पाकचे विभाजन- दुसरी शक्यता, स्वतंत्र पश्तुनिस्तान
         Date: 26-Mar-2019
पाकचे विभाजन- दुसरी शक्यता, स्वतंत्र पश्तुनिस्तान
पख्तुन असंतोषामुळे डुरंड लाईनचे अस्तित्व धोक्यात?

मागील लेखात आपण बलुचिस्तान स्वतंत्र राष्ट्र म्हणुन उदयाला येण्याच्या शक्यतेचा ( बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची शक्यता आणि युद्धाशिवाय पाकिस्तानला नमवण्याचे उपाय ) आणि त्यामागील आंतरराष्ट्रीय कारणांचा विचार केला. आता आपण पाकिस्तानच्या पश्तुन भागात असलेल्या प्रचंड असंतोषाचा आढावा घेऊ आणि पाकिस्तान- अफगाणिस्तानमधील पश्तुन समाजाला कृत्रिमरित्या विभागणी करणाऱ्या "डुरंड लाईन" च्या विरोधात रोज वाढणाऱ्या रागाचा मागोवा घेऊ.
 
पाकिस्तानातपश्तुन लोकसंख्या १५% च्या आसपास आहे आणि ती डुरंड लाईनला लागुन असलेल्या वझिरीस्तान भागात एकवटलेली आहे. पाकिस्तानी सैन्यात पश्तुन सैनिकांचे प्रमाण त्यांच्या लोकसंख्येच्या जवळपास दुप्पट किंवा त्याहुनही जास्त आहे. बांग्लादेश युद्धाच्या वेळी पाकिस्तानचे सेनाप्रमुख असलेले जनरल नियाझी आणि सध्याचे पंतप्रधान इम्रान खान नियाझी दोघेही पश्तुन होते/आहेत. जात्याच लढाऊ जमात म्हणुन जगभरात नावाजलेले पश्तुन/पठाण/पख्तुन पाकिस्तानसाठी नेहमीच हिरीरीने लढत, बलिदान देत आलेले आहेत. परंतु पाकिस्तानच्या सैन्यावर, सरकारवर आणि यंत्रणावर पोलादी पकड असलेल्या पाकिस्तानी पंजाब्यांनी पश्तुनांना कायमच दुय्यम आणि अवमानास्पद वागणुक दिलेली आहे.
 
अफगाणिस्तान मधील सोविएट विरोधी युद्धात पाकिस्तानने संपुर्ण देशभरातून कडव्या सुन्नी मुस्लिम तरुणांची "मुजाहिदीन" भरती करून त्यांना डुरंड लाईन वरच्या या पश्तुन प्रदेशात आणुन, तिथुन सोविएट विरोधात युद्ध केले. यासाठी तेव्हा "मुजाहिदीन" आणि मग तालिबान, तेहरिक ए तालिबान, लष्कर ए झंघवी, लष्कर ए तय्यबा, जमात उद दावा अश्या अनेक "टेरर प्रॉक्सीज" पाकिस्तानी सेना आणि आय.एस.आय. ने तयार केल्या. पण आतंकवादाचा शिक्का मात्र फक्त पश्तुनांच्या माथी मारला गेला.
 
मुजाहिदीन तयार करण्यासाठी पंजाबी मौलाना सामी उल हक़ याने वझिरीस्तानमधील मिरानशाह येथे "मदरसा हक्कानिया" उभारला. याच मदरशाचे सर्वात उत्तम प्रोडक्शन होते हक्कानी नेटवर्कचा संस्थापक जलालुद्दीन हक्कानी. हाच जलालुद्दीन इस्लाम आणि युद्धशास्त्र दोन्हीत पारंगत होता. सोविएट वापसीनंतर जलालुद्दीन हक्कानी अफगाणिस्तानमध्ये ट्रायबल मामल्यांचा मंत्री बनला. यावरून तालिबानवर पाकिस्तानी प्रभावाची आपल्याला कल्पना येऊ शकते.
 
पाकिस्तानचे तथाकथित "वॉर ऑन टेरर"
 
पुढे सोविएट पराभवानंतर पाकिस्तानने "तालिबान" तयार करून त्यांना सैनिकी मदत पुरवून अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेतली. एकेकाळी अमेरिकेच्या गळ्यातला ताईत असलेला ओसामा बिन लादेन याने १९९८ मध्ये खुद्द अमेरिकन दूतावासावर आफ्रिकेत हल्ले घडवले आणि २००१ मध्ये अमेरिकेत ९/११ चे हल्ले केले. अमेरिकेने सहयोगी देशांसह तालिबानचा बिमोड करण्यासाठी अफगाणिस्तान मोठी सैनिकी कारवाई सुरु केली. यामुळे लाखो अफघाणी विस्थापित म्हणुन डुरंड लाईन पार करून पाकिस्तानात आले आणि त्यांच्यात मिसळुन हजारो तालिबान अतिरेकीसुद्धा! मग अमेरिकेने तत्कालीन पाकिस्तानी सत्ताधीश जनरल मुशर्रफवर दबाव आणुन (पैसे आणि शस्त्रांची लालूच दाखवुन! ) पाकिस्तानच्या पश्तुन बेल्ट मध्ये तालिबानवर कारवाई करायला भाग पाडलं.
जनरल मुशर्रफने अत्यंत धूर्तपणे निर्दोष पश्तुन नागरिक आणि गावे यांच्यावर "तालिबानचा बिमोड" नावाखाली अत्यंत क्रूरपणे सैनिकी बाल वापरले. यावर लक्ष ठेवायला अमेरिकन सेना आणि गुप्तचर अधिकारी पाकिस्तानी सैन्यासोबत सामील होते, पण जमिनीवर पाकिस्तान नेमकं कुणाला मारत आहे हे अमेरिकन्सन समजण्याची काहीच सोय नव्हती. या कारवाईत हजारो पश्तुन मारले गेले आणि लाखो बेघर झाले. जनरल मुशर्रफने खऱ्या तालिबान अतिरेक्यांना पाकिस्तानी सेनेच्या कॅम्प्समध्ये लपवुन यातुन वाचवले. तालिबान आणि अमेरिकन्स दोघेही खुश! मेले बिचारे पश्तुन!
 
पुढे २०१४ मध्ये पाकिस्तानी सैन्याने जनरल राहील शरीफ सेनाप्रमुख असताना पश्तुन बेल्टमध्ये आधीपेक्षा वाईट आणि रक्तलांछित असं ऑपरेशन झर्ब ए अझब राबवलं. यादरम्यान वझिरीस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याने अनियंत्रितपणे आपली वायुसेना वापरून निर्दोष, निशस्त्र पश्तुनांची अक्षरशः कत्तल केली. एकुण ६५,००० घरे आणि व्यापारी प्रतिष्ठाने यादरम्यान जमीनदोस्त झाली. दोन्ही कारवायांमध्ये १.५ लाख पश्तुन मारले गेले आणि अपंग झाले. सैन्याने नागरी भागात पेरलेल्या भूसुरुंगांमुळे आजपर्यंत शेकडो निष्पाप पश्तुन बालके मरत आहेत किंवा अपंग होत आहेत आणि अजुनही दर आठवड्याला असे स्फोट कित्येकांचे हात-पाय तोडून टाकत आहेत. पाकिस्तानी सरकारने अनेक वेळा नुकसानभरपाई देण्याची केलेली घोषणा हवेत विरली आहे.
अशा अनेक घटना आणि पाकिस्तानी सैन्य आणि आय.एस.आय.च्या नादानीतून उभ्या राहिलेल्या अतिरेकी संघटनाची फळे पश्तुनांना भोगावी लागल्याने ते पाकिस्तानच्या कल्पनेपासून कोसो दूर गेले आहेत. शिवाय त्यात नवनवीन घटनांची भर रोज पडत आहे.
 
नकीबुल्ला मेहसूद आणि पोलीस अधिकारी ताहीर दावड यांची हत्या...
 
जानेवारी २०१८ मध्ये पाकिस्तानी पोलिसांनी देखण्या युवा पश्तुन मॉडेल आणि गायक असलेल्या नकीबुल्ला मेहसूदला पळवून नेले. खोट्या चकमकिंसाठी कुप्रसिद्ध पोलीस अधिकारी राव अन्वर याने त्याला अतिरेकी असल्याचा आरोप करून गोळ्या घातल्या. या घटनेने पाकिस्तानी पश्तुन समाजात मोठा संताप उसळला. युवा कार्यकर्ता मंझूर अहमद पश्तीन याने याविरोधात शांततापूर्ण आंदोलनाचे आवाहन केले आणि हजारो पश्तुन "पश्तुन तहफ्फुझ मुवमेंट" च्या नावाखाली रस्त्यावर उतरले. अवघ्या एका वर्षाच्या आत या युवा वादळाने आणि त्याच्या पीटीएम ने पश्तुन लोकांमध्ये तुफान लोकप्रियता मिळवली.
 
मंझूर पश्तीनवर भारतीय हस्तक, ते अफघाणी चेला असल्याचे आरोप झाले. त्याच्याविरुद्ध साम-दाम-दंड भेद सर्व पउपाय वापरून झाले. पण त्याची चळवळ वाढतंच राहिली. मंझूर पश्तीनच्या साथीने लढणारे पाकिस्तानी संसदेत वझिरीस्तान मधुन निवडुन गेलेले दोन खासदार मोहसीन दावड आणि अली वझीर यांना पेशावर विमानतळावरून विदेशात जाणाऱ्या विमानातुन उतरवुन अटक करण्यात आली. त्यांचे पासपोर्ट जब्त करण्यात आले. याची तीव्र प्रतिक्रिया उमटल्यावर दोघांना सोडुन देण्यात आलं. अशीच कारवाई पश्तुन कार्यकर्ती गुलालाई इस्माईलच्या विरोधातही करण्यात आली. तीही कारवाई अंगाशी आल्यावर सरकारने माघार घेतली.
 
संयुक्त राष्ट्रसंघाच्या मोहिमांमध्ये भाग घेतलेले लोकप्रिय पश्तुन पोलीस अधिकारी एस.एस.पी. ताहीर दावड इस्लामाबादेत आले असताना उच्च सुरक्षा व्यवस्था असलेल्या भागातुन त्याचं अपहरण करण्यात आलं. पुढे १८ दिवसांनी त्यांचा मृतदेह अफगाणिस्तानमध्ये मिळाला. पुर्ण सीमा बंद असताना त्यांना सीमेपार कुणी आणि कसं नेलं हे आजही कोडं आहे, या हत्येनंतर प्रचंड जनक्षोभ उसळला. ताहीर दावड यांचा मृतदेह तुर्खाम सीमेवरून पाकिस्तानात आणला गेला. परंतु स्थानिक पश्तुन जमात असलेल्या शिनवारी जमातीने पाकिस्तानचे गृहमंत्री शेहरीयार आफ्रिदी यांना मृतदेह देण्यास नकार दिला. पुढे त्यांच्या अंत्यसंस्कारांच्या वेळी दावड यांच्या पत्नीने मृतदेहावर पाकिस्तानी राष्ट्रध्वज घालण्यास मनाई केली. अनेक सरकारी अधिकारी, मंत्री आणि सेना अधिकारी यांच्या उपस्थितीत जमलेल्या जमावाने पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात तुफान घोषणाबाजी केली. ज्या पाकिस्तानात समाजमानसात सैन्याला देवाचा दर्जा आहे तिथे सैन्य आणि गुप्तचर संघटनेच्या विरोधात उघड घोषणाबाजी बघुन पाकिस्तानी समाज धास्तावला.
 
या घटनेने पाकिस्तानी सरकार/ सेना आणि पश्तुन यांच्यातील दरी खुपच रुंदावली. याचा दीर्घकालीन परिणाम काय होईल? आणि डुरंड लाईनचं भवितव्य काय?
 
डुरंड लाईनच्या अस्तित्वावर संकट?

 
 
मागे आपण बघितल्याप्रमाणे डुरंड लाईन ही अत्यंत अन्यायकारक आणि अनैसर्गिक रचना आहे. १८३४ पर्यंत अफगाणिस्तानची हिवाळी राजधानी असलेलं पेशावर शहर आज पाकिस्तानात आहे. पाकिस्तानात पश्तुन समाजाला दुय्यम आणि अवमानास्पद वागणुक मिळते ही भावना बलवत चालली आहे. "पाकिस्तान हे पंजाबिस्तान" आहे असं बलुच आधीपासून म्हणत आले आहेत आणि आता पश्तुनही ते खुलेआम म्हणत आहेत.
याच भावनेचं प्रतिनिधित्व करत वझिरीस्तानमधील खासदार आली वझीर यांनी १६ मार्च २०१९ ला आपल्या वझीर जातीची पारंपारिक संघटना "वझीर जिर्गा" चं नेतृत्व करत वाजतगाजत डुरंड लाईन पार केली. सरकारी फौजांनी त्यांना रोखण्याचा केलेला प्रयत्न निष्पळ झाला. "वझीर जिर्गा" पलीकडे गेल्यावर डुरंड लाईन मुळे ताटातूट झालेल्या अफगाणिस्तानमधील वझीर समुदायाने त्याचं जोरदार स्वागत केलं.
 
हा मोर्चा अनेक बाबतीत ऐतिहासिक होता. पाकिस्तानी पश्तुन अत्यंत वेगाने पाकिस्तानच्या कल्पनेपासून भावनिकदृष्ट्या दूर जात असताना एखाद्या बड्या राजकीय नेत्याने डुरंड लाईन पार करून दोन्ही बाजुच्या पश्तुन समाजाला एकप्रकारे एक करण्याचं आवाहन करणं भविष्यातल्या मोठ्या संघर्षाची नांदी आहे.
 
बरोबर ३० वर्षापुर्वी १९८९ ला अशीच एक कृत्रिम आणि अवमानास्पद भौगोलिक रचना जर्मनांनी धुळीस मिळवली होती, तिचं नाव आहे "बर्लिन भिंत" ही भिंत जर्मनांच्या हृदयात सलणारा काटा होता आणि रशियन साम्राज्य कोसळण्याआधी २ वर्षे जर्मन राष्ट्रवाद्यांनी ही भिंत धुळीस मिळवली. आज बरोबर ३० वर्षांनी या जगातली अजुन एक कृत्रिम रचना- जिने पश्तुन समाजाला अन्याय्य पद्धतीने आपल्या पुर्वजांची कर्मभूमी आणि जन्मभुमी असलेल्या अफगाणिस्तानपासुन तोडलं आहे ती "डुरंड लाईन" पुसली जाण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे.
 
दा संगा आझादी दा?
 
पश्तुन तहफ्फुझ मुवमेंटचं गीत आहे "दा संगा आझादी दा?"- हे कोणत्या प्रकारचं स्वातंत्र्य आहे? असा त्याचा अर्थ! पाकिस्तानात पश्तुन लोकांजवळ होत असलेल्या भेदभावाची वेदना मांडणारं हे गीत समाजात तुफान लोकप्रिय झालंय.. आबालवृद्ध लोकांच्या ओठावर ते आज खेळत आहे. अशा भारलेल्या आणि विस्फोटक परिस्थितीत गेल्या महिन्यात पी.टी.एम.च्या सेन्ट्रल कमिटीमधील एक प्रभावशाली नेता प्रोफेसर अरमान लुनी यांना पेशावर पोलिसांनी अटक केलं. दुसऱ्या दिवशी पोलिसी अत्याचारांमुळे त्यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. यांमुळे संतापाची लाट उसळली. प्रोफेसर लुनी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि दोषींना सजा देण्याच्या मागणीसाठी येत्या ३१ मार्च रोजी पी.टी.एम.ने "पेशावर लॉंग मार्च फॉर अरमान" चं विशाल आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाला आताच मिळणारी प्रसिद्धी बघता यामुळे पश्तुन बेल्टमध्ये जबरदस्त वादळ निर्माण होईल यात शंका नाही. येणाऱ्या काळात ही "पश्तुन अशांती" क्रमाक्रमाने वाढत जाऊन एक दिवस "डुरंड लाईन" चा घास घेऊनच थांबेल यात कोणतीही शंका नाही!
 
पाकिस्तानच्या भावनिक संकल्पनेपासून पहिले बंगाली दूर गेले आणि १९७१ ला बांग्लादेश नावाचा नवा देश उदयास आला. पण "इतिहासातून कोणताही बोध घ्यायचा नाही" असा निश्चय केलेल्या पाकिस्तानी पंजाबी नेतृत्वाने तीच चुक बलुच लोकांच्या बाबतीत केली. आणि आता पश्तुन समाजाला "अफघाणी", "अतिरेकी", "रानटी" म्हणत स्वतःच्या हाताने पाकिस्तानच्या कल्पनेपासून लांब लोटण्याची तयारी पाकिस्तान करत आहे...
येणाऱ्या काळात आपल्या पश्चिम सीमेवर "बलुचिस्तान" आणि "पश्तुनिस्तान" हे अजुन दोन नवे देश किंवा बलुचिस्तान हा नवा देश आणि "डुरंड लाईन" संपून अफगाणिस्तानचा विस्तार झालेला आपल्याला बघायला मिळेल यात शंका नाही!
 
---- विनय जोशी