पाकिस्तानच्या अफगाणिस्तानातील निर्यातीला बसला मोठा फटका.
         Date: 05-Feb-2019

पाकिस्तानच्या अफगाणिस्तानातील निर्यातीला बसला मोठा फटका.

 

पाकिस्तान अफगाणिस्तानला ज्या वस्तू निर्यात करीत असे त्यांच्या निर्यातीच्या दरामध्ये फार मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. ही घसरण ४१.५७ टक्क्यांची असून पाकिस्तानला याचा जबरदस्त फटका बसला आहे.

 

२०१०-११ मध्ये पाकिस्तानची अफगाणिस्तानमधील निर्यात २.६ बिलियन डॉलर्स एवढी होती ती आता २०१८-१९ मध्ये १.४ बिलियन डॉलर्स वर आली आहे. अफगाणिस्तान हा पाकिस्तानची सर्वात मोठी बाजारपेठ होता. ही बाजारपेठ आता पाकिस्तानच्या हातातून निसटून गेली आहे हेच ही आकडेवारी दर्शवित आहे.

 

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधील वाढता राजनैतिक तणाव आणि दोघांमध्ये अनेक वेळा होणारी सीमेवरील व्यापारावरील बंदी यामुळे अफगाणिस्तानच्या बाजारपेठेवर असलेला पाकिस्तानचा प्रभाव कमी होऊन तोच आता इराण आणि भारताकडे वळला आहे.


 

इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण कस्टम्स ऍडमिनिस्ट्रेशन च्या वार्षिक अहवालानुसार इराणची अफगाणिस्तानमधील निर्यात २.८ बिलियन डॉलर्सनी वाढली आहे आणि त्यापैकी २ बिलियन डॉलर्सची वाढ ही इराणच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या १० महिन्यातच झाली आहे. २०११ मध्ये इराणने अफगाणिस्तानला १.८८ बिलियन डॉलर्सची निर्यात केली. ही निर्यात जवळपास १ बिलियनने वाढून २०१८ मध्ये २.८८ बिलियन वर गेली आहे. असे यूएन कॉमट्रेडच्या आंतरराष्ट्रीय अहवालात म्हटले आहे.

 

सध्या इराणने ११.५ बिलियन डॉलर्स च्या बाजारपेठेतील जवळपास २२ टक्के हिस्सा (२.५ बिलियन डॉलर्स ) काबीज केला आहे. कधीकाळी अफगाणिस्तानातील बाजारपेठेचा २.६ बिलियन डॉलर्स इतका हिस्सा पाकिस्तानच्या नावावर होता. तो आता लक्षणीय घसरला आहे. हे धडधडीत सत्य आहे की इराणने पाकिस्तानकडून अफगाणिस्तानची बाजारपेठ हिसकावून घेतली आहे. पाकिस्तानमधील वाढत्या दहशतवादामुळे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सीमाव्यापार बंद झाल्याच्या फायदा इराणला मिळाला आहे.

 

आता आपण भारत-अफगाणिस्तानच्या व्यापाराकडे वळूया. २०१० मध्ये भारताची अफगाणिस्तानमधील निर्यात फक्त ११५.६ मिलियन डॉलर्स एवढी होती. २०१८ मध्ये हीच निर्यात १ बिलियन डॉलर्स एवढी झाली. २०२० मध्ये हीच निर्यात २ बिलियन डॉलर्स पर्यंत वाढविण्याचे दोन्ही देशांनी ठरविले आहे. सध्या भारत इराणमधील छाबहार बंदरामार्गे अफगाणिस्तानशी व्यापार करीत आहे. तसेच नवी दिल्ली आणि मुंबईहून काबुलला जाणाऱ्या दोन हवाई मार्गाने सुद्धा निर्यात होत आहे.

 

अफगाणिस्तानातील नाटो सैन्य मागे घेणे, वारंवार विश्वासघात होणे, कायदा आणि सुव्यवस्थेच्या समन्वयाचा अभाव, सीमा व्यापारावर सातत्याने येणारी बंदी आणि इराण मार्फत व्यापार चालू ठेवणे या सर्व गोष्टींमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानात होणारी निर्यात घटली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अफगाणिस्तान हा चोहोबाजूंनी जमिनीने वेढलेला देश आहे. त्यामुळे त्याने त्याची आयात वेगवेगळ्या मार्गांनी करण्याचे ठरविले आणि त्याने शेजारील देशातून सुद्धा आयात करण्याचे ठरविले. पाकिस्तानसंदर्भात सतत वाटण्याऱ्या अविश्वासामुळे त्यांनी पाकिस्तानवर असलेले आपले अवलंबित्व कमी केले.

 

इम्रान खान यांनी नुकतेच संबंधित अधिकाऱ्यांना ६ महिन्याच्या आत पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तुर्कम सीमा द्विपक्षीय व्यापारासाठी खुली करण्याच्या सर्व तरतुदी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

 

पाकिस्तान अफगाणिस्तानला अन्नधान्य, तयार खाद्यपदार्थ, गहू आणि गव्हाचे पीठ, साखर आणि तांदूळ तसेच सिमेंट, पेट्रोलियम उत्पादने जसे की केरोसीन, जेट इंधन पुरविते. बटाटे आणि भाज्या, बियाणे, वैद्यकीय उत्पादने, काॅलिफ्लॉवर निर्यात करते. काबूल प्रशासन भारताच्या प्रभावाखाली आले आहे. आणि पाकिस्तानवरील आपले अवलंबित्व कमी करण्यासाठी त्यांनी इतर देशांकडून आयात करायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या आयातीची किंमत इतर देशांच्या आयातीच्या किमतीपेक्षा खूप कमी असूनही अफगाणिस्तानने शेजारील देशांकडून आयातीस सुरुवात केली आहे.

 

पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तान यांच्यातील त्रिपक्षीय व्यापारावरील करारपत्र तयार करण्यामध्ये अफगाणिस्तान व्यत्यय आणीत आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये अजून कोणताही करार होऊ शकला नाहीये. काबूलला वाघा बॉर्डरच्या माध्यमातून भारताशी व्यापार करायचा आहे. आणि काबूलला हे त्रिपक्षीय करारात देखील समाविष्ट करावयाचे आहे. परंतु पाकिस्तानने यास मान्यता दिलेली नाही कारण मग हा करार त्रिपक्षीय न राहता चतुर्भुज करार होईल. भारताला समाविष्ट करून घ्यायचे म्हणजे या कराराचे मूळ स्वरूपच बदलून जाईल असे पाकिस्तानचे म्हणणे आहे.

 

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk)

Source: Indian Defence News

Pakistan faces a major blow to its exports to Afghanistan, thanks to India.