शार्ली एब्दो- निर्भीड पत्रकारितेचं दुसरं नाव
         Date: 02-Sep-2020
शार्ली एब्दो- निर्भीड पत्रकारितेचं दुसरं नाव

(ICRR Radical Ideologies ) 

 

charlie hebdo france atta 
२०१५ सालच्या जानेवारी महिन्यात फ्रान्समध्ये शार्ली एब्दो नावाच्या मासिकाच्या ऑफिसमध्ये काही इस्लामी कट्टरवादी लोकांनी घुसखोरी करून बेछूट गोळीबार केला होता. मासिकाच्या ऑफिसमधल्या लोकांना आणि तिथल्या पत्रकारांना ह्या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आलं होतं. प्रेषित मोहोम्मद ह्यांच्या संदर्भात काही चित्र/ कार्टून्स काढल्याच्या संतापात किंवा निषेधात हा हल्ला करण्यात आला होता. त्या हल्ल्यात १७ लोकांनी आपला जीव गमावला होता. ही घटना जगभरात फार गाजली होती. अगदी आपल्याकडे भारतातसुद्धा त्याची भरपूर चर्चा झाली होती. फ्रान्सबाहेर फारसं परिचित नसलेलं शार्ली एब्दो हे नाव आपल्याला त्या वेळी पहिल्यांदा समजलं होतं.


ह्या हल्ल्यात सहभागी असणाऱ्यांना मदत करणाऱ्या १३ जणांवर न्यायालयीन सुनावणी आणि कारवाई घटनेनंतर पाच वर्षांनी ह्या आठवड्यात चालू होतेय. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे शार्ली एब्दो ने ह्याच आठवड्यात तीच तथाकथित वादग्रस्त चित्र/ कार्टून्स पुन्हा छापायचं ठरवलं आहे.
 
 
ही चित्र छापून सामान्य जनतेसमोर आल्यास 'निर्भीड पत्रकारिते'चं हे एक उत्तम उदाहरण ठरेल. राजकीय, आर्थिक, धार्मिक किंवा इतर कोणत्याही दबावाला बळी न पडता आपलं मत तटस्थपणे मांडणे आणि त्यासाठी प्रसंगी ठाम भूमिका घेणे, ही अपेक्षा स्वतंत्र वृत्तपत्र किंवा मासिकांकडून असते. दुर्दैवाने तसं होत नाही आणि 'निर्भीड पत्रकारिता' ही केवळ टॅग लाईन ठरून बाह्य दबावाखाली संपादकीय मागे घेण्याची नामुष्की तथाकथित आघाडीच्या वृत्तपत्रांवर येते. ' शार्ली एब्दो 'चं उदाहरण अशाप्रकारच्या सर्व भारतीय पत्रकारितेने डोळ्यासमोर ठेवण्याची गरज आहे.
 
 
मध्य आशियात आयसिसने थैमान घातल्यावर राजकीय आश्रित ह्या नावाखाली येणाऱ्या लोंढ्याचं युरोपियन देशांनी स्वागत केलं. त्याच जनतेने युरोपियन देशांची समीकरणं आणि शांतता आता बिघडवायला घेतली आहे. नॉर्वे आणि स्वीडनमध्ये उसळलेल्या दंगली हे त्याचं ताजं उदाहरण. उशिराने का होईना युरोपियन राष्ट्रांना ह्या उपद्रवाची उपरती व्हायला लागली आहे.
 
 
धार्मिक अतिरेक आणि त्यातून उद्भवणारा दहशतवाद ह्यापुढे युरोपियन जनता नमतं घेणार नाही, हा संदेश शार्ली एब्दो च्या निमित्ताने युरोपात पोचवला मदत होईल अशी आशा करूयात.
 
 
- सारंग लेले, आगाशी.