रशियाच्या पाण्याखालील आण्विक ड्रोनला लवकरच तैनात केले जाईल.
         Date: 22-Jan-2019

रशियाच्या पाण्याखालील आण्विक ड्रोनला लवकरच तैनात केले जाईल.

 

पॅसिफिक महासागरामध्ये रशिया आपला पाण्याखालील पोसायडन आण्विक सक्षम ड्रोन तैनात करण्यास तयार असल्याचे वृत्त रशियन प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

 

रशियाचे क्रेमलिन आणि अमेरिका यांच्याशी असलेले संबंध पाहता रशियाचे लक्ष्य अमेरिकाच असेल हे काही गुप्त राहिलेले नाही. रशियाच्या बंदुकीच्या टोकावर अमेरिका आहे असे म्हटले तर ते वावगे नाही. असे असले तरी पोसायडनची पॅसिफिक समुद्रातील तैनात चीनची देखील डोकेदुखी ठरू शकते.

 

 

 

रशियाला शस्त्रास्त्रात असलेली आपली "अत्याधुनिकता" मिरवायला फार आवडते. विश्लेषकांच्या मते नवीन तैनात केलेला टॉरपेडो ड्रोन पश्चिमी पॅसिफिक समुद्र आणि इतर ठिकाणच्या अमेरिकेच्या लष्करी तळांना धोका पोहोचवू शकतो.
 

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी गेल्या मार्चमध्ये पोसायडनच्या निर्मितीची घोषणा केली. हे मानवरहित पाण्याखालील उपकरण असून २ मेगाटन आण्विक स्फोटके वाहून नेऊ शकते. तसेच हे शत्रूचे तळ आणि विमाने नष्ट करू शकते. हे अत्यंत वेगवान असून १००० मीटर अंतरापर्यंत मारा करू शकते. याला अडविणे सहज शक्य होणारी गोष्ट नाही.

 

या शस्त्रप्रणालीची पाण्याखालील चाचणी चालू आहे. २ पोसायडन घेऊन जाणारी पाणबुडी रशियन पॅसिफिक समुद्रात समाविष्ट केली जाईल आणि बाकीची दोन उत्तरेकडे तैनात केली जातील. प्रत्येक पोसायडनवर जास्तीत जास्त आठ टॉरपेडो ड्रोन तैनात केले जाऊ शकतात.

 

सामरिक महत्त्व-

पोसायडन ड्रोनचा रणनीतीक परिणाम होईल अशी चिंता मॉस्को बेस्ड प्रामाकोव्ह इंस्टीट्यूट ऑफ वर्ल्ड इकॉनॉमी आणि इंटरनॅशनल रिलेशन्स मधील मुख्य संशोधक अलेक्झांडर सव्हेलीव्ह यांनी व्यक्त केली.

 

"ही प्रणाली प्रथमदर्शनी तितकीशी नुकसानदेय वाटत नाही. कमांड पोस्ट्स, आयसीबीएम (इंटरकाँटिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल) सायलोस सारख्या मजबूत बांधकामाला नष्ट करण्याची ताकद या प्रणालीच्या अंगी नाही." असे आशिया टाइम्स शी बोलताना त्यांनी सांगितले.

 

तसं पाहायला गेलं तर रशियाच्या क्षमतेमध्ये टॉरपेडोच्या आगमनाने विशेष काही फरक पडत नाही कारण त्यांची विद्यमान आयसीबीएम, पाणबुड्या आणि त्यांच्याकडून केले जाणारे बॉम्बस्फोट हे इतके शक्तिशाली आहेत की तेच शत्रूवर अथवा त्यांच्या बांधकामावर मारा करून ते बेचिराख करू शकतात. त्यामुळे या प्रणालीची म्हणावी तितकीशी उपयुक्तता रशियाला होईल असे वाटत नाही असे शीतयुद्धाच्या अखेरीस अमेरिकेशी वाटाघाटी करणाऱ्या सोव्हिएत प्रतिनिधिमंडळातील एकाने सांगितले. असे असले तरी, जर पोसायडनचा वापर झालाच तर आण्विक युद्ध छेडले जाण्याची शक्यता वाढते. आणि याचा शेवट या संपूर्ण पृथ्वीचा नाश होण्यातच होईल.

 

यूएस नेव्हल वॉर कॉलेजमधील प्राध्यापक लेल गोल्डस्टाईन यांनीही हाच निष्कर्ष काढला. या प्रणालीमुळे यूएस, जपान आणि त्यांच्या सहयोगींना नक्कीच धोका पोहचू शकतो. परंतु या प्रणालीला अती महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. असे त्यांनी सांगितले.

 

गोल्डस्टाईन यांनी अजून एक मुद्दा सांगीतला की अमेरिका किंवा त्याच्या सहयोगींनी या प्रणालीची खात्री करून घेतली नाहीये. त्याचमुळे या प्रणालीची गांभीर्याने चाचणी झालीच नसावी. अशी शस्त्रे हाताळणे सोपे काम नाही. म्हणून या प्रणालीच्या क्षमतेविषयी शंकेला वाव आहे.

 

"आण्विक ड्रोन हाताळण्यामध्ये खूप मोठा धोका आहे आणि विशेषकरून तो ड्रोन शस्त्रांनी पूर्णपणे सज्ज असताना तर धोका जास्त संभवतो. त्याचमुळे रशिया फार फार तर याविषयी विचार करेल परंतु असले काही करेल असे वाटत नाही." गोल्डस्टाईन यांनी सांगितले.

 

पाण्याखालील आण्विक ड्रोन सारख्या "विनाशकारी" शस्त्राचा नाश त्याच्यासारखेच दुसरे "विनाशकारी शस्त्रच करू शकेल. अमेरिकेच्या सातव्या फ्लीटविरुद्ध काही कारवाई केली तर परिणामस्वरूप पॅसिफिक समुद्रात असलेल्या रशियाच्या सगळ्याच्या सगळ्या फ्लीट आणि सुविधांचा विध्वंस होईल.

 

"पोसायडन ची निर्मिती मुख्यत्वे किनारपट्टीवरील नौदल तळ आणि विमानतळ याना लक्ष्य करण्यासाठी केली गेली असावी. एकदा का ती वापरात आणली की अमेरिकेच्या सातव्या आणि तिसऱ्या फ्लीटच्या सर्व बांधकाम आणि मालमत्तेला खूप मोठा धोका निर्माण होईल." असे मत अलेक्सि मुरव्यु यांनी दिले.

 

जर यूएस सोबत खुले युद्ध झाले तर रशियाचे नौदल युएसच्या महत्त्वाच्या नौसैनिक तळांना लक्ष्य करेल. त्यापैकी सॅन दिएगो, पर्ल हार्बर किंवा योकोसुका हे त्यांचे पहिले लक्ष्य असेल. कारण हे तळ जास्तीत जास्त लढाऊ विमाने, पाणबुड्या, मिसाईल वाहून नेणारी जहाजे आणि मिसाईल नष्ट करणारी जहाजे ठेवण्याचे महत्त्वाचे ठिकाण आहे. याचमुळे पोसायडन टॉरपेडोचा या मालमत्तेवरील हल्ला एकाच फटक्यात अनेक विजय मिळवून देईल," असे मुरव्यू यांनी सांगितले.

 

अमेरिकेप्रमाणेच रशियाचा पोसायडन ड्रोनचा वापर चीनला देखील खटकला आहे. परंतु रशिया आणि चीन यांचे संबंध सध्या चांगले असल्याने चीन पोसायडन कडे एवढ्यात गंभीरतेने पाहणार नाही.

 

नौदलामध्ये अमेरिकेनंतर चीनला मात देणारा रशियाच असेल. निदान रशियाचा पोसायडन चीनला थोडा अभ्यास करायला भाग पाडेल हे नक्की. सूत्रांनुसार चीन सध्या आर्टिफिशल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता ), रोबोट्स आणि मानवरहित प्रणाली यावर जास्त काम करीत आहे. त्याचमुळे पोसायडन ड्रोन सारखा प्रोग्रॅम तयार करायला चीनला जास्त वेळ लागणार नाही.

 

आण्विक शस्त्रास्त्रांच्या स्पर्धेतील पोसायडन हा काही गेम चेंजर नाही. परंतु जर का याची वाढ झाली तर त्याचा मात्र फार मोठा फटका जगाला बसेल.

 

ही प्रणाली रणनीतीक शस्त्रास्त्रांच्या श्रेणीत येते. परंतु २०१० मधील "न्यू स्टार्ट" सारख्या शस्त्र नियंत्रण करारामध्ये याचा समावेश होत नसला तरी भविष्यात या करारासाठी याचा समावेश एक अडचण बनू शकते. २०२१ नंतर या कराराचा विस्तारा करायच्या वेळी पोसायडनमुळे या कराराचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते.

 

पाण्याखालील युद्धाची परिभाषाच या अश्या लांब पल्ल्याच्या मानवरहित प्रणालीमुळे बदलू शकते. या संदर्भात मागील अहवालावरून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की चीनने "रोबोटिक पाणबुडीवर" जोमाने काम सुरु केले होते.

 

भविष्यात यूएस ला पाण्याखालील युद्धाचा सामना करावा लागणार आहे असे दिसते.

 

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk)

This article is based on EMANUELE SCIMIA'S article in ASIA TIMES.

Russia’s nuclear-capable underwater drone to be deployed.