आसाममधील सांस्कृतिक युद्ध.
         Date: 17-Dec-2020

आसाममधील सांस्कृतिक युद्ध.

- प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk )

आसामचे मंत्री डॉ. हिमंत बिस्वा सरमा यांनी १० डिसेंबर २०२० रोजी आसाम आंदोलन हुतात्मा दिवसाच्या निमित्त तेजपूर येथे केलेल्या भाषणाचा हा शब्दशः उतारा आम्ही येथे देत आहोत.

जरी हे एक राजकीय भाषण असले तरी आसाममध्ये सध्या जे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय युद्ध पेटलेले आहे ते आपल्या सर्वांसमोर आणणे गरजेचे वाटल्याने आम्ही हा लेख आयसीआरआरवर प्रकाशित करत आहोत. आसामच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील समकालीन घडामोडी समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

अलीकडेच आसाम विधानसभेत श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र येथे मिया संग्रहालय स्थापन करण्याची जोरदार मागणी मुस्लिम आमदारांनी केली. या मागणीच्या आडून बांगलादेशी घुसखोरांची मिया संस्कृती भारतीय मातीत रुजवण्याचा मोठा डाव आहे.

ही अशी मागणी करण्याचे धाडस हे केवळ एआययूडीएफच्या वाढत्या राजकीय सामर्थ्याचे संकेत आहेत. हा पक्ष बांगलादेशचा कट्टर समर्थक असल्याची नेहमीच टीका केली जाते.

डॉ. हेमंत बिस्वा यांच्या शब्दात-

आजच्या या मंगलदिनी मी, भारतीय जनता पक्ष, आसाम सरकार आणि आसाम मधील जनता आसाम आंदोलनाच्या सर्व हुतात्म्यांना मनापासून श्रद्धांजली वहातो. आम्ही आज खरोखर भाग्यवान आहोत की आजच्या या दिवशी सोनितपूर जिल्ह्यातील आसाम आंदोलनात हुतात्मा झालेल्यांच्या कुटुंबातील बरेचसे सदस्य आज या सोहळ्यास उपस्थित आहेत. मी येथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना नम्र अभिवादन करतो. मला आशा आहे की यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी कायमच असतील. आणि यांचा सल्ला नेहमीच मार्गदर्शक ठरेल. आसाममध्ये उसळलेल्या मोठ्या जनआंदोलनानंतर १९८५ मध्ये आसामचा करार करण्यात आला. सन १९७८ मध्ये मंगळदोई लोकसभा मतदार संघातील तत्कालीन खासदार कै. श्री. हिरालाल पटवारी यांच्या निधनानंतर आसामच्या आंदोलनाला चालना मिळाली. आणि ६ डिसेंबर १९७९ मध्ये झालेल्या सार्वजनिक परिषदेमुळे मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली.

आसाममधील तळागाळातील लोकांनी या आंदोलनात उत्स्फूर्तपणे उडी घेतली. आणि १५ ऑगस्ट १९८५ या दिवशी ८६० लोकांनी हौतात्म्य स्वीकारले. आसाम आंदोलनातील १० डिसेंबर हा दिवस कायम संस्मरणात राहील असाच आहे. या दिवशी खारगेश्वर तालुकदार यांनी आपला जीव गमावला. या आंदोलनातील ते पहिले हुतात्मा ठरले.

मला अजूनही आठवतंय, त्यावेळी मी सहाव्या इयत्तेत शिकत होतो. आम्ही लखटोकिया येथील बेगम अबिदा अहमद हिच्या घरासमोर तिने उमेदवारी अर्ज भरल्याचा निषेध केला होता. त्यानंतर अचानक के. एस. गिल यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने पोलिसांची एक तुकडी येऊन थडकली आणि तिने आमचा निषेध हाणून पाडला आणि बेगम अबिदा अहमदला पोलीस संरक्षणात बारपेटा येथे नेले.

भवानीपूर येथे असंख्य लोक आंदोलन करण्यासाठी जमले. त्यात आपले पहिले हुतात्मा खारगेश्वर तालुकदार हे ही होते. त्या दिवशी मध्यरात्रीच त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर आंदोलन अधिकच तीव्र पणे सुरूच राहिले. अखेर १५ ऑगस्ट १९८५ ला आसाम करारावर स्वाक्षरी झाल्यानंतरच ते संपले.

आसाम आंदोलन जरी संपले असले तरी आमच्या पैकी एकही आसामी असे म्हणणार नाही की आमच्या सर्व मागण्या मान्य झाल्या किंवा आमचे उद्दिष्ट साध्य झाले. ज्या हेतू साठी ८६० लोकांनी आपले प्राण गमावले तो हेतू पूर्णत्वास गेलाच नाही. एकही आसामी व्यक्ती आपल्या हृदयावर हात ठेऊन हा दावा करूच शकत नाही की ज्या हेतूने एवढ्या लोकांनी हौतात्म्य स्वीकारले तो हेतू पूर्ण झाला आहे.

मला असे वाटते की आसाम आंदोलन संपुष्टात आले पण आसामी लोकांच्या जीवनातील अडचणी संपल्या नाहीत. आणि म्हणूनच आसाम आंदोलनातील मुख्य अटींची पूर्तता व्हावी असे आजही आसामी लोकांना वाटते. उदाहरणार्थ, नागरिकांची संपूर्ण राष्ट्रीय नोंदणी किंवा आसाम कराराच्या सहाव्या कलमाची अंमलबजावणी इत्यादी. परंतु दिवसेंदिवस आपल्याला जाणीव होतेय की ज्या राष्ट्राला वाचविण्यासाठी आपण सर्वानी १९७८ मध्ये आसाम चळवळीत उडी घेतली होती त्या राष्ट्राला वाचविणे तर दूरच पण समस्या अधिकच गंभीर होत आहे. आपला समाज अधिकच धोक्यात आला आहे. आपल्या समाजाच्या अस्तित्वावरील प्रश्नचिन्ह अधिकच गडद होतेय.

काही दिवसापूर्वीच आसाम विधानसभेचे सदस्य शेरमन अली यांनी आसामची आणि आसाम कराराची ऐतिहासिक वास्तू असलेल्या श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र येथे मिया संग्रहालय स्थापन करण्याची मागणी केली होती. मिया म्युझियममध्ये आपल्याला काय ठेवायचे आहे असे पत्रकारांना विचारले असता श्री. शेरमन अली यांनी सांगितले की आम्ही तेथे लुंगी आणि साडी ठेवू. ज्या जागेवर ८६० लोकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं आणि आपल्या समुदायाला वाचवण्याची, पुनरुज्जीवित करण्याची धडपड केली त्याच समुदायातील काही लोक मिया संग्रहालयासाठी वकिली करतात. श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र हा आमच्या समुदायाचे श्रद्धास्थान आहे.

आता आसाममधील परिस्थिती इतकी वेगाने बदलली आहे की नागाव आणि मोरगाव या महत्त्वाच्या शहरांमध्ये आसामी लोकांना आव्हान देण्यासाठी तेथील शाळांना मियां पब्लिक स्कूल असे नाव देण्यात आले आहे. आसाम चळवळीला जे लोक छुपा विरोध करत होते तेच लोक आज उघडपणे समोर येऊन ठाकले आहेत आणि आपल्या समाजाला त्यांनी सरळसरळ आव्हान दिले आहे. मिया संग्रहालयाच्या मागणी सोबतच त्यांनी मिया शाळा सुरु करून आसामी भाषा नष्ट करण्यासाठी मिया काव्य लिहायला सुरुवात केली आहे. हे एक मोठे सांस्कृतिक युद्ध आहे.

आसाम मधील काही विचारवंतच या लोकांना पाठीशी घालत आहेत हे आपले दुर्दैव आहे. आपल्या राज्यात अशी परिस्थिती उद्भवली आहे की जर आज भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सतर्क कार्यकर्ते आसाममध्ये नसते तर कदाचित आसामच्या मुख्यमंत्र्यांपैकी एखाद्याने श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र येथे मिया संग्रहालयाचे उद्घाटन केले असते. आज भारतीय जनता पक्ष राजकीय पक्ष म्हणून काम करत नाही परंतु या परक्या मिया संस्कृतीसमोर मोठी भिंत उभारण्याचे काम तो करत आहे. जर भारतीय जनता पक्षाने आसाम आंदोलनाची आग लोकांमध्ये जागृत ठेवली नसती तर बद्रुद्दीन अजमलने केव्हाच आसाम काबीज केले असते.

 

Assam war _1  H 

काही दिवसांपूर्वीच जेव्हा आमच्या तरुणांनी बारचलला मतदारसंघात बाईक आणि स्कूटरवरून मिरवणूक काढली होती तेव्हा काहींनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्याचे धाडस केले होते. आज आसाममध्ये असे बरेच लोक आहेत जे भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यात पाकिस्तान जिंकल्यावर जल्लोष करतात आणि भारत जिंकल्यावर अस्वस्थ होतात. अशा अनेक प्रसंगांना आम्हाला सामोरे जावे लागते. जेव्हा सिलचर येथे आमच्या पक्षाचे लोक जातात तेव्हा पाकिस्तान जिंदाबाद या घोषणांनी त्यांचे स्वागत केले जाते. आता आपल्या समाजासमोर कोणते गंभीर आव्हान आहे याचा जरा विचार करा.

दहाच दिवसांपूर्वी अजमल फाउंडेशनला परदेशातून १३० कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. आसाम मध्ये इस्लामीकरणाचे बियाणे रोवता येण्यासाठी ही रक्कम वापरण्यात येईल. ही बातमी जुनी होत नाही तोवर दुसरी बातमी उजेडात आली की अजमल फाउंडेशन प्रमाणेच अनफर फाउंडेशनलाही ८ कोटींची परदेशी देणगी आसामचे इस्लामीकरण करण्याकरता देण्यात आली आहे. याचा अर्थ असा की आपल्या विरुद्ध आता परदेशी शक्ती, परदेशी निधी यांच्या रूपाने नवीन आव्हान उभे आहे.

मला असे वाटते जेव्हा आपण एक समुदाय म्हणून हे आव्हान स्वीकारतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट निश्चित केली पाहिजे. ती म्हणजे आपली आपल्या समाजाची व्याख्या काय आहे. जर आपण आपल्या समाजाची व्याख्या केवळ दास, कळीत आणि ब्राह्मण एवढीच मर्यादित ठेवली तर आताच्या परिस्थितीतील सांस्कृतिक आक्रमणाच्या बाबतीत आपण कधीही यशस्वी होऊ शकत नाही. जेव्हा आपण आदिवासी किंवा आसामी लोकांबद्दल बोलत आहोत तेव्हा त्या दोघांची व्याख्या ही सर्वसमावेशक असणे आवश्यक आहे. तरच सर्वजण मिळून आपल्यासमोरील सांस्कृतिक आव्हानाचा सामना करू शकू. जर आसामी लोकांची व्याख्या करताना आपण तिथले मूळ रहिवासी (आदिवासी) आणि भारतीय वंशाच्या इतर लोकांकडे (जे आसाम मध्ये मागील ५० वर्षांपासून वास्तव्यास आहेत ) दुर्लक्ष केले तर आपण या सांस्कृतिक आणि राजकीय आव्हानाला एक दिवसही रोखू शकणार नाही.

पण जेव्हा आपण आसामी भाषा बोलणाऱ्या स्थानिक लोकांना घेऊन, वेगवेगळ्या आसामी जमातींना एकत्र घेऊन तसेच जे भारताच्या इतर भागातून आसाममध्ये येऊन स्थायिक झाले आहेत अशांना मुख्य प्रवाहात एकत्र आणले तरच आपण हे आव्हान पेलू शकू. नाहीतर आपला समाज कमकुवत होईल आणि आजकालच्या विचारवंतांनी जशी अजमलसारख्या लोकांशी तडजोड केली तशी तडजोड करणे आपल्याला भाग पडेल.

आज आसाम मधील काही बुद्धिवंतांना वाटते की आम्ही भूपेन डेकाची निर्दयपणे हत्या करणाऱ्याला, २० मार्च १९८३ मध्ये बलीन नाथ, शाम कुंदू, बिरेन मिश्रा, प्रसन्ना बरुआ, पलाश राजबोंगशी, जयराम बरुआ यांची हत्या करणाऱ्यांना विसरून जावे. आज त्यांना आसामच्या भाषेवरील आणि संस्कृतीवरील आक्रमण विसरायचे आहे ! त्यांना भाजपाला विरोध करण्यासाठी सर्वानी एकत्र यावे असे वाटते. पण मी त्यांना सांगू इच्छितो की आसामसाठी भाजप हे आव्हान नाही, तर आसामची भाषा आणि संस्कृतीला नष्ट करणाऱ्या लोकांविरुद्ध आपण एकत्र येऊ. आज आसामला अजमलच्या आक्रमकतेविरुद्ध एकजूट करण्याची गरज आहे. आणि हे आसाममधील बुद्धिवंतांनी समजून घेणे आवश्यक आहे.

मला अतिशय दुःख होते जेव्हा अजमल फाऊंडेशनला इस्लामीकीकरण करण्यासाठी परदेशातून मिळालेल्या निधीचे वाटप होत असताना काही विचारवंत तेथे उपस्थिती लावतात आणि अजमलची प्रशंसा करतात. पण ते कधीच या पैशाच्या उगमस्थानाविषयी चकार शब्द काढत नाहीत. हेच लोक जेव्हा काझीरंगा येथील आपल्या जमिनी हिसकावून घेतात, किंवा बोर्डोआ येथील महापुरुष श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थानावर अतिक्रमण करतात तेव्हा हे विचारवंत त्याविरोधात आवाज उठवण्याचे नैतिक धैर्य का दाखवत नाहीत? मला वाटते की आसाममधील काही डावे विचारवंत आज आपल्या संपूर्ण समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जर असेच होत राहिले तर एक दिवस असा येईल की आपण आपली जमीन, आपली संस्कृती,आपले राजकीय आणि आर्थिक हक्क गमावून बसू. आणि आपला आसामी समाज आपली ओळख हरवून बसेल.

लोकहो, आज आसाममधील दोन संस्कृतींमध्ये लढाई चालू आहे, एक अजमलच्या नेतृत्वाखाली चाललेली इस्लामीकरणाची आणि दुसरी आपले महापुरुष शंकरदेव यांच्या आदर्शांची आणि शिकवणुकीची लढाई. आसाममधील या दोन विरोधाभासी संस्कृतींमध्ये या निवडणुकांमध्ये स्पर्धा होईल.

मिया संस्कृतीचे हे आव्हान धीराने स्वीकारण्याचे आवाहन मी आज लोकांना करीत आहे. आज तेजपूर येथील बिहुतोली येथील एक ठिकाण त्यांच्या प्रार्थनास्थळात परावर्तित करण्यात आले आहे आणि आम्ही आसामी काही न करता केवळ ते पाहत बसलोय. काही विचारवंतांना असे वाटते की या शंकर-अजान भूमीवर आसामींनी आपला माथा टेकलाच पाहिजे. परंतु मी त्यांना हे सांगू इच्छितो की या आक्रमक शक्तीचा सामना करण्याची वीर लचित यांची परंपरा आमच्या शंकर, अजान आणि माधव यांच्यात आहे. आमच्यातही हे करण्याचे धैर्य आणि सामर्थ्य आहे आणि ते आम्हाला करावेच लागेल !

आज या लोकांच्या आक्रमकतेमुळे आसाम विधानसभेच्या १२६ मतदारसंघांपैकी जवळपास ३५ ते ४० मतदारसंघ आपण गमावले आहेत. लोअर आसाम मधील लोकांना त्यांच्या राजकीय हक्कांबरोबरच आपला जमीनजुमला यावरचा हक्क सोडून देऊन गुवाहाटी शहरात आश्रय घ्यावा लागला आहे. बारचल आणि तेजपूर मध्ये आपल्याला जीव मुठीत धरून रहावे लागत आहे. डॉ. भूपेन हजारिका यांनी प्रतिनिधित्व केलेल्या नाबोईचासारख्या मतदारसंघात आपल्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. आसाम करारावर स्वाक्षरी झाल्यानंतरही आमच्या जीवनात काही फरक पडलेला नाही. आम्हाला याचा प्रतिकार करण्यासाठी मोठ्या तयारीनिशी उतरावे लागेल.

सन्माननीय लोकहो, आमची भारतीय जनता पार्टी आमची जात, माती आणि भेती वाचविण्यासाठी २०१६ मध्ये सत्तेत आली होती. आम्ही एनआरसी चे काम हाती घेतले. पण प्रतीक हजेला नावाच्या एका व्यक्तीच्या अहंकारामुळे एनआरसीचा इच्छित हेतू पूर्ण होऊ शकला नाही हे मी नाकारत नाही. परंतु एनआरसी मध्ये सुधारणा करून लवकरच आम्ही आपला इच्छितt हेतू साध्य करू असा निर्णय आसाम सरकारने घेतला आहे.

जेव्हा आम्ही सत्तेत आलो तेव्हा श्रीमंत शंकरदेवांच्या जन्मस्थानावर या परदेशी लोकांनी अतिक्रमण केलेले होते. आम्ही ते हटविण्यास सक्षम आहोत. आता आम्ही ते जन्मस्थान सुवर्णमंदिरासारखे सुशोभित करण्याचे नियोजन करीत आहोत. पूर्वीच्या योजनेप्रमाणे राज्य सरकारने राज्याच्या शिक्षण विभागासंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. आता सर्व शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासाचे माध्यम विचारात न घेता, दहावीपर्यंत आसामी भाषेचा अभ्यास करणे अनिवार्य असेल. आम्ही भूमिहीन भारतीय नागरिकांना म्याडी पट्टे प्रदान केले आहेत जेणेकरून आम्ही आमच्या जमिनींवर आपले हक्क प्रस्थापित करू शकू. आमच्या भूमीवर या संशयित बांगलादेशींनी किती प्रमाणात अतिक्रमण केले आहे याचा शोध आम्ही उपग्रहाच्या माध्यमातून घेतला आहे आणि योग्य वेळ येताच त्यांना त्या भूखंडावरून हाकलून देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आसाम विधानसभा मतदारसंघ मर्यादित करण्याच्या निर्णयाबद्दल मी आमचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांचे आभार मानतो.

कॉंग्रेस सरकारच्या कार्यकाळात विधानसभेच्या जागा अशा पद्धतीने आखल्या गेल्या की आसाममधील लोक अखेरीस सर्व राजकीय हक्क गमावू शकतील. मला आशा आहे की या निवडणूकीनंतर मर्यादित मतदारसंघामुळे आसामी समाजाचे हित जपले जाईल. तसेच या निर्णयामुळे आसामी लोकांना कोणाच्याही मदतीशिवाय कोणताही मतदारसंघ जिकंण्यात काही अडचण येणार नाही. आणि हे असे घडून येण्यासाठी आसामी लोक मोदींकडे आशेने बघत आहेत. आता येणारे प्रत्येक आव्हान आपण स्वीकारले पाहिजे. पद्मा हजारिका म्हणाले त्याप्रमाणे आसाममध्ये भाजीपाल्याची लागवड ही संशयित नागरिकांकडून केली जाते. ही लागवड करताना त्या पिकांमध्ये ते लोक अतिशय घातक अशी रसायने मिसळतात. आसामी जनतेमध्ये शारीरिक कमकुवतपणा येऊन ते शारीरिक आणि मानसिकरित्या पांगळे व्हावेत हाच अंतस्थ हेतू ठेऊन हे केले जाते. एका रात्रीत एका लहान वांग्याचे इंजेक्शनद्वारे मोठ्या वांग्यात रूपांतर केले जाते. अश्या घातक रसायनांच्या वापरामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. अश्या प्रकारची इंजेक्शन देऊन वापरलेल्या मासे आणि भाजीपाल्यामुळे यकृत आणि मूत्रपिंड रोग्यांची संख्या वाढली आहे. आपली अन्नाची गरज भागविण्यासाठी आम्हाला स्वावलंबी झाले पाहिजे.

आसाम चळवळीच्या २५ वर्षानंतर आज परिस्थिती बदलली आहे. रस्त्यावर उतरून होणाऱ्या आंदोलनाला आता मर्यादा आहेत. आपण आंदोलन करण्यासाठी आधुनिक पद्धतीचा वापर केला पाहिजे. आज त्या लोकांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आमच्यावर आक्रमण केले आहे. अजमल च्या नेतृत्त्वाखाली त्यांनी आमच्याकडून वैद्यकीय व अभियांत्रिकीच्या जागा हिसकावून घेण्यासाठी संघटना उभारल्या आहेत. फार्मासिस्ट, नर्स, लॅब असिस्टंट यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांबद्दल आसामी तरुणांच्या औदासिनतेचा फायदा घेऊन या क्षेत्रात त्यांनी हातपाय पसरले आहेत. आमच्या औदासीन्यामुळेच मुख्य प्रवाहात येण्याची संधी त्यांना मिळाली आहे.

आपल्या आसामी लोकांना जमिनी विकण्याऐवजी आपण जास्त किंमत मिळते म्हणून या लोकांना जमिनी विकत आहोत. आपल्या समुदायाने याविषयी विश्लेषण करणे गरजेचे आहे. त्यांनी आमच्यावर सांस्कृतिक, शेती, शैक्षणिकरित्या आक्रमण केले आहे. हे लोक काही राजकारण्यांच्या आश्रयामुळे पोलीस यंत्रणेतही मोठ्या मोठ्या नियुक्त्यांवर आहेत. आणि हे सर्व करण्यासाठी त्यांना इस्लामिक कट्टरतावाद्यांकडून मदत मिळते.

मला फार वाईट वाटले जेव्हा गेल्या वर्षी १० डिसेंबर रोजी जपानचे पंतप्रधान आसामला भेट देणार म्हणून सुशोभित केलेल्या हुवाहाटी मधील रस्ते आणि रेलिंग या संशयित बांगलादेशींनी एकापाठोपाठ एक तोडून टाकले. आणि त्याचवेळी श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र नष्ट करण्याचा कटही रचला. परंतु याबाबतीत काही विचारवंतांनी डोळ्यावर कातडे ओढून घेतले आहे. आसाम आंदोलनाला विरोध करणारे काही विचारवंत आता आपल्या समाजाचा कार्यभार स्वीकारण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि यासाठी ते मौलाना मदानीबरोबर चर्चेचा प्रयत्न करीत आहेत. आज आपल्या समाजासमोर हजारो आव्हाने आहेत. परंतु आपण जनतेच्या आशीर्वादाने आणि भाजपच्या ४२ लाख कार्यकर्त्यांच्या मदतीने हा कट उधळून लावू असा मला विश्वास वाटतो. अजमलला दिसपूरच्या जवळपासही फिरकू देणार नाही याची मी खात्री देतो.

लोकहो, मला खात्री आहे की आपण यशस्वी होऊ. आसामचा विकास आता वेगळ्या टप्प्यावर येऊन पोचला आहे. आज आपण यासाठी कठोर मेहनत करत आहोत. विकासाच्या मार्गावर आपल्या समुदायाला घेऊन चालले आहोत. अरुणोदय आणि अरुंधती सारख्या अनेक नवीन योजना आपल्याला आत्मनिर्भर करत आहेत. आणि आपण एकजूट होत आहोत. शिक्षण हेच आपले मुख्य शस्त्र आहे हे लक्षात ठेवा. तसेच आपल्याला शेतीमध्ये स्वावलंबी होऊन नवीन क्रांती घडवावी लागेल.

तेजपूरमध्ये हुतात्मा स्मारकासाठी आदरणीय श्री. पद्मा हजारीका यांनी आसाम सरकारकडून अडीच कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. आणि पुढच्याच महिन्यात हे पैसे सोनितपूरच्या उपायुक्तांना देण्यात येतील असे आश्वासन मी देतो.

वरील उतारा आसामचे मंत्री डॉ. हिमंत बिस्वा सरमा यांनी केलेल्या भाषणाचा आहे.