"मला माझे जुने आयुष्य परत हवे आहे."
         Date: 03-Feb-2019

"मला माझे जुने आयुष्य परत हवे आहे."

 

ज्या वयात स्वप्न बघायची त्या वयात वाट चुकलेल्या एका १५ वर्षाच्या जर्मन मुलीचे हे उद्गार आहेत. लहान वयात लग्न करून इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेत सामील झालेल्या एका तरुणीची कहाणी.

 

जर्मनी सोडल्यानंतर गेली चार वर्षे इस्लामिक स्टेट ग्रुप मध्ये सामील झालेल्या १९ वर्षीय लिओनोराने सीरियामधील या जिहादींच्या तळावरून पळ काढला आहे.

 

अंगभर काळ्या रंगाचा ढगळ बुरखा आणि पांढरे ठिपके असलेला स्कार्फ गुंडाळलेल्या या तरुणीने "मी त्यावेळी थोडी अल्लड होते." असे उद्गार काढले आहेत. 
इराक सीमेजवळील सीरियाच्या पूर्वेकडील भागात अमेरिकन समर्थक सैन्य या दहशतवाद्यांशी लढत आहे. यांच्यात अगदी निकराची लढाई सुरु आहे.
 

या आठवड्यात बघौझ या खेड्यातून हजारो महिला, पुरुष आणि लहान मुले बाहेर काढण्यात आली आहेत. त्यांच्यातच लिओनोरा आणि तिची २ लहान मुले आहेत.

 

इस्लाम धर्म स्विकारल्यानंतर फक्त २ महिन्यातच ही १५ वर्षाची मुलगी जर्मनीतून सीरियाला आली. येथे आल्याच्या ३ दिवसानंतर अमेरिकेचा पाठिंबा असलेल्या सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सच्या एका विस्थापितांसाठी चालविल्या जाणाऱ्या तपासणी केंद्रावर माझं माझ्या जर्मन पतीशी लग्न झालं.

 

मार्टिन लेमके या जर्मन दहशतवादी तरुणाची लिओनारा ही तिसरी पत्नी. त्याची सीरियामध्ये येण्यापूर्वीच दोन लग्ने झाली होती. या दोन बायकांना घेऊन तो जर्मनीहून सीरियाला आला होता. आता आयएस ही संघटना चार वर्षानंतर लुप्त होत असताना लिओनारा म्हणतेय की तिला आपल्या घरी जायचंय.

 

"मला माझ्या जर्मनीच्या घरी परत जायचंय. माझ्या आईवडिलांजवळ रहायचंय. मी खूप मोठी चूक केली हे मला कळलंय." असे ती म्हणतेय.

 

तिने जर्मनी सोडायच्या आधी आयएस या संघटनेने मोठ्या प्रमाणात सीरियामध्ये आणि इराकमध्ये हातपाय पसरले होते. त्यांच्या नियंत्रणाखाली आलेल्या भागाला त्यांनी "खिलाफत" राज्य म्हणून घोषित केले. खिलाफत म्हणजे इस्लामी राज्य. (कुराणात सांगितल्याप्रमाणे)

 

सीरियाची राजधानी राका मध्ये ती एका दहशतवादी जहाल गटात राहत होती. त्यावेळी ती फक्त एक गृहिणी होती. "मी घरचीच स्वयंपाकाची, स्वच्छतेची कामे करीत असे." आपल्या फक्त दोन आठवड्याच्या लहानग्याला उराशी कवटाळून अतिशय म्लान चेहऱ्याने ती हे सर्व सांगत होती.

 

सीरियाच्या कुर्दिश अधिकाऱ्यांनी शेकडो विदेशी दहशतवाद्यांना आणि त्यांच्या हजारो बायका पोरांना पकडून विस्थापितांच्या छावणीत ठेवले आहे. कुर्दिश अधिकारी वारंवार पाश्चिमात्य सरकारांना त्यांच्या नागरिकांना परत घेण्याची विनंती करीत आहेत.

 

सुरुवातीला राकामधील आमचे दिवस चांगले गेले. परंतु जेव्हा एसडीएफने अमेरिकेच्या सहकार्याने हवाई हल्ले करून जिहादींच्या विरोधात कारवाई करायला सुरुवात केली तेव्हा सगळेच चित्र बदलले. कुर्दिश नेतृत्त्वाखालील एसडीएफने २०१७ मध्ये राकावर जोरदार हल्ले केले. आयएसच्या दहशतवाद्यांनी येथील रहिवाश्यांचे अतोनात हाल केले होते. त्यांना सार्वजनिक फाशी अथवा सुळावर देण्यात आले होते. कुर्दिश हल्ल्यानंतर या दहशतवाद्यांनी राका गमावले आणि आमच्यावर दर आठवड्याला घर बदलण्याची वेळ आली. कारण या दहशतवाद्यांच्या हातून दर आठवड्याला एक एक शहर निसटत चालले होते.

 

जेव्हा त्यांच्यावर कुर्दिश एसडीएफचा हल्ला होत असे तेव्हा हे आयएस चे दहशतवादी स्वतःला वाचविण्यासाठी कुटुंबाला सोडून पसार होत असत. " ते त्यांच्या बायकांना तिथेच सोडून देत असत, अन्नपाण्याविना, त्यांना तुमची कधीच काळजी वाटत नसे. शत्रू चाल करून येतोय आणि तुम्ही भकास झालेल्या शहरात तुमच्या मुलांसोबत एकटेच बसून असता," असे वर्णन लिओनोरा करते.

 

देयर इझोर प्रांतात युफ्रेटीसच्या पूर्व किनाऱ्यावरील एका लहानश्या जागेत एसडीएफने आयएसला घेरले आहे. म्हणजे साधारण चार चौरस किलोमीटरच्या (१.५ चौरस मैल) परिसरात त्यांना घेरले आहे.

 

अखेरीस, तिने आपल्या मुलांना उचलले आणि तिच्या नवऱ्यासोबत आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीसोबत ती एसडीएफच्या ताब्यात असलेल्या भागात आली.

 

अमेरिकेचा पाठिंबा असलेल्या सैन्याने लेमकेला गुरुवारी ताब्यात घेतले.

 

लिओनोराचे असे म्हणणे आहे की लेमके हा आयएससाठी टेक्निशियन म्हणून काम करीत होता. तो कॉम्पुटर आणि मोबाईलशी निगडित तांत्रिक गोष्टी बनविणे आणि दुरुस्त करणे अशी कामे करीत होता.

 

परंतु जर्मन वृत्तपत्रे त्याच्याबद्दल वेगळीच माहिती देत आहेत. त्यांच्या मते २८ वर्षांचा हा तरुण सीरियामधील परदेशी दहशतवाद्यांमधील सर्वात प्रभावी व्यक्तिमत्त्व आहे.

 

सीरियन ऑब्जर्वेटरी फॉर ह्यूमन राईट्सच्या म्हणण्यानुसार, डिसेंबरच्या सुरुवातीपासूनच "हजिन पॉकेट" या नावाखाली ३६,००० हून अधिक लोक एसडीएफच्या हल्ल्यामुळे पळून गेले आहेत. त्यातील ३,२०० लोकांवर दहशतवादाचा आरोप ठेवून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

 

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk)

Source: Hindustantimes

‘I want my old life back’, says German woman who joined Islamic State at 15.