हॉंगकाँग नवीन तिबेट बनण्याच्या मार्गावर
         Date: 11-Jul-2020

हॉंगकाँग नवीन तिबेट बनण्याच्या मार्गावर.

 

चीनने नवीन सुरक्षा कायदा लागू केला आहे ज्यामध्ये स्वातंत्र्यासाठी धडपड करणाऱ्यांना अथवा स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणाऱ्यांना गुन्हेगार ठरविले जाईल. तिबेटचे जे झाले त्याच्याच वाटेवर आज हॉंगकॉंग आहे. १९५१ मध्ये तिबेटी लोकांना स्वायत्ततेचे स्वप्न दाखवून ज्या प्रकारे त्यांची फसवणूक चीनने केली त्याप्रमाणेच आज हॉंगकॉंगचीदेखील फसवणूक चीन सरकार करत आहे असे निर्वासित तिबेटी नेता लोबसांग सांगाय यांनी म्हटले आहे. 

 

सत्तर वर्षांपूर्वी चीनने एका १७ कलमी कराराखाली तिबेटियन लोकांची स्वायत्तता अबाधित राहील असे वचन दिले होते. परंतु तसे न करता त्यांनी हिमालयीन जनतेवर अतिशय अत्याचारी नियम लादले आणि येथील सरकारचे हक्क हळूहळू काढून घेतले. जर तुम्ही तिबेटमधील घटनाक्रमाचा अभ्यास केला आणि हॉंगकॉंग मध्ये घडणाऱ्या घटनांची त्याच्याशी तुलना केली तर तुम्हाला दोन्हींमधील साम्य ठळकपणे दिसून येईल. तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा याना भारतात निर्वासिताचे जीणे जगावे लागतेय. हेच मोठे उदाहरण तुमच्यासमोर आहे. असे सांगाय म्हणाले.

 

' द्विशासित एक देश ' असे वचन चीनने तिबेटला दिले होते. पण १७ कलमी करारावर तिबेटियन नेत्यांनी सह्या केल्याच्या दुसऱ्या क्षणापासून चीनने त्यातील प्रत्येक तरतुदीचे उन्मत्तपणे उल्लंघन केले आहे. हेच हॉंगकॉंगमध्ये बघायला मिळतंय. त्यांना मूलभूत हक्क देण्याचा कायदा करण्याचे वचन दिले गेले. तसेच अनेक तरतुदींचे वचन दिले गेले परंतु त्यातील एकही गोष्ट अमलात न आणता चीन बळजबरी करत असल्याचे दिसून येतेय. ७.५ मिलियन लोकसंख्या असलेल्या अर्ध-स्वायत्त हॉंगकॉंगवर लादलेल्या सुरक्षा कायद्यावर त्यांनी कडकडून टीका केली. हॉंगकॉंगमधील लोकांच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत कायम असू असे ट्विट त्यांनी केले.

 

स्वातंत्र्य मागणे हा गुन्हा कसा काय असू शकतो? चीनच्या या कायद्यामुळे संपूर्ण जग त्यांच्यावर टीकेची झोड उठवत आहे.


Hong Kong protest_1 

 

चीनने अशीच सुरक्षा विषयक कायद्याच्या नावाखाली तिबेटला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झगडणाऱ्या लोकांची गळचेपी केली. त्यांचा आवाज बंद केला. चीनविरुद्ध आवाज उठवल्यामुळे चीनच्या भीतीने १९५९ मध्ये दलाई लामांनी तिबेटमधून पळ काढला आणि ते भारताच्या आश्रयाला गेले.

 

"हाँगकाँगमधील लोक मूलभूत मानवाधिकार आणि लोकशाहीसाठी प्रयत्न करत आहेत. जे मुळातच त्यांचे आहे त्यासाठी आज त्यांना झगडावे लागतेय. अत्ता जे हॉंगकॉंगमध्ये घडलंय ते तिबेटमध्ये कैक वर्षांपूर्वी घडून गेलेय. राष्ट्रीय सुरक्षा कायद्यामुळे तिबेटचा बळी गेला आहे. दुर्दैवाने त्याची सुरुवात हाँगकाँगमध्ये केली जात आहे." असे सांगाय म्हणाले.

 

सांगाय यांना भारताने आश्रय दिल्याबद्दल चीन नाराज आहे. त्यांच्या वास्तव्यास त्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. सांगाय यांनी भारताला चीनपासून सावध राहण्यास सांगितले आहे. सीमावादासंबंधी चीनने केलेल्या कोणत्याही वक्तव्यावर विश्वास ठेवू नका असा सावधगिरीचा इशारा त्यांनी भारताला दिला आहे.

 

१९६२ पासून चीन आणि भारत फार मोठ्या सीमावादात अडकला आहे. दोन्ही देश प्रबळ आहेत. दोघांकडेही अण्वस्त्रे आहेत. चीन रोज काही ना काही कागाळ्या करून एक एक इंच भूमी हडप करत आहे. चीनने आपले सैनिक माघारी बोलावले असले तरी त्यांच्यावर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. सीमेवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवले पाहिजे असे सांगाय यांनी म्हटले आहे.

 

भारताने चिनी ऍप्स वर घातलेल्या बंदीला आमचा पाठिंबा आहे. जगभरात विखुरलेले तिबेटीयन्स एकमेकांशी संपर्क ठेवण्यासाठी विचॅट या ऍपचा वापर करतात. हे ऍप सुद्धा चिनी आहे. गेल्या सहा ते सात वर्षांपासून हे ऍप न वापरण्याविषयी मी लोकांना सावध करत असतो. या ऍप वर चीनची नजर आहे. तिबेटमध्ये असलेल्या आपल्या नातेवाईकांशी बोलण्यासाठी हेच ऍप वापरावे लागते. हे ऍप सोडून बाकी सर्व ऍप्स ना चीनने तिबेटमध्ये बंदी घातली आहे. हे ऍप सुरक्षित नाही. आपण सगळे संकटात पडू असे सांगाय यांनी सांगितले. मला खात्री आहे की लवकरच आम्ही तिबेटियन या ऍप ला पर्याय शोधून काढू. असे सांगाय म्हणाले.

 

हॉंगकॉंगचा तिबेट होण्यापासून वाचावा यासाठीची सांगाय यांची खूप तळमळ दिसून येते.

 

- प्राची चितळे जोशी.

 

( ICRR Media Monitoring Desk)

 

Source: youtube, google, Wikipedia, twitter, Hong Kong Free Press

 

Hong Kong on the road to becoming a new Tibet.