अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेण्याचा अमेरिकेचा निर्णय अफगाणिस्तानबरोबर भारतासाठीदेखील चिंतेचे कारण?
         Date: 23-Dec-2018

अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेण्याचा अमेरिकेचा निर्णय अफगाणिस्तानबरोबर भारतासाठीदेखील चिंतेचे कारण?

 

आजच्या घडीला अफगाणिस्तानात सुमारे १५,००० यूएस सैनिक तैनात आहेत. त्यापैकी जवळपास निम्मे सैनिक मायदेशी बोलाविण्याचा निर्णय यूएस अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलाय. तश्या प्रकारचा अध्यक्षीय आदेश पेंटागॉनला पाठविण्यातही आला आहे. या निर्णयामुळे तालिबान तसेच पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना परतून येण्यासाठी मुक्तद्वार मिळणार असल्यामुळे अफगाणिस्तान तर चिंतेत पडलेच आहे पण त्याचबरोबर त्या देशामधील आपली गुंतवणूक, विविध क्षेत्रात असलेला आपला संचार इत्यादी गोष्टींचा विचार करता त्याचे सावट आपल्यावरही नक्कीच पडणार आहे.

 

 
 

अफगाणिस्तानातून सैन्य माघारी बोलावून घेण्याच्या ट्रम्प यांच्या या निर्णयास काही अमेरिकन तज्ज्ञांकडून 'युद्धातील पराभव' अशी संज्ञा दिली गेली आहे. मागील मंगळवारी त्यांनी ट्विट करून अश्याच प्रकारे सीरियामधून अमेरिकन सैनिक माघारी बोलावीत असल्याची घोषणा केली होती. आपल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकांच्या कालावधीत ट्रम्प यांनी अमेरिकेचा 'परदेशी प्रकरणांतील ढवळाढवळ कमी' करण्याच्या धोरणाचा वारंवार उल्लेख केला होता. आताचे हे दोन जुळे निर्णय हा त्या आश्वासनपूर्तीचाच भाग असल्यासारखे वाटत आहे. परंतु ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर गुरुवारी युनाइटेड स्टेट्सचे डिफेन्स सेक्रेटरी जिम मॅटीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

 

या दोन्ही निर्णयांच्या घोषणांनंतर अमेरिकेचे परराष्ट्र धोरण आणि राजकीय डावपेचात्मक पातळीवरील घटकांकडून थोडा नरमाईचा सूर लावण्यात आलेला असला तरीही स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील कोणत्याही खळबळीबद्दल कोणतीही चिंता ट्रम्प यांनी दर्शविलेली नाहीये.

 

आपल्या घोषणेचे ट्विट केल्यानंतर ट्रम्प यांच्यावर काही मोजकेच सदस्य सोडता अनेक रिपब्लिकन लॉमेकर्स व पुराणमतावाद्यांकडून टीकेचा वर्षाव करण्यात आला. त्या सगळ्यांना उत्तर देताना ट्रम्प यांनी सांगितले,"सीरियामधून बाहेर पडणे यात आश्चर्यचकित होण्यासारखे काही नाहीये. मी या निर्णयाबद्दल गेली कित्येक वर्षे बोलत आहे. सहा महिन्यांपूर्वीच मी या निर्णयाची जाहीर घोषणा करण्याचे ठरविले होते परंतु थोडे दिवस वाट पाहण्याचेही ठरविले. रशिया, सीरिया, इराण आणि इतर हेच इसिस चे स्थानिक पातळीवरील शत्रू आहेत. मात्र इतकी वर्षे आम्ही त्यांचे काम करीत होतो. आता घरी परतण्याची वेळ झाली आहे."

 

आपल्या ट्विट्सच्या शृखंलेत सुरुवातीला ट्रम्प यांनी अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्याचा आपला निर्णय जाहीर केला नव्हता परंतु त्यांनी विचारले होते,"युएसएला मध्य पूर्व देशांच्या पोलिसांची भूमिका बजावयाची आहे काय? ज्यामध्ये आपणास मिळत काहीच नसून उलट आपण अनेक मोलाचे जीव गमावत असून करोडो डॉलर्सही संपवीत आहोत. तेही अश्या लोकांच्या संरक्षणासाठी जे आपण करीत असलेल्या कार्याची अजिबात प्रशंसा करीत नाहीत. तरीही आपण तिथेच राहायचे का?"

 

गेली १७ वर्षे यूएस अफगाणिस्तानात हस्तक्षेप करीत आहे आणि यूएस सैनिकांचा अफगाणिस्तानात वापर करून घेण्याबद्दल ट्रम्प यांनी कायमच शंका व्यक्त केली आहे. तर जिम मॅटीस आणि इतर वरिष्ठ यूएस जनरल्स तसेच काही आघाडीचे यूएस सिनेटर्स ज्यांमध्ये रिपब्लिकन्सचा देखील समावेश होतो अश्या सर्वांनी यूएस सैनिकांच्या अफगाणिस्तानमधील उपस्थितीस पाठिंबा दर्शविला असून त्यांच्या मते १९९० च्या उत्तरार्धात अफगाणिस्तानातील पोकळीचे रूपांतर अल कायदाच्या तेथील विस्तारात तसेच ९/११ च्या प्रलयंकारी हल्ल्यात झाल्याची कोणतीही कल्पना डोनाल्ड ट्रम्प यांना नसल्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.

 

"अफगाणिस्तानातील सध्याची परिस्थिती पाहता अमेरिकन सैनिकांना तेथून हटविण्याचा निर्णय हा अत्यंत धोकादायक ठरू शकतो. जर आपण या निर्णयावर कायम राहिलो तर आपण आतापर्यंत जे काही कमावले आहे ते सर्व हरविण्याच्या तसेच आणखी एका ९/११ हल्ल्याच्या प्रक्रियेस जन्म देऊ", असे मत साऊथ कॅरोलिनातील रिपब्लिकन सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी व्यक्त केले.

 

तर इतरांनी या घोषणेची,"धरसोड प्रवृत्ती आणि अविश्वासार्ह्यता दर्शविणारा अमेरिकेचा आणखी एक निर्णय' या शब्दात टीका केली आहे. पाकिस्तानचे अमेरिकेसाठीचे माजी राजदूत हुसेन हक्कानी म्हणतात,"अफगाणिस्तानातून माघार घेण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाची बातमी खरी असेल तर मी म्हणेन ट्रम्प यांनी तेच केले आहे जे ओबामा यांनी अध्यक्ष असताना केले. अफगाणिस्तानात सैन्य पाठवायचे आणि वेळेआधीच ते काढून घ्यायचे. यामुळे तालिबानच्या नेत्यांचे म्हणणेच ते खरे करीत आहेत. 'अमेरिकेकडे घड्याळ असले तर आमच्याकडे वेळ आहे'.

 

पाकिस्तानकडून नाडल्या गेलेल्या अफगाणिस्तानमध्ये बांधकाम क्षेत्र तसेच इतर सुविधात्मक क्षेत्रांमध्ये भारताने मदत म्हणून अनेक बिलियन डॉलर्सची गुंतवणूक केलेली आहे ते देखील तेथे प्रत्यक्ष पाऊल न ठेवता. भारताची गुंतवणूक असलेल्या बऱ्याचश्या प्रकल्पांना अमेरिकन सैनिकांचे संरक्षण लाभले आहे. हे संरक्षण नाहीसे झाल्यास पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना तेथे लुटालूट करण्यास मोकळे आंदण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

सीरियामधून अमेरिकन सैनिकांना माघारी बोलाविण्याच्या ट्रम्प यांच्या घोषणेनंतर ते अफगाणिस्तान बद्दलही असाच निर्णय घेतील असा अंदाज अनेक विश्लेषकांकडून वर्तविला जात होताच.

 

तालिबानने काबुल वर हक्क प्रस्थापित करू नये म्हणून नुकतेच अमेरिकेकडून त्यांच्याबरोबर वाटाघाटी करण्याचा प्रयत्न झाला होता (यांमध्ये भारताला फारसा वाव नव्हता). यावर प्रतिक्रिया देताना 'लॉन्ग वॉर जर्नल' चे बिल रोगिओ म्हणतात,"काय वाटते तुम्हाला? सीरियामधून सैन्य मागे घेण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाकडे तालिबान नक्की कोणत्या दृष्टिकोनातून पाहील? ते नक्कीच याकडे एक सुसंधी म्हणून पाहतील. अमेरिका माघार घेण्यासाठी आतुर झालेली दिसत असताना ते कोणतीही तडजोड का म्हणून स्वीकारतील? वाटाघाटींच्या राजकारणात दुबळ्या पक्षाने (या प्रसंगी यूएस) अटी घालण्याचा प्रघात कधीपासून सुरु झाला?"

 

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk)

Source: TOI

Blow to India as US to recall 50% troops in Afghanistan.