चायना व्हायरस - दुसऱ्या शीतयुध्दाची नांदी?
         Date: 18-Apr-2020

चायना व्हायरस - दुसऱ्या शीतयुध्दाची नांदी?

 

जागतिक महामारीमुळे जगाच्या रंगमंचावर पुन्हा एकदा शीतयुद्धाचे नाट्य घडणार आहे. त्यातील प्रमुख पात्रे अर्थातच अमेरिका आणि कम्युनिस्ट चीन आहेत. या महानाट्याची सुरुवात २०१३ मध्ये शी जिनपिंग सत्तेवर आल्यापासून झाली. माओ नंतर सर्वात शक्तिशाली नेता कुणी असेल तर तो म्हणजे शी जिनपिंग. 

 

कोविद-१९ चे परिणाम -

 

कोविद-१९ चे परिणाम अनेक पटींनी जगाला भोगायला लागणार आहेत. जागतिक क्रमवारीत सगळ्यात मोठा बदल होईल. याचा परिणाम संयुक्त राष्ट्रसंघावरही मोठ्या प्रमाणात होणार आहे. विशेषतः जेव्हा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला चीनने ज्या प्रकारे वापरून घेतले त्यावरून तर नक्कीच असे दिसून येते.  जागतिक सुरक्षेकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करून आपले खोटे लपविण्यासाठी आणि आपली प्रतिमा वाचविण्यासाठी चीनने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा वापर करून घेतला. या महामारीवर जास्तीत जास्त चर्चा होणे आवश्यक असताना सुद्धा तसे न होता डब्ल्यूएचओ चीनची प्रतिमा उंचावण्यात मग्न होता. अमेरिका २०१७ मध्येच संयुक्त राष्ट्रसंघाच्या शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेतून बाहेर पडला आहे. त्यानंतर लगेच २०१८ मध्ये अमेरिकेने यूएनच्या मानवी हक्क परिषदेतूनही आपले अंग काढून घेतले. ट्रम्प तेव्हापासूनच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला निधी न देण्याविषयी सुचवत आहेत.

 

जागतिक व्यापार संघटनेसह अनेक संघटना चायना व्हायरसमुळे तुटण्याचा धोका वाढला आहे. जागतिक पुरवठा साखळीसुद्धा चीन मधून दुसरीकडे जाण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जाणारे देश चीनवर नुकसान भरपाईसाठी चीनवर दावे ठोकू शकतात. एका अहवालात असे म्हटले गेले आहे की फक्त जी -७ देशांकडूनच ४  ट्रिलियन डॉलर्सहून अधिक दावा केला जाऊ शकतो. चीन हे सगळे दावे निःसंशय फेटाळून लावेल. आणि याचे परिणाम चीनला या देशांकडून भोगायला लागतील. हे देश दुखावले जाऊन संघर्ष करू लागतील.

 

भू-राजकीय महत्त्व

 

चीनचे सरकारी धोरण सध्या अनेक वादांच्या फेऱ्यातून जात आहे. जगभर पसरलेले चीनचे नेटवर्क सध्या चीनच्या सरकारी धोरणाचे कौतुक करण्यात व्यस्त आहे. यासाठी  त्यांनी सर्व प्रसारमाध्यमांवर मुख्यत्वे इंग्रजी भाषा वापरली आहे. परंतु  हुकूमशाही राजवट कशी महत्त्वाची आहे हे सांगण्याचे त्यांचे सर्व प्रयत्न लोकशाहीच्या तुलनेत फोल ठरले आहेत. चीनने या रोगाबद्दल खरी माहिती जगाला दिली असती तर आज त्यांचं नक्कीच कौतुक झालं असतं.

 

आपली भौगोलिक राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी चीनने वैद्यकीय उपकरणांच्या पुरवठ्यावर नियंत्रण बसवले आहे. हुवेई ५ जी नेटवर्क न घेणाऱ्या देशांना चीन मास्कचा सप्लाय करणार नाही असे तिथली प्रसारमाध्यमे ओरडून ओरडून सांगत आहेत. चीनने अमेरिकन सैन्यावर हा विषाणू वुहानमध्ये पसरवल्याचा आरोप केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून ट्रम्पनी या व्हायरसला चायना व्हायरस असे संबोधले.

 

केवळ अमेरिकाच नव्हे तर बरेचसे देश या महामारीसाठी चीनला या ना त्या प्रकारे जबाबदार धरत आहेत. पाश्चात्य देश चीन निर्मित वस्तूंवरील अवलंबित्व कमी करण्याच्या विचारात आहेत. जपानने आपल्या कंपन्या चीनमधून हलविण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. अमेरिकन कंपन्या सुद्धा एक एक करून चीनबाहेर पडू लागल्या आहेत. परिणामी व्यापार युद्ध भडकण्याची चिन्हे आहेत. चीनने याविषयी या कंपन्यांना आणि देशांना चेतावणी दिली आहे.

 

अमेरिकेने इंडो-पॅसिफिकमधील दक्षिण कोरिया, न्यूझीलंड आणि व्हिएतनाम या देशांसह व्यापार, तंत्रज्ञान सामायिक करण्याबद्दल दोनदा बैठक घेतली आहे. सध्याच्या चालू संकटापुरतंच नव्हे तर जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत चालू राहण्याच्या उद्देशाने ही बैठक घेतली गेली. चीन आणि अमेरिका यांच्यात शाब्दिक चकमकी चालू असतानाच ट्रम्प यांनी तैवानसोबतच्या एका करारावर स्वाक्षरी केली. अमेरिका तैवानच्या सुरक्षेला धोका पोहोचवू शकणाऱ्या सर्व देशांविरोधात तैवानच्या बाजूने उभा ठाकेल अश्या आशयाचा तो करार होता. चीनने याचा कडाडून विरोध केला.

 
cold war 2.0_1  

 

सामरिक महत्त्व लक्षात घेऊन राष्ट्रपती झाल्यानंतर शी जिनपिंग यांनी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हची घोषणा केली. मुख्यत्वे दहा क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मॅन्युफॅक्चरिंग पॉवरहाऊस बनविण्यासाठी मेक इन चायना २०२५ ची घोषणा सुद्धा केली. अमेरिकेला मागे टाकून लष्करी आणि आर्थिक महासत्ता बनण्याचा त्यांचा उद्देश आहे. 

 

संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर (एससीएस) दावा करून त्यावर केवळ चीनची सत्ता असल्याचं त्यांनी दाखवून दिलंय. अमेरिकेने याला जोरदार विरोध करत आपली युद्धनौका या प्रदेशात घुसवली होती.  याबद्दल कोणत्याही चर्चेला चीनचा नकार आहे. त्यांनी  एससीएसमधील वादग्रस्त बेटांवर लष्करी छावण्या उभारल्या आहेत. २०१७ मध्ये जपानच्या सेनाकाकू बेटावर आपला हक्क सांगितलाय. डोकालामसाठी भारताच्या हद्दीवर ७२ दिवस ठाण मांडून बसलेत.

 

चीनची आक्रमकता वाढतच जातेय. २०१७ मध्ये ट्रम्पनी चीनला आपला सामरिक प्रतिस्पर्धी म्हणून घोषित केलं. ट्रम्पचं चीनसोबत असलेलं युद्ध हे केवळ व्यापारी युद्ध नाहीये तर दोन्ही देशांपैकी जागतिक महासत्ता कोण यासाठीचं युद्ध आहे.

 

चीनची अग्रगण्य तंत्रज्ञान कंपनी हुवेईवर अमेरिकेने सुरक्षेचं कारण देऊन बंदी घातली आहे. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर आपल्या मित्र राष्ट्रांवर सुद्धा त्यांनी बंदीसाठी दबाव टाकला. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ट्रम्प यांनी अमेरिकन कंपन्यांना चीन सोडण्यास सांगितले.

 

शीतयुद्ध २.० हे पहिल्या शीतयुद्धासारखं सीमा ठरविण्यासाठी नाहीये. तर ही लढाई इतर देशांवर तांत्रिक, आर्थिक आणि वैचारिक वर्चस्व मिळविण्याकरिता असणार आहे. त्याच्या एका बाजूला अमेरिका आणि दुसऱ्या बाजूला चीन अश्या दोन महासत्ता आहेत.

 

- प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk)

 

Source: ThePrint

 

Covid-19 is deadlier than the world thinks it to be. It will start Cold War 2.0