नवाझ शरीफ यांची कन्या ठरतेय पाकिस्तान सरकार आणि लष्कराची डोकेदुखी.
         Date: 15-Jul-2019

नवाझ शरीफ यांची कन्या ठरतेय पाकिस्तान सरकार आणि लष्कराची डोकेदुखी.

 

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी लंडनमध्ये आंतरराष्ट्रीय समुदायापुढे पाकिस्तानची प्रतिमा चांगली करण्याच्या दृष्टीने पाकिस्तानमधील पत्रकारिता कोणत्याही दबावाखाली नसून ती मुक्त असल्याचा दावा केला.

 

युके आणि कॅनडा सरकारच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या प्रेस फ्रीडम कॉन्फरन्समध्ये बोलताना ते म्हणाले," माझ्यावर विश्वास ठेवा, आमच्याकडे मीडियाचा आवाज दाबला जात नाही. त्यांची मुस्कटदाबी केली जात नाही. त्यांना नियंत्रणात वगैरे ठेवण्याचा प्रश्नच येत नाही." ११ जुलै रोजी झालेल्या कॉन्फरन्स मधील त्यांच्या भाषणावर वार्ताहरांनी बहिष्कार टाकला होता.

 

परंतु त्यांचे हे वक्तव्य खोटे ठरविणारी घटना लंडन पासून हजारो किलोमीटरवर त्यांच्या देशात त्याच वेळी घडत होती. एका खाजगी वृत्त वाहिनीवर कुरेशी यांच्या सत्ताधारी पार्टीच्या विरोधी पक्षाच्या नेत्या मरियम यांची लाईव्ह मुलाखत घेतली जात होती. १० मिनिटानंतर ही मुलाखत थांबविण्यात आली. मुलाखत घेणाऱ्या पत्रकाराने असे सांगितले की ही मुलाखत धाकदपटशा दाखवून जबरदस्तीने थांबविण्यात आली.

 

 

"  प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सगळ्या षडयंत्रात इम्रान खान यांचा हात आहे. या सगळ्यातून त्यांचा फायदा झाला आहे." असा आरोप मरियम हिने तिचा हम न्यूज वरचा लाईव्ह शो थांबविण्यात आल्यावर केला. या शो मधील मुलाखतकार नदीम मलिक याने शो बंद पाडण्यात आल्यानंतर ट्विटर वर याचे प्रसारण चालूच ठेवले. जेणेकरून ही मुलाखत पूर्ण होईल.

 

" ते मरियम नवाझ ला नव्हे तर सत्याला घाबरतात. आता तर ते कचरत आहेत. माझ्या वडिलांच्या कार्यकाळात जवळपास चार वर्ष या लोकांनी त्यांच्या विरुद्ध कट कारस्थाने करण्यात घालवली.   पीटीआयचा सांसदीय निवडणुकीत झालेला विजय हा पाकिस्तानच्या लष्कराच्या वरदहस्तामुळे मिळालेला विजय होता," असेही त्या म्हणाल्या. पीटीआय ने लष्कराचा आमच्या विजयात कसलाही वाटा नसून आम्हाला लोकांनी निवडून दिले आहे असे सांगितले तर लष्कराच्या प्रवक्त्याने राजकारणात आमचा काहीही हस्तक्षेप नाही असे वारंवार सांगितले आहे.

 

गेल्या महिन्यात चाळीस वर्षाच्या मरियमला तिच्या पाकिस्तान मुस्लिम लीग नवाझ (पीएमएल-एन) या पक्षाने वरिष्ठ पदाचा मान दिला. मरियमने आल्या आल्या पीटीआयला आव्हान द्यायला सुरुवात केलीय. तिने तिच्या पार्टीच्या माध्यमातून पीटीआय विरुद्ध मोठी चळवळ उभारलीय आणि आता ती सशक्त विरोधी पक्ष म्हणून पीटीआयच्या समोर उभी ठाकलीय.

 

पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) सोबतच इतरही लहान सहान राजकीय पक्षांना हाताशी धरून, त्यांच्याशी गठबंधन करून तिने पीटीआयला मात देण्याची तयारी केली आहे. पर्यायाने पाकिस्तानचे  राजकारण आणि अर्थव्यवस्था यावर असणारा लष्कराचा प्रभाव कमी करायचा आहे.

 

संसदेचे सध्याचे अध्यक्ष सादिक संजरनी यांच्यावर या संयुक्त विरोधी पक्षाने आधीच अविश्वाचा ठराव पास केला आहे. आणि त्या विरोधात २५ जुलै हा " काळा दिवस" म्हणून घोषित सुद्धा केला आहे. वाढती महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत होणारी वाढ यामुळे मतदारांना लवकरच कळून चुकेल की त्यांनी पीटीआयला निवडून देण्यात केवढी मोठी चूक केलीय.

 

 

गेल्या वर्षी आपल्या वडिलांना भ्रष्टाचाराच्या आरोपात दोषी ठरवून शिक्षा देणाऱ्या न्यायाधिशाचा गुप्तपणे काढलेला एक विडिओ मरियमने प्रसारित करून मोठे वादळ निर्माण केले आहे. मला माझे भूतकाळातील चुकांचे काही व्हिडीओ एका अज्ञात व्यक्तीने दाखवून त्या व्हिडिओंमुळे मला ब्लॅकमेल करून शरीफ याना दोषी ठरविण्यास भाग पाडले असे या व्हिडिओमध्ये न्यायाधीश अर्शद मलिक सांगताना दिसत आहेत. या व्हिडीओने खूप खळबळ माजविली आहे. त्यांनी मात्र हा व्हिडीओ खोटा असल्याचे सांगितले आहे. इस्लामाबाद न्यायालयाने त्यांना निलंबित केले आहे.

 

"तीन वेळा पंतप्रधान म्हणून निवडून आलेले नवाझ शरीफ हेच खरे जनतेचे प्रतिनिधी आहेत. त्यांना मुक्त करा. त्यांना कट करून अडकवण्यात आले आहे. एकदा नाही तर अनेक वेळा. एका व्यक्तीवर सूड उगवण्यासाठी संपूर्ण राष्ट्राला हाताशी धरण्यात आले आहे. परंतु अल्ला ठरवेल कोणाला शिक्षा करायची आणि कोणाला आशीर्वाद द्यायचा ते." नवाझ शरीफ हे एका मोठ्या षडयंत्राचे बळी ठरल्याचे तिने ट्विट केले.

 

तिच्या या वक्तव्याने पीटीआयच्या नेत्यांवर कसलाही परिणाम झालेला नाही. तिच्या या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान इम्रान खान यांचे विशेष सहाय्यक फिरदोस आशिक अवान म्हणाले," आपल्याला लुटणाऱ्या नेत्याला जनतेने आपल्या मताधिक्याने, मतदानाच्या अधिकाराचा वापर करून राजकारणातून फेकून दिले आहे.

 

मरियम ही भूतपूर्व पंतप्रधान नवाझ शरीफ यांची कन्या आहे. नवाझ शरीफ याना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कैद झाली आहे. आपल्या वडिलांना मरियम कश्याप्रकारे सोडविते आणि देशात लोकशाही टिकवून ठेवण्यात काय योगदान देते या कडे पाकिस्तान जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

 

- प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk)

 

Daughter Of Jailed Former PM Challenges Pakistani Gov’t, Military