३७० चा अंत आणि सुंदर नग्न तरुणी!
         Date: 05-Aug-2019
३७० चा अंत आणि सुंदर नग्न तरुणी!
(ICRR Current Affiairs)
 
आरंभ है प्रचंड- अशा थरारक घोषणेने सुरु झालेल्या एका विशाल प्रकल्पाचा पहिला टप्पा आज पूर्ण झाला. आनंददायक, अकल्पनीय, अद्भुत, अतर्क्य, अनाकलनीय, अनपेक्षित, अविश्वसनीय, अवाढव्य, अतिप्रचंड, धक्कादायक तितकाच धोकादायक, आश्वासक तितकाच जोखमीचा असा कलम ३७० आणि ३५-अ चा निर्णय एका तडाख्यात पूर्णत्वास गेला.
 
 
फक्त "स्वतः" नावाच्या व्यक्तीवर मोदी- शहा यांचा असलेला अतिप्रचंड विश्वास हेच एवढा मोठा निर्णय घेण्यामागचं या दोघांचं शक्तिस्थान होतं. मिळेल त्या मार्गाने, अर्धपोटी, अधाशी असल्यासारखे दुसऱ्या पक्षातले आमदार, खासदार यांनी गेल्या ५ वर्षात आपल्या पक्षात घेतले. चोर, गुंड, बलात्कारी, नीच, नादान हलकट, खुनी अशा सर्व सामाजिक थरातील लोक भाजपात घेतले (घेऊ का नये हा मुद्दा प्रत्येकाने आपापल्या क्षमतेने सोडवावा). या "कार्पेट बॉम्बिंग" ने विरोधी पक्षाच्या पाठीचा कणा आणि मानसिक धर्य मोडलं. आणि खचलेल्या विरोधी पक्षांमुळेच २०१९ लोकसभेत ३०३ चा आकडा गाठला.
 
 
नीतिमत्ता विसरून कुणालाही हे लोक भाजपात घेत आहेत, ही जोडी सत्तेच्या मागे लागली आहे असे आरोप झाले. त्यावर एका ऋषींची गोष्ट नेहमी सांगितली जाते, ती अशी.....
 
 
एकदा एक ऋषी आपल्या एका शिष्यासह आश्रमात परत येत असताना वाटेत मुसळधार पाऊस दोघांना झोडुन काढतो. आश्रमात पोचण्यासाठी एक नदी पार करणं अत्यावश्यक असतं पण ती पुराने रौद्ररूप घेऊन दुथडी वाहत असते. आणि एक अत्यंत सुंदर परंतु वादळ, पावसाच्या तडाख्याने कपडे विदीर्ण होऊन जवळपास नग्न झालेली तरुणी थंडीने कुडकुडत मदतीची वाट पाहत किनाऱ्याला बसुन असते. एका क्षणाचाही विचार नं करता ते ऋषी आपल्या हातातील कमंडलु शिष्याच्या हातात देऊन त्या तरुणीचा हात हातात धरून नदी पार करू पाहतात. पण थकलेली ती अर्धनग्न तरुणी चालुही शकत नाही म्हणुन ऋषी तिला उचलुन खांदयावर घेऊन एका हाताने शिष्याच्या हाताचा आधार घेऊन नदी पार करतात.
 
 
पैलतीरावर गेल्यावर तरुणीला खांदयावरून तिच्या जवळंच असलेल्या घरी सोडुन दोघे आश्रमात जातात. काळोख होत असतो, संध्यावंदन, भोजन करून दोघेही झोपतात. पण काही काळानंतर ऋषींना जाग येते तर शिष्य अस्वस्थ आणि जागा दिसतो.
 
ऋषी त्याला विचारतात, "बाळा तु जागा का आहेस?"
शिष्य घाबरत घाबरत म्हणतो, "गुरूवर .... ती.... तरुणी...?"
ऋषी, "तरुणी? काय झालं तिचं?"
शिष्य, "ती... नग्न... आणि.... तुम्ही?"
 
 
शिष्याच्या मनातील द्वंद्व ओळखुन ऋषी म्हणतात, "अच्छा, मी सन्यस्त असताना त्या अर्धनग्न तरुणीला उचलुन घेतलं याबद्दलच तु बोलत आहेस ना?"
शिष्य, "होय!"
यावर हास्याचा गडगडाट करत ऋषी म्हणतात, "बाळा, मी त्या तरुणीला तिच्या घरीच सोडुन आलोय, ज्या ठिकाणी ती माझ्या खांद्यावरून उतरली तिथेच मी तिला सोडली, पण तु मात्र तिला मनातुन आश्रमात घेऊन आला आहेस, तिला तु मनातुन तिच्या घरी पाठव म्हणजे शांत झोपशील !!"
 
 
मोदी- शाह कुणाचाही ऐकत नाहीत, सगळ्यांना दुय्यम समजतात, कुणालाही पक्षात घेतात याची दुसरी बाजु सतत "लक्ष्यावर" नजर ठेवतात, मुद्दे विसरत नाहीत, आणि जगातल्या कुणालाही शिंगावर घेण्याची धमक उरात बाळगतात ही आहे. आज कलम ३७० रद्द करताना त्यांनी अमेरिका, चीन, अरब देश आणि या सगळ्यांचा पाळीव प्राणी पाकिस्तान यांना एका क्षणात शिंगावर घेतलंय तो हाच माज नसानसात कुटुन कुटुन भरलेला असल्यामुळे! फक्त, फक्त आणि फक्त "स्वतः" नावाच्या व्यक्तीच्या सर्व क्षमतांवर पराकोटीचा विश्वास असल्यामुळेच!
 
 
आज विरोधी पक्षातील जे जे लोक राज्यसभेत ३७० साठी सरकारच्या मागे उभे आहेत ते काश्मीरच्या भल्यासाठी आणि देशाच्या अखंडतेसाठी मुळीच नाहीत; तर ते सर्वजण सीबीआय, ईडी, एनआयए यांच्या आक्राळविक्राळ जबड्याच्या भीतीने रांगेत उभे आहेत! तसेच जे मवाली- गुंड-बलात्कारी आज सत्ताधारी पक्षात आहेत तेही "सीबीआय, ईडी, एनआयए" या देवतांच्या कोपाच्या भीतीनेच!
 
 
त्यामुळे जशी ती सुंदर, नग्न, भिजलेली तरुणी त्या ऋषींनी नदीच्या पैलतीरावर तिच्या घरी सोडुन आपल्या आश्रमाची वाट धरली, तशीच आपणही, अयोध्या, व्याप्त काश्मीर आणि अन्य मोठमोठ्या आश्रमांची वाट धरूया!!! ऋषीवरील प्रेमापोटी आणि ऋषींच्या बदनामीच्या चिंतेने जशी त्या शिष्याला झोप लागत नव्हती तशी आपली स्थिती होणे एकदम स्वाभाविक आहे. पण पूर्वानुभव लक्षात ठेऊन आणि "ती" तरुणी ऋषी कायमची आश्रमात ठेवत नाहीत ना याकडे बारकाईने लक्ष ठेऊन आपण आपल्या मार्गाला चालत राहुया!
 
 
यात कुणालाही ऋषितुल्य मानणं किंवा देवत्व बहाल करणं वगैरे मुद्दा नाही. पण भारताच्या समोर असलेली अवघड आणि प्रचंड मोठी आव्हाने बाजुला करण्यासाठी तेवढीच प्रचंड शक्ति नेतृत्वाच्या हातात एकवटलेली असली पाहीजे. अशी शक्ति एकवटताना "शिव जी की बारात" जशी राक्षस, भुत, खेत, वेताळ, पिशाच्च यांनी भरलेली असते तशीच असणार, पण आपल्याला त्यांच्यासारखं होण्याचीअजिबात आवश्यकता नाही!
 
आरंभ है प्रचंड... त्यामुळे शेवटही तसाच असणार!
---- विनय जोशी