भारतीय सेना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पोचली आहे का?पाकव्याप्त काश्मीरमधील भारतीय सैनिकी कारवायांचे आकलन
         Date: 03-Aug-2019
भारतीय सेना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पोचली आहे का?
 
पाकव्याप्त काश्मीरमधील भारतीय सैनिकी कारवायांचे आकलन
 
(ICRR Media)
 
काल नामवंत सुरक्षा विश्लेषक सुशांत सरीन यांनी भारताने पाकव्याप्त काश्मीर मध्ये केलेल्या २ मोठ्या हल्ल्यांबद्दल एक ट्विट केलं आणि काही वेळात ते त्यांनी काढुनही टाकलं. त्यानंतर दिल्लीमधुन प्रकाशित होणाऱ्या द वीक या इंग्लिश साप्ताहिकाच्या वेबसाईटवर भारताने व्याप्त काश्मीरमध्ये मागील ४ दिवसात २ मोठे हल्ले केल्याचं आणि त्यात अनेक अतिरेक्यांसह कित्येक पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याची बातमी प्रकाशित केली. ही बातमी ६ परिच्छेदांची होती. पण अर्ध्या तासात तीही बातमी वेबसाइटवरून काढुन टाकण्यात आली.
 
 
३ दिवसांपूर्वी पाकव्याप्त काश्मीरमधल्या नीलम आणि झेलम नद्यांच्या संगमावर बांधण्यात आलेल्या पण अजून पूर्ण नं झालेल्या नौसेरी धरणावर भारतीय सैन्याने भीषण बॉम्बिंग केल्याची बातमी पाकिस्तानी आणि आंतरराष्ट्रीय मीडिया हाऊसेसनि प्रकाशित केली. भारतीय बॉम्बिंगमध्ये नौसेरी धरणाची २ दारे क्षतिग्रस्त झाल्याने मुझफ्फराबाद शहरात पुराची पूर्वसूचना देण्यात आली आणि शिवाय धरणावर काम करणारे ५० चिनी इंजिनियर्स सुरक्षित स्थळी हलवल्याची बातमी प्रकाशित झाली.
 
कालच्या चिनार कॉर्प्सचे (१५ कॉर्प्स) कमाण्डर ले.जन. धिल्लन यांच्या पत्रकार परिषदेत या सर्व बाबींवर काहीतरी खुलासा करण्यात येईल अशी आशा सर्वजण बाळगुन होते, पण याबद्दल एक शब्दही उच्चारण्यात आला नाही (आणि असंच केलं जावं!!)
 
काल सकाळपासुन पाकव्याप्त काश्मीरच्या (यालाच पाकिस्तानमध्ये आझाद जम्मु -काश्मीर AJK म्हटलं जातं) एका अधिकाऱ्याचं ३१ जुलैचं एक पत्र अत्यंत जबाबदार पत्रकारांनी सोशल मीडियावर प्रकाशित केलं. इंग्रजी आणि उर्दूमध्ये असलेल्या आणि सईद उल रहमान कुरेशी यांनी जरी केलेल्या या पत्रात काही धक्कादायक उल्लेख आहेत. (मुळ पत्र ICRR लिंकवर)

या पत्राच्या पहिल्या परिच्छेदात, "नुकत्याच भारतीय सैन्याने नियंत्रण रेषेवरून केलेल्या आक्रमणात आझाद काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात मानवी आयुष्याचं आणि इन्फ्रास्ट्रक्चरचं नुकसान झालं आहे" असा उल्लेख आहे. त्यापुढे म्हटल्याप्रमाणे भारतीय सेना "अमानवीय मार्गांचा वापर करून" निर्दोष नागरिकांना लक्ष करण्यासाठी "बुबी ट्रॅप्स", "लँड माईन्स" अन्य प्रकारची "ज्वालाग्राही उपकरणे" वापरत आहे असा उल्लेख केलेला आहे.
 
यापैकी बुबी ट्रॅप्स आणि लँड माईन्स प्रत्यक्ष जागेवर जाऊन लावावे लागतात. बुबी ट्रॅप्स एखाद्या संशय नं येणाऱ्या रोजच्या वापरात येणाऱ्या वस्तुत लावलेला बॉम्ब असतो, ज्याला धक्का लागला किंवा स्पर्श केला की तो फुटतो आणि माईन्स छोट्या पायवाटा, रस्ते यावर लावले जातात. पण ही दोन्ही स्फोटके तोफेतून पाहीजे त्या जागेवर फिट करता येत नाहीत, तर तज्ञ व्यक्तिला प्रत्यक्ष त्या जागेवर जाऊन ती लावावी लागतात.
 
ज्या दिवशी नियंत्रण रेषेवर भीषण गोळीबार झाला त्या दिवशी व्याप्त काश्मीरमधील लोकांचा सोशल मिडीयावर दिसणारा रोष आणि राग बघण्यासारखा होता. भारतीय सेना भीषण आग ओकत असताना, पाकिस्तानी मिडीया, सेना आणि एरवी नको नको त्या विषयांवर पोपटपंची करणारा सैन्य प्रवक्ता जनरल असिफ घफुर आज व्याप्त काश्मीरच्या लोकांच्या परिस्थितीबद्दल गप्प का, असा प्रश्न लोक विचारत होते.
दुसरी बाब ज्या धरणावर गोळीबाराचा पाकिस्तान उल्लेख करत होते ते धरणही नियंत्रण रेषेपासुन मोठ्या अंतरावर असल्याने छोट्या शस्त्रांच्या माऱ्यात ते येण्याची शक्यता नाही. तर मग नेमकं काय होतंय जमिनीवर?
अशा परिस्थितीत वरील सर्व मुद्द्यांचा विचार करताना अनेक नवे प्रश्न जन्माला येत आहेत.
 
 
१) जर व्याप्त काश्मीरच्या नीलम- झेलमच्या नौसेरी धरणावर नुकसान होण्याएवढं बॉम्बिंग खरंच झालं असेल, तर भारतीय अवजड तोफखाना व्याप्त काश्मीरच्या हद्दीत हलवला गेला आहे का? जर छोट्या "मॅन पोर्टेबल- शोल्डर फायर" तोफांनी धरणावर बॉम्बिंग झालं असेल तर, भारतीय सैनिक धरणाच्या खुप जवळ कोणत्याही पाकिस्तानी विरोधाला नं जुमानता किंवा विरोध मोडुन पोचले आहेत का?
 
 
२) २९- ३० जुलैच्या आसपास १५ ते ४५ पाकिस्तानी सैनिक भारतीय गोळीबारात मारले गेल्याची बातमी सोशल मिडीयावर आली होती, ते सैनिक भारतीय सैनिकांची "मुव्हमेंट" अडवताना मारले गेले असतील का?
 
 
३) व्याप्त काश्मीरचा अधिकारी सईद उल रहमान कुरेशी याच्या पत्रात उल्लेख केलेले "बुबी ट्रॅप्स" आणि "लँड माईन्स" वर उल्लेख केल्याप्रमाणे प्रत्यक्ष त्या जागेवर जाऊन "प्लांट" करावे लागतात; ते तसे केलेले आहेत त्यापासुन "आझाद काश्मीरच्या" नागरिकांनी सुरक्षित राहावं असं पत्रात म्हटलेलं आहे- याचाच अर्थ भारतीय सैनिक ते बुबी ट्रॅप्स" आणि "माईन्स" प्लांट करून तिथेच ठाण मांडुन बसले आहेत का?

४) आझाद काश्मीरचा अधिकारी ( आझाद काश्मीरचा स्वतंत्र पंतप्रधान असतो ) भारतीय सैनिकांनी पेरलेल्या बुबी ट्रॅप्स आणि माईन्सपासुन सावध राहण्याचे सल्ले स्थानिकांना देत आहे याचा अर्थ पाकिस्तानी सैन्य ते माईन्स "सॅनिटाईझ" करायला असमर्थ आहे किंवा पाकिस्तानी सैन्य आपली ठाणी/ चौक्या सोडुन पळुन गेलं आहे, असा याचा अर्थ घ्यायचा का? पाकिस्तानी सैन्याने पाकव्याप्त काश्मीरच्या काही भागातुन सरळ माघार/ पलायन केलं आहे का?
 

५) भारतीय सैन्याने नौसेरी धरणावर गोळीबार केल्याच्या बातम्या आल्या त्याच दिवशी व्याप्त काश्मीरमध्ये मुझफ्फराबाद येथे याच नीलम- झेलम प्रकल्पाविरोधात लोकांनी निषेध मोर्चे काढल्याचे व्हिडीओ सोशल मिडीयावर आले आणि त्याला नेहमीप्रमाणे अडवायला आलेले पाकिस्तानी सैनिक कुठेही दिसत नव्हते, याचा अर्थ काय? पाकिस्तानी सैन्य तिथे उपस्थित नाही का विरोध करायच्या स्थितीत नाही?

६) पाकिस्तानमध्ये नवाझ शरीफ यांची मुलगी मारियम शरीफ ही सध्या प्रचंड आंदोलन चालवत आहे आणि वझिरीस्तान खायबर पख्तुनख्वामध्ये जेलमध्ये बंद पश्तुन खासदार अली वझीर, मोहसीन दावड यांच्या सुटकेसाठी मोठी निदर्शने सुरु आहेत, याशिवाय बलुचिस्तानमध्ये जवळपास रोज पाकिस्तानी सैन्यावर जीवघेणे हल्ले होत आहे; या पार्श्वभुमीवर पाकिस्तानी सेना आणि आयएसआय ऐतिहासिक कोंडीत सापडली आहेत का?
 
 
सध्या काश्मीरच्या बाबतीत प्रश्न अनेक पण उत्तर एक अशी स्थिती आहे- आणि ते उत्तर "देव जाणे" एवढं साधं आणि सोप्पं आहे! त्यामुळे येणाऱ्या काळात होणाऱ्या घटना बघणे आणि स्वतःची बुद्धी वापरुन त्याचं जमेल तेवढं संतुलित विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणे एवढंच आपल्या हातात आहे!
 
--- विनय जोशी