हज यात्रेकरिता देण्यात येणारी ४५० कोटी रुपयांची सबसिडी पाकिस्तान सरकारने केली बंद.
         Date: 07-Feb-2019

हज यात्रेकरिता देण्यात येणारी ४५० कोटी रुपयांची सबसिडी पाकिस्तान सरकारने केली बंद.

 

हज सबसिडी रद्द करण्याच्या पाकिस्तान सरकारच्या निर्णयामुळे देशाच्या खजिन्यातील ४५० कोटी रुपये वाचतील असे पाकिस्तानच्या आंतरधर्म सलोखा मंत्री नुरुल हक काद्री यांनी सांगितले.

 

हज सब्सिडी रद्द करण्याचा निर्णय नुकताच इस्लामाबादमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. या बैठकीत इस्लाममध्ये सबसिडी घेऊन केलेली हज यात्रा मान्य आहे की नाही यावर बरेच वाद झाले.


 

"मागील (पीएमएल-एन) सरकार प्रत्येक तीर्थयात्रेवर ४२,००० रुपये सबसिडी देत असे. ज्यामुळे राष्ट्रीय खजिन्यावर ४५० करोड रुपयांचा अतिरिक्त भार पडत असे. देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीकडे बघता फेडरल कॅबिनेटने या सबसिडीला मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे." असे कादरी यांचे नाव घेऊन मंगळवारी द न्यूज ने सांगितले.

 

या वर्षी १,८४,००० पाकिस्तानी नागरिक हज यात्रा करणार आहेत. त्यापैकी १,०७,००० लोक सरकारी अनुदानातून तर उरलेले स्वतःच्या खर्चाने जाणार आहेत अशी माहिती मंत्र्यांनी दिली.

 

"या यात्रेकरूंना देण्यात येणारी ४५० कोटी रुपयांची सबसिडी सरकारने मागे घेतली आहे. हज यात्रेची वाढलेली किंमत ही सौदी सरकारने जे मूल्यवर्धित कर (व्हॅट) लादले आहेत त्यामुळे आहे. तसेच रुपयाचे झालेले अवमूल्यन सुद्धा यास जबाबदार आहे." असे त्यांनी सांगितले.

 

" पाकिस्तान्यांचा हज यात्रेवरील खर्च तरीही कमी आहे. जर आपण अमेरिकन डॉलर्सच्या हिशोबात पाहायचे ठरविले तर भारत, बांगलादेश, मलेशिया आणि इंडोनेशिया हे या यात्रेचा खर्च जास्त घेत आहेत. माझ्या मंत्रालयाने सबसिडी रद्द होऊ नये म्हणून खूप प्रयत्न केले. परंतु फेडरल कॅबिनेट ने ते ऐकले नाही आणि ही सबसिडी रद्द केली." असे स्पष्टीकरण या मंत्र्यांनी दिले.

 

गेल्या आठवड्यात फेडरल सरकारने हजच्या यात्रेच्या किमतीत ६० टक्क्यांनी वाढ केली आणि प्रत्येक यात्रेकरूंच्या डोक्यावर १,५६,००० रुपयांचा अतिरिक्त भार घातला.

 

हज यात्रेच्या किंमती वाढविणे आणि हज यात्रेकरूंना देण्यात येणारी सबसिडी रद्द करण्याबद्दल विरोधी पक्षाच्या राजकीय नेत्यांनी इम्रान खान सरकारवर कडाडून टीका केली.

 

हज तीर्थयात्रा ही इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक स्तंभ आहे. ही यात्रा करण्यासाठी जर तुम्ही निरोगी असाल आणि यात्रा करण्याएवढी साधने तुमच्याजवळ असतील तर प्रत्येक मुसलमान व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी ही यात्रा करावी असे म्हटले जाते.

 

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk)

Source: WION

Pakistan government to save Rs 450 crore by abolishing Haj subsidy to pilgrims: Minister.