ईस्टर संडेच्या आधीच्या घडामोडी!
२ एप्रिल ते ५ एप्रिल २०२६ दरम्यान मध्य इराणमध्ये काही गूढ घटना घडल्या. अमेरिकन हवाई दलाचे लढाऊ विमान इराणने पाडल्यानंतर अमेरिकन पायलट वाचविण्यासाठी एक व्यापक शोध मोहीम राबविण्यात येत असल्याचं अमेरिकन सेंट्रल कमांडने जगाला सांगितलं. मात्र याची व्याप्ती, त्यात सामील सैनिकांची संख्या आणि सहभागी विमानांची संख्या यांचे आकडे बघता ती फक्त २ पायलटना वाचविण्यासाठी राबवलेली मोहीम वाटेनाशी झाली तर तिचा संबंध इसफहान आण्विक केंद्राशी असल्याचे अंदाज वर्तवले जाऊ लागले.
२ एप्रिलच्या संध्याकाळी इराणच्या सैन्याने अमेरिकेचे विमान पाडल्याचा दावा करणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला. सुरुवातीला ही घटना पर्शियन आखातावर झाल्याचे सांगण्यात आले, परंतु नष्ट झालेल्या विमानाच्या अवशेषांचे आणि जागेच्या विश्लेषणावरून असं दिसून आलं की हे विमान इराणच्या भूप्रदेशात खोलवर असलेल्या इसफहान शहराजवळ कोसळलं होतं. ३ एप्रिलच्या सकाळपर्यंत, इसफहानच्या दक्षिणेस ब्रिटीश तळावरून उड्डाण केलेल्या ४९४ व्या फायटर स्क्वॉड्रनच्या एफ१५ ई स्ट्राईक ईगल विमानाचे अवशेष सापडले.
फक्त पायलटचा बचाव की अजून काही?
मार्च २०२६ मध्ये आंतरराष्ट्रीय अणू ऊर्जा आयोगाचे प्रमुख राफेल ग्रोसी यांनी म्हटलं होतं की इराणचे ६०% शुद्धतेचे युरेनियम इसफहानमधील बोगद्यांमध्ये साठवले असावे. आता असा अंदाज वर्तवण्यात येत आहे की, अमेरिकन लष्कर या ठिकाणाहून "हायली एनरिच्ड युरेनियम" (HEU) बाहेर काढण्यासाठी इसफहानच्या दक्षिणेस असलेल्या धावपट्टीचा वापर 'फॉरवर्ड ऑपरेशनल बेस' म्हणून करणार होते. पाडलेले एफ१५ ई हे विमान बहुतेक इराणी एअर डिफेन्स यंत्रणांवर हल्ले करण्यासाठी चाललेल्या कारवाईत सामील होते, आणि नंतर तिथे सी १३० सैनिकी मालवाहू विमाने २०० स्पेशल फोर्सेस कमांडोजना घेऊन तिथे उतरून इसफहानमधील आण्विक तळाचा ताबा घेण्यासाठी जाणार होते.
मोहिमेचा विस्तार आणि संघर्ष
एफ १५ विमान कोसळल्यानंतर ३ एप्रिल रोजी अनेक अमेरिकन हेलिकॉप्टर्स एच एच पेव हॉक, ए १० विमाने आणि कित्येक सार्विलन्स ड्रोन इराणच्या हवाई हद्दीत सक्रिय दिसली. या दरम्यान झालेल्या संघर्षात एका ए १० विमानाला इराणी एअर डिफेन्स मिसाईल ने दणका दिला आणि वैमानिकाला पर्शियन आखातात उडी मारावी लागली. काही हेलिकॉप्टर्सचेही नुकसान झाले. दरम्यान, एफ १५ च्या वैमानिकाची सुटका झाल्याचे वृत्त आले, परंतु वेपन्स ऑफिसर अजूनही बेपत्ता होता.
४ एप्रिलच्या रात्री कारवाईची पातळी आणि तीव्रता वाढली. ५ एप्रिलच्या पहाटेपर्यंत समोर आलेल्या चित्रांनी कल्पनेपेक्षा वेगळीच परिस्थिती समोर आली. इसफहानजवळ दोन जळलेली सी १३० मालवाहू विमाने आणि अनेक एम एच ६ लिटल बर्ड हेलिकॉप्टर्सचे अवशेष दिसले.
ट्रंप याने स्वतःच म्हटल्याप्रमाणे या मोहिमेत ४ बॉम्बर्स, ६४ फायटर जेट्स, ४८ एरियल रिफ्युएलिंग टँकर आणि १३ मालवाहू आणि रेस्क्यू विमाने आणि लढाऊ, मालवाहू हेलिकॉप्टर्स मिळून एकूण १५५ विमाने, चॉपर्सनी भाग घेतला. दोन पायलटना शत्रू प्रदेशातून उचलून आणण्यासाठी इतक्या मोठ्या प्रणामात विमाने तैनात करावी लागत नाहीत. ही मोहीम जबरदस्त यशस्वी झाली असा प्रचार केला गेला असला तरी एकूण अर्ध्या बिलियन डॉलर्स किमतीची १२ विमाने आणि हेलिकॉप्टर्स या कारवाईत इराणी हल्ल्यामुळे नष्ट झाली आहे यात दोन अवाढव्य सी १३० विमानांचा समावेशही आहे.
अमेरिकन एयरफोर्स मेजर अमांडा रायडर हिचे आयडेंटिटी कार्ड, क्रेडिट कार्ड आणि इस्रायलमध्ये राहण्याचा तात्पुरता परवाना हा सुद्धा या जागी इराणी सैन्याला मिळालेला आहे.
ट्रम्पची शिवीगाळ आणि थयथयाट!
यावरून असा निष्कर्ष काढला जात आहे की खार्ग बेटावर सैन्य उतरवणे किंवा होर्मुझच्या आसपास सैन्य उतरविण्याची हूल देऊन अमेरिकन सैन्याने थेट मध्य इराणमध्ये सैन्य उतरवून इसफहानमधील खोल बोगद्यांमधील समृद्ध युरेनियम ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असावा! आणि हे ऑपरेशन सपशेल फसल्याने, शिवाय इराणी प्रदेशात १२ विमाने आणि चॉपर्स जळल्याने ईस्टर संडेच्या दिवशी आपण युरेनियम ताब्यात घेऊन युद्ध जिंकलो आहोत असा प्रचार करून युद्धातून बाहेर पडण्याची ट्रम्पची योजना फसली. या रागाने त्याने त्यादिवशी इराणवर आगपाखड करून शिव्यांची लाखोली वाहिली
युद्धबंदी नंतरच्या युद्धाची भीतीदायक "इसफहान आघाडी"
आज उद्याकडे इराण अमेरिका यांच्यात १४ दिवसांच्या युद्धबंदी दरम्यानची चर्चा होणार आहे. यात इराण सैनिकी आण्विक आणि मिसाईल कार्यक्रम बंद न करणे, होर्मुझ मधून टोल वसूल करणे आणि भविष्यातील हल्ल्यांपासून कायमची मुक्ती मिळवण्याची हमी मिळवण्याची मागणी रेटणार आहे, शिवाय हिजबुला वरील हल्ले थांबवणे आणि युद्धात झालेल्या नुकसानाची भरपाई मिळवणे, इराणी तेल आणि गॅसवरील निर्बंध मागे घेणे या मागण्या लावून धरणार आहे.
यापैकी एकही मागणी अमेरिका मान्य करणार नाही. सध्या अमेरिकन सैन्य अमेरिका ते युरोपियन सैनिकी तळ आणि तिथून इस्रायल, अरब देशांमधील तळांवर अवजड सैनिकी मालवाहू विमानांमधून अव्याहतपणे वाहतूक करत आहेत. इस्रायल आणि आखातात अमेरिकेने आजपर्यंत ५०,००० सैनिक आणले आहेत आणि ही संख्या काही लाखांपर्यंत पोचणार आहे.
युद्धबंदी १४ दिवसांची असली तरी येणाऱ्या काही दिवसांतच अमेरिका यातून बाहेर पडेल आणि इस्रायली दबावामुळे इसफहान आघाडी उघडेल अशी शक्यता आहे. चर्चेच्या फेऱ्या सुरू असताना यापूर्वी दोनदा अमेरिकेने इराणवर मध्येच हल्ले केल्याचे अनुभव इराण विसरलेला नाही त्यामुळे इराणी सैन्य अमेरिकन जमिनी कारवाईची मोठ्या प्रमाणात तयारी करत आहे.
जर इसफहान आघाडी उघडली तर....?
येणारे काही दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. ट्रम्पने आपल्या भयंकर अहंकाराच्या आहारी जाऊन इसफहान आघाडी उघडल्यास आणि इसफहान मधून समृद्ध युरेनियम ताब्यात घेतल्याशिवाय थांबायला नकार दिल्यास एप्रिल मे आणि जून याकाळात अमेरिकन सैन्य इराणच्या मध्यावर उतरलेलं असेल. तेव्हा इराणी वाळवंटात, डोंगरात तापमान ४२ ते ५२ डिग्री सेल्सिअस असेल. अवजड युद्ध साहित्य घेतलेले अमेरिकन मरीन्स आणि आर्मर्ड डिव्हिजन मधील सैनिक यात शब्दशः भाजून निघतील, वरून इराणी मिसाईल आणि ड्रोन्सचा पाऊस पडेल. जमिनीवर जिहादी बासीज मिलिशियाचे सैनिक, गावोगाव असलेले हत्यारबंद इराणी नागरिक, कुदस फोर्सेसचे अख्ख्या शिया क्रेसेंट भागात तावून सुलाखून निघालेले कमांडो, आयआरजीसीची साबेरीन स्पेशल फोर्सेस युनिट्स, बासीज मिलिशिया मधून तयार केलेले फतेहीन कमांडोज, पारंपरिक इराणी सैन्य आर्तेशच्या पॅराट्रूपर्स युनिट्सची ६५ व्या नोहेद ब्रिगेडचे कमांडोज आणि सुमारे ८ लाख विविध युनिट्सचे सैनिक यांच्याशी अमेरिकन सैन्याची हातघाईची लढाई असेल.
यात अमेरिकन एअर सुपेरिओरिटी राहिली एक बाजूला, प्रत्यक्ष जमिनीवर स्थानिक उष्ण, बिकट वाळवंटी डोंगराळ भागात जन्मलेले आणि वाढलेल्या इराणी सैनिकांशी दोन हात करताना आणि अन्न पाण्याची सप्लाय लाईन नको तितकी ताणलेली असताना बाहेरून येऊन लढणं हे स्वतःहून स्वतःचा बळी देण्यापेक्षा काही कमी नाही.
आणि हे सगळं कशासाठी? तर इराणी समृद्ध युरेनियम ताब्यात घेण्यासाठी! हेच समृद्ध युरेनियम इराण इराण द्यायला तयार आहे आणि वाटाघाटी यशस्वी झाल्या आहेत असं चर्चेत मध्यस्थ असलेल्या ओमानने २७ फेब्रुवारीला घोषित केलं होतं आणि तरीही २८ फेब्रुवारीच्या सकाळी इस्रायलने एकतर्फी हल्ला केला!
अमेरिकन पायदळ उतरण्याचे अन्य परिणाम...
अमेरिकेने "इसफहान आघाडी" उघडल्यास आम्ही बहरीन आणि अरब अमिरातीच्या किनाऱ्यावर आमचं सैन्य उतरवू अशी इराणने खुली धमकी दिली आहे. यामुळे आकाराने आणि लोकसंख्येने अत्यंत लहान असलेल्या या दोन अरब देशांची टोकाची वाताहत होईल. तेल आणि गॅस उत्पादन इन्फ्रास्ट्रक्चर इराणी पायदळाच्या लढाईत ६० वर्षं मागे जाईल. खुद्द अमेरिकन सैन्य अधिकारी, डिफेन्स पत्रकार आणि विश्लेषक म्हणतात त्याप्रमाणे इराणमध्ये पायदळ तैनात करून प्रभावी कारवाई करायची झाल्यास कमीत कमी २ लाख सैनिक लागतील, त्या प्रमाणात लॉजिस्टिक्स साठी लागणारी विमाने आणि जहाजे. याकामी अरब देशातील एकही अमेरिकन तळ सध्या सुस्थितीत नाही कारण त्याची इराणने नासाडी केली आहे.
या सगळ्याच्या विचार करता ही युद्धबंदी कायमची युद्धबंदी ठरो, जेणेकरून जागतिक तेल आणि गॅस पुरवठ्याचा वाजलेला बोजवारा आणि त्यामुळे येऊ घातलेलं जागतिक आर्थिक संकट वेगाने पूर्वपदावर येईल!
--- विनय जोशी