व्हायरसमुळे तियानानमेन सारख्या प्रसंगाला पुन्हा एकदा चीनला तोंड द्यावे लागणार.
         Date: 12-May-2020

व्हायरसमुळे तियानानमेन सारख्या प्रसंगाला पुन्हा एकदा चीनला तोंड द्यावे लागणार.

 

कोरोनाव्हायरसच्या उद्रेकामुळे बीजिंगला जगाच्या वाढत्या रोषास सामोरे जावे लागत आहे. अमेरिकेसारख्या देशाशी वैर येत आहे. तसंही १९८९ च्या तियानानमेन स्क्वेअर क्रॅकडाऊननंतर जगात चीन-विरोधी भावना वाढीसच लागली आहे. असे चीनच्या अंतर्गत अहवालात म्हटले आहे आणि ही स्थिती दिवसेंदिवस वाढतच जाणार असल्याचा इशारा या अहवालाने दिला आहे.

 

या भयंकर महामारीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या नेतृत्वाखाली चीन विरोधी भावना भडकत आहेत. चीन विषयी एवढा द्वेष लोकांच्या मनात पसरलाय की बीजिंगला अगदी वाईटातल्या वाईट परिस्थितीशी सामना करण्यासाठी तयार राहावे लागेल. जागतिक महासत्ता असलेले दोन देश चीन आणि अमेरिका यांच्यात सशस्त्र संघर्षही होऊ शकतो आणि त्यासाठी बीजिंगने तयारी ठेवावी. या प्रकरणाचे गांभीर्य लवकरात लवकर ओळखावे असे अहवालात म्हटले आहे.

 

हा अहवाल चायना इन्स्टिट्यूट्स ऑफ कंटेम्पररी इंटरनॅशनल रिलेशन्स (सीआयसीआयआर), राज्य सुरक्षा मंत्रालयाशी संबंधित विचारवंतांचा एक समूह    आणि चीन मधील गुप्तचर संस्थेचे काही सदस्य यांनी मिळून सादर केला.

 

या अहवालासंबंधी खूप गुप्तता पाळण्यात आली होती. म्हणजे तो प्रत्यक्ष कोणाला दाखविण्यात आला नाही. सीआयसीआयआरने सुद्धा याविषयी भाष्य करण्यास नकार दिला.

 

हाँगकाँग, तैवान आणि दक्षिण चीन समुद्रातील विवादित प्रदेशातील गैरवापर आणि तंत्रज्ञानाच्या पद्धतींविषयी असलेले वाद आणि दक्षिण चीन समुद्रातील अरेरावी या सर्व गोष्टींमुळे अमेरिका आणि चीन एकमेकांना पाण्यात पाहत आहेत. त्यांच्यातील वैर वाढतच चाललेय.

 
xi_1  H x W: 0

 

चीनची वाढणारी अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षेत होणारे बदल याकडे वॉशिंग्टन आणि पाश्चात्य देश एक आव्हान म्हणून पाहत आहेत. जनतेचा विश्वास हळू हळू डळमळीत करून सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीला रसातळाला नेण्याचे अमेरिकेचे उद्दिष्ट आहे असे अहवालात म्हटले आहे.

 

कोरोनाव्हायरसमुळे निर्माण झालेल्या चीनविरोधी भावना चीनच्या बेल्ट आणि रोड प्रकल्पाला घातक ठरू शकतात. या प्रकल्पातील देशांना अमेरिका आर्थिक आणि लष्करी साहाय्य करून तेथील सुरक्षा धोक्यात आणू शकते.

 

तीन दशकांपूर्वी, तियानानमेननंतर अमेरिका आणि अनेक पाश्चात्य सरकारांनी चीनवर शस्त्रे विक्री आणि तंत्रज्ञान हस्तांतरणावर निर्बंध घातले होते.

 

तियानानमेन स्क्वेअर प्रोटेस्ट काय आहे पाहूया.

 

तियानानमेन स्क्वेअर प्रोटेस्टला तियानानमेन स्क्वेअर इन्सिडेंट किंवा जून फोर्थ इन्सिडेंट म्हणतात. १९८९ मध्ये  तियानानमेन स्क्वेअर इथे १५ एप्रिल ला विद्यार्थ्यांनी तत्कालीन सरकारविरुद्ध आंदोलन केले आणि त्यांचे हे आंदोलन ४ जून रोजी जबरदस्तीने संपविण्यात आले. सरकारने मार्शल लॉ डिक्लेअर केला आणि बीजिंग मधील महत्त्वाची ठिकाणे काबीज करण्यासाठी लष्कर पाठविले. लष्कराने आंदोलनकर्त्यांवर अंदाधुंद गोळीबार केला आणि तोफेचा भडिमारही केला. यात हजारो विद्यार्थी ठार झाले आणि अनेक जखमी झाले.

 

कम्युनिस्ट जनरल सेक्रेटरी हू योबंग यांच्या निधनानंतर वेगाने होणाऱ्या आर्थिक आणि सामाजिक बदलांना खीळ बसल्यामुळे आणि या उठावामुळे लोकांना देशाच्या भविष्याविषयी चिंता लागून राहिली.

 

१९८०च्या दशकातील बाजारपेठेतील सुधारणांमुळे काही लोकांना त्याचा फायदा झाला पण इतरांना मात्र खूप नुकसान सोसावे लागले. आणि एकपक्षीय राजकीय व्यवस्थेच्या वैधतेविषयी शंका उपस्थित करून गेले. देशात महागाई, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी वाढली. तसेच राजकीय घडामोडींवर निर्बंध लादले गेले. विद्यार्थ्यांना अधिकाधिक जबाबदारीची कामे मिळावीत, घटनेप्रमाणे हक्क मिळावेत, लोकशाही, पत्रकारितेविषयी स्वातंत्र्य आणि मुख्य म्हणजे बोलण्याचे स्वातंत्र्य मिळावे यासाठी हा उठाव केला गेला. यात सुमारे एक मिलियन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि ते तियानानमेन स्क्वेअर येथे जमले.

 

हा उठाव वाढतच गेला आणि चीन मधील ४०० शहरातील विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन पोचला. आणि हा उठाव  आपल्या पक्षाला घातक असल्याने तो चिरडून टाकायच्या उद्देशाने मार्शल लॉ घोषित केला गेला. तब्बल तीन लाख सैन्य बीजिंग मध्ये जमा केले गेले. आणि ४ जून च्या पहाटे या सैन्याने विद्यार्थ्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारले.

 

या नरसंहाराविरुद्ध आंतरराष्ट्रीय समुदाय आणि मानवाधिकारवाल्यानी चीनची निंदा केली. चीनवर अनेक निर्बंध लादले गेले. चीनवरील हे निर्बंध पुढे २००४ मध्ये उठविले गेले. पण घाव मात्र तसेच राहिले. आत्ता तशीच परिस्थिती उद्भवली आहे. या व्हायरसमुळे जगातील अनेक देश चीन वर भडकले आहेत. हा व्हायरस कमी होण्याची आणि त्यावर लस मिळण्याची खोटी की पुन्हा तियानानमेन सारखे निर्बंध चीन वर लादले जाण्याची शक्यता आहे.

 

शीतयुद्धाची नांदी

 

या अहवालाविषयी माहिती असणाऱ्यांपैकी एकाने म्हटले आहे की चिनी गुप्तचर संस्था चीनच्या या आवृत्तीला " नोव्हिकोव्ह टेलिग्राम" म्हणून संबोधतात. १९४६ मध्ये वॉशिंग्टनमधील सोव्हिएत राजदूत निकोलाई नोव्हिकोव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि लष्कर यावर खूप मोठा ताण आला होता.

 

अमेरिकेचा मॉस्को येथील राजदूत जॉर्ज केनानच्या " लॉन्ग टेलिग्राम " ला दिलेले नोव्हिकोव्हीचे हे उत्तर होते. जॉर्ज केनान ने या टेलिग्राम मध्ये सोव्हिएत युनियनला पश्चिमेसोबत शांतीवार्ता करण्याची इच्छा दिसत नाही आणि हीच त्यांची दीर्घकालीन रणनिती आहे असे म्हटले होते.

 

दोन्ही दस्तऐवजांमुळे शीत युद्धाच्या दोन्ही बाजूची रणनीती समजून घेण्यास मदत झाली.

 

चीनने वुहान शहरात प्रथम हा व्हायरस दिसल्याची बातमी लपवून ठेवली आणि व्हायरस विषयी प्राथमिक माहिती दडपल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. आणि चीन मात्र हे वारंवार नाकारत आहे.

 

चीनने या व्हायरसचा प्रसार रोखण्यात यश मिळविले आहे आणि कोविद-१९ विरुद्धच्या जागतिक युद्धात पहिल्या पातळीवर भूमिका बजावण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे चीन अमेरिका आणि इतर देशांना वैद्यकीय मदत आणि इतर आवश्यक गोष्टी पुरविण्यात अग्रेसर आहे.

 

परंतु चीनला हा रोग जगभर पसरविला असल्याच्या आरोपाला सामोरे जावे लागत आहे. या व्हायरसमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता २ लाखाच्यावर गेली आहे. आणि ३ मिलियन लोकांना याची लागण झाली आहे.

 

शी जीनपिंगनी आधुनिक युद्ध जिंकण्यासाठी सैन्याची सुसज्ज पुनर्रचना करून नव्याने रणनीती आखली आहे. आशिया खंडात जवळपास ७० वर्षाहून अधिक काळ सैन्याचे वर्चस्व असलेल्या अमेरिकेला शह देण्यासाठी चीनने त्यांचे हवाई आणि नौदल सामर्थ्य वाढविले आहे.

 

- प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Content Generation)

 

Source: Reuters

 

Exclusive: Internal Chinese report warns Beijing faces Tiananmen-like global backlash over virus