केरळ- ख्रिस्ती महिला धर्मोपदेशिकांचे आगार ...आणि चर्चमधील महिलांची अवहेलना...
         Date: 25-Nov-2018

केरळ- ख्रिस्ती महिला धर्मोपदेशिकांचे आगार ...आणि चर्चमधील महिलांची अवहेलना...

डॉ. आर्या जोशी

(ICRR Media Monitoring Desk)

सुमारे अर्ध शतकापूर्वी फादर सीरिक पूथेनपूरकल यांच्या हाती केरळातील ,कोट्टायम जिल्ह्यातील एतूमनूर येथील बिशपच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्रातील विशेषाधिकार होते. त्या दरम्यान म्हणजे १९६० ते १९७० च्या दशकात केरळातील गरीब कुटुंबातील सुमारे ८०० मुली जर्मनीला पाठविल्या गेल्या. या संदर्भात या फादरवर आरोपही ठेवण्यात आला. या मुलींच्या कुटुंबीयांना सांगितले होते की त्यांना रुग्णसेविका किंवा शिक्षिका म्हणून प्रशिक्षण देण्यासाठी जर्मनीला पाठविण्यात येत आहे. परंतु जर्मनीत मात्र त्यांना हलक्या प्रतीची कामे स्थानिक पातळीवर करावे लागली.


 

या सर्वाचे संयोजन करणा-या चर्चच्या स्थानिक समितीला मात्र कालांतराने १९६० मध्ये स्त्रियांना धर्मोपदेशिका बनण्यासाठी कार्य करीत असलेल्या केंद्राना न्याय देणे कठीण जाऊ लागले. स्थानिक पातळीवरही अनेक मुली ख्रिस्ती धर्माला वाहून घेण्याची शपथ घेण्यास उत्सुक होत्या आणि त्यात केरलातून आलेल्या मुलींची भर पडलेली होती. केरळातील अनेक केथॉलिक कुटुंबे आपल्या मुलांना येशूच्या सेवेत रुजू करण्यास कमालीची उत्सुक होतीच. या संधीचा गैरवापर करीत फादर सीरिक पूथेनपूरकल याने या मुलींना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाईलअसे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीना सांगून या मुलींना जर्मनीला पाठविले. १९६० च्या मध्यात अशा प्रकारे मुलींचे जर्मनीला जाणे याचा उच्चांक गाठला गेला होता. केरळातील समन्वय केंद्राला प्रतिवर्षी पुष्कळ कामासाठी मुलींची गरज असल्याची मागणी नोंदविली जात होतीच आणि केरळात अशा सेवाभावीवृत्तीच्या मुलींची कमतरता नव्हतीच!

पण जर्मनीत पोहोचल्यावर या मुलीना लक्षात आले की त्यांनी इथे असे कोणतेही प्रशिक्षण दिले जाणार नसून भेदभावाची वागणूकच मिळते आहे. तसेच समन्वय करणा-या केंद्राला या मुलींच्या कामासाठी आधीच पैसेही मिळालेले आहेत. पण हे पैसे मुलींच्या पालकांना मिळण्याऐवजी धर्मोपदेशकांचे खिसेच भरले जात होते आणि आपली मुलगी विकली गेली आहे याची या कुटुंबाना पुसटशी कल्पनाही नव्हती!

अशा केंद्रातून कामगार म्हणून मुलींना राबवून घेतले जात आहे अशी बातमी प्रथम एका परदेशी वृत्तपत्राने प्रकाशित केली आणि त्या बातमीने भारतातही गोंधळ माजला. केरळातील सिरो-मलबार चर्च आणि जर्मनीतील केथॉलिक चर्च यांचे बिशप या प्रकरणात गुंतले असल्याचे यातून निष्पन्न झाले.

भारतातील आणि जगभरातील विविध वृत्तपत्रात या मुलींच्याविषयी माहिती छापून आली पण त्यांना शोधून, मायदेशात सुरक्षित आणण्याचे प्रयत्न मात्र झाले नाहीत !! ही घटना लोक विसरत असतानाच ; परंतु १९८३ मध्ये फादर सीरिक पूथेनपूरकल याने हा आपला जुनाच उद्योग पुन्हा केला आणि यावेळी त्याने मुलींना इटलीला पाठविले.

इटलीतून सुटका-

मर्सी आणि जेससी यांनी लेखिकेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की या दोघी आपल्या स्थानिक नातेवाईकांच्या मदतीने इटलीतील अशा समन्वय केंद्रातून पळून आल्या. त्यांना वास्तविक सांगितले गेले होते की त्यांना रुग्णसेविका होण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल पण प्रत्यक्षात रोममध्ये पोहोचल्यावर होतकरू आणि शिकाऊ धर्मोपदेशिका म्हणून त्यांना पोशाख देण्यात आले.

या मुली कोट्टायम जिल्ह्यातील गरीब कुटुंबातील होत्या आणि त्यांची कुटुंबे अशिक्षित होती. यापूर्वी या मुली आपल्या जिल्ह्यातूनही कधी बाहेर पडलेल्या नव्हत्या. त्यांनी फादरवर विश्वास ठेवला कारण त्यांना चांगले व्यावसायिक प्रशिक्षण आणि त्यानंतर नोकरी मिळण्याची अपेक्षा वाटत होती. पण त्याऐवजी समन्वय केंद्राच्या मोठ्या खिडक्या, भलीमोठी तावदाने, प्रशस्त मोकळ्या जागा, स्वच्छता गृहे यांचीच स्वच्छता करावी लागत होती. पण अन्य मुलींप्रमाणेच त्यांचेही पारपत्र जप्त करून घेण्यात आले होते. त्यांना चर्चने १५,००० रुपये कामाचा मोबदला म्हणून देऊ केले होते. तरीही स्थानिक नातेवाईकांच्या मदतीने त्यांनी आपली सुटका करून घेतली.

नुकत्याच एका वार्ताहराने अशा मुलींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याला फार थोड्या जणी सापडल्या की ज्या पूर्वी अशा मार्गाने जर्मनीत गेल्या आहेत. त्यांच्यापैकी काही आज जर्मनीत चर्चच्या समन्वय केंद्रात चांगल्या पद्धतीने राहत आहेत, काहींचे निधन झाले आहे तर काही भारतात परत आल्या आहेत.

परंतु हा सर्व इतिहास आहे...

आज केरळात धर्मोपदेशिका होऊन सेवा करण्याची इच्छा असलेल्या मुलींचा तुटवडा जाणवतो आहे. कुटुंबाचा लहान आकार. मुलीना मिळत असलेले शिक्षण आणि त्यातूनही त्यांना भारतातच व्यावसायिक शिक्षणाच्या मिळत असलेल्या संधी याचा हा परिणाम आहे. भारतातील केरळ राज्यातून सर्वाधिक प्रमाणात महिला धर्मोपदेशिका ख्रिस्ती धर्माला मिळालेल्या आहेत. आज मात्र ही संख्या तुलनेने अत्यल्प आहे. त्या तुलनेत झारखंड, छत्तीसगढ आणि ईशान्य भारतातील तरुण मुली धर्माचे कार्य सेवा म्हणून करण्याची शपथ घेताना दिसत आहेत.

धर्मोपदेशिका म्हणून ख्रिस्ताशी विवाहबद्ध होताना आया मुलींना चर्चला मोठ्या रकमेचा हुंडा द्यावा लागतो! त्यामुळेच सधन कुटुंबातील मुली या सेवेत येतील असा धूर्त हेतू येथील धर्माचे उपदेशक साध्य होईल असे पाहत असतात जेणेकरून या मुलींच्या कुटुंबाची पैतृक संपत्तीही चर्चला मिळेल!! यातील अनेक जणी शिक्षिका किंवा रुग्णसेविका म्हणून चर्चच्या विविध उपक्रमात काम करतात. मात्र त्यांना मिळणारा पगार त्यांची मातृसंस्था जप्त करते. त्यांच्या दैनंदिन गरजांची काळजी चर्च घेत असले तरी स्वतःच्या खर्चासाठी मात्र त्यांच्याजवळ पैसे नसतात. त्यांना भेटायला येणा-या नातेवाईकांनी दिलेल्या थोड्याशा रकमेवर त्या अवलंबून असतात. जर त्यांना या केंद्रातून आणि सेवेतून बाहेर पडायचे असेल तर चर्चला आधी दिलेली रक्कम काही अंशी त्यांना परत मिळण्याची व्यवस्था असते, पण पुष्कळदा ते सहज शक्य होत नाही, त्यांना त्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो.

या परिस्थितीत चर्चचे असलेले नियंत्रण आणि तेथील नियमांचे पालन यामुळे या धर्मोपदेशिका बाहेरच्या जगाशी सामना करू शकत नाहीत. धर्माच्या नियमांचे पालन, कठोर आचरण यामुळे उपदेशक, फादर यांच्या तावडीतून या स्त्रियांची सुटका होणे कठीण असते. त्यांच्यावर लक्ष ठेवणारी ज्येष्ठ उपदेशिका आणि अन्य पुरुष उपदेशक यांच्याविरुद्ध वागल्यास ते या नव्या तरुण उपदेशिकांना प्रसंगी प्राणघातकही ठरू शकते.

जर एखाद्या अशा तरुण उपदेशिकेचा मृत्यू चर्चच्या अंतर्गत झाल्यास खुन्याचे नावही जगासमोर न येण्याची काळजी घेतली जाते. आभाया नावाच्या १९ वर्षाच्या उपदेशिकेचे प्रेत तिच्या कॉन्व्हेंटच्या परिसरात एका विहिरीत तरंगताना आढळले. ही घटना १९९३ सालातील आहे. आजही २५ वर्षानंतरही तिच्या खुन्याचा शोध आणि न्यायालयात सुनावणी सुरूच आहे... प्रथम तिने आत्महत्या केला असावी असे मानले गेले. त्यानंतर मात्र तीन पुरुष उपदेशक आणि एक महिला उपदेशक यांना आभाया जाच वाटत असल्याने त्यांनी तिला मारले असावे असा कयास वर्तविण्यात आला आणि त्या तिघांना अटक करण्यात आली. परंतु या सगळ्यात तिच्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही.

कॉन्व्हेंटच्या आत...

उपदेशिकांसाठी कॉन्व्हेंट ही जागा म्हणजे काही स्वर्ग अजिबात नाही... एका शाळेचे प्रमुखपद सांभाळल्यानंतर ३० वर्षांनी एका धर्मोपदेशिकेने स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर तिने आमेननावाच्या पुस्तकात कठोरपणे अंतरंगात असलेल्या व्यवस्थेवर टीका केली आहे. तिचे स्वतःचे स्वानुभव, लिंगभेद आणि स्त्रियांना मिळणारी वागणूक अशा विविध गोष्टी तिने नोंदविल्या आहेत. तिच्या वरिष्ठ महिला धर्मोपदेशक महिलेनेच तिच्याशी लैंगिक संबंध ठेवून तिच्यावर जबरदस्ती केली आणि या नात्यात गरोदरपणाचा धोका नसल्याने हे सोयीचे आहे असेही तिला सांगितले होते ! वरिष्ठ पुरुष उपदेशक कशाप्रकारे महिलांना लैंगिक कृत्यांसाठी उद्युक्त करीत असत हेही तिने नोंदविले आहे. या पुस्तकाने समाजात आणि जगभरातील चर्च जगतात खळबळ माजवली आणि हे पुस्तक तुच्छ असल्याचीही टिपण्णी केली. या परिस्थितीत तिच्या कुटुंबाला समाजातून मिळालेली वागणूक पाहून कुटुंबानेही तिला नाकारले. तीस वर्षे सेवाभावाने काम करूनही कॉन्व्हेंटनेही तिला एक पैसाही मोबदला म्हणून दिला नाही. पण या सगळ्यातून दहा वर्षांनंतर आता ही महिला अधिक आनंदी आहे.

ज्या बातमीच्या आठवणी अजून ताज्या आहेत त्या केरळातील उपदेशिकेवर झालेले सातत्याने बलात्कार तिने का सहन केले? तर त्यावर उत्तर असे आहे की बिशपचे असलेले वर्चस्व आणि त्याची तिला असलेली दहशत! या सगळ्यातून तिने आपल्या वरिष्ठ महिलेला काही सांगितले असते किंवा तिने चर्च सोडले असते तरीही तिला समाजात मानाने जगता आलेच नसतेमात्र तिच्या सहकारी महिलांनी तिला दिलेली साथ ही नोंद घेण्याजोगी आणि धाडसाची आहे. असा आशावाद बाळगायला हरकत नाही की समाज आणि न्यायव्यवस्था भविष्यकाळात अशा ख्रिस्ती महिला धर्मपदेशिका महिलांना आधार आणि न्याय देतील....