भारताचे पाकिस्तान संदर्भातील पर्याय
         Date: 03-Mar-2019

 भारताचे पाकिस्तान संदर्भातील पर्याय.

 

बालाकोटवर भारताने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने जराही उसंत घेतली नाही. आततायीपणे भारतावर प्रतिहल्ला करून आपण सुद्धा काही तरी करू शकतो हे जगाला दाखवायचा प्रयत्न करून पाहिला. तथापि, आर्थिकदृष्ट्या खिळखिळा झालेला देश शत्रूचा रोष फार काळ सहन करू शकत नाही कारण भारत केव्हाही पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवू शकतो. याचमुळे पाकिस्तानचे लष्कर हे युद्ध नाही असे ठामपणे सांगत आहे. म्हणजेच भासवत आहे.

 

पुलवामा येथील भ्याड हल्ला हा भारतासाठी अत्यंत वाईट होता. बऱ्याच काळापासून भारत पाकिस्तानकडून सीमापार होणाऱ्या दहशतवादी कृत्यांना प्रत्युत्तर देत नव्हता. परंतु पुलवामाचा हल्ला झाल्यानंतर मात्र त्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले. लोकांच्या मनात फक्त पाकिस्तानविषयी क्रोध नव्हता तर त्या राजकारण्यांविषयी सुद्धा होता ज्यांनी भारताची प्रतिमा सहिष्णू अशी करून ठेवली आहे.

 

 

पाकिस्तान आणि शांतता हे एक मृगजळ आहे. भारताची केलेली दिशाभूल आहे. भारतीय वायुसेनेने (आयएएफ) आपल्या मिराज २००० या विमानाने तेथील दहशतवाद्यांवर बॉम्ब हल्ला करून अतिशय थंडपणे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना आणि लष्कराला मोठा संदेश दिला आहे. पाकिस्तानी वायुसेना आणि बॉम्ब याना छेदून पाकिस्तानच्या अंतर्गत भागात घुसू शकण्याची आमची क्षमता आहे हे भारताने दाखवून दिले. यामुळे पाकिस्तानी लष्कराचे नाक कापले गेले. आपली लाज राखली जावी म्हणून त्यांनी या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी प्रती हवाईहल्ला केला.

 

डिसेंबर २००१ मध्ये तात्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी जैश-ए-मोहम्मदने केलेल्या संसदेवरील हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ताबडतोब हवाईहल्ले केले होते. त्यावेळी पाकिस्तानच्या हवाईदलातील F-16 ही विमाने उडण्यास सक्षम नव्हती ही संधी साधून भारत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद नष्ट करू शकला असता. परंतु हे घडू शकले नाही. १८ वर्षे राजकीय दडपणाखाली गमावलेली ही सुवर्णसंधी आपल्याला अत्ता मिळाली. त्यावेळी भारतीय वायुदलाचा मर्यादित वापर केला गेला. भारताने खूप उशिरा का होईना केलेल्या हवाई शक्तीच्या योग्य त्या वापराने दहशतवाद्यांना स्पष्ट संकेत दिला आहे की भारत पाकिस्तानच्या परमाणू बागुलबुवाला घाबरत नाही.

 

एका परमाणू शक्तिधारी राष्ट्राने दुसऱ्या परमाणू शक्तिधारी राष्ट्राच्या अंतर्गत भागात शिरून केलेला पहिला एअरस्ट्राईक बालाकोट मध्ये झाला. जशास तसे हा पाश्चात्यांचा सिद्धांत आण्विक युद्धाला कारणीभूत ठरतोय. पाकिस्तानी अधिकारी आततायीपणा करतील पण आत्मघातकीपणा करणार नाहीत. आपल्या तथाकथित आण्विक सुरक्षेविषयी असलेली त्यांची भूमिका आता उघड झाली आहे.

 

आता आणखी एक मूलभूत प्रश्न असा आहे की यामुळे भारतातील परिस्थितीला कलाटणी मिळेल का? भारताला सतत इजा पोहोचवता येणार नाही असा नवीन आणि ठाम संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचेल का? पाकिस्तान पुन्हा प्रतिकार करणार नाही अश्या अंदाजाने आणि देशातील जनतेच्या क्रोधाला आवर घालण्यासाठी २०१६ च्या सर्जिकल स्ट्राईक प्रमाणे केला गेलेला आत्ताचा बालाकोटचा स्ट्राईक भारत पुन्हा घडवून आणेल? एकच सर्जिकल स्ट्राईकचा घाव आणि एकच एअर स्ट्राईक पाकिस्तानला धडा शिकवण्यास पुरेसा आहे का?

 

ज्या संख्येने बालाकोटमधील दहशतवादी मारले गेले आहेत ती पाहता पाकिस्तानला मोठी किंमत चुकवावी लागली आहे. ज्या वेगाने त्यांनी या स्ट्राईकला प्रत्युत्तर दिले आहे ते पाहता भारतात ते यापुढे नक्कीच काहीतरी घातपात घडवून आणायचा प्रयत्न करतील. जसे की २०१६ च्या सर्जिकल स्ट्राईक नंतर ज्याप्रकारे त्यांनी नागरूट ते पुलवामा वर दहशतवादी हल्ले केले.

 

भारताने पाकिस्तानची हरप्रकारे कोंडी करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जर नवी दिल्लीची स्वतःचीच इच्छा नसेल तर भारत कसा काय आंतरराष्ट्रीय समुदायाकडून त्याने पाकिस्तानला वाळीत टाकावे अशी अपेक्षा करणार? भारताने पाकिस्तानला एक दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करण्यास नकार दिल्यामुळे पाकिस्तान पुन्हा पुन्हा त्याचा फायदा घेऊन भारतावर हल्ला करीत आहे.

 

लष्करी परिमाणे सोडल्यास इतर उपायांनी सुद्धा भारताने पाकिस्तानला दंडित करण्याच्या बाबतीत भीड बाळगली आहे.

 

जसे की भारत आपल्या १९७४ च्या अणुचाचणीस "शांततापूर्ण" असे संबोधतो, त्याचप्रमाणे आपल्या बालाकोट स्ट्राईक ला तो "अलष्करी" कृतिशील कृती असे म्हणतो. परंतु पाकिस्तानी लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तरामुळे या गोष्टीला अर्थ रहात नाही. सध्याच्या परिस्थितीबद्दल पाकिस्तानने दिलेल्या चुकीच्या माहितीविरुद्ध पुरावा न देता शांत राहण्याचा अर्थ असाच होतो की डोकलामच्या घटनेनंतर भारताने काहीच बोध घेतलेला नाही.

 

पाकिस्तान गेल्या कित्येक वर्षांपासून भारताशी युद्धच खेळत आला आहे या वस्तुस्थितीचा सामना भारताने करायला हवा. त्यांच्या या कृत्याला "दहशतवाद" असे लेबल लावल्याने त्याच्या या युद्धाच्या परिमाणांची तीव्रता कमी होते आणि पाकिस्तान विषयक कोणतेही वर्तमान, क्रियाशील दृष्टिकोनाचे धोरण टाळले जाते. १९८० पासून एकतर्फी सुरु असलेल्या या युद्धात भारत भरडला जातोय. सरळ सरळ युद्ध छेडले गेले तर जेवढं नुकसान होईल त्याच्या कितीतरी पट नुकसान अश्याप्रकारच्या युद्धामुळे भारताला सहन करावे लागतेय. जोपर्यन्त या दहशतवादी पाकिस्तानशी भारत युद्धास तयार होत नाही तोपर्यंत हे पाकिस्तानी भारतात दहशतवादी पाठवतच राहतील.

 

ब्रह्मा चेल्लनी यांच्या लेखाचा स्वैर अनुवाद. लेखक रणनीती तज्ञ आहेत.

 

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk)

 

Source: The Hindustan Times

 

India’s options on Pakistan.