पाकिस्तान परत १९७१ च्या दिशेने- पश्तुन पाकिस्तानपासुन तुटण्याच्या मार्गावर?
         Date: 04-Dec-2018
पाकिस्तान परत १९७१ च्या दिशेने- पश्तुन पाकिस्तानपासुन तुटण्याच्या मार्गावर?
(ICRR AfPak Desk) 

 
नकीबुल्लाह मेहसूद ची हत्या ते पश्तुन खासदार अली वझीर आणि मोहसीन दावड यांची नाट्यमय अटक हे सर्व घटनाक्रम पाकिस्तानच्या नव्या फाळणीचे संकेत देत आहेत. या सर्व घटनाक्रमांचा धावता आढावा.
१९७० ला बंगाली पूर्व पाकिस्तान मधुन पाकिस्तानी संसदेत जास्त जागा जिंकलेल्या पक्षाला पश्चिम पाकिस्तानी पंजाबी लोकांनी सत्तेत येऊ नं दिल्याने बंगाली भावनिकदृष्टया वेगळे व्हायची प्रक्रिया सुरु झाली. त्याचा परिणाम म्हणुन बंगला गृहयुद्ध सुरु झालं आणि पाकिस्तानी सेनेच्या अपरिमित अत्याचारांनी ट्रस्ट झालेल्या बंगाली लोकांनी भारताच्या मदतीने १९७१ च्या अखेरीस स्वतंत्र बांग्लादेश निर्माण केला. बंगला मुक्ति वाहिनी या स्वातंत्र्यवादी बंगाल्यांच्या असीम पराक्रमामुळे पाकिस्तानचे दोन तुकडे झाले.
या फाळणीची आणि त्यासोबत ९१००० पाकिस्तानी सैनिकांच्या शरणागतीची सल पाकिस्तानच्या मनात कायम राहिली. आणि त्यातुन पाकिस्तानने काश्मीर मध्ये रक्तपात सुरु केला. पण या फाळणीतुन पाकिस्तानची सेना आणि जनता फार काही शिकली असं दुर्दैवाने दिसत नाही. आणि सध्या पाकिस्तान अजून एका फाळणीच्या उंबरठयावर उभा असल्याचं चित्र दिसत आहे.
नकीबुल्ला मेहसूदची हत्या आणि पश्तुन तहफ्फुज मुंव्हमेंटचे वादळ
२०१८ च्या सुरुवातीला जानेवारी मध्ये कराची मधील उमदा, देखणा पश्तुन कलाकार नकीबुल्ला मेहसूद याला पोलीस अधीक्षक राव अन्वर याने आतंकवादी ठरवुन एका खोट्या चकमकीत ठार मारले. पाकिस्तानमध्ये बलुच आणि पश्तुन युवकांच्या अशा "सरकारी" हत्या अतिशय सामान्य बाब आहे. पण या हत्येने पश्तुन नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. युवा पश्तुन कार्यकर्ता मंजूर अहमद पश्तीन याने या हत्येचा सोशल मिडीयावरून विरोध करायची सुरुवात केली आणि त्यातून पश्तुन तहफ्फुज मुंव्हमेंट या लोकशाहीवादी पश्तुन संघटनेचा जन्म झाला. याच्या स्थापनेत मंजूर अहमद पश्तीनच्या साध्या, समर्पित, सामान्य माणसाचे प्रतिनिधित्व करणारा चेहरा आणि मोहसीन दावड, अली वझीर हे वझिरीस्तान या पश्तुन बहुल भागातील खासदार आणि अन्य पश्तुन नेत्यांची मोठी भुमिका होती.

आजपर्यंत पाकिस्तानच्या लोकसंख्येत १५% च्या आसपास असलेला पश्तुन समाज हा पाकिस्तानी सैन्य आणि पोलीस दलांचा अविभाज्य भाग, कट्टर सुन्नी मुसलमान म्हणून गणला जात होता. त्याशिवाय अफगाणिस्तानात पाकिस्तान समर्थित अतिरेकी संघटना तालिबान आणि हक्कानी नेटवर्क यांच्याशी पश्तुन समाज जोडून बघितला जात होता. सोव्हिएट युनियनच्या अफगाणिस्तान मोहिमेला अमेरिका आणि पाकिस्तानने याच पश्तुन लोकांच्या शौर्याच्या बळावर पराजित केलं होतं आणि पुढे तालिबान मधुन फुटून बाहेर आलेले तेहरीक ए तालिबान पाकिस्तान आणि जमात उल अहरार हेही बहुसंख्य पश्तुन गट पाकिस्तानात सक्रीय होते आणि आहेत.
साहजिकच ९/११ हल्ल्यानंतर अमेरिकन दबावात पाकिस्तानने आतंकवादाविरुद्ध लढाईच्या नावाने जी धूळफेक केली त्यात पाकिस्तानी पश्तुनांचा बळी गेला. हजारो निरपराध पश्तुन २००१ पासून आजपर्यंत मारले गेले आणि वझिरीस्तान, फाटा या पाशातून बहुल प्रदेशात पाकिस्तानी सैन्याच्या अंदाधुंद कारवाया ऑपरेशन "जरब ए अजब" आणि "रद्द उल फसाद" मध्ये अब्जावधी रुपयांची मालमत्ता बरबाद झाली, शेवटी तालिबान आणि हक्कानी एकदम सुरक्षितच राहिले.
या सगळ्या पार्श्वभूमीवर पश्तुन तहफ्फुज मुंव्हमेंटला सामान्य पश्तुन समाजाने मोठा पाठिंबा दिला. पण या आंदोलनाला उचित प्रतिसाद नं देता पाकिस्तानी सैन्य, सरकार आणि पंजाबी राज्यतंत्राने भारतीय एजंट आणि देशाचे शत्रु म्हणून हेटाळणी सुरु केली. पाकिस्तानी सैन्य आणि सरकार यात पंजाबी प्राबल्य प्रचंड आहे. त्यामुळे बलुच, सिंधी, पश्तुन समाज रागाने पाकिस्तानला पंजाबिस्तान म्हणुन हिणवत असतात. आणि पंजाबी प्राबल्य कोणीही नाकारू शकत नाही.
या पंजाबी उद्धटपणामुळे पश्तुन तहफ्फुज मुंव्हमेंटच्या (पीटीएम) लोकशाहीवादी आंदोलनाला दाबण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने वाटेल त्या मार्गांचा वापर सुरु केला. पश्तुन तहफ्फुज मुंव्हमेंटच्या लाहोर येथील मोची गेट आंदोलनाच्या आधी सैन्याने टँकरने गटारातील घाण आणून संपूर्ण मैदान भरून टाकलं. पीटीएम च्या प्रत्येक रॅली आणि कार्यक्रमाच्या आधी सैन्य रॉड ब्लॉकेड, इंटरनेट आणि मोबाईल सेवांवर बंदी आणि अनधिकृत धरपकड असे उपाय करत असते. पण अशा उपायांमुळे पीटीएम ला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतंच आहे.
ऑक्टोबरच्या शेवटी पश्तुन तहफ्फुज मुंव्हमेंटने बन्नु येथे एका लॉन्ग मार्चचे आयोजन केले होते. त्यातही हर तऱ्हेची विघ्ने आणण्याचे प्रयत्न करूनही हजारो पश्तुन्स उपस्थित राहिले आणि याविरोधात आयएसआय समर्थित खोट्या नाट्या प्रचाराने पश्तुन तहफ्फुज मुंव्हमेंटला बदनाम करण्याचा प्रयत्न करून पाहिला पण कोणताही उपयोग नं होता पश्तुन तहफ्फुज मुंव्हमेंटलाच याचा फायदा झाला.
ताहीर दावड हत्या आणि आक्रोश
नोव्हेंबर महिन्यात पेशावर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक, अनेक आंतरराष्ट्रीय मोहिमांमध्ये सामील झालेले उमदे पश्तुन अधिकारी ताहीर दावड यांचे इस्लामाबाद मधुन अपहरण करण्यात आले. १९ दिवसांनंतर त्यांचा मृतदेह अफगाणिस्तानात मिळाला. आणि त्यावर उर्दूमध्ये लिहिलेली हत्येची जबाबदारी स्वीकारणारी चिठी मिळाली. या हत्येने पश्तुन समाजात संतापाची लाट उसळली. त्यांचा मृतदेह तुरखम सीमेवरून पाकिस्तानात आणताना स्थानिक पश्तुन जमात असलेल्या "शिनवारी" ट्राइबने पाकिस्तानी सरकारी अधिकाऱ्यांच्या हाती मृतदेह देण्यास विरोध केला. पाकिस्तानी गृहमंत्री शेहरियार आफ्रिदी यांच्या उपस्थितीत पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात मोठी घोषणाबाजी झाली. एवढंच नाही तर त्यांच्या कुटुंबियांनी अंत्यसंस्काराच्या वेळी मृतदेहावर पाकिस्तानी राष्ट्रध्वज घालण्यास मनाई केली.
पाकिस्तानी सोशल मीडियात सध्या बलुच-पश्तुन एका बाजुला आणि पंजाबी दुसऱ्या बाजुला अशी उभी फूट दिसत आहे.
खासदार अली वझीर आणि मोहसीन दावड यांची नाट्यमय अटक!


तीन दिवसांपूर्वी लोकप्रिय पश्तुन खासदार अली वझीर आणि मोहसीन दावड पेशावर विमानतळावरून दुबईला जाण्याच्या तयारीत असताना, दोघांनाही विमानातुन उतरवण्यात आलं आणि त्यांचे पासपोर्ट जब्त करण्यात आले. या दोन्ही खासदारांवर कोणताही गुन्हा दाखल नाही किंवा खटला नाही. उलट अली वझीर यांच्या कुटुंबातील १७ निरपराध लोक ऑपरेशन झर्ब ए अजब मध्ये मारले गेले आहेत. पण तरीही त्यांची नावे "एक्सिट कंट्रोल लिस्ट" मध्ये टाकण्यात आली आहेत. या अटकेने पाकिस्तानी पश्तुनांमध्ये एका वेगळ्याच संतापाची लाट उसळली. नकीबुल्ला मेहसूद या निरपराध पश्तुन युवकाची हत्या करणारा राव अन्वर हा पंजाबी पोलीस अधिकारी अजुनही अटक करण्यात आलेला नाही आणि दोन निरपराध पश्तुन खासदार मात्र लोकशाहीवादी आंदोलनात भाग घेतात म्हणून गुन्हेगार कसे? असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जातोय.
सोशल मीडियावरील दमन
सध्या पश्तुन तहफ्फुज मुंव्हमेंटला पाकिस्तानात मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद बघुन आयएसआय आणि पाकिस्तानी सेना चुकांवर चुका करत आहेत. पश्तुन आणि बलुच सोशल मीडिया कार्यकर्त्यांन अंदाधुंद अटक आणि धाकधपटशा यामुळे वातावरण अजुन गढुळ होत चाललंय. आजपर्यंत मौलाना सामी उल हक आणि जलालुद्दीन हक्कानी याना हाताशी धरून पाकिस्तानी पश्तुनांचा कसा बळीचा बकरा करण्यात आला याबद्दल सोशल मीडियावर उघड होणाऱ्या चर्चा पाकिस्तानी सैन्यासाठी डोकेदुखी ठरत आहे.
याशिवाय मागे उल्लेख केल्याप्रमाणे ऑपरेशन झर्ब ए अजब आणि रद्द उल फसादच्या वेळी वझिरीस्तान मध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या अंदाधुंद बंबार्डींगमुळे नष्ट झालेल्या ६० हजार घरे आणि दुकाने यांच्या पुनर्निर्माणसाठी सरकारवर दबाव वाढत आहे. आजपर्यंत खायबर पख्तुनख्वा मधील विकास का आणि कुणी रोखला असा प्रश्न नेटाने विचारला जात आहे. त्या भागात अजुनही दिवसाचे २० तास वीज नसते आणि पिण्याच्या पाण्याची नेहमीची बोंब आहे.
एका बाजुने पश्तुन तहफ्फुज मुंव्हमेंट आणि दुसऱ्या बाजुने बलुच गटांचे सशस्त्र हल्ले शिवाय पाकिस्तानी सैन्याने अपहरण करून मारून टाकलेल्या आणि बेपत्ता झालेल्या ३० हजार बलुच लोकांच्या तपासासाठी चालु शांततापूर्ण आंदोलन या कात्रीत पाकिस्तान सापडला आहे. नुकताच बलुच लिबरेशन आर्मीने कराचीच्या चिनी दूतावासावर हल्ला करून पाकिस्तानची झोप उडवलेली आहे. त्याचवेळी मामा कादिर बलोच यांच्या नेतृत्वाखाली बलुच मिसिंग पर्सन्सच्या शोधासाठी रोज आंदोलने होत आहेत. एकूण काय वातावरण भयानक विस्फोटक आहे.
सैन्य विरोधी सर्वच जण भारतीय एजंट!
आपल्या विरोधात एक शब्द ऐकून घ्यायची सवय नसलेली पाकिस्तानी सेना आणि आयएसआय आता आपल्या पंजाबी समर्थकांना हाताशी धरून बलुच आणि पश्तुन कार्यकर्त्यांना आणि सर्व मोठ्या आंदोलनांना भारतीय एजंट ठरवत आहे. यामुळे वातावरण अजून गढूळ होत आहे. बांगला युद्धातुन पाकिस्तानी आणि विशेषतः पंजाबी लोकांनी कोणताही धडा घेतलेला नाही हाच यातुन निष्कर्ष निघत आहे.
ही डुरंन्ड लाईन पुसण्याची सुरुवात तर नाही?
एकूण परिस्थितीचा विचार करता आणि त्याला पाकिस्तानी सेना आणि आयएसआय देत असलेला बिनडोक आणि हिंसक प्रतिसाद बघता, पाकिस्तान १९७१ ची आपल्याच देशबांधवांना दूर लोटण्याची चुक परत करताना दिसत आहे. यावेळी पाकिस्तानी सैन्याचा कणा असलेले पश्तुन, पाकिस्तानच्या कल्पनेपासून आणि पाकिस्तानी राष्ट्र या भावनेपासुन भावनिकदृष्ट्या लांब जाताना दिसत आहेत आणि अफगाणिस्तान-पाकिस्तान मधील अशास्त्रीय, कृत्रिम आणि अन्यायकारी डुरंन्ड लाईन पुसण्याच्या चर्चा सुरु झालेल्या आहेत. अशा स्थितीत अनेक नवे प्रश्न समोर येत आहेत; ज्याची उत्तरे पाकिस्तानच्या अस्तित्वावरच मोठे प्रश्नचिन्ह उभे करत आहेत;
एका बाजुने अमेरिका समर्थित अफगाणिस्तान, त्याच्या खाली कट्टर शिया ईराण आणि पलीकडे ७० वर्ष डिवचला गेलेला भारत; अशा कात्रीत सापडुन पाकिस्तानचे सॅन्डविच झाले तर?

डुरंन्ड लाईन पुसली गेली तर?
कर्जाच्या कात्रीत सापडलेला पाकिस्तान आपली प्रजा एकत्र राखू शकला नाही तर?
आणि सध्या पाकिस्तानचा एकमेव तारणहार असलेला पण उईघुर मुस्लिमांचे दमन करणाऱ्या चीनविरोधात पाकिस्तानी बरेलवी-सलाफी कट्टरतावादी मुस्लिम एकसंध झाले तर?
हे प्रश्न कल्पनाविलास नसुन सध्या याभोवती पाकिस्तानी प्रजा मनाने फिरत आहे....
पाकिस्तान परत १९७१ च्या दिशेने जात असल्याची ही सर्व स्पष्ट चिन्हे आहेत आणि घटनांचा वेग थक्क करणारा आहे! त्यामुळे येणाऱ्या काही काळात घटना खूप खूप वेगाने घडताना दिसतील आणि आपण त्याचे साक्षिदार असू यात शंका नाही!
---- विनय