे. यावर कुणी चलाखी दाखवली तर इराणी सैन्य तत्काळ त्यावर मिसाईल डागून जाळपोळ करत आहे त्यामुळे कुणीही पैसे न देता जाण्याची हिंमत दाखवत नाही.
 
होर्मुझ स्ट्रेट उघडण्यासाठी बळाचा वापर करण्याच्या दृष्टीने अमेरिका नाटो देशांना विनवण्या करून दमली आहे आणि आता अमेरिकन आणि इस्रायली वायुसेना होर्मुझच्या पूर्वेला असलेल्या बंदर अब्बास या इराणी बंदरावर अंदाधुंद हवाई हल्ले करत आहे. पण प्रत्यक्षात तिथे सैन्य आणून इथून इराणी उपद्रव थांबवणे म्हणजे काही हजार अमेरिकन सैनिकांचा बळी देणे आहे असं अमेरिकन सैन्य अधिकारी मानतात.
 
काही दिवसांपूर्वी अमेरिकेने इराणच्या खार्ग बेटावर हवाई हल्ले केले पण इराणी तेल इन्फ्रास्ट्रकचर वर हल्ले केले नाहीत, इथे अमेरिकन मरीन एक्स्पिडिशनरी फोर्स आणून इराणचं नाक दाबायचा योजना आहे. पण इथे सैनिक उतरल्यास इराण मुख्य भूमीवरून त्यांना शब्दशः भाजून काढेल ही रास्त भीती अमेरिकन जनरल व्यक्त करत आहेत, पण ट्रम्प बेट ताब्यात घेण्यावर ठाम आहे. तरी सध्या ही आघाडी शांत आहे.
 
 
दुसरी शांत आघाडी आहे येमेनी शिया हौती बंडखोरांची. इराणने बहुदा शेवटची खेळी म्हणून त्यांना शांत ठेवलं आहे अशी चर्चा आहे. होर्मुझ नाकेबंदी उठविण्याचा आनंद अमेरिका साजरी करू लागली किंवा तिथे प्रत्यक्ष लढाईला तोंड फुटल्यास येमेनी बंडखोरांच्या माध्यमातून बाब अल मांदेबची कोंडी करून एका झटक्यात जगाच्या तेल पुरवठ्याच्या ३७% हिश्यावर घाला घालायचा आणि जगाच्या अर्थव्यवस्थेत हाहाकार माजवायचा अशी इराणी योजना असावी.
 
निष्कर्ष!
 
अशा ७ आघाड्यांपैकी सध्या ५ आघाड्या पेटलेल्या आहेत. येमेनी शिया हौती बंडखोर कोणत्याही क्षणी युद्धात उतरू शकतात आणि अमेरिकन मरीन एक्स्पिडिशनरी फोर्स लवकरच उत्तर अरबी समुद्रात दाखल होऊ घातला आहे. हे झाल्यास आणि आत्ता ठरल्याप्रमाणे ट्रम्प वागल्यास अमेरिका खरंच खार्ग बेटावर सैन्य आणेल, ही बेट जिंकणं अमेरिकेला फार कठीण नाही पण नंतर होणारा अमेरिकन रक्तपात कल्पनेच्या पलिकडे पोचू शकतो. एका अमेरिकन पत्रकाराच्या भाषेत खार्ग बेटावर सैन्य उतरवणे म्हणजे "मीट ग्राईंडर" मध्ये मांस घाल्यासारखं आहे! इराणी सैन्य प्रवक्ता म्हणाला त्याप्रमाणे अफगाणिस्तान २१ वर्षात जितकं अमेरिकन नुकसान झालं तेवढं इराण खार्ग बेटावर एका आठवड्यात देईल!
कोणत्याही अंगाने विचार केल्यास हे खोटं वाटत नाही!
----- विनय जोशी