छाबहारवरील हल्ला हा विदेशी गुंतवणुकीला अडथळा आणण्यासाठीच.
         Date: 07-Dec-2018

छाबहारवरील हल्ला हा विदेशी गुंतवणुकीला अडथळा आणण्यासाठीच.

 

अलीकडे इराणच्या आग्नेय दिशेला असलेल्या छाबहार बंदरावर झालेला दहशतवादी हल्ला हा इराणच्या शत्रूकडून केला गेला होता. मकरान प्रदेशातील विदेशी गुंतवणुकीला अडथळा निर्माण करण्याच्या उद्देशानेच हा हल्ला केला गेला असे इराणच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

 

इराण, अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि इतर मध्य आशियाई राज्ये यांच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या बंदरावर हल्ला करण्यामागे छाबहारची सुरक्षा विस्कळीत करणे हाच हेतू होता. त्या प्रदेशामध्ये आपला अंमल राहावा अशी शत्रूची खेळी असली तरी इस्लामिक रिपब्लिक चे गुप्तहेर त्यांचा हा प्रयत्न नक्कीच हाणून पडतील. असे इराण संसदेच्या प्रवक्त्याच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असलेल्या मन्सूर हकीकतपूर यांनी सांगितले.

 
 

या बंदराचे राजकीय महत्त्व लक्षात घेता आम्ही लवकरच या मकरन किनाऱ्याचा विकास करणार आहोत असे इस्लामिक रिव्होल्यूशन च्या पुढाऱ्याने सांगितले. हा संपूर्णपणे राजकीय हीत लक्षात ठेऊन घेतलेला निर्णय असल्याचे ते म्हणाले.

 

पाकिस्तानातील ग्वादार बंदराचा विकास चीन आणि पाकिस्तान जोमाने करीत आहेत. ग्वादार बंदराला सर्वोत्कृष्ट बनविण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालले आहेत. दुसरीकडे त्यांना शह देण्यासाठी त्यांचा प्रतिस्पर्धी इराण आपल्या मित्र राष्ट्रांसोबत (रशिया, भारत आणि अफगाणिस्तान ) छाबहार बंदराचा विकास करीत आहे.

 

आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी बंदरांच्या विकासाकडे आणि त्याच्या राजकीय उपयुक्ततेकडे इराण जास्त लक्ष पुरवीत आहे. त्याचमुळे आमच्या प्रतिस्पर्ध्यांकडून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांसारख्या भ्याड कृतींना आम्हाला तोंड द्यावे लागत आहे.

 

तथापि, मकरन मधील आर्थिक, राजकीय आणि सामाजिक सुधारणेबरोबरच इस्लामिक रिपब्लिकनच्या अधिकाऱ्यांना सुरक्षा आणि राजकीय परिपक्वतेचा अनुभवही आता घेता आला.

 

हकीकतपूरनी सांगितले की," या हल्ल्यामुळे छाबहारमधील लोकांची एकात्मता कोणताही प्रकारे भंग पावलेली नाही. या उलट या हल्ल्यामुळे लोकांचे एकमेकांशी असलेले संबंध अधिक मैत्रीपूर्ण आणि बंधुत्वाचे झाले आहेत. तसेच छाबहार मधील विविध राजकीय पक्ष आणि धार्मिक गटांमध्ये या हल्ल्यामुळे एकजूट निर्माण झाली आहे. मकरनच्या विकासासाठी शिया आणि सुन्नी हे दोन्ही हातात हात घालून काम करित आहेत. त्यांचे या प्रदेशात असलेले एकमेकांसोबतचे संबंध हे इस्लामिक एकतेचे प्रतीक आहे. परंतु शत्रूला आमची ही एकी बघवत नाही. त्यामुळे लोकांना संभ्रमित करण्यासाठी ते अशी कृत्ये करीत आहेत. सौदी अरेबिया मध्ये जसे घडत आहे तसेच इथे सुद्धा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे."

 

छाबहार आणि त्याच्या बाहेरचे जग यांच्यामध्ये योग्य तो समतोल राखण्यासाठी आणि परकीय गुंतवणुकीसाठी हे क्षेत्र खुले करून देण्यासाठी त्यांनी सुरक्षा दलांना संपूर्ण प्रदेशाला कडक सुरक्षाव्यवस्था देण्यास सांगितले आहे.

 

"असे हल्ले करण्यामागचा एक उद्देश हा परकीय गुंतवणूकदारांच्या मनात असुरक्षितता निर्माण करणे हा असू शकतो. पण इथे ते त्यांचं इप्सित साध्य करू शकणारच नाहीत." असेही त्यांनी सांगितले.

 

शहरातील पोलिस मुख्यालयासमोर गुरुवारी घडवण्यात आलेल्या आत्मघातकी बॉम्बच्या स्फोटात एक पोलीस आणि एक अधिकारी ठार झाले. तसेच एक लहान मूल आणि त्याच्या आई सकट अनेक जण जखमी झाले.

 

आत्मघातकी हल्लेखोर निसान कार चालवत होता. त्याला त्याच्या कारचा स्फोट छाबहार पोलीस मुख्यालयाच्या आत नेऊन करायचा होता. परंतु जागरूक असलेल्या सुरक्षा दलांनी त्याच्यावर ताबडतोब हल्ला केल्यामुळे त्याचा हा बेत धुळीस मिळाला आणि कारचा स्फोट मुख्यालयाबाहेरच झाला.

 

छाबहारच्या राज्यपालांनी सांगितले की हे बंदर इराणसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण भविष्यात मध्य आशियाई राज्ये आणि हा प्रदेश याना ओमान समुद्रातून जोडणारे एक मोठे ऊर्जा केंद्र बनू शकते.

 

द अन्सार अल-फुरकान या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk)

Source: IFP NEWS

‘Chabahar Attack Aimed at Hampering Foreign Investment’