पाकिस्तान यापुढे आपल्या भूमीवर कोणाच्याही सांगण्यावरून कोणतेही युद्ध लढणार नसल्याचे इम्रान खान यांचे वक्तव्य.
         Date: 27-Nov-2018

पाकिस्तान यापुढे आपल्या भूमीवर कोणाच्याही सांगण्यावरून कोणतेही युद्ध लढणार नसल्याचे इम्रान खान यांचे वक्तव्य.

 

गेली कित्येक वर्षे पाकिस्तान लढत असलेले 'देशांतर्गत दहशतवाद विरोधातील युद्ध' म्हणजे खरेतर पाकिस्तानवर जबरदस्तीने लादण्यात आलेले युद्ध असून यापुढे पाकिस्तान असे कोणतेही 'लादलेले युद्ध' त्यांच्या भूमीवर लढणार नाही असा निर्धार पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी उत्तर वजिरीस्तान येथे बोलताना त्यांच्या भाषणात व्यक्त केला. गेले कित्येक आठवडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानवर करीत असलेल्या "पाकिस्तानने त्यांच्या देशातील दहशतवाद्यांविरोधात कोणतीही ठोस पाऊले न उचलता केवळ तसा देखावा निर्माण करून अमेरिकेची कायम फसवणूकच केली आहे' या आरोपाला प्रत्युत्तर देताना त्यांनी हे विधान केले.

 

"आम्ही गेले कित्येक वर्ष आमच्याच भूमीवर एक लादलेले युद्ध लढत होतो. ज्याची किंमत आम्ही प्रचंड कष्ट उपसून आणि रक्तपात करवून घेऊन तसेच आमच्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीस धक्का पोहोचवून चुकविलेली आहे. त्यामुळेच यापुढे आम्ही अशी चूक करणार नाही", इम्रान खान म्हणाले. एकेकाळी तालिबानी दहशतवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर वझिरीस्तानातील नव्याने समाविष्ट झालेल्या एका जिल्ह्याच्या भेटीवर गेलेले असताना तेथील वंशाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर बोलताना त्यांनी हे विधान केले.

 

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमार जावेद बावजा हेदेखील या दौऱ्यात खान यांच्या बरोबर होते. पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानचे लष्कर, इतर संरक्षण दले व गुप्तहेर संघटनेचे त्यांच्या दहशतवादाविरोधात यशस्वी कामगिरीविषयी प्रशंसा करून अभिनंदन केले.

 

ते म्हणाले,"जगातील इतर कुठल्याही देशाच्या लष्कराने व संरक्षण दलांनी केली नसेल अशी कामगिरी पाकिस्तानच्या लष्कराने देशांतर्गत दहशतवादाविरोधात लढताना करून दाखविली आहे." अर्थातच हे बोलताना त्यांचा रोख ट्रम्प यांच्याकडे होता ज्यांनी पाकिस्तानला कायमच याबाबतीत खोटारडा म्हणून निंदा केली आहे.

 

"जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांना त्यांच्या भूमीवर सुखाने नांदू देणे थांबवीत नाही व त्यांच्या विरोधात कठोर कृती करीत नाही तोपर्यंत युनाइटेड स्टेट्स कडून पाकिस्तानला दिली जाणारी १.३ बिलियन डॉलर्सची रक्कम थांबवून ठेवण्यात येईल" या आपल्या घोषणेचा ट्रम्प यांनी नुकताच पुनरुच्चार केला आहे. त्यानंतर काही दिवसातच इम्रान खान यांचे हे वक्तव्य आलेले आहे.

 

२००१ सालापासून युनाइटेड स्टेट्स अफगाणिस्तानात दहशतवाद्यांविरोधात लढत आहे आणि आता त्यांना हे युद्ध लवकरात लवकर संपवायची इच्छा आहे. गेली १७ वर्षे सुरु असलेले हे युद्ध संपविण्याकरिता त्यांनी तालिबानच्या प्रवक्त्यांबरोबर बोलणी देखील सुरु केली आहेत.

 

'इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स' या पाकिस्तान लष्कराच्या माहिती प्रसारण विभागाकडून प्रसारित करण्यात आलेल्या एका पत्रकात म्हटले आहे की या दौऱ्यावर पंतप्रधान इम्रान खान यांच्यासमोर 'आतापर्यंत पार पाडण्यात आलेल्या मोहिमा, सध्या चालू असलेल्या मोहिमा, विस्थापितांचे पुनर्वसन, सामाजिक-आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी हाती घेण्यात आलेले प्रकल्प आणि पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमारेषेवर कुंपणाची बांधणी' इत्यादी गोष्टींचा लेखाजोगा मांडण्यात आला.

 

अफगाणिस्तानात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या कामात योग्य भूमिका पार पाडण्याचे आश्वासन इमरान खान यांनी यावेळी दिले.

 

"आम्हाला देखील सीमेपलीकडे आणि विशेष करून अफगाणिस्तानात शांतता हवी आहे. त्यामुळे अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित होण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते सर्व आम्ही करू. कारण अफगाणिस्तानात अस्थैर्य पसरले तर त्याचा परिणाम पाकिस्तानातील शांतता भंग होण्यातही होतो. त्यामुळे पाकिस्तानात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अफगाणिस्तानात शांतता निर्माण होणे गरजेचे आहेच", खान म्हणाले.

 

या नव्याने स्थापन करण्यात येणाऱ्या जिल्ह्याच्या विकासासाठी आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि प्रशासकीय कारभार या क्षेत्रातील अनेक योजनांची घोषणा देखील खान यांनी यावेळी केली.

 

केंद्र सरकारकडून शासकीय कारभार पाहिला जात असलेले एकूण ७ वांशिक प्रदेश या वर्षाच्या सुरुवातील खैबर पख्तुन्वा राज्यात समाविष्ट करून घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे सुमारे शतकभरापासून या प्रदेशात असलेले वसाहतवादाचे वारसाचक्र थांबले आहे. परंतु हे प्रदेश अजूनही निराश्रीतच आहेत.

 

या प्रदेशात वर्षानुवर्षांपासून चालत असलेली वांशिक पद्धतीची न्यायनिवाडा पद्धत बदलून स्वच्छ व प्रगत न्यायव्यवस्थेसाठी खान यांनी या प्रदेशात नव्या पोलीस दलाच्या निर्मितीची घोषणा केली.

 

उत्तर आणि दक्षिण वझिरीस्तानातील जिल्ह्यांकरिता इस्पितळासह वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती, उत्तर वझिरीस्तानासाठी स्वतंत्र विद्यापीठाची निर्मिती, उत्तर वझिरीस्तानात लष्करी प्रशिक्षणासाठी महाविद्यालय, नव्याने समाविष्ट झालेल्या जिल्ह्यातील लोकांसाठी आरोग्य विमा कार्ड आणि विशेष तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी फोनवरून तपासणी करण्याची सुविधा, व्याजरहित कर्जपुरवठा (?), खेळाच्या मैदानाचा विकास, अतिरिक्त संगणकांचा पुरवठा  इत्यादी आश्वासनांचा वर्षाव खान यांनी या प्रसंगी केला. या प्रदेशास देशातील इतर प्रदेशांच्या पातळीवर घेऊन येण्याच्या उद्देशानेच हा विकासाचा आराखडा आखण्यात आला असल्याचे खान यांनी स्पष्ट केले.

 

पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवरील 'गुलाम खान क्रॉसिंग टर्मिनल' येथे खान यांनी भेट दिली तसेच पाकिस्तान अफगाणिस्तान यांच्या मधील कुंपणाचीही पाहणी त्यांनी केली. गेली अनेक वर्षे अत्यंत प्रतिकूल आणि खडतर परिस्थितीत दहशतवादाचा सामना केल्याबद्दल त्यांनी स्थानिक वंशाच्या वरिष्ठांचे कौतुकही केले.

 

-प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk)

 

Source: NDTV

 

Pak Will Never Again Fight "Imposed Wars" On Its Territory.