जगातील सर्वात मोठा म्हणजेच ५,००० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प लडाख मध्ये होणार.
         Date: 16-Jan-2019

जगातील सर्वात मोठा म्हणजेच ५,००० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प लडाख मध्ये होणार.

 

ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एसईसीआय) लडाख मध्ये ५,००० मेगावॅट आणि कारगिल मध्ये २,५०० मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारत आहे. प्रचंड वीजनिर्मिती क्षमता असलेला आणि एकाच ठिकाणी उभारलेला (सिंगल लोकेशन) हा प्रकल्प जगातील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प बनेल यात शंकाच नाही.

 

या प्रकल्पामुळे दरवर्षी होणारे १२,७५० टन कार्बनचे उत्सर्जन थांबून निसर्गाचे रक्षण होणार आहे. डिझेल वरील अवलंबित्व कमी होऊन तेथील जनतेला बाराही महिने वीजपुरवठा होणार आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

 

 
 
लडाख आणि कारगिल मध्ये उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाला ४५,००० कोटी रुपयांचा निधी लागणार असून साधारणपणे २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होऊन वापरात येईल.
लेह पासून २५४ किलोमीटर अंतरावरील न्योम मधील हानले-खल्दो येथे लडाख ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येईल. या प्रकल्पाद्वारे तयार होणारी ऊर्जा हरियाणातील कैथलला पुरविली जाईल. ही ऊर्जा पुरविण्यासाठी लेह-मनाली रस्त्यावरून ९०० किलोमीटर ची लाईन टाकण्यात येईल.
 

झान्स्करमधील सुरु जिल्ह्यापासून साधारण २५४ किलोमीटर अंतरावर कारगिल ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येईल. हा प्रकल्प श्रीनगर जवळील न्यू वानपो च्या पॉवर ग्रीडशी जोडला जाईल.

 

सर्व यंत्रणा आणि आवश्यक ती ट्रान्समिशन्स एकत्रित करणे आणि प्रमोटर्स नियंत्रणात ठेवणे हे या प्रकल्पामध्ये आवश्यक आहे. ट्रान्समिशनसाठी बाहेरील दुसऱ्या कोणत्याही यंत्रणेवर विसंबून राहण्याची वेळ येऊ नये आणि त्यामुळे कसलीही दिरंगाई होऊ नये म्हणून यांचे एकाच जागी एकत्रीकरण होणे आवश्यक आहे.

 

"पूर्वीच्या निविदांमध्ये आम्हाला काही अडचणी आल्या त्याचमुळे आम्ही सर्व दृष्टींनी विचार करून आणि येथील आव्हानात्मक भौगोलिक परिस्थितीचा विचार करून योग्य तो निर्णय घेऊच," असे एसईसीआयचे संचालक (पॉवर सिस्टम) एसके मिश्रा यांनी म्हटले आहे.

 

लेह आणि कारगिलच्या प्रशासनाने अनुक्रमे २५,००० आणि १२,५०० एकराची चराऊ नसलेली जमीन घेतली आहे. हिल काउन्सिल च्या मूल्यांकनानुसार योग्य ती किंमत देऊन ही जागा घेण्यात आली आहे. दरवर्षी ३ टक्क्यांच्या वाढीच्या बोलीवर या वर्षी सुमारे १२०० रुपये प्रती हेक्टर दराने त्यांना या जागेचे भाडे देण्यात येईल.

 

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk)

Source: Swarajya

Ladakh To Get World’s Largest Solar Power Plant; 5,000 MW Capacity Project To Be Completed By 2023.