वुहान येथील व्हायरोलॉजी इन्स्टिटय़ूटमध्ये लष्करी शास्त्रज्ञांचा समावेश असल्याचा अमेरिकेचा आरोप.

26 Apr 2021 21:47:51

वुहान येथील व्हायरोलॉजी इन्स्टिटय़ूटमध्ये लष्करी शास्त्रज्ञांचा समावेश असल्याचा अमेरिकेचा आरोप.  

 

- प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk)


वुहानमधील प्रयोगशाळेतील वटवाघुळाचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ लष्करी शास्त्रज्ञांसमवेत प्राण्यांच्या विषाणूच्या तपासणीच्या कामात गुंतले होते असा अमेरिकेने आरोप केला आहे. लष्कर आणि शास्त्रज्ञ यांच्यातील संबंध चीन कधीच मान्य करणार नाही.

 

गेल्या नऊ वर्षांपासून नवीन विषाणू शोधण्यासाठी आणि रोग पसरवणाऱ्या जीवशास्त्रातील " काळ्या बाजू" विषयी अभ्यास करण्यासाठी राज्यसरकारच्या वुहान इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजी (डब्ल्यूआयव्ही) या संस्थेने देशव्यापी योजना सुरु केली होती असे रविवारी द मेल ने म्हटले आहे.

 

गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात कोविड-१९ च्या विषाणूचा अनुवांशिक क्रम प्रकाशित करणाऱ्या प्रमुख चिनी शास्त्रज्ञाने या प्रकल्पाच्या सुरुवातीच्या ३ वर्षातच एकट्याने १४३ नवीन आजार शोधून काढले होते.

 

ह्या व्हायरस डिटेक्शन प्रोजेक्ट्चे नेतृत्व राज्यातील शास्त्रज्ञ आणि लष्करी शास्त्रज्ञ या दोघांनी केले आहे. अमेरिकेने वुहान इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजी (डब्ल्यूआयव्ही) आणि लष्कर यांच्यात संगनमत असल्याचे आरोप केले आहेत. आणि आता त्या आरोपांची पुष्टी देखील केली आहे.

 
 
wuhan lab_1  H
 

या प्रकल्पाचे पाच टीम लीडर्स आहेत. " बॅट वूमन ' या नावाने ओळखली जाणारी डब्ल्यूआयव्ही मधली विषाणूतज्ञ शी झेन्गली ही या पाच जणांपैकी एक आहे. वटवाघुळांचे नमुने गोळा करण्यासाठी गुहांमध्ये / लेण्यांमध्ये तिच्या अनेक चकरा होत असल्याने तिला हे नाव मिळाले आहे. तसेच बायोटेररिझम विषयी सरकारी सल्लागार आणि वरिष्ठ सैन्य अधिकारी काओ वुचुन यांचा सुद्धा या पाच लोकांमध्ये समावेश आहे.

 

अमेरिकेचे आरोप फेटाळून लावत " डब्ल्यूआयव्हीमध्ये कोणतेही लष्करी काम नाही. अमेरिकेची माहिती चुकीची आहे." असे प्रो. शी झेन्गली यांनी गेल्या महिन्यात स्पष्ट केले.

 

कर्नल काओ हे पीपल्स लिबरेशन आर्मीच्या अकॅडेमी ऑफ मिलिटरी मेडिकल सायन्सेसचे संशोधक म्हणून त्या प्रकल्पावर रुजू आहेत. ते इतर लष्करी शास्त्रज्ञांबरोबर काम करतात आणि लष्करी जैव सुरक्षा तज्ज्ञ समितीचे (मिलिटरी बायोसेफ्टी एक्स्पर्ट कमिटी ) संचालक आहेत. ते केम्ब्रिज विद्यापीठात शिकलेले महामारी रोग शास्त्रज्ञ आहेत. तसेच वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या सल्लागार मंडळावरही ते होते. नवीन व्हायरसवर लस तयार करण्यासाठी चीनमधील अव्वल बायोडिफेन्स तज्ज्ञ मेजर जनरल चेन वे यांच्या नेतृत्त्वाखाली त्यांना नेमण्यात आले.

 

गेल्या महिन्यात ब्रिटन, अमेरिका आणि इतर १२ देशांनी चीनवर WHO ला महत्त्वाची माहिती आणि नमुने  देण्यास नकार दिल्याबद्दल टीका केली होती. प्रयोगशाळेतील गळती शक्यच नसल्याचे या देशांचे म्हणणे आहे. चीनने जी थोडीफार माहिती दिली त्यात खूपच विसंगती असल्याचे लंडनमधील बायोसिक्युरिटी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. महामारीच्या स्रोताविषयी आजही चीनने तोंड उघडलेले नाही. प्राण्यांपासून हा विषाणू पसरला की प्रयोगशाळेत तयार केला असताना चुकून तो बाहेर आला यासंबंधी काहीच माहिती नसल्याने केवळ अंधारात तीर मारणेच चालू आहे.

 

रविवारी द मेल ने सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये ' वन्य प्राण्यांनी संक्रमित केलेल्या रोगजनकांचा शोध ' या नावाच्या एका प्रमुख प्रकल्पाची माहिती दिली आहे. ज्यामध्ये मानवांना संक्रमित करणारे जीव शोधून त्यांच्या उत्क्रांतीची चौकशी केली जाईल. हा प्रकल्प २०१२ मधील आहे आणि चीनच्या नॅशनल नॅचरल सायन्स फाउंडेशनने याला आर्थिक मदत केली होती. २०१९ मध्ये झालेल्या एका कॉन्फरन्समध्ये या प्रकल्पाच्या प्रमुखांनी " संसर्गजन्य रोग प्रतिबंधक आणि नियंत्रण याचे एक विशाल नेटवर्क आकार घेत आहे. " असे म्हटले होते.

 

ह्या प्रकल्पाच्या एका रिव्यू मध्ये " मोठ्या प्रमाणात नवीन व्हायरस सापडले आहेत ज्यामुळे आंतरराष्ट्रीय विषाणू विज्ञान समूहामध्ये खळबळ माजेल. जर याचे विषाणू मानवात आणि प्राण्यात पसरले तर मानवी आरोग्यासाठी मोठा धोका निर्माण होईल आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होईल. तसेच सामाजिक जीवन अस्थिर होईल " असे म्हटले होते.

 

चिनी सरकारसाठी काम करणारे पण विरोधी मत असणारे लिआनचाओ हान म्हणाले की, काओच्या सहभागामुळे लष्करी शास्त्रज्ञ बायो-डिफेन्स कार्यात सहभागी असल्याच्या शंकेला वाव मिळतो.

 

भविष्यातील युद्धाचा भाग म्हणून बायोटेक्नॉलॉजीला चीनने गांभीर्याने घेतले आहे. आता ते आक्षेपार्ह आहे की बचावात्मक हाच मोठा मुद्दा आहे असे कोविड १९ च्या उत्पत्तीबद्दल सरकारतर्फे अभ्यास करणारे, जैविक, रासायनिक आणि आण्विक तज्ज्ञ डेव्हिड आशर म्हणाले.

 

IAN Birrell  यांच्या लेखाचा स्वैर अनुवाद.

 

Source : dailymail, google, youtube

 

 

 

 

 

Powered By Sangraha 9.0