जनरल कासीम सुलेमानीची हत्या, शिया- सुन्नी भीषण रक्तपाताची नांदी
         Date: 04-Jan-2020
जनरल कासीम सुलेमानीची हत्या, शिया- सुन्नी भीषण रक्तपाताची नांदी
 
(ICRR- Shia Sunni Conflict)

Qasem Soleimani Shia Sunn
 
 
८० च्या दशकात ईराण आणि इराकच्या दरम्यान दीर्घकाळ युद्ध होऊन त्यात जवळपास १० लाख मुस्लिम मारले गेले. शिया आणि सुन्नी इस्लाम मधील हा आधुनिक काळातील सर्वात रक्तरंजित आणि उघड सैनिकी संघर्ष होता. या युद्धात नुकताच सैन्यात भरती झालेला सैनिक कासीम सुलेमानी युद्धभुमीवर ईराणी सैनिकांना पाणी पुरवण्याचं काम करत होता.पण अल्पावधीत त्याच्या अंगभुत बेडरपणाने आणि वेगवान हालचालींनी तो सैन्यात मोठी प्रगती करत गेला. लवकरच तो ईराणी सैन्याचाच भाग असलेल्या पण ईराणच्या बाहेर ईराणी प्रभाव वाढवण्यासाठी वाटेल ते करणाऱ्या कुद्दस फोर्सेसच्या जबाबदारीत आला आणि बघता बघता बासिज मिलिशिया आणि कुद्दस फोर्सेसचा प्रमुख झाला.
 
 
जनरल सुलेमानीची शक्तिस्थाने...
 
 
येमेन, ईराण, सीरिया, बहारीन, इराक, अझरबैजान, लेबनॉन आणि अफगाणिस्तान अश्या मोठ्या पट्ट्यात राहणाऱ्या शिया मुस्लिमांना जोडणाऱ्या "शिया क्रेसन्ट" ला मजबूत करुन तो इराणच्या प्रभावाखाली आणण्यात जनरल सुलेमानीचं योगदान मोठं होतं. पहिल्या इराक- अमेरिका युद्धापासुन जनरल सुलेमानीवर अमेरिकन सैनिकांच्या हत्त्येचे आरोप झालेले आहेत. सध्या चालु असलेल्या सीरिया- इराक युद्धातही कित्येक हल्यात अमेरिकन सैनिकांवर हल्ले करुन त्यांना मारण्याचं नियोजन जनरल सुलेमानीच करत होता असा अमेरिकेचा आरोप आहे. २ दिवसांपुर्वी बगदाद मधील अमेरिकन दूतावासावर शिया मिलिशियाने केलेल्या हल्ल्यामागे याचंच डोकं असल्याचे आरोप होत होते. त्यामुळे अमेरिकेच्या दृष्टीने जनरल कासीम सुलेमानी हा लादेन नंतरचा सर्वात मोठा आणि महत्वाचा शत्रु होता.
 
 
 
इस्राएलचे कट्टर शत्रु असलेले लेबनॉनमधील हेजबुल्ला आणि पॅलेस्टाईनमधील हमास या अतिरेकी संघटनांना आत्मविश्वास आणि त्याजोडीला अत्याधुनिक मिसाईल्ससह सैनिकी सामुग्री अव्याहतपणे पुरवण्याची कामगिरी याच्याच मार्गदर्शनाखाली कुद्दस फोर्सेसनी यशस्वीपणे पार पाडली आहे. त्यामुळे मागच्या वर्षी इस्रायली सैन्य आणि गुप्तचर अधिकाऱ्यांनी जनरल सुलेमानीच्या हत्येची गरज उघडपणे बोलुन दाखवली होती. सीरिया युद्ध सुरु झाल्यापासुन इस्रायली वायुसेनेने बासिज मिलिशिया- कुद्दस फोर्सेस यांच्या सीरियामधील सैन्य ठिकाणांवर शेकडो हवाई हल्ले केले आहेत. आणि सीरिया- इराकमधील शिया मिलिशियाच्या इस्राएल- अमेरिका विरोधी हालचालींच्या मागे जनरल कासीम हीच एकमेव व्यक्ति आहे याबद्दल कोणाच्याही मनात दुमत नव्हतं त्यामुळे आज ना उद्या त्याच्यावर थेट हल्ला होणार ही काळ्या दगडावरची रेष होती.
 
 
 
सौदी अरेबिया आणि ईराण यांच्यातील वितुष्ट तर अत्यंत टोकाला गेलेलं आहे. येमेन मधील शिया हौथी गटांना इराणचा अर्थात कुद्दस फोर्सेसचा असलेला दमदार सैनिकी सहारा हेच सौदीच्या रागाचं सगळ्यात मोठं कारण आहे. यामुळे हौथी बंडखोर काही महिन्यात सौदी नेतृत्वाखालील इस्लामिक मिलिटरी अलायन्ससमोर गुडघे टेकतील या भ्रमात येमेन युद्धात शिरलेल्या सौदीचं नाक जनरल सुलेमानीने असं काही कापलं की सौदी आणि अमेरिका आपल्या अब्जावधी डॉलर्सचा येमेनमध्ये झालेला चुराडा नुसता बघत राहिले. हौथीना युद्धात हरवणं सोडाच, सौदीला स्वतःचा जीव कसाबसा वाचवत येमेनमध्ये तग धरण्याची नामुष्की ओढवली. इराणच्या दमदार सैनिकी मदतीमुळे हौथीनी येमेन युद्धातुन यूएईला बाहेर पडायला लावलं.
 
 
 
त्यातच सौदीच्या नाजरीन प्रांतात हौथीनी केलेल्या भयंकर हल्ल्यात सौदीच्या अक्ख्या ब्रिगेडला शरणागती पत्करावी लागली. हा प्रकार सौदीसाठी भयंकर मानसिक धक्का देणारा होता. त्यातच सौदीच्या सर्वात मोठ्या तेल उप्तादक कंपनी आरामकोवर इराणने केलेल्या ड्रोन हल्ल्यात सौदीच्या तेल उत्पादनाची आणि इभ्रतीचे ऐशीतैशी झाली. या हल्ल्यानंतर सौदीचा एकही मित्र इराणला धडा शिकवायला पुढे आला नाही, सौदी एकटा पडला. ईराणसोबत लढणं वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही याचं सौदीला भान आलं! नाजरीन हल्ला आणि आरामको हवाई हल्ला यात परत एकदा जनरल सुलेमानी सगळ्यांच्या फोकसवर आला.
 
 
 
 
या आणि अशा अनेक बाबींमुळे जनरल सुलेमानी ईराणमध्ये खोमेनीच्या खालोखाल लोकप्रिय व्यक्ति झाला. भावी राष्ट्रप्रमुख म्हणुन त्याच्याकडे सध्या बघितलं जात होतं. एकाच वेळी सैनिकी नेतृत्व, युद्धनैपुण्य, इंटेलिजन्स नेटवर्कवर मजबुत पकड, मध्यपुर्वेत सर्व शिया भागांमध्ये आपले हस्तक गट तयार करुन ते पोसणे, अमेरिका, इस्राएल आणि सौदीच्या हितसंबंधांना अडथळे आणणे आणि खुद्द ईराणमध्ये आपला राजकीय आणि सैनिकी दबदबा कायम राखणे अशा अनेक गोष्टी जनरल सुलेमानी लीलया पार पाडत होता त्यामुळे, ईराणविरोधी आघाडीचा तो क्रमांक एक चा शत्रू होता यात शंकाच नाही. त्यामुळे त्याच्यावर आज ना उद्या हल्ला होणार यात कुणालाही शंका नव्हती.
 
 
 
पण, सुलेमानीच्या हत्त्येने लगेच युद्धाचा भडका उडेल असं मानणं चुकीचं ठरेल, कारण.....
 
 
ईराण आणि अमेरिका, मित्र देश यांना खुल्या युद्धाने होणाऱ्या आर्थिक सर्वनाशाची पुरेपूर कल्पना आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षात एक अलिखित करार झाल्यासारखी स्थिती आहे, तो करार असा-- आपापल्या देशात प्रत्यक्ष युद्ध नं करण्याचा करार!असं का? आणि मग संघर्ष होईल कुठे? याची उत्तरे थोडा विचार केल्यावर मिळतील ती अशी...
 
 
स्ट्रेट ऑफ होर्मुझचं व्यापारी महत्व..
 
 
पर्शियन आखातात असलेल्या स्ट्रेट ऑफ होर्मुझमधुन अख्ख्या आशियाचा तेल पुरवठा होतो. अमेरिकेने ईराणी भूमीवर थेट युद्धाला तोंड फोडल्यास ईराण होर्मुझ मधुन होणाऱ्या जलवाहतुकीला वेठीस धरेल. फक्त कल्पनाच केलेली बरी, होर्मुझ फक्त १ आठवडा व्यापारी जहाजांसाठी बंद केल्यास संपुर्ण आशियात काय हाहाकार उडेल याची. आशिया फक्त होर्मुझवर अवलंबुन आहे अशातला भाग नाही, पण तो सगळ्यात गतिमान आणि जवळचा रस्ता आहे त्यामुळे सर्वाधिक वापरला जातो. हा मार्ग बंद झाल्यास चीन आणि भारताच्या अर्थव्यवस्था अभुतपुर्व कोंडीत सापडतील आणि याचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होईल. यामुळे कुणीही सर्वंकष युद्धाचा विचार करणार नाही. याला पर्याय म्हणजे दोन्ही बाजु येमेन- सीरिया, इराक आणि बलुचिस्तान मध्ये एकमेकांना कुरघोडी करण्याचा आटोकाट प्रयत्न करतील...
 
 
बलुचिस्तान- ईराण विरोधातील नवीन ऍक्सिस बेस?
 
 
एकेकाळचा कलात म्हणजेच सध्याचा बलुचिस्तान हा इराणच्या पूर्व सीमेवर आहे. खनिज संपत्ती, तेल, गॅस आणि सोनं यांनी गच्च भरलेला हा प्रदेश आकाराने प्रचंड मोठा पण लोकसंख्या अत्यंत विरळ असलेला पाकिस्तानी प्रांत आहे. याला स्वतःचा समुद्रकिनारा आहे पण गेल्या ७० वर्षात बलुचिस्तानने स्वतः ला कधीही पाकिस्तानी प्रदेश मानलं नाही त्यामुळे तिथे सतत सशस्त्र स्वतंत्रतावादी आंदोलने होत असतात.
 
 
 
बलुचिस्तान- ईराण सीमेवर पाकिस्तानने गेल्या कित्येक वर्षांपासुन वसवलेले तालिबानी अड्डे आहेत. सध्या अमेरिका तालिबानसोबत शांती वार्ता करत आहे, जेणेकरून अमेरिकन सेना अफगाणिस्तानातुन बाहेर काढता येईल. अशा स्थितीत तालिबान त्यांचे ईराण सीमेवरील तळ ईराणविरोधात वापरण्याची अनुमती देऊ शकतं. बलुचिस्तानची अत्यंत विरळ लोकसंख्या, लांबलचक इराण सीमा, पाकिस्तानी सुन्नी अतिरेकी गटांचे ईराणमध्ये वारंवार होत असलेले हल्ले आणि ईराणी सुन्नी गटांचे ईराणसोबत होत असलेले सततचे संघर्ष या बाबींमुळे अमेरीकन ऍक्सिस देशांना बलुचिस्तानमधुन ईराणविरोधात छुपं युद्ध लढणं तुलनेने सोपं आहे.
 
 
 
भारतात पुलवामा येथे ज्या दिवशी हल्ला झाला त्याच्या आदल्या दिवशी ईराणी रिव्होल्यूशनरी गार्ड्सवर पाकिस्तानी गटांनी केलेल्या हल्ल्यात २७ ईराणी सैनिक मारले गेले होते. त्यानंतर लगेचच ईराणमधील पाकिस्तानविरोधी गटांनी बलुचिस्तानच्या मकरान कोस्टल हायवेवर रात्री टाकलेल्या छाप्यात पाकिस्तानी नौसेनेचे १४ सैनिक मारले गेले होते. या स्थितीचा अमेरिकेने फायदा उचलायचा ठरवल्यास बलुचिस्तान ही अत्यंत उपयुक्त जागा ठरू शकते आणि येमेनमध्ये हात पोळलेला सौदी अरेबियासुद्धा यात उत्साहाने भाग घेईल.
 
 
 
यावरुन एक गोष्ट परत परत सिद्ध होते, आरामको वरील धाडसी हल्ल्यानंतरही सौदी- अमेरिका यांनी ईराणविरोधात कोणतीही आततायी सैनिकी कारवाई केली नाही, तर त्यांनी शांतपणे संधीची वाट पाहुन जनरल कासीम सुलेमानीला टिपला. आता याचा हिशोब कुठे चुकता करायचा हे इराण ठरवेल, अर्थात उघड सैनिकी संघर्षाच्या भानगडीत नं पडता.
 
 
थोडक्यात काय तर, आपल्या भूमिवर युद्ध व्हावं अशी सौदी- ईराण दोघांचीही ईच्छा नाही, त्यामुळे हा शिया- सुन्नी संघर्ष येमेन- सीरिया- इराक- बलुचिस्तानच्या जमिनीवर होईल आणि परत एकदा लाखो निष्पाप मुस्लिमांचा परत एकदा बळी चढवला जाईल, हीच नियतीची ईच्छा दिसते!
 
--- विनय जोशी