तेजस लढाऊ विमानांच्या नौसैनिक मॉडेलच्या अरेस्टेड लँडिंगची जमिनीवरील पहिली चाचणी यशस्वी
         Date: 14-Sep-2019
तेजस लढाऊ विमानांच्या नौसैनिक मॉडेलच्या अरेस्टेड लँडिंगची जमिनीवरील पहिली चाचणी यशस्वी
संरक्षण क्षेत्रातील "मेक इन इंडीया" कार्यक्रमाला अजुन एक प्राथमिक यश
(ICRR Defense/ Military Hardware) 
 
स्वदेशात विकसित केलेल्या तेजस लढाऊ विमानाच्या नौसैनिक मॉडेलची "अरेस्टेड लँडींग" तंत्राची पहिली यशस्वी चाचणी भारतीय नौसेनेच्या गोव्यातील हंस तळावर यशस्वीरीत्या पार पडली. वायुसेनेची लढाऊ विमाने नौसेनेच्या ताफ्यात सामिल करताना त्यांना विमानवाहक नौकांवर उडण्यासाठी आणि उतरण्यासाठी योग्य बनवण्यासाठी त्यात अनेक महत्वाचे बदल करावे लागतात. यापैकी सर्वात महत्वाचा बदल उतरताना जमिनीच्या तुलनेत अतिशय कमी अंतरात विमान उतरवण्यासाठी करावा लागतो.
 
 
अरेस्टेड लँडींग तंत्र- क्षणात २५० किमी प्रति तासावरून ० किमी प्रति तास
 
 
जमिनीवर मोठ्या धावपट्टीच्या तुलनेत विमानवाहु नौकेच्या लहान धावपट्टीवर उतरताना विमानाला नैसर्गिकरीत्या वेग कमी होण्याची वाट नं बघता कमीत कमी वेळात "शुन्य" वेगावर आणण्याच्या तंत्राला "अरेस्टेड लँडींग" म्हणतात. यासाठी विमानाच्या धुरांड्याच्या खाली एक "हुक" लँडींगच्या वेळी बाहेर येतो आणि विमानवाहु नौकेच्या डेकवर असलेल्या हुकामध्ये अडकुन विमानाचा वेग काही सेकंदात २५० किमी प्रति तासावरून ० किमी प्रति तासावर आणण्यात येतो.
 
 
यामध्ये उतरताना हुकने विमानवाहु नौकेच्या डेकवर अचुकपणे अडकणे आणि हुकमध्ये अडकुन विमान शुन्य वेगावर थांबत असताना विमानाच्या फ्रेमला कोणतीही इजा होऊ नं देणे ही आणि अशी अनेक तांत्रिक आव्हाने असतात. त्यावर मात करण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे. अशाप्रकारे जमिनीवरील अनेक चाचण्या झाल्यानंतर तेजसची विमानवाहु युद्धनौका विक्रमादित्यवर प्रत्यक्ष चाचणी होईल.
 
 
विमानवाहु नौकेवरील चाचणीतील आव्हाने...
 
सध्या झालेली चाचणी जमिनीवर झाली असुन अशा अनेक चाचण्या अजुन बाकी आहेत. प्रत्यक्ष युद्धनौकेवरील चाचणीच्या वेळी यापेक्षा कितीतरी जास्त आवाहने समोर येतात. उदाहरणार्थ, धावत्या युद्धनौकेच्या आणि समुद्री लाटांमुळे हलणाऱ्या नौकेच्या वेगाजवळ उतरणाऱ्या विमानाचा ताळमेळ बसवणे, उतरणाऱ्या विमानाचा वेग, स्थिती आणि युद्धनौकेच्या सतत बदलणाऱ्या स्थिती आणि वेगाचा अंदाज घेऊन, पायलटने आपल्या विमानाची स्थिती, उतरण्याचा वेग, कोन यांचा प्रत्यक्ष डोळ्यांनी बघुन अंदाज बांधुन नौकेच्या अरेस्ट लँडिंग हुकची स्थिती आणि विमानाचा हुक याचा अंदाज घेऊन आपले विमान उतरवणे आणि दोन हुक एकमेकात अडकत आहेत याची खात्री करणे अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो.
 
 
या सर्व प्रक्रियेत विमान, युद्धनौका आणि पायलट प्रचंड मोठ्या तांत्रिक आव्हानांचा सामना करतात, त्याचा ते तांत्रिकदृष्ट्या आणि व्यावहारिकदृष्ट्या कसा सामना करतात यावर याचं यश अवलंबुन आहे. शिवाय तेजसचा "अरेस्ट लँडींग गियर" भारतात बनलेला असला तरी भारतीय विमानवाहु युद्धनौका रशियन बनावटीच्या असल्याने त्या दोन वेगवेगळ्या "अरेस्ट लँडींग गियर्स" चा ताळमेळ कसा बसतो हेही बघणं महत्वाचं आहे.
 
 
सध्या अरेस्टेड लँडींग तंत्रज्ञान फक्त अमेरिका, रशिया, फ्रांस, ब्रिटन आणि चीनकडे आहे, त्यामुळे हे तंत्रज्ञान भारताला पुर्णपणे विकसित करता आल्यास ती भारतासाठी मोठी बाब ठरेल.
 
 
पण जमिनीवरील पहिली चाचणी यशस्वी झाली हीसुद्धा एक मोठी पायरी आहे. त्यामुळे लवकरच तेजसची नौसैनिक आवृत्ती विमानवाहु युद्धनौका विक्रमादित्यवर उतरेल यात काही शंका नाही.