पाकिस्तानच्या दहशतवादी कृत्यांसंबंधित कारवाईचा बीजिंग एफएटीएफच्या बैठकीत आढावा घेणार.
         Date: 10-Apr-2020

पाकिस्तानच्या दहशतवादी कृत्यांसंबंधित कारवाईचा बीजिंग एफएटीएफच्या बैठकीत आढावा घेणार.

 

दहशतवादी कृत्यांना निधी पुरवल्याप्रकरणी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय समुदायाला दिलेल्या वचनांचा आढावा येत्या फिनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ ) च्या बैठकीत घेतला जाईल. ही बैठक येत्या २१ ते २६ जून दरम्यान बीजिंग मध्ये घेतली जाणार आहे.

 

जूनपर्यंत पाकिस्तानने दहशतवादी कृत्यांना निधी पुरवणे थांबवले नाही किंवा त्याविषयी काही ठोस पाऊल उचलले नाही तर पाकिस्तान " ब्लॅक लिस्ट " होऊ शकते अशी चेतावणी फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानला समितीकडून देण्यात आली होती. यामध्ये पाकिस्तान अपयशी ठरला तर त्याला खूप मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागेल असा इशाराही देण्यात आला होता.

 

पाकिस्तान सध्या "ग्रे लिस्ट " मध्ये आहे. पाकिस्तानला दिलेल्या २७ कसोट्यांपैकी केवळ १४ कसोट्या  तो पूर्ण करू शकला आहे. जूनपर्यंत उर्वरित बाबींची पूर्तता तो करू शकला नाही तर त्याची रवानगी "ब्लॅक लिस्ट " मध्ये करण्यात येईल. भारताने वारंवार पाकिस्तानच्या दहशतवादाविरुद्ध एफएटीएफ मध्ये आवाज उठल्यामुळे आणि त्याला अमेरिका, इंग्लंड आणि युरोपियन देशांनी (फ्रांस आणि जर्मनी ) पाठिंबा दिल्यामुळे जून  २०१८ मध्ये पाकिस्तानला " ग्रे लिस्ट " मध्ये टाकण्यात आले होते.  

 

पाकिस्तानने दहशतवादी कृत्यांना आळा घालावा आणि अश्या कृत्यांना निधी पुरविणे थांबवावे म्हणून एफएटीएफने पाकिस्तानला काही कसोट्यांची पूर्तता करण्यास सांगितले होते. जर तो या कसोट्यांवर खरा उतरला तर त्याचे नाव ग्रे लिस्ट मधून काढून टाकण्यात येईल आणि जर तो या कसोट्या पूर्ण करू शकला नाही तर त्याला ब्लॅक लिस्ट मध्ये जावे लागेल याची स्पष्ट चेतावणी पाकिस्तानला देण्यात आली होती.


pakistani PM_1  

 

द डॉन गेल्या महिन्यापासून पाकिस्तानचे गोडवे गात आहे. पाकिस्तान एफएटीएफच्या सर्व कसोट्यांचे पालन करण्यासाठी प्रयत्न करीत आहे आणि लवकरच तो सगळ्या कसोट्या पार करेल असा हवाला डॉन देत आहे. पाकिस्तानने सक्रियपणे दहशतवादविरोधी पावले उचलली असल्याचेही डॉन लोकांच्या मनावर ठसवत आहे. उर्वरित १३ कसोट्या पाकिस्तान लवकरच पूर्ण करेल. उर्वरित १३ कसोट्यांमधील आठ महत्त्वाच्या कसोट्या कठीण असल्या तरी त्यावर पाकिस्तानने काम सुरु केले असल्याची माहिती डॉनने दिली.  बेकायदेशीर पैशांविरूद्ध अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित अधिकारी सहकार्य करीत आहेत. मूल्य हस्तांतरण सेवा आणि सीमापार चलन नियंत्रणाची अंमलबजावणी देखील केली जात आहे असे डॉन च्या अहवालात म्हटले आहे. 

 

कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या संस्था दहशतवाद्यांना निधी पुरवणाऱ्या संस्थांवर बारीक लक्ष ठेवून आहेत. अश्या संस्था किंवा व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जात असल्याचे द डॉन च्या अहवालात सांगितले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक निर्बंधाच्या बाबतीतही आवश्यक ती पूर्तता करण्याकडे पाकिस्तान लक्ष देत आहे.

 

-प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk)

 

Source: hindustantimes

 

FATF meet in Beijing: Pakistan’s action on terror funding to be reviewed.