अमेरिकेच्या इशाऱ्यास डावलून चीनचे अध्यक्ष 'पनामा' भेटीवर
         Date: 25-Nov-2018

अमेरिकेच्या इशाऱ्यास डावलून चीनचे अध्यक्ष 'पनामा' भेटीवर.

लॅटिन अमेरिकेत चीनच्या वाढत्या अंमलाबद्दल यूएस सरकारकडून वारंवार टीका होत असताना आणि यूएस सरकारकडून इशारा मिळत असताना देखील चीनचे अध्यक्ष शी जीनपिंग यांनी त्यांच्या पहिल्यावहिल्या 'पनामा' भेटीचा अभूतपूर्व निर्णय घेतलेला आहे. 

पुढील महिन्याच्या दोन आणि तीन तारखेला शी पनामा येथे पनामाचे अध्यक्ष युआन कार्लोस व्हरेला यांची भेट घेतील. दोन देशांतर्गत व्यापार, तंत्रज्ञान आणि बांधकाम क्षेत्रातील अनेक करार संमत करण्यासाठी हा दौरा असल्याचे बोलले जात आहे.

 

या महिन्याच्या शेवटाला जीनपिंग आणि ट्रम्प यांची भेट होईल. नोव्हेंबर ३० - डिसेंबर १ रोजी ब्युनोस आयरिस येथे होणाऱ्या जी-२० इकॉनॉमिक समिटमध्ये जगातील दोन महासत्तांच्या अध्यक्षांची भेट होईल. चीन आणि अमेरिकेमध्ये चालू असलेले ट्रेड वॉर संपविण्याच्या दृष्टीने काही मार्ग आहेत का हाच या दोघांच्या चर्चेचा मुख्य विषय असेल.

शुक्रवारी, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे उपमुख्यमंत्री कीं गॅंग यांनी सांगितले की शी जीनपिंग यांच्या या दौऱ्यामुळे चीन आणि पनामा यांच्यातील संबंधांना बळकटी मिळणार आहे. या दोन देशांमध्ये मागील काही महिन्यांच्या काळात बऱ्याच सकारात्मक राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत. अर्थातच त्यामुळे स्थानिक नेत्यांच्या पोटदुखीला कारण मिळाले आहे हे वेगळे.

२०१७ मध्ये पनामा देशाने यूएस आघाडीमधील एक असलेल्या तैवान शी अधिकृतपणे आपले करार संपुष्टात आणून चीनबरोबर अनौपचारिक संधान बांधले आणि पाठोपाठ 'डॉमिनीकन रिपब्लिक' आणि 'एल साल्वाडोर' या देशांनीही त्याचीच पुनरावृत्ती केली. या घटना यूएस सरकारला इतक्या खटकल्या की सप्टेंबर २०१८ मध्ये त्यांनी या तिन्ही देशांमधील आपल्या राजदूतांना माघारी बोलाविले.

पनामाने अधिकृतपणे आपले राजकीय संबंध युएसशी तोडून चीनशी जोडल्यानंतर आणि पनामा कालव्याच्या भवितव्याबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केल्यानंतर प्रथमच शी जीनपिंग हे चीनकडून एखाद्या मोठ्या सरकारी अधिकाऱ्याच्या हुद्य्याने पनामा'स भेट देणार आहेत. पश्चिम गोलार्धातील देशांमध्ये आपले महत्त्व कायम ठेवण्यासाठी पनामा कालवा कायमच युएससाठी महत्त्वाचा मानला गेला आहे.

जुलै महिन्यात चीन आणि पनामाच्या अधिकाऱ्यांनी मुक्त व्यापारी धोरणावर बोलणी सुरु केली. भौगोलिक दृष्ट्या महत्त्वाच्या देशांना एकत्रित रित्या एक केंद्र बनवून संपूर्ण लॅटिन अमेरिकेमध्ये चीनची उत्पादने पोहोचविणे हा या चर्चेमागील उद्देश होता. आणि ही बोलणी सुरु झाल्यापासूनच युएसकडून पनामा शहरावरील दडपणाचे प्रमाण वाढले होते.

यूएस सेक्रेटरी ऑफ स्टेट माईक पॉम्पीओ यांनी त्यांच्या मागील महिन्यातील पनामा भेटीमध्ये व्हरेला यांना चीनशी संबंध न ठेवण्याबद्दल व त्यांच्याशी व्यापार न करण्याबद्दल इशारा दिला होता. चीनमधील मोठमोठाले उद्योग हे चीन सरकारच्या अधिपत्याखाली असून आपल्या पैशाच्या जोरावर गरीब देशांना चिरडून टाकण्याचेच त्यांचे धोरण असल्याची टीका पॉम्पीओ यांनी केली होती.

जीनपिंग यांच्या 'बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह' या महत्वाकांक्षी अश्या जागतिक पातळीवरील बांधकाम प्रकल्पामुळे पश्चिमी देशांमध्ये कायमच चिंतेचे वातावरण राहिले आहे. चीन सर्वप्रथम गरीब देशांना विविध प्रकल्पासाठी अर्थसहाय्य पुरवितो, तदनंतर तो देश कर्जाच्या सापळ्यात अडकला की त्याचा फायदा उचलून त्यांच्या भूमीवर आपला लष्करी तळ उभारण्याचेच धोरण या प्रकल्पाडून चीन राबवित असल्याचे आरोप सध्या होतच आहेत.

पानामामध्ये देखील सध्या विविध बांधकाम प्रकल्पांवर ज्यामध्ये बंदरांचा देखील समावेश होतो, अनेक चिनी कंपन्यांचाच अंमल आहे.

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk)

Source: The Washington Times.

Xi plans 'unprecedented visit' to Panama despite warnings from U.S.