नेपाळी भूमीवर चीनचे अतिक्रमण.
         Date: 10-Nov-2019

नेपाळी भूमीवर चीनचे अतिक्रमण.

 

तिबेटमध्ये सुरु असलेल्या रोड प्रकल्पाच्या आडून चीन नेपाळच्या भूमीवर अतिक्रमण करीत असल्याचे नेपाळच्या सर्वेक्षण विभागाने म्हटले आहे.

 

चीनच्या सीमेला लागून असलेल्या सांखुवासभा, रसुवा, सिंधुपालचौक आणि हुमला या चार वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील सुमारे ३६ हेक्टर जमिनीवर चीनने अतिक्रमण केले असल्याचे नेपाळच्या न्यूज पोर्टल खबरहब ने आपल्या सविस्तर अहवालात म्हटले आहे.

 

यासंबंधीचा सविस्तर अहवाल -

 

हुमला जिल्ह्यातील भगदरे नदीच्या पात्रातील सहा हेक्टर आणि कर्नाली जिल्ह्यातील चार हेक्टर जमिनीवर अतिक्रमण करून ती  तिबेटच्या फुरंग प्रांताला जोडण्यात आली आहे. तसेच सांजे नदी आणि रासुवाच्या जांभू खोला येथील सुमारे सहा हेक्टर नेपाळी जमीन दक्षिणी तिबेटमधील केरुंग प्रांतात अतिक्रमणाद्वारे समाविष्ट करण्यात आल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.

 

सिंधुपालचौक  जिल्ह्यातील भोटेकोशी आणि खरणेखोला भागातही चीनने १० हेक्टरपेक्षा जास्त जागेवर अतिक्रमण केल्याचे अहवालात म्हटले आहे.

 

कमळखोला, अरुण नदी व सुमजुंग नदीच्या आसपासचे नऊ हेक्टर क्षेत्र चीनने ताब्यात घेऊन तिबेटच्या टिंगीसन क्षेत्राला जोडले आहे.

 

कालापानी प्रांताला भारताचा हिस्सा दाखवल्याबद्दल नेपाळ नाराज आहे. भारत आणि नेपाळमध्ये यामुळे वाद चालू आहेत. ३१ ऑक्टोबर २०१९ ला जम्मू, काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश केल्यानंतर भारताने आपला अधिकृत नकाशा जारी केला. त्या नकाशात उत्तराखंड आणि नेपाळ यांच्या मधील कालापानी आणि लिपू लेख प्रांत भारताचे भाग असल्याचे दाखवले गेले. नेपाळचा दावा आहे की हे प्रांत त्यांचे आहेत.

 

नेपाळने यावर तीव्र आक्षेप घेतल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने यावर खुलासा करताना म्हटले आहे की या नकाशात केवळ जम्मू-काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश असल्याचे दाखविले गेले आहे. याशिवाय नकाशात कसलाही बदल केला गेला नाही. पूर्वापार चालत आलेला नकाशा तसाच ठेवण्यात आला आहे.

 

यासंबंधी बोलताना रवीश कुमार म्हणाले की, नेपाळ आणि भारताच्या सीमेविषयी अजून काहीच निश्चित नाहीये. दोन्ही देश एकमेकांशी सामोपचाराने बोलून यावर तोडगा काढतील. नकाशामध्ये केवळ जम्मू-काश्मीर आणि लडाख याना केंद्रशासित प्रदेश म्हणून दाखवले गेले आहे. बाकी पूर्वापार चालत आलेल्या नकाशात आम्ही कसलीही छेडछाड केली नाही. सीमारेषेसंबंधी दोन्ही देश सामंजस्याने निर्णय घेतील असे आश्वासन त्यांनी दिले.

 

-प्राची चितळे जोशी

 

(ICRR Media Monitoring Desk)

 

Source :  freepressjournal

 

China is encroaching into Nepal's land.