पंचेन लामा, चीन आणि तिबेट.
         Date: 01-Dec-2019

पंचेन लामा, चीन आणि तिबेट.

 

दलाई लामा हे नाव नसून उपाधी आहे. याचा अर्थ ज्ञानाचा महासागर. बौद्ध धर्माचे नेतृत्त्व करणाऱ्याला ही उपाधी मिळते. दलाई लामा हे तिबेटचे सर्वोच्च धार्मिक गुरु आहेत. तिबेटमध्ये दलाई लामांची परंपरा चौदाव्या शतकात सुरु झाली. जेनडून द्रुप हे पहिले लामा आहेत. बौद्ध धर्मियांचे पवित्र धार्मिक स्थळ म्हणजे तिबेट मधील ड्रेपुंग विहार. या विहारामध्ये दलाई लामा बौद्ध धर्मियांना दिक्षा देण्याचे काम करीत असत.

 

आतापर्यंत 13 दलाई लामा होऊन गेले. दलाई लामा बनण्यासाठी काही खास नियम आणि संकेत आहेत. असे पटकन कुणालाही लामा बनता येत नाही. आताचे लामा आपल्या आयुष्याचा अंत जवळ आला की मृत्यूच्या आधी त्यांच्या वारसासंबंधी तो कोण असावा किंवा तो कोणत्या ठिकाणी जन्म घेईल यासंबंधी काही संकेत देतात. त्यांनी दिलेल्या संकेतांचा आणि त्यांच्या शब्दांचा अर्थ लावून त्यानुसार वारसदाराचा शोध घेतला जातो. या लोकांची अशी श्रद्धा आहे की लामांचा पुनर्जन्म होतो. त्यामुळे दलाई लामांचा मृत्यू ज्या तारखेला होईल त्या तारखेच्या आणि वेळेच्या आसपास ज्या बालकाचा जन्म झाला आहे असे बालक शोधून काढले जाते. लामांच्या संकेताप्रमाणे त्याचे निरीक्षण केले जाते. त्याच्या वागण्याचे अर्थ लावले जातात. नवीन लामांचा शोध घेण्यास कधी कधी अनेक वर्ष सुद्धा लागू शकतात. लामांचा शोध थांबेपर्यंत एखाद्या विद्वान अश्या धम्मगुरुला लामांची जागा सांभाळावी लागते. आताचे दलाई लामा ८४ वर्षाचे आहेत. त्यांचा जन्म तिबेट मधील एका गरीब शेतकऱ्याच्या घरी झाला. त्यांचे मूळ नाव तेन्झिन ग्यात्सो आहे.

 

दलाई लामांच्या नंतरची सर्वाधिकार असलेली व्यक्ती म्हणजे पंचेन लामा. पंचेन म्हणजे पंडित. पंचेन लामा या पदाची नियुक्ती पाचव्या दलाई लामांच्या काळापासून सुरु झाली. पंचेन लामा हे ताशिल्हुनपो मठातील प्रमुख असतात.  शिगात्से येथील त्सांग प्रांतामधील धार्मिक गोष्टींच्या बाबतीतले अधिकार त्यांना मिळाले आहेत.त्यांचे कार्य जरी स्वतंत्र असले तरी दलाई आणि पंचेन लामा एकमेकांशी जोडलेले आहेत. म्हणजे नवीन दलाई लामा निवडण्याच्या प्रक्रियेमध्ये पंचेन लामा यांचा सहभाग महत्त्वाचा मानला जातो. दलाई लामांच्या खालोखाल पंचेन लामांचा अधिकार असतो.

 

आतापर्यंत १० पंचेन लामा होऊन गेले. अकरावे पंचेन लामा गेदुन चोयकी नीमा यांचा जन्म २५ एप्रिल १९८९ ला झाला. त्याना पंचेन लामा म्हणून १४ मे १९९५ ला पद मिळाले. परंतु त्यांच्या निवडीला चीनने विरोध केला. आणि चीनने त्यांना ताब्यात घेतले. हे देशद्रोही कार्य आहे असे सांगून चीनने त्यांना अटक केली. आणि त्यांच्या बदली ग्यालसेन नोरबू याना पंचेन लामा म्हणून निवडले. ही चीनची तिबेटमधील लोकांना फोडण्याची राजकीय खेळी होती. तिबेटी जनतेने या निवडीला विरोध केला. आता तिबेट मध्ये पंचेन लामा पदासाठी दोन दावेदार आहेत. एक दलाई लामांनी पारंपरिक पद्धतीने निवडलेले पण चीनला नको असलेले म्हणून बंदिवान झालेले आणि दुसरा चीनने निवडलेला पण जनतेने नाकारलेला.

 

त्यांची पंचेन लामा पदी निवड झाल्यापासून ते लोकांना अज्ञात आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना अज्ञात ठिकाणी ठेवल्याचे चीनचे अधिकारी सांगतात. मानवाधिकार संस्थांनी गेदुन चोयकी नीमा यांना " जगातील सर्वात तरुण राजकीय बंदी" असे म्हटले आहे. अलगाववादी याना पळवून नेतील म्हणून आम्ही त्यांना सुरक्षित जागी हलविले असल्याचे चीनच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. निमा याना सोडण्याविषयी अनेक प्रयत्न झाले परंतु चीनने दाद दिली नाही.

 

"निमा सर्वसामान्य माणसासारखे आयुष्य जगत आहेत, त्यांची तब्बेत ठणठणीत असून ते आनंदी आहेत. त्यांना चांगले शिक्षण देण्यात आले आहे. त्यांची उंची ५.५ फूट आहे. आणि त्यांना सगळ्यांच्यात मिसळायला आवडते." एवढीच माहिती चिनी अधिकाऱ्यांनी दिली.

 

संयुक्त राष्ट्रसंघाने ११ व्या पंचेन लामांविषयी विचारले असता चीनने उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाला कसलेही सहकार्य चीनने केले नाही. त्यांचा ठावठिकाणा न सांगता  " सरकारकडून त्यांना फुकट शिक्षण मिळाले असून ते आता चांगली नोकरी करत असल्याचे " चिनी अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

-प्राची चितळे जोशी.

 

( ICRR Content Generation )

 

Panchen Lama, China and Tibet.